वधुवर सूचक मंडळ © श्री.किरण कृष्णा बोरकर

वधुवर सूचक मंडळ
” ह्या वर्षी अमोलचे लग्न ठरले नाही तर पुढच्या वर्षीपासून तुला घरी आणणे बंद ” हातातली घंटा जोरजोरात बडवत रघुवीर कडाडले .
त्यांचा आवाज ऐकून धुप आणि अगरबत्तीचा मंद सुवास अनुभवत असलेला तो खडबडून जागा झाला तर आता लवकरच भक्तांच्या घरी जाण्यासाठी तोंडाला फेशियल पॅक आणि डोळ्यावर काकडीचे काप ठेवून आराम करीत असलेला उंदीरही बेडवरून पडला.
” , हा पूजा करतोय की धमकी देतोय ?” थोड्या चिंतीत आवाजात त्याने आपल्या उंदराला विचारले.
” घ्या, करा आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण .मग हे असेच चढून बसतात आणि काहीही नवस मागतात .पण तुम्हाला तर सवय झालीय तथास्तु म्हणायची ‘ तो शेपटी आपटत काकडीचे काप तोंडात टाकीत छद्मीपणे म्हणाला.
” अरे माझे ठीक आहे पण तू का दचकलास ? “त्याने हसत विचारले.
” का म्हणजे ? आता पुढच्या वर्षी ह्याचे घर आपल्यासाठी बंद झाले तर नैवेद्याचे काय ? प्रमिला काकू किती हौसेने दर दिवशी वेगवेगळे नैवेद्य बनवितात .एकदम डायट वाले .म्हणून आपले वजन कंट्रोलमध्ये राहते.” तो चिडून नवीन काकडीचे काप डोळ्यावर ठेवीत म्हणाला.
” हो हो पण ते पुढच्या वर्षी ना .अजून एक वर्ष आहे आपल्या हातात .करू काहीतरी ” तो सोंड हलवीत बेफिकीरपणे म्हणाला.
” म्हणजे आता तुम्ही लग्नेही जुळवणार तर ? देवा काय हे .अजून काय काय करणार तुम्ही स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी तुम्ही कितीही करा आपले भक्त सुधारणार नाहीत.” असे बोलून त्याने शेपटी जोरात आपटली.
” कितीही झाले तरी ते आपलेच आहेत.आज वर्षानुवर्षे आपली त्याच भक्तिभावाने सेवा करतायत .भले पद्धती बदलल्या तरी मनातील श्रद्धा तीच आहे .” तो हसत म्हणाला .
अंबादास चाळीत कोपर्यावरच्या खोलीत नुकतेच एक ऑफिस उघडले होते. विनायक वधुवर सूचक मंडळ असे नाव दिले होते .पण विनायकाचा फोटो कुठेच दिसत नव्हता. दहा बाय दहाच्या खोलीत एक तरुण टेबल वर लॅपटॉप ठेवून काम करताना दिसायचा तर माळ्यावर उंदीर बिनधास्त फिरत होता.
रघुवीर त्याच रस्त्याने ऑफिसला जायचे. दोन दिवस ते फक्त नजर टाकून जात होते पण आत शिरायची हिंमत होत नव्हती .शेवटी आज धीर करून आत शिरलेच.
समोरच्या खुर्चीत बसलेला तरुण त्यांच्याकडे पाहून ओळखीचे हसला जणू काही तो त्यांचीच वाट पाहत होता .
” मी रघुवीर ” ते हात जोडून म्हणाले .
” मी अथर्व ” समोरच्या तरुणाने उत्तर दिले.
” तुमचे लग्न करायचे आहे का ?” अथर्वने असे बोलून लॅपटॉप उघडला .
” काहीही काय ? माझा मुलगा लग्नाचा आहे .वय वर्षे सत्तावीस .बँकेत आसिस्टंट मॅनेजर आहे .” रघुवीर कदम एका झटक्यात बोलले.
” अरे सॉरी , तुम्हाला इतका मोठा मुलगा आहे हे पटत नाही ” अथर्व हसत म्हणाला तसे रघुवीर मनातून सुखावले.
