Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर
15 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग १५ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग १५
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
६. विनायकाने वक्तृत्वकला कशी आत्मसात केली.
विनायकाने वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी वक्तृत्व कलेवरची मराठी दोन पुस्तके वाचून काढली होती. त्यामुळे वक्तृत्व कलेच्या तयारीसाठी काय काय करावे लागते याची त्यास माहिती झालेली होती. पूर्वतयारीत निबंध कसे असावेत, विषय प्रवेश, विषय विवेचन, पूर्वपक्ष-उत्तरपक्ष, खंडन-मंडन, संकलन, समारोप कसा असावा हे शिकण्यासाठी विनायकाने अनेक ग्रंथ वाचून त्या त्या ग्रंथकारांची पद्धत इतर ग्रंथकारांच्या पद्धतीशी तुलना करून परिणामकारक कोणती याची निवड केली. प्रथम त्याने पद्धतशीरपणे निबंध लिहिण्याची कला आत्मसात केली. हे त्याचे वक्तृत्व कलेतील पहिले पाऊल होते.
एकदा विषयाची मांडणी पद्धतशीरपणे कशी व का करतात याचे मर्म कळले आणि त्यावर हात बसला की मग त्या मूळ नियमांचा क्रम आपण हवा तसा बदलू शकतो किंवा एखादी नवी पद्धत आपण निर्माण करू शकतो.
याबाबत विनायक स्वतः सांगे की,
“मूळ निबंध हा वक्तृत्वाचा दुय्यम भाग; वक्तृत्वाचा आत्मा म्हणजे भावना. विषयाशी स्वतःचे तादाम्य झालं पाहिजे. ते स्वतःला इतके पटले पाहिजे की ते दुसऱ्याला पटविल्यावाचून चैनच पडू नये.
यास्तव निबंध किंवा व्याख्यान लिहून काढण्यापेक्षा ते मूलतःच जेव्हा मी केवळ व्याख्यानीत जातो, भाषण करू लागतो, तेव्हाच माझे वक्तृत्व अधिक सरस उठते. कारण जस जशी भावना उद्दीप्त होते तस तशी भाषाशैली, वाग्गती, आवेश, मुद्राविष्कार आणि अभिनय सहजगत्या यथावत प्रकट होत जातात.”
विनायकाने लहानपणापासूनच अनेक काव्ये, सुभाषिते पाठ केलेली असत. बखरी, निबंधमाला वगैरे मधील उत्तम उतारे तो लिहून काढी. आणि स्वतःच्या निबंधात तशी सुटसुटीत किंवा संक्लीष्ट वाक्ये याथास्थाली रचून घालण्याची सवय करी. विशेषतः गद्यात वाक्य न तोडता त्याच सहज गतीत पद्यातील सुंदर अवतरण गुंफून देण्याची विनायकास आवड असे.
शिवाय वक्तृत्व खरोखरीच परिणामकारक आणि प्रभावी करायचे असेल तर त्याला मुख्यतः त्या विषयासंबंधीचाच नव्हे तर पुष्कळश्या अवांतर ज्ञानाचाही भरपूर साठा जवळ असला पाहिजे. असा अवांतर ज्ञानाचा पुष्कळ साठा गाठीशी असला आणि भावना, भाषाशैली, अभिनय, वाग्गती इत्यादी साधनांनी वक्तृत्व खुलून दिसते.
विनायक या विषयात पुढे एकदा म्हणतो,
“या विषयात काय सांगू अशी लेखणीचे मागचे टोक तोंडात चघळीत बसणारी चिंता मला केव्हाच भासली नाही. तर बहुदा या विषयावर काय लिहू आणि काय नको असे माझे होत असे. व्यक्त होऊ पाहणाऱ्या विचारांची आणि माहितीची लेखणीच्या टोकाशी चाललेली धक्काधक्की बंद करता करता त्रासलेली चिंताच मला बहुदा भासत आली. याचे कारण लहानपणापासूनचे माझे विविध आणि अश्रांत वाचन, मनन आणि निरीक्षण.”
त्याप्रमाणे विनायकास हे ही सांगावे वाटले की,
“मला लहानपणी कवितेप्रमाणे वक्तृत्वकलेचेही शिक्षण तर राहोच, पण त्या गुणास सहानभूतीचे उत्तेजन देखील देणारा कोणीही मिळाला नाही. उलट माझ्या बहुतेक समवयस्कांनी अरसिक अज्ञानाने आणि बहुतेक समकालीन प्रौढांनी मत्सरामुळे माझा मनोभंग आणि तेजोभंग करण्याचा यत्न करीत असावा. पण त्या संघर्षामुळे सुप्त अग्नीच्या ठिणग्या अधिकच प्रदीप्त होऊन उडू लागल्या.”
किशोरावस्थेनंतरही विनायक वक्तृत्वकलेच्या अभिरुचीस्तव डीमास्थेनिस, मिसरो, शेरिडन इत्यादी इंग्रजी मराठी चरित्रांचा आणि लेखकांचा अभ्यास तो करीत असे. उत्कृष्ठ उतारे तो पाठ करत असे. महाभारतातील श्रीकृष्णाची सभापर्वातील किंवा कर्णपर्वातील ओजस्वी भाषणे विनायक वारंवार वाचत असे. अशाप्रकारे विनायकाने आपल्या वक्तृत्वकलेचा विकास सतत करत ठेवला.
वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखामुळे आणि वक्तृत्व स्पर्धेतील भाषणामुळे नाशिकमधील प्रमुख पुढारी मंडळीत विनायक पहिल्या सात आठ महिन्यातच परिचित झाला. त्यामुळे त्याच्या बरोबर असणाऱ्या आणि कानड्या मारुती जवळच्या खोलीत जमणाऱ्या उनाड मुलांमध्ये देखील विनायकाची वाहवा होऊन ते विनायकाच्या विचारांनी प्रभावित होऊ लागले.
नाशिकचे प्रख्यात शीघ्रकवी, टिळकांचे निस्सीम भक्त, तेथील एक पुढारी आणि वकील श्री. बळवंत खंडूजी पारख यांच्याशी देखील विनायकाचा परिचय झाला.
विनायकाच्या वडिलांचा आणि त्यांचा पूर्व परिचय असे. त्यांना जेव्हा कळले की विनायक भगूरच्या सावरकरांचा मुलगा आहे, तेव्हा तर त्यांचा विनायकावरील लोभ अधिकच वाढला. रस्त्यात जरी भेट झाली तरी ते विनायकाच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवीत आणि सोबत असणाऱ्या लोकांना आवर्जून याचा परिचय करून देत, ते म्हणत, “हा आमच्या सावरकरांचा मुलगा, बर का! बाळ, सावरकर नाव यथार्थ कर बर का! ज्याचा कर (हात) आपल्या पडत्या राष्ट्रास सावरतो, असा सावरकर हो.”
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

