Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर
29 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग २९ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग २९
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
पुढे तात्याराव म्हणतात, “मला वेड्यासारखे होऊन बाबा आणि वहिनी हेही केव्हा अंथरूण धरतात की काय याची चिंता वाटे. हा क्षण आम्ही तिघे एकत्र आहोत- दुसऱ्या क्षणी कोणाची पाळी, कोणी सांगावे! निश्चिती अशी मरणाचीच काय ती, जीवनाची निश्चिती अशी क्षणाचीही वाटेना. आश्चर्य हेच की त्या उभ्या आठवड्याच्या भयंकर मानसिक तापात आणि असह्य शाररीक क्लेशात मला काही झालेले नाही. मी पायावर उभाच उभा होतो. कोण भयंकर स्पर्शजन्य तो रोग! मी नि वहिनी सारखे रोग्यापाशी; पण डोके देखील दुखले नाही! जगावयास झोप देखील आवश्यक नाहीसे झाले.”
एव्हाना सावरकर कुटुंबीयांवर कोसळलेल्या संकटाची बातमी नाशिकच्या रामभाऊ दातारांपर्यंत पोहोचली होती. ते बाबारावांचे निकटवर्तीय असत. मागच्या प्लेगच्या वेळी नाशिकास प्लेगने हाहाकार उडवून दिला असता बाबारावांच्या सांगण्यावरून त्यांच्या वडिलांनी दातारांच्या कुटुंबियांना भगूरला आणून आपल्या घरी राहण्यास जागा दिली होती. नाशिकला रामभाऊंचे वडील प्लेगने आजारी असता बाबारावांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांची शुश्रुषा केलेली होती. अशी रामभाऊ आणि बाबारावांची मैत्री होती. आणि एक मित्र संकटात आहे असं कळल्यावर दुसऱ्या मित्राला चैन कशी पडेल.
रामभाऊ स्वतःचा जीव धोक्यात घालून बाबाराव आणि त्यांच्या कुटुंबियांची मदत करण्यासाठी भगूरला तातडीने आले. त्यांच्यासोबत बाबारावांचे आणखीन एक दोन सहकारी देखील होते. रामभाऊ आणि त्यांच्या आजूबाजूच्या मंडळींना आता प्लेगची भीती वाटत नसे. मागच्या प्लेगच्या अनुभवाने ते आता निर्ढावले होते. नाशिकात प्लेगचा धुमाकूळ चालू असतांना देखील ते रानात जाऊन राहण्यापेक्षा आपल्या घरीच बिनधास्तपणे राहत असत.
चापेकर बंधूंनी रँडचा वध केल्यानंतर आता प्लेगमध्ये सरकारी ससेमिरा आणि अरेरावी कमी झालेली होती. बळाने लोकांना घरातून हुसकावून देण्याचे आणि घराची, घरातील सामानाची नासधूस करण्याचे प्रमाण बरेचसे कमी आले होते. पण तरीही प्लेगच्या रोग्याला एका गावाहून दुसऱ्या गावी ने आण करण्यासाठी अजूनही प्रतिबंध होतेच. अशा रुग्णांची कडक तपासणी केली जाई.
नाकाबंदी, रोग्याचे विलगीकरण वगैरे प्रतिबंध अजूनही होतेच. या सगळ्या सोपस्कारातून रामभाऊ सर्व सावरकर कुटुंबाला घेऊन नाशिकास आपल्या घरी आले. नाशिकला प्लेग असला तरी प्लेगवर उपचारांसाठी मोठे रुग्णालयही होते. रामभाऊ मदतीस अत्यंत तत्पर असत. त्यांना बाबारावांबद्दल आत्मीयता होती.
त्यामुळेच रामभाऊंनी बरोबर प्लेगचे दोन रुग्ण असतानाही हे धाडस केले.
रामभाऊंनी प्लेगचे रुग्ण आळीत आणले म्हणून त्यांच्यावर आणि सावरकर कुटुंबीयांवर त्या आळीतले काही लोक शिव्यांचा भडीमार करत होते. पण त्याला न जुमानता रामभाऊ मदत करत होते. प्लेग झालेल्या आईबापाला घरी ठेवणे म्हणजे चोरी असायची अशा काळात रामभाऊंनी दोन प्लेगचे रुग्ण आपल्या घरी उतरवायचे धाडस केले होते.
