नवरात्री आठवा दिवस…. माता श्री महागौरी संकलन – अनघा वैद्य

नवरात्री आठवा दिवस…. माता श्री महागौरी संकलन – अनघा वैद्य
माता श्री महागौरी
माता महागौरी देवीचे नवदुर्गेपैकी आठवे रूप आहे, तिची पूजा नवरात्रीच्या आठव्या दिवशी केली जाते. देवीचा रंग अतिशय गोरा असून, ती शंख, चंद्र आणि कुंद फुलासारखी तेजस्वी आहे. तिला अन्नपूर्णा, ऐश्वर्यप्रदायिनी असेही म्हणतात, कारण ती भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि संपत्ती व शांती प्रदान करते. महागौरीच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात डमरू असतो, तर तिचे वाहन वृषभ (बैल) आहे.
दक्षिणेश्वर श्री काली मंदिर
दक्षिणेश्वर काली मंदिर हे कोलकात्याच्या दक्षिणेश्वर भागात असलेले एक मोठे हिंदू मंदिर आहे. हूगळी नदीच्या पूर्व काठावर असलेल्या ह्या मंदिर प्रासादामध्ये श्री काली देवीचे प्रमुख मंदिर तसेच शंकर व इतर देवतांची देखील मंदिरे आहेत. इ.स. १८५५ साली बांधल्या गेलेल्या ह्या मंदिरामध्ये प्रसिद्ध भारतीय योगी रामकृष्ण परमहंस ह्यांनी अनेक काळ पौरोहित्य व काली पूजन केले होते.
राणी रासमणि या देवी भक्ती होत्या. देवी कालीने त्यांच्या स्वप्नात दर्शन देऊन या ठिकाणी मंदिर बांधण्याची आज्ञा दिली. यानंतर त्यांनी १८४७ मध्ये मंदिराचे बांधकाम सुरू केले आणि १८५५ मध्ये ते पूर्ण झाले.
रामकृष्ण परमहंस यांनी या मंदिरात पुजारी म्हणून काम केले. त्यांच्या कठोर भक्ती आणि साधनेमुळे त्यांना श्री कालीमातेचे साक्षात दर्शन झाले, असे मानले जाते. त्यामुळे हे मंदिर त्यांच्यासाठी आणि भक्तांसाठी एक विशेष स्थान बनले.
हे मंदिर २५ एकरमध्ये पसरलेले आहे. मंदिरात असलेली श्री कालिमातेची मूर्ती शस्त्रास्त्रांसह भगवान शिव पिंडीवर उभी आहे, असे मानले जाते.
हे स्थान कालीमातेच्या सिद्ध क्षेत्रामुळे अत्यंत पवित्र आणि सकारात्मक उर्जेने भारलेले मानले जाते.
हे मंदिर केवळ धार्मिकच नव्हे तर बंगाली संस्कृती आणि इतिहासाचेही एक महत्त्वाचे प्रतीक आहे.