Classifiedदेश विदेशमंथन (विचार)युनिटी बिझनेस
27 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग २७ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग २७
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
वडिलांच्या दुखण्याची दुसरी रात्र सुरु झाली. नऊ दहा वाजता त्यांना एकदम वायूचा भयंकर झटका आला. त्यात ते सतत पाणी मागू लागले. तात्याराव पाणी देईनात त्यामुळे ते त्यांच्यावर संतापू लागले. उठून धावून येऊ लागले. सोळा वर्षाच्या मुलाला त्यांना आवरणे शक्यच नव्हते. ते तर तात्यारावांच्या अंगावर धावून येऊ लागले. इतक्यात काय झाले आणि खोलीतला दिवा खाली पडून मालवला. तात्यारावांना तेथून खाली जाण्याची संधी मिळाली आणि ते पटकन खाली आले.
पण वडिलांना मात्र त्यांच्या मागे खाली येता आले नाही. तिथेच दारापाशी पडून ते कण्हू लागले. आणि ‘तात्या, बाळ अरे पाणी द्या रे, कोणी तरी पाणी द्या’ म्हणून विव्हळू लागले. तात्यारावांना वडिलांजवळ जायचे होते पण त्यांच्या भयाने वर देखील जाता येईना.
इकडे बंगल्यात बाळ देखील कण्हू लागला होता. तो सारखा ‘तात्या, तात्या’ म्हणून मोठ्याने हाक मारू लागला. त्यालाही वायूचा झटका येत होताच. वहिनी त्याच्याजवळच होती.
तात्याराव त्याच्याजवळ गेले आणि त्याला म्हणाले की, “बाळ, ओरडू नकोस नाही तर तू आजारी असल्याचे वडिलांना कळेल. आपल्याला त्यांना कळू द्यायचे नाहीये ना.” अस म्हंटल्यावर तो काही काळ शांत बसे. त्या अर्ध बेशुद्धावस्थेत देखील बाळ तात्यारावांचे ऐके.
तात्याराव तिथे येताच वहिनीला एकदम रडू आलं. तात्यारावांना वाटल तिलाही त्रास चालू झाला की काय.
त्यांना फारच चिंता वाटू लागली. त्यांनी तीस विचारले, “तुझे तर काही दुखत नाही ना?” त्यावर वहिनी म्हणाली, “माझे कशात काय, पण तुमचे ते क्लेश पाहून मला तुमची चिंता वाटते. तुम्ही थोडे तरी निजा.”
त्यावर तात्याराव म्हणाले, “अशा वेळी असे रडून कसे चालेल. धीराने संकटाशी झुंजच घेतली पाहिजे.”
रात्र अजून संपलेली नव्हती. दोघांची धावपळ सुरूच होती. एकदा वडील, एकदा भाऊ. दोघांकडे सतत लक्ष द्यावे लागे. वडील वायूच्या झटक्याने वरून खाली पडतील म्हणून तात्याराव आणि वहिनी दिवा घेऊन माडीवर गेले तर वडील पुन्हा धावून आले. आणि खाली जाऊ लागले. शेवटी नाईलाजाने त्यांना थोडे पाणी द्यावे लागले. मग खोलीची दारे बंद करून घेतली. पाणी प्यायल्या नंतरही वडील अजून पाणी मागतच होते. पण अधिक पाणी देता येत नव्हते. ते अत्यंत आर्त किंकाळ्यांनी मुलांना बोलावत होते, ‘अरे तात्या, बाळ कोणी तरी या रे. पाणी द्या रे.’
त्या आर्त किंकाळ्या अंधाऱ्या रात्रीत अधिकच भयानक वाटत होत्या. त्या रात्री वहिनी आणि तात्यारावांनी बाळ जवळ आळीपाळीने डुलक्या घेत काढली. बाळ देखील वडिलांसारखा वायुतच होता. पण लहान मुलाला आवरणे तात्यारावांना शक्य होते. पण वडिलांना जिन्यापाशी रोखता येणे या दोघांनाही शक्यच नव्हते.
ती भयाण रात्र सरता सरत नव्हती. प्रेमळ वडिलांचे आणि लाडक्या भावाचे चाललेले हाल बघवत नव्हते. दोघांच्या किंकाळ्या, ओरडणे ऐकून तात्याराव हवालदिल होत होते. पण त्यांना थांबून चालणार नव्हते. त्यांना वडिलांसाठी आणि भावासाठी सतत धावपळ करावीच लागणार होती. संपूर्ण रात्र सावरकर घराण्यावर अक्षरशः काळरात्र होऊन कोसळत होती.
एकदाची रात्र संपली आणि पुढचा दिवस उजाडला. ज्याची तात्याराव आतुरतेने वाट पाहत होते, ते त्यांचे मोठे बंधू बाबाराव बहिणीस आणि मेव्हण्यास घेऊन आले.
धाकट्या बहिणीचे वय तेरा चौदा वर्षाचे. तीस सगळा प्रकार बघून अतोनात दुख झाले. वडिलांजवळ ती गेली असता, ते ग्लानीत होते, त्यांनी तीस ओळखले देखील नाही. प्लेगचा रुग्ण असलेल्या घरात अधिक काळ थांबणे धोक्याचे असल्याने बहिणीस आणि मेव्हण्यास दुसऱ्यांच्या घरी जेवायला घालून त्यांच्या संबंधितांकडे दुसऱ्या गावी लगेच पाठवून देण्यात आले. बहिणीस वडिलांना अशा अवस्थेत सोडून जाताना खूप वाईट वाटत होते, पण काही पर्याय नव्हता.
थोरले बंधू आल्याने तात्यारावांना थोडे हायसे वाटत होते. थोरल्या बंधूंचे वय सुद्धा फार नव्हते. केवळ वीस वर्षांच्या आसपास. तरी ते आल्यामुळे धीर आला. एव्हाना गावात सर्वत्र सावरकर कुटुंबीयांवर आलेल्या संकटाची बातमी कळली होती. ज्या त्या घरात असेच संकट कोसळले होते, तर कोण कुणाची मदत करायला येणार. सगळीकडे धावपळ, रडारड सुरु होती. गावातले एक दोन वैद्य आले, त्यांनी तपासले, काही चूर्ण आणि काढे देऊन निघून गेले.
नाशिकहून मोठा डॉक्टर आणावा अस ठरत होत. पण या तिसऱ्या दिवशी वडील गलितगात्र झालेले होते. त्यांच्याकडे बघून त्यांची वेळ नजीक येत चालली असल्याच जाणवत होते.
त्या संध्याकाळी मामा आले. पण ते दुसऱ्याकडे उतरले. सावरकरांच्या अंगणात येऊन त्यांनी सगळी माहिती विचारून घेतली आणि तात्यारावांच्या वडिलांना दोष देत म्हणाले, “अण्णांना पूर्वीच गाव सोडण्यास सांगितले. ते त्यांनी ऐकले नाही. माझ्या मुलांना जीवे मरणाच्या तोंडी दिले.”
आणखीनही बरेच काही बोलून ते निघून गेले.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

