Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर
20 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग २० लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग २०
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
लहानपणापासून तात्यारावांच्या वडिलांनीच त्यांच्या मनात देशप्रेम, कवितेची आवड, इतिहासाची आवड निर्माण केलेली होती. लोकमान्य टिळकांच्या राजकारणाची रुची लावली होती. तात्यारावांच्या या गुणांचे मुक्तकंठाने ते कौतुकही करत. तात्यारावांच्या या गुणांचा त्यांना अभिमान वाटे. तरी आता तात्यारावांच्या बदलत्या रूपाने त्यांना चिंता वाटू लागली. ते प्राण संकटात टाकतील अशी त्यांच्या वडिलांना धास्ती वाटू लागली.
एक दिवस तात्यारावांचे वडील भोजनानंतर मध्यरात्री बंगल्यात आले तर तात्या काही कविता गुणगुणत आहे, त्यात अगदी गढून गेला आहे, गालांवरून टिपे वाहत आहेत, नेत्र कोणत्या तरी अदृश्य देखाव्याकडे टक लावून विचारमग्न बसलेला आहे. इतक्यात त्यांना कवितेचे पुढचे चरण सुचले आहे, ते आवेशाने म्हणत कागदावर लिहून काढत आहे.
अशा स्थितीत वडिलांनी अचानक पण हळुवार स्पर्श करून तात्यारावांना विचारले, “काय करत आहेस?” आणि समोरील कागद घेऊन वाचू लागले. तात्याराव चापेकर बंधूंवर फटका लिहित होते. झालेली कडवी वाचून वडिलांनी त्याचे फार कौतुक केले आणि तात्याच्या चेहऱ्यास कुरवाळत प्रेमाने म्हणाले,
“तात्या, अजून तुझे वय कोवळे, तुझा देह मूळचाच सुकुमार, हे विचार आणि मार्ग भयंकर आणि कठोर. तुझ्या कोमल मेंदूला फार ताण बसेल अशा ह्या विषयांचा ध्यास धरू नकोस. त्यातही आपल्या कुटुंबाची सर्व अशा तुझ्यावर. माझी व्दारका एका खांबावर. फेडलेस तर तूच आपल्या घराचे पांग फेडशील. तेव्हा स्वतःच्या जीवास अशा संकटात ढकलू नकोस. तुला आजून याचे परिणाम किती भयंकर असतात ह्याची कल्पना नाही. तू इतर कविता रच, शिक, मोठा हो, मग काय हवं ते कर!”
प्रेमापोटी बोलत असलेल्या वडिलांना तात्याने थांबवले नाही. पण तात्यारावांच्या आयुष्याचा मार्ग ठरला होता. ते मनात म्हणत होते,
“चापेकर बंधुच्या परिणामांपेक्षा आणखी किती भयंकर परिणाम तो काय असणार? ते भोगण्यास आम्ही सिद्धच आहोत!”
पण त्यानंतर तात्यारावांनी क्रांतीदर्शी कविता घरातील सर्वांसमोर करण्याचे सोडून दिले. उकडते म्हणून ते एकटेच बंगल्यात झोपाळ्यावर निजत. आणि सर्वजण झोपल्यावर त्या कविता रचत. दिवसा त्या विषयाकडे लक्षच नाही असे दाखवून ते दुसरे वाचन, अभ्यास, चर्चा करत. कधी कधी रात्रीच्या तंद्रीत काही चरण जुळून जात. मग ते सकाळी उठल्यावर लिहून काढत.
या काळात तात्यारावांनी चापेकर बंधूंच्या हौतात्म्यावर एक दीर्घ फटका लिहिला. चापेकर बंधूंचे हौतात्म्य समाजाकडून विसरले जाऊ नये. येणाऱ्या तरुण पिढीला त्याचे सतत स्मरण राहावे. त्यांच्या मार्गावर चालण्यास देशभक्त प्रेरित व्हावेत हा त्या मागचा उद्देश. हा फटका बारा भागात आणि सत्तर ऐंशी कडव्यात त्यांनी लिहिला. त्यात तात्याराव म्हणतात,
*धर्माज्ञेला इशाज्ञेला समाज कर्तव्याला हो!
पाळोनीया प्राणा द्याया सिद्ध, त्यांना शुभ लाहो !!३
स्वजन छळाला ऐकुनी होती तप्त तरुण ते अरुण जाणो!
देशासाठी प्राणा देती धन्य धन्य त्यां कां न म्हणो? !!४
परस्परांमधी विचार करिती उपाय वादाती मग सुचला!
