Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर
25 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग २५ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग २५
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
बघता बघता संपूर्ण गावात प्लेग पसरला. चार दिवसात अनेक जण या प्लेगला बळी पडले. तात्यारावांच्या मामाने कळवले की, भगूर सोडून मुले माणसे त्यांच्याकडे पाठवून द्या. पण राहते घर सोडणे इतके सोपे असते होय, त्यातच एक दोन दिवस गेले. रुग्ण वाढतच होते.
एका रात्री तात्यारावांचे वडील एका प्लेगच्या रुग्णाची विचारपूस करून घरी परत येत असताना त्यांच्या आळीतील राणू शिंप्याच्या घरावरून चालत येत असताना त्या घराकडे त्यांचे लक्ष गेले. अगदी चारच दिवसांपूर्वी पाच पंचवीस माणसांनी गजबजलेल हे घर आता उजाड पडल होत. त्यात कोणीही नव्हते. घराची कौले उस्कटून काढली होती. घरातील समान अस्ताव्यस्त पडलेलं होत.
खिडक्या दारे सताड उघडी होती. एकूणच ते घर भयाण वाटत होते. ते बघत असताना त्यांच्या मनात एकदम चर्र झाल.
आणि रोजची पायवाट असतानाही ते खड्ड्याचा अंदाज न आल्याने पाय मुरगळून पडले. तसेच लंगडत लंगडत ते घरी आले. वातावरण एकदम भयानक असल्याने घरी असलेली सगळी पोर त्यांची वाट पाहत दारात उभीच होती. वडील लंगडत आहेत हे बघून तात्यारावांनी त्यांना मलमपट्टी केली. पाय चेपून दिले. त्यांनी आणलेलं प्लेग प्रतिबंधक औषध सर्वांना दिले.
दुसरा दिवस नेहमीप्रमाणे उजाडला. तात्यारावांनी स्वयंपाकात आपल्या वहिनीची मदत केली. आणि वडिलांना भेटायला ते त्यांच्या खोलीत गेले. वडील जांघेत काहीतरी चाचपीत उभे होते. त्यांनी तात्यारावांना आलेल पाहिले आणि एकदम चपापले.
तात्यारावही त्यांच्या कृतीने चपापले. तात्यारावांनी त्यांना विचारले, “काही दुखत आहे का?” तर त्यांनी उत्तर दिले की, “काल पाय मुरगळला आहे त्याची सूज असावी.”
रोज दुपारी वडील लहान मुलाला घेऊन माडीवर झोपण्यास जात. पण आज त्यांनी त्यास नेले नाही. आणि वरती गेल्यावर तात्यारावांना हाक मारून वरती बोलावले. तात्या वडिलांजवळ गेल्यावर वडिलांनी त्याला मिठीत घेतलं. त्यांचे डोळे पाण्याने डबडबले होते.
कापऱ्या स्वरात ते म्हणाले, “तात्या, मला प्लेग झाला आहे. बाळांनो आता तुम्हा माझ्या चिल्यापिल्यांचे कसे होईल? कोण तुम्हाला सांभाळून घेईल?”
हे वाक्य ऐकताच तात्याराव एकदम दचकले. त्यांना क्षणभर काय बोलावे हे सुचेना. पण तात्यारावांचा स्वभाव लहानपणापासूनच असा होता की, संकट येताच त्यांचे मन दगडासारखे होऊन उलट एक प्रकारचे कर्तुत्वाचे अवसान त्यांना चढे.
स्वतःला सावरत तात्याराव म्हणाले, “काय चिंता, वैद्यास आत्ता बोलावून आणतो.”
वडील पटकन म्हणाले, “ छे छे, ही बातमी मुलांना कळू देऊ नकोस. नाही तर पोर घाबरून जातील. लोकांना कळले तर पोलीस येतील. घरच्यांना ते गावाबाहेर काढतील.
वर्तमानपत्रात तात्यारावांच्या वाचनात प्लेगवरील एक रामबाण उपाय अशा आशयाची बातमी आलेली होती. त्यात दिलेला उपाय करून पाहू म्हणून तात्यारावांनी वडिलांना सांगितले आणि त्याला लागणारे साहित्य आणण्यास बाहेर पडले. त्यांचा एक मित्र त्रिंबक शिंपी असे, त्याच्याकडून त्यांनी दोन अंडी मागून आणली. ती अंडी शेंदरात घालून कालवली. आणि त्याचा लेप प्लेगच्या गाठीवर बांधून ठेवला. आणि वडिलांना मागच्या माडीवर झोपवले.
लहान भावाला सांगितले की, ‘वडिलांना हिवताप आला आहे, त्यांच्याजवळ जाऊ नकोस.’ पण वहिनीला मात्र खरे सांगावे लागले. तात्यारावांचे वय केवळ सोळा वर्षांचे होते, तरी त्यांच्यातील धीरोदात्तपणा वाखाणण्याजोगा होता.
इकडे ब्राह्मणाच्या घरी अंडी मागवली म्हणून त्रिंबकच्या घरी चर्चा सुरु झाली. तात्यारावांचे दुसरे दोन मित्र राजा आणि परश्या शिंपी, हे दोघेही तात्यारावांच्या मदतीला नेहमी धावून येत असत. पण यावेळी मात्र त्यांचा एक भाऊ प्लेगने वारल्याने त्यांना रानात राहावे लागत होते. त्यांच्या घरात देखील प्लेगचे थैमान सुरूच होते. रानात गेल्यावर तिथे त्यांच्या आईला प्लेगची लागण झाली. त्या दोन दिवसात अर्धमेल्या होऊन पडल्या. खालचा भाग साफ मेलेला.
पण श्वास अजून सुरु होता. हा रोग संपर्कजन्य असल्याने एका झाडाखाली कापड बांधून त्यांना कुटुंबापासून दूर ठेवण्यात आले. तिथे त्यांच्या खालच्या शरीराला मुंग्या लागून अनेक भोके पडली. अशा बातम्यांनी सर्वांचे मन विषण्ण होऊन जाई.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

