नवरात्री नववा दिवस…. माता श्री सिद्धीदात्री संकलन – अनघा वैद्य

*माता श्री सिद्धीदात्री *
देवी सिद्धीदात्री कमळावर विराजमान असून देवीच्या हातात शंख, गदा, चक्र आणि कमळ असते. माता श्री सिद्धिदात्री सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करते आणि ज्ञान व प्रकाशाने अंध:कार दूर करते.
अलौकिक शक्ती किंवा ध्यान करण्याची क्षमता वाढते. असे मानले जाते की शिवाच्या शरीराची एक बाजू सिद्धीदात्रीची आहे, म्हणून त्यांना अर्धनारीश्वर असेही म्हटले जाते.
माता श्री मनसा देवी
माता श्री मनसा देवी, भगवान शिवाची कन्या, हिला सापांची देवी मानले जाते आणि तिची पूजा विशेषतः नागदंशावर उपचारासाठी केली जाते.
भगवान शिवाचे कुटुंब मोठे असून त्यात पार्वती, कार्तिकेय, गणेश यांच्यासह अशोकसुंदरी आणि मनसा या कन्यांचा समावेश होतो. यांपैकी मनसा देवी ही त्यांची धाकटी कन्या मानली जाते. तिचे नाव जरी फारसे प्रसिद्ध नसले तरी तिच्या शक्ती अपार आहेत. लोकविश्वास असा की, हरिद्वारमधील तिच्या मंदिरात दर्शन घेणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. विशेष म्हणजे, सर्पदंशावर उपचारासाठी श्री मनसा देवीची पूजा केली जाते. म्हणूनच तिला “सर्पांची देवी” असेही म्हटले जाते.
पुराणकथेनुसार, श्री मनसा देवी कमळावर किंवा सापावर बसलेली दिसते. काही ठिकाणी ती हंसावरही विराजमान आहे. सात सर्प नेहमी तिचे रक्षण करतात. तिच्या मांडीवर असणाऱ्या बालकाचे चित्रण हे तिच्या पुत्र आस्तिकाचे आहे. आस्तिकानेच नागकुळाचे रक्षण केले होते. भक्तांना असे मानले जाते की जरत्कारू, जगदगौरी, मनसा, सिद्धयोगिनी, वैष्णवी, नागभागिनी, शैव्य, नागेश्वरी, जरत्कारूप्रिया, आस्तिकमाता आणि विशरी या नावांचा जप केल्याने सापांची भीती दूर होते.
समुद्रमंथनावेळी विष प्रकट झाले तेव्हा भगवान शिवाने ते पचवले आणि त्यांचा कंठ निळा झाला. त्या वेदनेतून शिवाच्या मनातून एक
विषकन्या प्रकट झाली. तिने शिवाच्या घशातील विष शोषून घेतले आणि त्यांचा त्रास कमी केला. तीच पुढे माता श्री मनसा देवी म्हणून पूजली जाऊ लागली.
एका आख्यायिकेनुसार, वासुकी नागाच्या आईने मूर्ती तयार केली होती. शिवाच्या स्पर्शामुळे ती मूर्ती जिवंत झाली आणि त्यातूनच श्री मनसा देवी प्रकट झाल्या.
ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, एक नागकन्या भगवान शिव व कृष्णाची प्रचंड भक्त होती. तिच्या तपश्चर्येने तिला कल्पतरु मंत्राचे ज्ञान मिळाले आणि शाश्वत पूजेचे वरदान प्राप्त झाले.
हरिद्वारमधील श्री मनसा देवी मंदिर हे सर्वात प्राचीन व पूजनीय मानले जाते. १८११ ते १८१५ दरम्यान मणि माजरा येथील राजा गोपालसिंह यांनी हे मंदिर बांधले. ते आई श्री मनसा देवीचे अखंड भक्त होते. आज लाखो भाविक येथे येऊन नवरात्रीत आपली मनोकामना व्यक्त करतात आणि ती पूर्ण होते असा विश्वास ठेवतात.