” कोणी आहे का बघण्यात एखादी चांगली मुलगी ” त्यांनी हळुवारपणे विचारले.
” आहेत ना .पण चांगल्या मुलीची तुमच्या मते व्याख्या काय ? ” अथर्व लॅपटॉपमध्ये पाहत म्हणाला .
“चांगली म्हणजे सासू सासर्याना सांभाळणारी , घरात सगळ्याचा आदर करणारी .नवऱ्याच्या संसारात हातभार लावणारी . पारंपरिक सण साजरे करणारी ” रघुवीर म्हणाले.
“म्हणजे तुम्हाला सून हवीय ” अथर्व पुटपुटला.
” म्हणजे ? ” रघुवीर चिडून म्हणाले
” आहो हल्ली बायको आणि सून असे दोन प्रकारे मुली पाहतात .बायको पाहिजे म्हणजे फक्त नवऱ्याकडे लक्ष देणारी आणि सून पाहिजे म्हणजे संपूर्ण कुटुंब सांभाळणारी . बायको फक्त नवऱ्यासोबत राहते .तिला स्वतःचे आणि नवऱ्याचे आई वडील नको .कोणाची जबाबदारी नको .आपले आणि नवऱ्याचे सुख पहायचे मजामस्ती करायची . ह्या मुली जास्त शिकलेल्या ,श्रीमंत आणि आधुनिक परिवारातून आलेल्या असतात त्यांची नोकरी ही चांगली असते काहींचा व्यवसाय असतो . सून पाहिजे तर पदवी पर्यंत शिकलेल्या , मध्यम वर्गीय ,साधारण नोकरी करणाऱ्या ,घरात आर्थिक मदत करणाऱ्या , उपवास करणाऱ्या .नवऱ्याशी ऍडजस्ट करणाऱ्या ” अथर्व शांतपणे म्हणाला .
” हे असे असते होय हल्ली . आम्हाला आमचा मुलगा सुखी झालेला हवाय .त्यामुळे जी मिळेल ती चालेल .आम्हीच ऍडजस्ट करू ” शेवटी रघुवीरमधील बाप जागा झालाच .
” ओके चला माहिती सांगा पटापट .” खिडकीत खुडबुड करणाऱ्या उंदरकडे हळूच पाहत अथर्वने लॅपटॉप जवळ ओढला.
आरती समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहत होती. बिल्डिंग कसली हो .साधारण तीस वर्षे जुनी तीन मजल्याची चाळच ती. तिचे वडील सरकारी खात्यात क्लार्क .ही कशीबशी ग्रॅज्युएट झाली आणि छोट्याश्या ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून काम करते. दरवर्षी गणपती आले की घरगुती मखर बनवून विकायची . खोट्या गोष्टींचा तिला राग होता .तिच्या तिखट स्वभावामुळे कोण मुलगा लग्न करत नाही अशी बापाची तक्रार .
त्या दिवशी मखर बनवायचे सामान घरी घेऊन येत होती.भली मोठी सामानाची गोण घेऊन मैत्रिणीच्या मागे स्कुटरवर कशीबशी बसली आणि दोघी निघाल्या.
गणेशोत्सव जवळ आल्यामुळे रस्त्यावर बरीच गर्दी होती .संथ गतीने ट्रॅफीक पुढे सरकत होता .पाऊस आल्यामुळे रस्त्यावर ओलावा होता आणि अचानक स्कुटर घसरली . ती आणि तिची मैत्रीण दोघीही खाली कोसळल्या .आपल्या पेक्षा सामानाचे काय झाले याकडे आरतीने पाहिले लक्ष दिले आणि सामानाची अवस्था पाहून तिने खच्चून दोन शिव्या हासडल्या. मैत्रिणीने शांतपणे एका दिशेने बोट दाखविले .एक म्हातारा स्कुटरचा धक्का लागून बाजूला बसला होता .इतके लागूनही त्याच्या चेहऱ्यावर वेदना दिसत नव्हती.
” ओ बाबा ,सरळ बघून चाला ना .किती नुकसान झाले बघा .आता याची भरपाई कोण करेल ? ” आरतीच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला .
