Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर
9 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ९ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ९
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
याच वयात विनायकाच्या धार्मिक वृत्तीतही वाढ होऊ लागली होती.
त्याच्या वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी सावरकर घराण्याच्या कुलस्वामिनीवर विनायकाची भक्ती प्रचंड वाढली होती. त्याच दरम्यान एक घटना घडली. ती अशी की, भगूर गावामध्ये एक खंडोबाचे मंदिर होते. त्या मंदिरात सावरकरांच्या कुलस्वामिनी देवीची एक मूर्ती असे. तिथे अब्राह्मण पुजारी बोकडाचे बळी देत. तेथील पुजाऱ्यास अशी स्वप्ने पडू लागली की, देवी म्हणतेय, ‘मला माझ्या घरी पोहोचव.’ इकडे विनायकाच्या वडिलांना असे स्वप्न पडू लागले की, ‘देवी आपल्या घरी आली आहे.’ ती देवी जागृत असे, तिच्या कडकपणाच्या कथा आणि आख्यायिका गावात पूर्वापार सांगितल्या जात. तिच्या विषयी सर्व गावकऱ्यांना सश्रद्ध भीती वाटत असे. अशी रुधीरप्रिय देवीची मूर्ती देवीची इच्छा म्हणून त्यांनी घरी आणली. देव्हाऱ्यात तिची प्राणप्रतिष्ठा केली. गावचे लोक सावरकरांना सांगू लागले की, ‘देवी देवळातच ठेवावी. ही रुधीरप्रिय जाज्वल्य देवता, प्रसंगी कोपाने सर्व घर भस्मसात करेल.’ त्यांना विनायकाचे वडील म्हणत, ‘देवीची इच्छा काय असेल तसे होईल.’
विनायकाची मात्र देवीवर प्रचंड श्रद्धा असे. त्यास ती देवी आपल्या आईसारखी कृपाळू, मायाळू वाटे. आईप्रमाणे या देवीस सगळे सांगावे असे वाटे. त्याप्रमाणे तो आपल्या सुखदुःखाचा पाढा देवी पुढे वाचे. विनायक एखाद्या साधकाप्रमाणे तन्मय होऊन त्या देवघरात देवी पुढे बसून तासंतास पूजा अर्चना करे, साधना करे.
तोपर्यंत देवीची मराठी भाषेतील पोथी विनायकास उपलब्ध झालेली नव्हती. त्यामुळे सप्तशतीचे संस्कृत पाठ तो वाचे. पण त्याला ती स्पष्ट समजेना म्हणून तो कासावीस होई.
शेवटी त्यास समजले की देविविजय नावाची भागवताची मराठी पोथी प्रसिद्ध होत आहे, विनायकाने लग्गेच ती मागवून घेतली. आणि ती हातात पडताच तिची अक्षरशः पारायणे केली. या ग्रंथातील माहिती वाचून विनायकास एक कल्पना सुचली. ती म्हणजे, आपणही अशी एखादी पोथी लिहावी. त्यात भक्तांच्या कथा वर्णन कराव्यात, ही मालिका अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत लिहावी.
एकदा विनायकाने मनावर घेतले की ते काम पूर्ण झाल्याशिवाय त्यास चैन पडत नसे. त्याने ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला. ग्रंथाचे नाव ‘दुर्गादास विजय’ असे ठेवायचे ठरवले. आणि त्याने वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी ओवीबद्ध ग्रंथ लिहिण्यास आरंभ केला. प्रथम विनायकाने देवीची स्तुती ओवीबद्ध केली. मग ग्रंथकारांचे चरित्र्य लिहिले. विनायकाला आलेले देवीचे साक्षात्कार लिहिले. इतके लिहून झाल्यावर विनायकाने तो भारतास स्वतंत्र्य मिळण्याकरिता जे युद्ध करणार होता, त्यात यश मिळावे म्हणून प्रार्थना केली. त्यानंतर देवीची प्रारंभिक प्रार्थना लिहिली. यातच ग्रंथाचे चार पाच अध्याय आणि तीन चारशे ओव्या लिहून झाल्या.
श्रीधर स्वामींप्रमाणे विनायकही आपल्या ग्रंथाचा एक एक अध्याय लिहून झाल्यावर देवघरात जाऊन आपल्या देवीस वाचून दाखवीत असे. त्यावेळी देवीची पूजा झालेली असे, आणि देवीवर अनेक फुले वाहिलेली असत. अनेक फुलांची सजावट केलेली असे. त्यातील एखादे फुल विनायकाचे असे वाचन सुरु असताना घरंगळून खाली पडले तरी विनायकास तो देवीच्या संमतीचा प्रसाद वाटे.
विनायकाचा हा ग्रंथ धार्मिक नसून देशास स्वातंत्र्य मिळावे या दृष्टीने लिहिलेल्या मजकुराचा असे. त्यात त्याने इंग्रजांचा, इंग्रजी सत्तेचा, त्यांच्या अत्याचारांचा ‘दैत्य’ असा पौराणिक भाषेत उल्लेख केलेला असे.
‘पृथ्वीभारहरण’ , ‘अवतार’ असे शब्द वापरून विनायकाने पौराणिक कथांचा आणि सद्य परिस्थितीचा छान मिलाफ केला असे.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

