Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर
13 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग १३ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग १३
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
४. शिक्षणासाठी नाशिकास
विनायकाचे भगूरच्या शाळेत पाचवी इयत्तेपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर दीड दोन वर्षे घराच्या अडचणींमुळे त्यास शाळेत जाता आले नाही. त्या वेळेचा सदुपयोग करत त्याने इंग्रजीच्या दोन इयत्तांचे शिक्षण स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर घरच्या घरीच घेतले. पुढचे शिक्षण घेण्यासाठी वयाच्या तेराव्या वर्षाच्या आसपास विनायकास त्याच्या वडिलांनी नाशिकला पाठवले.
नाशिकच्या शिवाजी स्कूल या राष्ट्रीय बाण्याच्या शाळेत विनायकाची परीक्षा घेऊन इंग्रजीच्या तिसऱ्या इयत्तेत प्रवेश देण्यात आला.
तेथील शिक्षकवर्ग खूप चांगला असे. विनायकाच्या एकंदर टापटीपपणावर, त्याच्या बुद्धी चापल्यावर, बहुश्रुततेवर शिक्षकवर्ग चांगलाच खुश झाला. त्यांचा विनायकावर लोभ जडला. शिवाजी स्कूलचा इतर इंग्रजी हायस्कूलवर प्रभाव पाडू शकेल असा विद्यार्थी म्हणून विनायकाकडे पाहिले जाऊ लागले. त्यास ममतेने वागवले जाऊ लागले. राष्ट्रीय बाण्याची असल्याने विनायकास देखील या शाळेचा फार अभिमान वाटे. विनायकाने या शिक्षकांना आपले लेख व कविता दाखवल्यावर तर त्यास विनायकाचा अधिकच अभिमान वाटू लागला. त्यांनी नाशिक वैभव नावाच्या वर्तमानपत्राचे संपादक श्री. खरे यांच्या कानावर विनायकाविषयी घातले. त्यांनीही विनायकाचे कौतुक केले. या सगळ्यामुळे विनायकास आपणही वर्तमानपत्रात लेख लिहावा असे वाटू लागले.
त्याप्रमाणे विनायकाने ‘हिंदू संस्कृतीचा गौरव’ या मथळ्याचा एक लेख लिहून श्री. खरे यांच्याकडे दिला. तो वाचताच त्यांना वाटले की, कोणा मोठ्या व्यक्तीकडून हा लेख विनायकाने लिहून घेतला असावा.
पण शिवाजी स्कूलच्या शिक्षक मंडळींनी तो लेख विनायकानेच लिहिला असल्याची ग्वाही दिल्यावर तो लेख संपादकीय म्हणून नाशिक वैभवच्या दोन अंकात अग्रलेखाच्या जागी छापण्यात आला. विनायकाची भाषाशैली आणि तेजस्वी विचार यामुळे या लेखाची चर्चा बरीच झाली. लेख वाचलेल्या व्यक्तींना तो लेख लिहिणारा कोण आहे हे जाणून घेण्याची उत्कंठता लागली. पण काही थोड्याच लोकांना हा लेख शिवाजी स्कूलच्या तेरा चौदा वर्षांच्या मुलाने लिहिला असल्याचे माहित होते.
विनायक नाशिकला येण्यापुर्वीच त्याचे मोठे बंधू गणेश उर्फ बाबाराव हे शिक्षणासाठी नाशिकला आले होते. दोघे बंधू एकत्र राहत. सुरुवातीला दोघे घरीच स्वयंपाक बनवून जेवण करत आणि शाळेस जात. पण शाळेची वेळ आणि स्वयंपाक यांची वेळ जमेना म्हणून खानावळीत जेवण्यास जाऊ लागले. विनायकाचा स्वभाव याबाबतीत लाजरा असे, त्यामुळे वाढप्याकडे मागण्याचा त्यांना संकोच वाटे. आणि खानावळीत मागितल्याशिवाय कोण वाढणार.
वाढपी विनायकाला विचारे पोळी हवी का? विनायक चटकन नको म्हणून टाके. या गंगारामाच्या खानावळीत सावरकर बंधू अधिक पैसे देणारे असत. तरी विनायकास मागण्याचा संकोच वाटे. त्यामुळे सुरुवातीला कित्तेक दिवस विनायक अर्धपोटी राहत असे. त्यात विनायक मजबूत व्यायाम करत असे. त्यामुळे खाण्याचे हाल होऊन चालणार नव्हते. म्हणून बाबारावांनी विनायकाला एका प्रसिद्ध हलवायाकडे जिलेबीचा रतीब लावला.
त्याकाळात ब्राह्मणांनी बाहेर खाणे निषिद्ध मानले जाई. पण या समजुतीचा विनायक त्या वयातही उपहास करून अन्नाने जात बाटत नाही हे ठामपणे मित्रमंडळीस सांगे.
त्यावेळी हे दोघे बंधू कानड्या मारुतीपाशी राहत. तिथे इंग्रजी सहावी सातवीतील किंवा वयाने त्यापेक्षा मोठी मुले जमत. त्या मुलांच्या आणि विनायकाच्या स्वभावात प्रचंड फरक असे. या मुलांना चैन, नाटके, गाणीबजावणी, बाष्कळ चकाट्या पिटण्यात आनंद मिळे. ही मुले बदमाश नसली तरी उनाड असत. त्यांच्या मनात देशभक्ती, स्वातंत्र्य असे विचार येत नसत. पण विनायकाचे बरोबर या उलट असे. दिवसभर वाचन आणि व्यायाम याचं नियोजन केलेलं असे. त्याप्रमाणेच तो वागत असे. उरलेल्या वेळेत कुणाशी राजकीय चर्चा करण्यात त्याला जास्त स्वारस्य असे. त्यामुळे विनायकाच्या वृत्तीचा मित्र नाशिकात आल्यावर त्यास मिळेना. त्यावेळी विनायकाला वाटे की, या शहरातील शिकल्या सवरल्या मुलांपेक्षा आपल्या भगूर गावातील आपले सवंगडी अधिक देशभक्त, सत्संगी आणि राजकीय चर्चेत तत्पर असे आहेत. नाशिकला आल्यावर यामुळे पहिले काही महिने विनायकाचे मान लागेना. त्याला उदासीन वाटू लागले.
विनायकाच्या वडिलांना विनायकाचा लळा खूप असे. आणि विनायकासही आपल्या वडिलांबद्दल नितांत प्रेम असे. त्यामुळे ते दर पंधरवड्यात एकदा त्याला भेटायला भगूरहून नाशिकला येत. विनायक त्यांची आतुरतेने वाट पाही. ते आले की दोन दिवस मज्जेत जात. ते परत जाऊ लागले की विनायकास तळमळ लागे, डोळ्यात पाणी येई.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

