5 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ५ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ५
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
विनायकाला लहान असल्यापासूनच वाचनाची आणि लेखनाची प्रचंड आवड असे. कविता कराव्यात, लेख लिहावेत असे वयापेक्षा मोठे छंद त्यास असत. तो वयाच्या अकराव्या वर्षापासूनच दिवसाकाठी चार पाच वृत्तपत्रे वाचीत असे. त्यात पुणेवैभव, गुराखी, केसरी वगैरे वृत्तपत्रे असत. गावात ती ज्यांच्याकडे येत असत त्यांच्याकडे जाऊन ती आणावी, वाचून झाली की परत ज्याची त्याला नेऊन द्यावी, हा त्याचा दैनंदिन कार्यक्रम असे. जे जे मिळेल ते ते वाचून काढावे. वाचताना आणि लिहिताना त्याची प्रचंड एकाग्रता होत असे. त्यावेळी बाकीचे काही सुचतच नसे. अगदी परसाकडे जातानाही एखाद वर्तमानपत्र घेऊन जावे, इतकी वाचनाची आवड.
याच वयात विनायकाने पेशव्यांची बखर पण वाचून काढली. त्यात सवाई माधवरावांचे चित्र होते. ते विनायकाने हुबेहूब रेखाटून काढले. विनायकात काही गुण उपजतच होते. सवाई माधवरावांच्या रंग खेळण्यावर त्याने चक्क एक गाणे लिहून काढले आणि ते इतरांना शिकवले देखील.
वाचन आणि लेखनाचा कंटाळा आला की मग तो सोबतच्या मुलांबरोबर किंवा घरी वहिनी आणि भावांबरोबर थोडावेळ खेळे आणि पुन्हा जाऊन वाचत बसे. खेळता खेळता एखादे गाणे रचत. ते सर्वांना भारी आवडे.
वाचनाची इतकी प्रचंड आवड असणाऱ्या विनायकाच्या हातात एकदा संस्कृत भाषेतील हस्तलिखित असलेली आणि लाल हिरव्या शाईने काही शब्द लिहून सजवलेली एक पुरातन पोथी पडली. विनायकाने लगेच ती उघडून वाचायला सुरुवात केली. त्याला अर्थ नीटसा कळत नव्हता पण वाचायला मात्र गोडी वाटत असल्याने तो एक एक पान वाचू लागला. इतक्यात विनायकाचे वडील तिथे आले, आणि त्यांनी बघितलं की विनायक एक पोथी वाचत आहे, लगेच त्यांच्या हेही लक्षात आले की ती पोथी म्हणजे ‘आरण्यके’ आहे. ते धावतच विनायकाजवळ जाऊन त्यांनी ती पोथी त्याच्या हातातून हिसकावून घेत त्याला म्हणाले,
“विनायका, हे काय करत आहेस? हे आरण्यक आहे. हे घरात वाचायचं नसते. हे घरात वाचल तर घराचे अरण्य होत अस म्हणतात.”
लहानश्या विनायकाला त्याचा अर्थ कळला नाही, पण पोथी वडिलांकडे सुपूर्त करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. वडिलांनी ती पोथी गुंडाळून माळ्यावर कुठे तरी ठेऊन दिली. तरीही लवकरच ती पोथी शोधून काढून विनायकाने वडिलांच्या अपरोक्ष वाचून काढली.
याच वयात विनायकाची प्रतिभा तेजाळू लागली होती. कविता कराव्यात, त्याही देशभक्तीवर. या लहानश्या वयात देखील त्या काळात अवघड असलेल्या देशाभिमान त्यांच्या अंगी ठासून भरला होता. विनायकाने स्वदेशी कापडांवरचा फटका लिहिला. साठ पेक्षा अधिक ओळींचा हा फटका काव्यशास्त्रातील उत्तम असा नमुना ठरला. त्याची सुरुवात अशी होती,
आर्यबंधू हो उठा उठा कां मठासारखे नटा सदा
हटा सोडूनी कटा करू म्लेंच्छपटा ना धरू कदा.
काश्मीरच्या शालींपासून ते नागपूरच्या रेशमी कापडापर्यंत अनेक ठिकाणच्या स्वदेशी कापडांच्या नमुन्यांचा उल्लेख या स्वदेशी कापडाच्या फटक्यात विनायकाने केला. इतक्या लहान वयात कुठे कुठले कापड निर्माण होते याचा असलेला अभ्यास खरंच वाखाणण्याजोगा होता. या फटक्याचा शेवट करताना विनायक लिहितो,
दर अज्ञानी रजनी जावो सांग प्रकाशो रवी थोर
वरावयाला रत्नपटला करो आर्य ते रण घोर
कवितारुपी माला अर्पी आर्य बुन्धला सार्थक हा
भक्तांकरवी मन देवास सेवायासी अर्पण हा.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