” मी भरेन ना .फक्त समोरच्या बँकेत मला घेऊन चला .मी पैसे देतो ” ते बाबा लागलीच म्हणाले.
” चला , आता तर आरती हट्टाला पेटली. भांडण न होता नुकसानभरपाई मिळतेय यात ती खुश होती. म्हाताऱ्याचा हात धरून बँकेत शिरली .
” त्यांचे केवायसी करावे लागेल.”काउंटरवरची स्त्री चेहऱ्यावर सुरकुती न आणता म्हणाली.
म्हाताऱ्याने हताशपणे आरतीकडे पाहिले.
” माझ्या खात्यात माझेच पैसे आहेत. पण तरीही माझी ओळख मलाच पटवून द्यावी लागते.” म्हातारा हसत म्हणाला. “गावी जायचे आहे म्हणून पैसे काढायला आलो तर ही परिस्थिती.”
” तुमचे मोठे साहेब कुठेयत ” आरतीने शांतपणे विचारले तर त्या स्त्रीने फक्त अमोल कदमकडे बोट दाखविले.
आरती निमूटपणे त्या बाबांचा हात धरून अमोलच्या केबिनमध्ये शिरली . अमोलने त्रासिक नजरेने तिच्याकडे पाहिले .
” ह्या बाबांना पैसे हवेत ” ती अमोलला म्हणाली .
” मग मी देऊ का ? ” अमोलने उत्तर दिले.
” त्यांचे खाते आहे बँकेत ” आता आरती चिडली.
” मग घ्या खात्यातून काढून ” अमोल ही तयार होता.
” केवायसी करायला सांगितली आहे ” अजूनही आरती शांत होती
” नियम असतात बँकेचे ते पाळावे लागतात .” अमोल उत्तरला
” आहो नाहीत पेपर त्यांच्याकडे आता ,देतील नंतर .इतके काटेकोरपणे नियम कधीपासून पाळू लागली तुमची बँक .हे वरिष्ठ नागरिक आहेत .आता सणासुदीचे दिवस आलेत .पैश्याची गरज प्रत्येकाला भासते . थोडेफार इकडे तिकडे होते म्हणून काय पैसे द्यायचे नाहीत का ?” आरती चिडून म्हणाली.
” अरे बापरे पोरगी चिडलेली दिसते . पण तरीही सुंदर दिसते हे मान्य करावे लागेल.” अमोल मनात म्हणाला .का कोण जाणे त्याला तिचे आकर्षण वाटू लागले .अमोल साधा होता .स्त्रियांशी मोजकेच बोलायचा. फारसे मित्रही नव्हते त्याचे.
” बाबा बसा, तो त्यांना म्हणाला , तुमचे नाव ”
” विनायक ” तो म्हातारा हळुवारपणे म्हणाला
” गणपती फॅमिली आहे .तुमची अमोल हसत म्हणाला “मी तुम्हाला आता पैसे देतो पण माझी अट आहे .तुमच्या सूनबाईना इथे अकाउंट काढावे लागेल ”
” ओ, मी याची कोण नाही आणि माझे लग्न झाले नाही अजून .माझ्या स्कुटरसमोर पडले आणि माझे नुकसान झाले त्यासाठी मी याना घेऊन बँकेत आले “आरती चिडून म्हणाली तरी तिच्या चेहऱ्यावर चढलेली लाली काही लपली नाही .
” तरीही अकाउंट काढावे लागेल .आता हा फॉर्म भरा कागदपत्र उद्या आणून द्या “असे म्हणत त्याने फॉर्म तिच्यासमोर ठेवला
” माझ्याकडे पैसे नाहीत ” आता तिने बचावात्मक पवित्रा घेतला .
” झिरो बॅलन्स अकाउंट काढू . “अमोल आता मागे फिरणार नव्हता.
“आहो पण ही जबरदस्ती का ? “ती चिडून म्हणाली.
” तुमची जबरदस्ती चालते आणि आम्ही विनंती करतोय ते मात्र चालत नाही .ओ बाबा उद्या कागदपत्र घेऊन या परवा पैसे काढून घेऊन जा ” अमोलने पुन्हा लॅपटॉपकडे लक्ष वळविले.