अरे, रँड हा अधम, ह्यासही वधू चला ते चला चला !!५
अरे, कांच हा मनी डाचतो, जाच असह्यच लोकांना!
पोचट देखुनी नाचविती हे काळ भासती कैकांना !!६
शतावधी ते जन्मा येती मरोनी जाती ना गणती!
देशासाठी मरती त्यांसी देश्पिते किं बुध म्हणती !!७
वरू वरू झडकरी मरण तें जरी अमर असे घडे !
अनोन्यामधी बोलती की मग गरुडपतीची जोड जडे !!८*
तात्याराव यांनी अगदी स्पष्ट शब्दात चापेकर बंधूंचे उद्दिष्ट या फटक्यात सांगितले. नाही तर अनेक लोक चापेकरांना अवहेलीत होते. त्यांच्यावर टीका करत. इंग्रजी ससेमिरा मागे लागेल म्हणून त्यांचे नाव घ्यायला देखील भीत. पण तात्यारावांनी त्यांच्या बलिदानाची महती या फटक्यातून गायली. रँडचा वध झाला, त्याचे वर्णन देखील तात्याराव तितक्याच उदात्तपणे करतात, ते म्हणतात,
लालभडक ते नेत्र, बंधूवर बाळकृष्ण दे धीर !
श्री दामोदर सिद्ध जाहला जयालागी खलदमना !!५
कांता वदली, “कांता, जाचा देशहिताला कारवाया !
पतिराया, च्या निरोप जावे त्वरित कीर्तीला वरावया” !!६
पवन जवन परी मागे सरिता ‘गणेशखिंड’ प्रती आला !
कालासम मग समय साधितो घालायला तो घाला !!७
भक्ष रँड बहु मस्त देखता सिंह धावला बगीकडे !
गोळी सुटली, गडबड मिटली,दुष्ट नराधम चीत पडे !!८
या फटक्यात तात्याराव शेवटी चापेकर बंधूंना संबोधून लिहितात की, आपली फाशी ही यज्ञवेदीका आहे. त्यावर आमचे ही रक्त सांडो. त्यामुळे आमच्या रक्ताचेही सार्थक होईल. आणि पुढे तात्याराव म्हणतात,
झुंजण्यात अपुरे पडलात याची खंत बाळगू नका आम्ही आपले कार्य पुढे चालवून पराक्रमाने धडे गिरवू.
फाशी न ती यज्ञवेदिका रक्ते न्हाली जी तुमच्या !
सांडूनी होवो त्याच्या राष्ट्ररणी सार्थक रक्ताचे आमच्या !!७
कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत, खंती नको! पुढे !
कार्य चालवू गिरवूनी तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे !!८
चापेकर बंधुंवरील हा फटका अल्पावधीतच सर्वत्र पोहोचला. लोक त्याची पारायणे करू लागले. पाठांतर करून गुप्त किंवा उघडपणे तो फटका म्हणू लागले. त्यात वापरलेले शब्द इतके दाहक होते की, ते छापायचे धाडस कोणताही छापखाना करत नव्हता. त्यातील काही शब्द बदलून त्याची दाहकता कमी करण्याचा प्रयत्न तात्यारावांच्या सहकाऱ्यांनी केला तरीही त्यास छापखाना मिळेना. असे असले तरी त्याच्या लिहिलेल्या प्रती महाराष्ट्रभर बघता बघता पसरल्या. त्या फटक्याने तरुणांना चेतवण्याचे काम अगदी चपलखपणे बजावले.
ज्या काळात चापेकर बंधूंचे नाव उच्चारणे सुद्धा लोकांना भयभीत करून सोडत होते. त्याकाळात तात्यारावांनी त्यांचे गोडवे गाणारे आणि त्यांच्या कृत्याचे समर्थन करणारे गीत रचले, हे फार मोठे धाडस होते. इंग्रज तर चापेकरांचे कोणी नाव उच्चारले तरी त्यास सरकारद्रोही ठरवून मोकळे होत.
अशा अवघड काळात तात्यारावांनी हा फटका लिहून तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवला आणि त्यामुळे पुढची काही वर्षे घरोघरी, विद्यालयात, बैठकीतून, उपहारगृहातून, कॉलेजातून, सभांमधून तो फटका म्हंटला जाई. तसेच तो तरुणात आणि प्रौढात, स्त्रियात आणि पुरुषात अत्यंत प्रिय झाला.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता

