Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

16 बखर सावरकरांची:पूर्वार्ध  ~भाग १६ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध  ~भाग १६
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
७. प्लेगचा पहिला प्रादुर्भाव.
विनायक आपल्यातील गुणांचा विकास करत असतानाच त्यास देवी रोगाने गाठले. त्यामुळे त्यास भगूरास घरी राहावे लागले. त्याच दरम्यान पुण्या-मुंबईस प्लेग या साथीच्या रोगाने प्रचंड थैमान घातला होता. केसरीतून या प्लेगच्या भयंकर रुपाची वर्णने छापून येत. शिवाय प्लेग निवारणार्थ चाललेल्या सरकारी योजनातील भयंकरपणा देखील केसरीत रकानेच्या रकाने भरून छापून येत असे. विनायकाचे वडील त्याच्याकडून केसरीतील हे वृत्त नियमित वाचून घेत. भगूर गावातील अनेक मंडळी देखील हे वृत्त ऐकण्यास तेव्हा बैठकीवर जमत.
आज ज्याला प्लेग झाला तो उद्या मृत्युमुखी पडे. घरात एका व्यक्तीस प्लेग झाला म्हणजे बघता बघता संपूर्ण कुटुंब प्लेगच्या आहारी पडे. बायका-मुले, माणसे, भावंडे घरच्या घर एखाद्या आगीत पडून भस्मसात व्हावे तसे पटापट मृत्युमुखी पाडून नष्ट होऊन जाई. एकेका घरात पाच पाच, सहा सहा प्रेते एकामागून एक पडत, प्रेत उचलायलाही त्या घरात कोणी शिल्लक राहत नसे. वाडेच्या वाडे, पेठाच्या पेठा, गल्ल्या सगळीकडे हीच अवस्था. घरोघरी कण्हणे, किंकाळ्या, प्रेते, धावपळ, रडारड चाललेली असे. प्लेग झालेल्यांची प्रेते जे उचलत, स्मशानापर्यंत पोहोचवत, त्यास दुसऱ्या दिवशी प्लेगने आपल्या कब्जात घेतलेले असे. तिसऱ्या दिवशी त्याचे प्रेत उचलून न्यावे लागे. अशी भयंकर परिस्थिती उद्भवली होती.
या संपर्कजन्य रोगांच्या भयाने कोणी कोणाची प्रेते उचलायला पुढे येईनात. इतकेच काय पण मुले आई-बापांची प्रेते टाकून पळून जाऊ लागली तर कुठे आई बाप मुलांची प्रेते तशीच टाकून पळून जात.
फक्त रोगाची लागण होण्याच भय नव्हत तर घरात रुग्ण आहे किंवा त्याचे प्रेत आहे हे समजताच सरकारी अधिकारी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या सोजीरे लोकांना त्या घरावर पाठवून देत. त्यांचा ससेमिरा रोगापेक्षा भयंकर असे. घर शुद्ध करण्याच्या नावाखाली घरात घुसून सामानाची फेकाफेक करणार, जाळपोळ करणार, उपयोगी वस्तूंची लुटालूट करणार आणि कुटुंबातील उरलेल्या सर्वांना ‘सेग्रीगेशन’ च्या अटकेत टाकणार. तिथेही हालच व्हायचे.
ही सगळी वर्णने केसरी सारख्या वर्तमानपत्रातून सतत छापून येत. वाचणाऱ्या आणि ऐकणाऱ्या लोकांच्या अंगावर शहारे यावेत अशी भयंकर स्थिती पुण्या-मुंबईस होती. हळूहळू प्लेगने पुण्या मुंबईच्या आजूबाजूस हात पाय पसरणे सुरु केले. त्यात तो भगुरास देखील येऊन दाखल झाला. भगुरास सावरकरांच्या बैठकीवर बसून पुण्या मुंबईची वर्णने विनायकाकडून ऐकणारे गावकरी देखील एक एक करत प्लेगच्या आहारी गेले. पुण्यास लोक कसे मरत आहेत, हे वाचून घाबरा होणाऱ्या भगूरच्या गावकऱ्यास एक दोन अपवाद वगळता सर्वांना प्लेग झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. रोग परवडला पण उपाय नको अशी लोकांची अवस्था झाली. भगूरची देखील पुण्या मुंबईसारखी अवस्था झाली. रस्तेच्या रस्ते ओस पडू लागले.
बघता बघता प्लेग संपूर्ण हिंदुस्थानभर पसरला. सर्वत्र पुण्यासारखी मन विषण्ण करणारी स्थिती उद्भवू लगली. जसा प्लेग पसरू लागला तसा तो निवारणार्थ चाललेला अमानवी छळ देखील सर्वत्र होऊ लागला. देशात अनेक ठिकाणी दंगे उसळले. काही लोकांनी या छळापासून सुटका करून घेण्याचे शक्य ते सगळे प्रयत्न करून पाहिले. तरी या प्लेगने आणि त्याच्या निवारणार्थ चाललेल्या छळाने बहुतांशी लोकांचे डोळे उघडेनात.
पुण्यात तर हे प्रकरण अगदी विकोपास गेले. इंग्रजांचे सरकारी अधिकारी त्यांच्या सोजीर लोकांस वाट्टेल ते करण्याचे अधिकार देऊन पाठवत असत. आणि हे सोजीर लोक लोकांना बुटांनी लाथा घालत, घरे फोडत, दिसेल ते जाळून टाकत. देव्हाऱ्यातील देव रस्त्यावर फेकून देत. मरत्या नवऱ्यापासून बायकोला, आईपासून मुलांना बळाने हिसडून अटकेत टाकत. फरफटत, ओढत घेऊन जात. प्लेग निवारक टोळ्यांचा रस्त्या रस्त्यावर धिंगाणा चाले.
 पुराणातले दैत्य देखील लाजतील अशी त्यांची वर्तणूक असे. लोकांस हे असह्य आणि त्रासदायक वाटू लागले. पण दंडेलशाही पुढे कुणाचे काही चालेना.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य  (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.)  9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}