एक गव्हाच्या पिठापासून केला जाणारा गडगीळ © हृदयस्पर्शी

बरेचसे पारंपरिक पदार्थ आता काळाच्या ओघात विस्मरणात गेले आहेत. त्यापैकीच एक गव्हाच्या पिठापासून केला जाणारा गडगीळ हा गोड पदार्थ आहे.
याला अनेकजण गोड शेंगोळे किंवा गुळाच्या पाकातील मुटके असेही म्हणतात.
आवश्यक साहित्य:
१) १ वाटी गव्हाचे पीठ
२) १ वाटी गूळ
३) १/२ वाटी पाणी
४) १ टेबलस्पून तूप (मोहनासाठी)
५) १ टीस्पून वेलची पूड
६) चिमूटभर मीठ
७) तेल/तूप (तळण्यासाठी)
कृती:
एका ताटात गव्हाचे पीठ घेऊन त्यात चिमूटभर मीठ आणि १ टेबलस्पून कडकडीत तुपाचे मोहन घालून ते पिठाला चांगले चोळून घ्यावे.
आता यामध्ये लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून चपातीसाठी मळतो तसे पीठ मळावे व १० मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
यानंतर गॅसवर एका पातेल्यात १ वाटी बारीक चिरलेला गूळ आणि १/२ वाटी पाणी घेऊन मंद आचेवर गूळ छान विरघळून घ्यावा. गूळ विरघळत आला की त्यात १ टीस्पून वेलची पूड घालून ढवळावे व गॅस बंद करावा.
आता मळलेल्या पिठातून छोटे छोटे गोळे काढून मुटकुळे तयार करावेत.
गॅसवर कढईमध्ये तेल/तूप गरम करुन त्यामध्ये तयार केलेले मुटकुळे लालसर रंगावर तळावेत व एका ताटात काढावेत.
आता वर तयार केलेल्या गुळाच्या मिश्रणात हे मुटकुळे मिक्स करुन मंद आचेवर गुळाचे मिश्रण थोडे घट्टसर होईपर्यंत शिजवावे व त्यानंतर गॅस बंद करावा. गॅसवरुन खाली उतरल्यानंतर थोडी कोमट असतानाच ही गडगीळ मोकळी करुन घ्यावीत.
अशाप्रकारे आपली अतिशय स्वादिष्ट आणि गुळाच्या रसाने भरलेली गडगीळ तयार आहेत.
© हृदयस्पर्शी