Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर
7 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ७ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ७
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
त्याच फळ्यावर एकदा विनायकास एक फाटके इंग्रजी पुस्तक सापडले. त्याच नाव होत, ‘Short History of the World’. ते पुस्तक त्याने लगेच खाली काढून घेतले. त्याला मोठा खजिना हाती लागल्याचा आनंद झाला. आपल्याला प्रचंड माहिती या ग्रंथातून मिळेल या आशेने विनायक आनंदून गेला.
इतिहासाचे सर्व धन हाती लागल्याचा त्यास आनंद झाला होता. ते पुस्तक कधी वाचून काढतो असे त्यास झाले. पण ते पुस्तक इंग्रजीतून होते आणि विनायकाचे त्यावेळी केवळ तिसरी पर्यंतच इंग्रजीतून शिक्षण झाले होते, तेही घरच्या घरीच. त्यामुळे त्याने वडिलांचा पिच्छा पुरवून ते पुस्तक थोडे थोडे सांगावे असे त्यांच्याकडून मान्य करून घेतले.
ते पुस्तक समजावून घेता घेता विनायकास कळले की हे पुस्तक केवळ एकच भाग आहे. त्यात संपूर्ण जगाचा इतिहास नाही. या भागात अरबस्थानच्या इतिहासाचा आरंभ होता. वडील त्यास ते पुस्तक वाचून समजावून सांगू लागले पण त्याआधीचा इतिहास काय असावा या प्रश्नाने विनायकास चैन पडेना. आणि नेमक त्या पुस्तकाचे पहिलं पान फाटले होते. ते फळ्यावर कुठे सापडते का हे पाहण्यासाठी विनायकाने जंग जंग पछाडले, पण त्यास ते काही मिळाले नाही.
त्याने वडिलांना विचारले की या आधीचा इतिहास काय असेल? पण वडिलांना देखील काही कल्पना नसल्याने त्यांनी सांगितले की, “या पहिल्या पानात तो लिहिला असावा.”
विनायक आपल्या विचारात गढून गेला. त्याच्या मनात विचार येऊ लागले की, काय असेल त्या पहिल्या पानात. नंतर त्याच्या मनात असेही विचार येऊ लागले की, जरी पहिले पान सापडले तरी त्याच्या आधीचा पण काही इतिहास असेलच की. तो आपल्याला कसा कळणार? तो कुठे वाचायला मिळणार? अगदी उपलब्ध सगळी पुस्तके वाचली तरी त्या आधीचा काही इतिहास असेलच की, म्हणजे इतिहासाच्या पुस्तकाचे पहिले पान नेहमीच अज्ञात असणार. हा इतिहासाच्या लेखनाला मिळालेला शाप तर नसेल ना?, असे विचार मनात येऊन विनायकास एक काव्य स्फुरले,
*जे, भौमिक त्यांचा न शक्य सकलांचा
विश्वेतिहास लिप्से; तुजसी वेध अकाट्य विकलाचा
कल्प विमानीही की, तू, ताऱ्यांचे जिने करुनी नभी
जाशील उंच शोधीत, शोधीत कितीही जरी धरुनी न भी
इतिहासाचे पहिले, पान न मिले कधी पहायाते
आरंभ तुझा दुसऱ्या, पानापासुनी शाप हा याते.*
–*–
विनायकाच्या घरी असलेल्या श्रीधरकृत ‘हरी विजयादी’ पोथ्या पाहून विनायकाने वयाच्या आठव्या वर्षी ठरवले की, ‘आपणही एक महाकाव्य किंवा एक मोठा ग्रंथ लिहिला पाहिजे.’ त्यादृष्टीने विनायकाने तयारी देखील सुरु केली.
त्याचा निश्चय दृढ होता. त्याने सुरुवात केली ती आगपेटीच्या आकारा इतकी पाने कापून घेतली. त्यानंतर ती त्याने एक एक अध्यायाची पाने छोट्याश्या दोऱ्याच्या वेष्टणीत गुंफली. महाकाव्य लिहिण्यासाठी एक एक गोष्टींची पूर्तता होत असल्याने विनायक साहजिकच सुखावत होता. त्यानंतर त्याने बोरुची बारीक लेखणी तयार करण्यास सुरुवात केली. चार चारदा मोडून जेव्हा ती मनासारखी झाली तेव्हाच त्यास आनंद झाला. पोथ्यांच्या पानांवर चारही बाजूंनी लाल शाईने चौकट आखलेली असे, त्याप्रमाणे विनायकानेही सर्व पानांवर लाल चौकट आखून घेतली.
आता काय सारी सिद्धता झाली. आता आपण महाकाव्य लिहिण्यास तयार आहोत, असे विनायकास वाटले. आता काय फक्त महाकाव्य लिहील की झाल असे विचार त्याच्या बालसुलभ मनात आले, आणि त्याने सुरुवात केली ‘श्री गणेशाय नमः’ लिहून.
त्याने जी कल्पना केली होती की, पोथी इतकी सुंदर असेल की लोकांना पाहतच रहाव लागेल. पण विनायकाला स्वतःचे हस्ताक्षर इतके चीडबीड वाटले की त्याने महाकाव्य लिहिण्याचा विचार मनातून काढून टाकला आणि त्याने आधी आपले हस्ताक्षर सुधारण्याचे ठरवले.
–*–
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

