Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर
28 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग २८ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग २८
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
त्या रात्री तात्यारावांच्या वडिलांचे देहावसान झाले. तो दिवस होता शके १८२१ च्या अधिक श्रावणाच्या अमावस्येचा. चार इष्टमित्र कसेबसे आले. त्यावेळी बापूकाका देखील आले. वडिलांचा अंत्यविधी पार पडला.
इकडे बाळही मरणासन्न झालेला होता. मान ढिली पडलेली, तोंडातून रक्ताचे ओघळ येत होते. केवळ धुगधुगी बाकी होती. बाळही कधीही जाईल अशी स्थिती निर्माण झालेली होती.
हे सगळ होत असतांना तात्यारावांचे मामा देखील तिथे आले. त्यांनी बाळ सोडून उरलेल्या तिघांनी तत्काळ गाव सोडून त्यांच्याबरोबर चलण्याविषयी सांगितले. ते म्हणाले, “आता हे लहान मुल- बाळ- क्षणाचे सोबती आहे.
आता त्यास दैवाच्या स्वाधीन करून तुम्ही तिघे एकदम कोठूरला चला.
आताच्या आता निघा चला.”
पण बाबारावांचे म्हणणे पडले की, “बळाच्या जीवात जीव असेपर्यंत मी येथून हलणार नाही.”
मग मामा ही पोर काही लगेच येत नाहीत असे बघून त्याच दिवशी कोठूरला निघून गेला. प्लेग असलेल्या गावात अन्न पाणी घेणे पण प्रचंड धोक्याचे असे.
दोघे भाऊ वडिलांच्या देहास अग्नी देऊन घरी परतले, तो पोलिसांनी घर सोडण्याचा तगादा लावला. या लहान पोरावर संकटांचे डोंगर कोसळत होते.
खरोखर रडावयास देखील अवसर मिळू नये, अशा भराभर घटना घडत होत्या. दोन भावांचे आणि येसू वहिनीचे मन अक्षरशः सुन्न झाले होते.
एक क्षणाची देखील उसंत न घेता मोठ्या प्रयत्नांनी एक दोन गडीमाणसे गावाबाहेर झोपडी बांधून देण्यास तयार झाली. तरी त्याला किमान दोन चार दिवस लागणार होते. झोपडी पूर्ण होईपर्यंत गावाबाहेरील महादेव आणि गणपती मंदिरात जाऊन रात्रीपुरते हे सर्वजण राहिले.
त्यांचे बापूकाका देखील यांच्या सोबतीला येऊन राहिले. पण मधून मधून भाऊबंदकीची चिडखोर लहर येऊन एक दोन वेळा वडिलांच्या नावे काहीही बोलले. ते तात्यारावांना आवडले नाही. त्यामुळे ते काकांस म्हणाले, “वडिलांच्या मागे आता तुम्हीच आम्हाला वडिलांच्या जागी आहात. जे सांगाल ते प्रमाण मानून राहू, पण मागे तुमचे आपसात काही जरी वाकडे असले तरी आता ते गेल्यावर त्यांच्यामागे आपण त्यांचा उल्लेख करू नये. वडिलांच्या पहिल्या दिवशीच त्यांच्याबद्दल कोणताही अपशब्द काढणे आम्ही सहन करणार नाही.”
तेव्हा काका म्हणाले की, “अरे, पण मी मला बुडवले म्हणून का त्याला दोष देतो. त्यांनी तुम्हा चिमुकल्याना भिकेस लावले रे! म्हणून, माझा जीव तुटतो. कसे ते तुम्हा मुलांना काय माहित.”
त्यावर तात्याराव म्हणाले, “चिंता नाही, आम्ही भिक मागू पण वडिलांस दोष देऊ देणार नाही.”
तेव्हा बापूकाका ओशाळले आणि पुढे या सगळ्या मुलांचे ममतेने करू लागले.
झोपडीचे काम सुरु होते. बाबारावांनी त्या संध्याकाळी बाळला खांद्यावर टाकून त्याची लुळी पडलेली मान सावरत सावरत गणपतीच्या देवळात आणून ठेवले. त्याच्या जवळ तिघांपैकी आळीपाळीने दोघे कोणी बसत आणि एक जण बापुकाकांकडे महादेव मंदिरात जाऊन विश्रांती घेत असे. वहिनीला आता प्रचंड थकवा वाटू लागला होता. चालता चालता आपण पडू की काय असे तिला वाटू लागले होते. ही तिघे पोर मोठ्या दिव्यातून पार होत होती. त्यांना बापुकाकांचा खूप आधार वाटत असे. त्यांच्या असण्यानेच या तिघांना आधार वाटत असे.
पण हा आधार फार काळ टिकणारा नव्हता. मंदिरात येऊन राहिले त्याला चार दिवस होतात न होतात तोच एक दिवस बापुकाकांना अचानक ताप भरला. संध्याकाळपर्यंत प्लेगची गाठ फुगून वर आली. त्यांनी महादेव मंदिरात अंथरूण धरले. त्यांना वायूचे झटके येऊ लागले. संकटांची अक्षरशः सीमा झाली.
महादेव मंदिरात चुलता प्लेगने मरणासन्न अवस्थेत पडला, तर गणपती मंदिरात बाळ अजूनही त्याच अवस्थेत मरणाशी झुंज देत होता.
तात्याराव या प्रसंगाचे नंतर वर्णन करताना म्हणाले होते की,
“रात्री त्या रानात जिकडे तिकडे ओसाड, आजूबाजूस कोल्हे आणि घुबडे ओरडताहेत. मी, वहिनी आणि बाबाराव कोणी चुलत्यापाशी तर कोणी भावापाशी. त्यांचा वायूचा झटक्याशी झगडत आणि भयाने, चिंतेने, दु:खाने थरकापत जगत आहोत. गावात झोपड्यांतून चोरांचा सुळसुळाट झालेला. त्यात आम्ही सावकार. त्या भपक्यानेच आमच्यावर चोरांचा केव्हा घाला पडेल याचा नेम नव्हता.
जात्यायेत्या प्रेतांच्या यात्रेचा तो भयंकर ‘बोलो भाई राम!’ मधून उठे- कारण शेजारी स्मशान. त्यात चिता भडकलेल्या! सोबतीस चिटपाखरू नाही- मात्र एक कुत्रे कुठून काय की येऊन आमच्यापाशी त्या रात्री बसले. तीच एक सोबत. कोठे काही पान हलले की भुंकून भुंकून त्याने रान गर्जवावे. त्या भयंकर दोन चार रात्री आम्हाला या जगात त्या प्रसंगात उपयोगी पडला असा तोच एक सुहृदय!”
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

