Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर
19 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग १९ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग १९
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
चापेकर आणि रानडे यांना फाशी देण्यात आली, त्यानंतर वर्तमानपत्रातून त्यांच्यावर लेख आले. त्यात लिहिले होते की, ‘ते फाशीच्या आदल्या रात्री स्वस्थ निजले. पहाटे उठले. गीतापठण केले. आणि “नैनं छीदन्ति शस्त्राणि” असे गर्जत गर्जत एकमेकांचा हसून निरोप घेत फासावर चढले.’ हे सगळ वर्णन वाचल्यानंतर विनायकास दिवस रात्र एकच विचार मनात येई. चापेकरांचे बलिदान व्यर्थ जाऊन दिले नाही पाहिजे. आपण स्वतःची समिधा या स्वातंत्र्याच्या होमात अर्पिली पाहिजे. अशा विचारांनी विनायक बेचैन होई. दोन चार दिवसांच्या या अस्वस्थते नंतर विनायक उठला. त्याच्या बालपणीचा एकमेव आधार असलेल्या, विनायकाचे संकट समयी समाधान करणाऱ्या, जिला विनायक हक्काने सुख-दुखे सांगताच आणि ती हसतमुखाने ऐकताच विनायकाच्या मनास समाधान वाटून हलकेसे वाटे, ती विनायकाची आई, साक्षात देवीकडे विनायकाने धाव घेतली.
तो देवघरात गेला. त्याने देवीची भक्तिभावाने पूजा केली.
सावरकरांच्या त्या नव्या घरातील लहानश्या पण सुंदर देवघरात सुगंधी फुलांचा दरवळ पसरला होता, तुपाचा मंद मंद दिवा निरांजनात तेवत होता, उदबत्यांचा उन्मदाकारक नागमोडी धूर कुसुमांच्या कोमल परीमलात विणला जात होता, महिषासुरास तुडवणाऱ्या, सिंहावर आरूढ असणाऱ्या, जिच्या आठही हातात शस्त्रे उपसलेली आहेत अशा अष्टभुजा असणाऱ्या देवी समोर विनायकाने ध्यान लावले. आणि शेवटी तिच्या पवित्र चरणांवर हात ठेऊन, तिला साक्ष ठेऊन विनायकाने प्रतिज्ञा केली की,
“माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीत चापेकरांसारखा मरेन किंवा शिवाजी महाराजांसारखा विजयी होऊन मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवीन!”
विनायक प्रतिज्ञा घेताना त्यास भास होत होता की, देवी त्याच्या कार्यास अनुमती देत आहे. उग्र पण सुहास्य वदनाने मंदस्मित करत देवी त्यास परवानगी देत आहे. देव्हाऱ्यात देवीची सुंदर मूर्ती विराजत आहे, तिच्या पुढे त्या तशा पुण्यमय वातावरणात विनायकाने शपथ घेतली,
“यापुढे मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून ‘मारिता मारिता मरेतो’ झुंजेन!!!”
विनायकराव सावरकर. आज त्यांनी भारतमातेस परकीय जोखडातून मुक्त करून स्वराज्य स्थापण्याची भीष्मप्रतिज्ञा केली. वय फक्त पंधरा वर्षे असलेल्या विनायकाने अष्टभुजा देवीस साक्षी ठेऊन प्रतिज्ञा घेतली होती. तेव्हा त्यास कल्पना होती की, पुढे आयुष्यात रक्तपात, घात-प्रत्याघात, वध, फाशी, वनवास, छळ, यश किंवा अपयश, दौरात्म्य आणि हौतात्म्य, प्रकाश आणि अंधार यांचा समावेश होऊ शकतो. याची पूर्णपणे जाणीव ठेवून ही प्रतिज्ञा त्याने घेतलेली होती. हे सन होते १८९८.
प्रतिज्ञेची एक ठिणगी पडली होती, तिचा येत्या काळात वणवा होऊन त्याचे चटके इंग्रजी सत्तेला बसणार होते.
विनायकास घराचे लोक प्रेमाने तात्या म्हणत तर बाहेरचे लोक त्यांना शक्यतो तात्याराव असे संबोधत असत. तात्यारावांच्या वर्तनात आता बदल होत होता. त्यांच्या चेहऱ्यावर एक अकालिक चिंता आणि गंभीरता दिसू लागली होती. रात्र रात्र ते एकांतात जागे राहत. सतत स्वतःच्या विचारात गढून गेलेले असत. त्यांच्या बोलण्यात आता इंग्रजांना मारण्याचे आणि बंडाचे विषय अधिक असत. लोकमान्य टिळकांच्या राजकारणापुढे जाऊन प्रत्यक्ष पाऊल टाकण्याची त्यांची सिद्धता होऊ लागली. तात्यारावांच्या विचारांना क्रांतिकारक वळण अधिक वेगाने लागू लागले. आधीच त्यांच्या विचारात बंड वगैरे असेच, त्यात आता प्रतिज्ञा केल्याने ते अधिकपणे आणि ठळकपणे जाणवू लागले. तात्याराव आता आचरणात क्रांतिकार्याची भीषण तत्वे आणू लागले.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

