आमच्यावेळी असं नव्हतं… – सदानंद देशपांडे
आमच्यावेळी असं नव्हतं…
– सदानंद देशपांडे
मोठ्यांकडून (वयाने) कायम ऐकू येणारे नेहमीचे शब्द…
काळ बदलला. Technology बदलते, शरीर व मनाच्या गरजा बदलल्या. नात्यांमधला ओलावा फिका होत गेला. एकमेकांबद्दल वाढणारी ओढ, एकमेकांच्या गरजा कमी होत गेला. हाती पैसा खेळू लागला.
मला आठवतंय, आमच्या घरात 1982 साली टीव्ही आला. तोपर्यंत घराच्या बाहेर राहून मित्रांमध्ये रमणे हे एकच मनोरंजनाचं साधन होतं. कार्ट्या बस झालं आता उंडारणं. हातपाय धुवून अभ्यासाचं बघ हे वाक्य आता पन्नाशीत असलेल्या सगळ्यांनी कधीतरी ऐकलं असणारच त्यांच्या लहानपणी.
‘राहायला येतोय’ असं पत्र न पाठवता अचानकच बाहेरगावचे नातेवाईक राहायला यायचे. घरात एकच खाट. ती खाट येणाऱ्या पाहुण्यांतल्या बुजूर्गाला झोपण्याकरता दिली जायची आणि झोपण्याकरता रवानगी वाड्याच्या कॉमन गच्चीवर व्हायची पण त्यात वावगं काहीच वाटायचं नाही आणि घरातल्या बुजूर्ग मंडळींनाही अहंकार कशाशी खातात हे माहिती नसायचे. कधीकधी तो बुजुर्ग पाहुणा पाय दाबून घ्यायचा. हं आता जा खेळायला अशी बक्षीसी त्याच्याकडून मिळाली की गल्ली क्रिकेट सुरू.
पण घरोघरी टीव्ही आल्यावर मित्रांशी, नातेवाईकांशी असलेली भावनिक नाळ तुटत चालली. तो पहिला संकेत होता माणसावर येऊ घातलेल्या संकटाचा. सगळेजण शनिवारचा मराठी चित्रपट, रवीवारचा हिंदी चित्रपट, गुरुवारचं छायागीत, कधीतरी सायंकाळी असणारे मुलाखतीचे सोहळे त्या त्या वेळेत टीव्ही पुढे येऊन पाहायला लागले. त्याआधीच्या काळात टेबलावर असलेला दूरध्वनी कधीकधी वाजायचा आणि तो फार कमी जणांकडे उपलब्ध असल्याने त्या निमित्ताने शेजाऱ्यांना हाक मारून बोलावले जायचे व अवांतर गप्पा, सुखदु:खांची शाब्दिक देवाणघेवाण होत राहायची. ब्लॅक-व्हाईट टीव्हीच्या काळातही शेजारी राहणारे आणि टीव्ही खरेदी करण्याची ऐपत नसणारे दारावर टकटक करून यायचे आणि टीव्हीसमोर फतकल मारून बसायचे. त्या नादाने बऱ्यापैकी संवाद व्हायचा. एकमेकांच्या घरात काय चाललंय याची खबरबात मिळायची. टीव्ही घरात यायच्या आधी लग्नकार्यात नाती कामी यायची. आजच्यासारखा केटरिंग व्यवसाय त्याकाळी भरास आलेला नव्हता. शिधा घेऊन स्वयंपाक कमी खर्चात करणारी अनेक मंडळी होती. पण शुभकार्याचा मुहूर्त करताना ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्याकरता घरी येऊन हातभार लावणे याकरता नात्यांमध्ये मनुष्यबळ भरपूर उपलब्ध असायचे. बायकांनी नोकरीव्यवसायाकरता बाहेर पडणे आजच्याएवढे रूढ नव्हते. तरीही नवराबायको दोघेही नोकरीस असले तरी ऑफिसच्या वेळा माणसाळलेल्या असायच्या. एकतर सरकारी नोकरी किंवा खाजगी असली तरी सायंकाळी 6 च्या आत दोघे घरी. जरासं मोठ्ठं झालेलं बाळ शाळेतून आल्यावर शेजारच्यांकडे आईबाबा येईपर्यंत बिनदिक्कत राहत असे. पाळणाघर संकल्पना तेवढी विकसित झालेली नव्हती.
