3 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ३ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ३
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
बाल-पर्व.
२.जन्म आणि बालपण
वासुदेव बळवंत फडकेंनी चेतवलेली क्रांतीची ज्योत १८८३ साली मालवत असतानाच महाराष्ट्रातच नाशिक जवळ भगूर गावी असंख्य क्रांतींच्या उगमस्थानाचा जन्म होत होता. दिनांक २८ मे १८८३, शके १८०५, वैशाख कृ. ६, सुर्योदयात घटी ३९, पळे ५५ या मुहूर्तावर एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. त्याच नाव ठेवण्यात आले, ‘विनायक’. आई राधाबाई आणि दामोदरपंतांना दुसरे पुत्ररत्न झाले. या विनायकास त्याच्यापेक्षा तीन वर्षे मोठा भाऊ असे, त्याचे नाव गणेश ठेवण्यात आले होते. दामोदरपंत सावरकर आणि त्यांचे बंधू बापूसाहेब भगुरास वडिलोपार्जित घरात एकत्र राहत असत.
हे सावरकर घराणे पेशवाईच्या काळात कोकणातील चिपळूण तालुक्यातील गुहागरमधून देशावर आपला भाग्योदय व्हावा या आशेने आले. ते भगूर जवळील राहुरीस आले. हे राहुरी गाव पुढे पेशव्यांकडून सावरकरांच्या पूर्वजास इनाम म्हणून मिळाले. ते त्या गावाचे जहागीरदार असत. त्यामुळे गावात त्यांचा मोठा मान असे. राहुरीचे आणि भगूरचे इनाम अगदी विनायकाच्या जन्मानंतरही सावरकर कुटुंबाकडेच असे. लहानश्या विनायकास तेथील लोक जहागिरदाराचा मुलगा म्हणून कुरवाळत, लाड करत.
या सावरकरांच्या कुटुंबातील एका पूर्वजास संस्कृत विद्येच्या सन्मानार्थ पालखीचा मानही पेशव्यांनी दिला असल्याचे विनायकाचे वडील आणि काका मोठ्या अभिमानाने अनेकदा सांगत असत. त्यांच्या घरातील माळ्यावरती एक भलेमोठे लाकूड ठेवलेले असे. ते पालखीचा अवशेष असल्याचे देखील ते सांगत. या कथांवरून लहानश्या विनायकाच्या मानत अनेक कल्पना तरंगत असत. तो मनातच ती पालखी कशी दिसत असेल? त्या देवळातल्या पालखीसारखीच तर दिसत नसेल ना? असे अनेक प्रश्न पडत. त्यात कोणीतरी भव्य पुरुष भलेमोठे पागोटे घालून बसला असता तर कसा दिसला असता याचे चित्रही तो कल्पनेत रंगवत असे.
विनायक पाच वर्षांचा झाल्यावर दामोदरपंतांना पुन्हा पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव नारायण असे ठेवण्यात आले. दामोदरपंत आणि राधाबाई यांचे या तिन्ही मुलांवर आणि एका कन्येवर अतिशय प्रेम असे. दिवसभराची कामे उरकल्यावर हे दोघे मुलांना अनेक ग्रंथ वाचून दाखवत. त्यावर त्यांच्यासमोर चर्चा करत. ज्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार होऊ लागले. विनायक पाच सात वर्षांचा असल्यापासूनच त्यास लोकांच्यात मिसळण्यास फार आवडे. नित्यनेमाने एक गोष्ट हमखास घडत असे ती म्हणजे,
सावरकरांच्या आमराईतून आंब्याच्या गाड्या घेऊन लोक येत. हे लोक उन्हाळ्याच्या दिवसात काबाडकष्ट करत, हे पाहून विनायकास त्यांचा कळवळा वाटे. तो त्या लोकांना ओसरीवर बसायला सांगे, थोडी विश्रांती घ्यायला सांगे, थंड पाणी प्यावयास देत.
त्या लोकांस विनायकाचे फार कौतुक वाटे. ते म्हणत,
“ अहो, छोटे जहागीरदार, पण आम्हास बापूसाहेब रागावतील.”
तेव्हा विनायक त्यांना अधिकारवाणीने सांगत असे, “माझे नाव सांगा. मी तुम्हास बैठकीवर बसविले. मग बापू कसे रागावतील.”
आणि खरच थोड्यावेळाने तिथे बापूसाहेब म्हणजे विनायकाचे काका आल्यावर हे लोक त्यांना सांगत की,
“बापूसाहेब, आमच्या छोट्या जहागिरदारांच्या वशिल्याने बसलो आहोत आम्ही इथे. किती मायाळू आहे हो हे पोर.”
ते ऐकून बापूसाहेब देखील हसत आणि म्हणत, “ आमच्या बाळ्याचा वशिला का? मग आमची काय माय व्याली आहे, तुम्हास उठ म्हणायची. बसा बसा.”
[क्रमशः] बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.


Excellent information… 👍