” पोरा मला आज रात्री गावी जायचंय.देव येतक घरात.” भिंतीवरच्या गणपतीकडे बोट दाखवून तो म्हातारा म्हणाला.
” बाबा तुम्हाला देव आणायची गरज काय ? तुमच्या नावातच देव आहेत ” अमोल हसत म्हणाला .
न राहवून ती ही हसली .
” फारच गमतीदार स्वभाव आहे तुमचा .बँकेत शोभत नाही .आरती तिरकसपणे म्हणाली. “काढा माझे अकाउंट पण पैसे कट झाले तर माझ्याशी गाठ आहे. तिने आपले बोट त्याच्याकडे रोखून सांगितले.
” हो हो , आता किती पैसे हवेत सांगा असे म्हणत खिशातून पाकीट काढले आणि सांगितलेली रक्कम तिच्या हातात दिली.”
” हे पैसे तुम्ही का देतायत ” आरतीने आश्चर्याने विचारले.
कारण त्यांची प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय पैसे काढता येणार नाही म्हणून माझ्याकडचे देतोय आणि यांनाही माझ्या अकाउंटमधून काढून देतो म्हणजे तुमचे काही अडायला नको ” तो हसत म्हणाला .
“धन्यवाद साहेब ” बाबा पैसे घेत म्हणाले .
” मी उद्या कागदपत्र घेऊन येते ” आरती खाली मान घालून पुटपुटली.
दुसऱ्या दिवशी ती कागदपत्र घेऊन आलीच पण गणपती डेकोरेशनचे काही फोटो ही अमोलला दाखविले .
घरातल्या गणपतीसाठी त्याने एक मखर सिलेक्ट केले तसेच गावच्या गणपतीसाठी ही एक निवडले .मग चहा पीत बऱ्याच गप्पा झाल्या .हळूहळू दोघांनाही एकमेकांची संगत आवडू लागली .
गणपतीचा मखर सजविण्यासाठी ती अमोलच्या घरी आली तेव्हा सगळ्यांना तिचा स्वभाव आवडला . त्याचवेळी विनायक वधुवर सूचक मंडळाच्या अथर्वने नेमका आरती चा फोटो रघुवीर ना दाखविला . फोटो पाहताच रघुवीर खुश झाला आणि ताबडतोब होकार कळवून टाकला.
आज तो रघुवीर च्या डोक्यावर बसून घरात शिरला आणि मखर पाहून खुश झाला .
” पोरीच्या हातात जादू आहे ” तो आसनावर ऐसपैस बसत पुटपुटला .
” तर , त्यासाठी काय काय करावे लागले याची कल्पना आहे ना ” स्वयंपाक घरात चौकस नजरेने पाहत उंदीर ही पुटपुटला .
” यापुढे हे असेच करून काम करून घेणार . त्या अमोल आणि आरतीचे जुळवायला दहा दिवस आधी यावे लागले .खाण्यापिण्याचे राहण्याचे किती वांधे झाले माहितीय ना ” उंदराने रागाने शेपटी आपटली.
” ते ही खरच म्हणा. पण हे लग्न जुळवणे फारच कठीण आहे.नशीब त्या आरतीला लहानपणापासून ओळखतोय आपण .कष्ट तर तिच्या पाचवीला पुजले आहेत .अमोल ही साधा आहे म्हणा .आपल्यावर फारशी श्रद्धा नाही पण तिरस्कारही करत नाही . दोघांचे जुळले त्यात आनंदच आहे .” तो लोडाला अलगद टेकून म्हणाला पण टेकताना चेहऱ्यावरची वेदना लपवू शकला नाही .
” त्यादिवशी स्कुटरचा धक्का जरा जास्तच जोरात लागला म्हणा पण दरवर्षी कदम काकूंचा डायट नैवेद्य खायचा असेल तर हे सहन करायलाच हवे ” समोरच्या डायट मोदकाकडे आशाळभूत नजरेने पाहत उंदीर छद्मीपणे म्हणाला .
© श्री.किरण कृष्णा बोरकर