हळुहळू ब्लॅक-व्हाईट टीव्हीची जागा कलर टीव्हीने घेतली. पुढची पिढी शहराच्या आसपासच्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवू लागली. शिफ्टमध्ये काम करू लागली. पालकांनी पसंत केलेल्या जोडीदाराबरोबर लग्ने करू लागली.कुटुंब तरीही 1 बीएचके घरांमध्ये सुखी होती. सासू-सुनेमध्ये होणाऱ्या बारीकसारीक खटक्यांसकट पण सुखी असायची. कुणाकुणाच्या हातात घरातल्या लँडलाईन फोनबरोबर छोटे नोकियाचे कीबोर्ड वाले फोन येऊ लागले. असे फोन विकत घेतल्यावर बऱ्याच जणांना टेक्नोसॅव्ही असण्याचा शिक्का मोफत मिळू लागला.
त्यावेळीही आमच्यावेळी असं नव्हतं बुवा हे पालुपद आधीच्या पिढीकडून चालूच होतं. पण त्यावेळची तिशी चाळीशीतली पिढी ही वाक्ये हसून झेलत असे. पोष्टातून किंवा सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या आपल्या वडिलांना उद्धट उत्तरं देताना मुलगा चार वेळा विचार करत असे. मोठ्यांना सणासुदीला पाया पडण्याची पद्धत होतीच होती.
परवाच माझा एक भाचा मला कित्येक महिन्यांनतर अचानक रस्त्यात भेटला पण वाकून पाया पडण्याऐवजी त्याने गळाभेट दिली. नुकताच जेन-झी पिढी हा शब्द कानावरून गेला. येणाऱ्या पिढीला वयाने मोठ्या असलेल्यांना पाया पडणे कुणी शिकवलं कसं नाही बुवा हा प्रश्न पडून गेला. सध्याच्या पिढीत वाढदिवस आणि केक हे समीकरण तर पक्कं ठरून गेलंय. माझ्या लहानपणी केक हा काय प्रकार असतो हे माहिती नव्हतं. खिशाला परवडेल असं काहीतरी गोड केलं जायचं. आणि सायंकाळी आई ओवाळायची आणि खचित एखादा शर्टपीस मिळायचा.
तर मंडळी, मुद्दा काय आहे की पहिल्या पिढीतून काळ जेव्हा पुढच्या पिढीकडे सरकतो तेव्हा तो आपला रंग बदलतो आणि मग आधीची पिढी पुढच्या पिढीला एक वाक्य नक्की ऐकवते, ते म्हणजे, ‘आमच्यावेळी असं नव्हतं बुवा.’ आहे की नाही गम्मत. पण अलीकडे दोन पिढींमधला हा संवादही तुटत चाललाय. हा तर काळाने दिलेला धोबीपछाड. यातून आजचा समाज बाहेर येईल असे वाटत नाही. पैसा आहे पण सुख नाही… कारण सुखाची व्याख्याच काळाच्या ओघात बदलत चाललीय. दारात चारचाकी गाडी, वर्षातून एकदा परदेश सहल, हॉटेलिंग, मॉलमधली खरेदी ही आजच्या सुखाची व्याख्या. वाढदिवसाच्या दिवशी आईने केलेली खीर, ओवाळणे आणि शर्टपीस यात समाधान होतं. आज सुख हाताशी असेल कदाचित, पण समाधान आहे का? उत्तर ज्याचं त्यानं शोधायचंय.
© सदानंद देशपांडे