गल्लीत एक जरी प्लेगचा रुग्ण सापडला तरी बघता बघता अख्ख्या गल्लीत प्लेग पसरायचा. पण रामभाऊंनी तशाही आपत्तीस न भिता बाळला घरी उतरवले. पहिली रात्र त्यांनी तिथेच काढली. दुसरा दिवस उजाडताच बापुकाकांचे देहावसान झाले. त्यांचे अंत्यविधी बाबारावांनी त्यांच्या मित्रांच्या सहाय्याने केले.
वडिलांच्या पश्चात आधार असलेले काका देखील दहाच दिवसात प्लेगने वारले. आता सावरकर घराण्यात फक्त चार पोर काय ती राहिली. तात्याराव, बाबाराव, बाळ आणि बाबारावांच्या पत्नी. सगळ्यांची वये वीस वर्षांच्या आतली. बाळचा देखील काही भरवसा नव्हता. दहा अकरा वर्षाचे ते बालक अजूनही प्लेगशी झुंजत होते.
त्यावर प्लेगच्या मोठ्या रुग्णालयात उपचार व्हावेत म्हणून हे सर्व नाशिकला आले होते. त्यामुळे पुढच्या दोन चार दिवसातच तशी सोय करण्यात आली. तसाही त्या आळीतील लोकांनी सतत तगादा लावला होताच. पण इतक्या छोट्या मुलाला एकट्याला कसे काय मोठ्या रुग्णालयात सोडायचे, त्याच्याकडे कुणाचे लक्ष तरी जाईल का? उपचार नीट होतील का?
असे अनेक प्रश्न समोर उभे असल्याने तात्याराव म्हणाले, “त्यास एकटे तिथे टाकून येणे म्हणजे त्यास जवळजवळ गिळून टाकीत असलेल्या काळाच्या दाढेत पुरतेपणी स्वहस्तेच ढकलणे होय.”
यावर नाशिक मधील इष्टमंडळी म्हणत होते की, “आता आहात ते तरी सुखरूप राहा. एकामागे दुसऱ्याने काळाच्या दाढेत व्यर्थ उडी घेणे वेडेपणा आहे.”
खर तर त्या परिस्थितीत हा एका अर्थे योग्य सल्ला होता. पण या उपदेशास न जुमानता बाबारावांनी बाळसोबत रुग्णालयात राहायचे निश्चित केले.
प्लेगच्या रुग्णालयात राहणे म्हणजे जीवावर उदार होण्यासारखेच होते. स्पर्शजन्यतेमुळे शुश्रूषेसाठी राहणाऱ्या व्यक्तीस रुग्णालयातून बाहेर जाता येत नसे. त्या प्लेगच्या भयंकर रुग्णालयात त्या मृत्युच्या गुहेत सदैव राहावे लागे. त्यांचा बाहेरच्या माणसांशी कसलाही संपर्क होऊ दिला जात नसे. बाबाराव आणि बाळ अखेरीस त्या काळाच्या गुहेत राहायला गेले. तात्याराव आणि वहिनी रामभाऊंच्या माडीवर राहू लागले.
रुग्णालयात बाबारावांना अखंड राहावे लागत असल्याने बाहेर तात्यारावांना त्यांची फार चिंता वाटे. बाबाराव मात्र आत एखाद्या धीरोदात्त व्यक्तीप्रमाणे राहत असत. बाळ वर उपचार सुरु झाले. त्यांच्या जांघेतील प्लेगची गाठ दोन वेळा कापली. त्यावर टाके घातले. पण बाळ लहान असल्याने फार हालचाल करी.
त्यामुळे शिवलेली जखम उसवून रक्ताच्या धारा लागत. त्याने बाळ अधिकच वैतागत असे. त्यास समजावे पर्यंत बाबारावांची पुरेवाट होत असे.
त्या रुग्णालयातील प्रत्येक क्षण अतिशय भयानक असे. तात्याराव म्हणायचे की, “पुराणात वर्णिल्या आहेत, त्याप्रमाणे स्मशानातील भूतप्रेतांच्या भीषण बीभत्स हलकल्लोळात राहणे म्हणजे काय याचा प्रत्येय तिथे राहणाऱ्याला येत असेल.”
कोणी वाळूत पळत आहेत, कोणी आवरेना झाला की त्यास खाटेस बांधून ठेवत. तशा अवस्थेत तो वाताचा झटका येऊन शिव्याशाप देत आरडाओरड करत आहे, कोणास मृत्यूचा कण्ह लागला आहे. कोणी असह्य ठणक्याने किंचाळत आहेत. कोणी ओक्साबोक्शी रडत आहेत. कोणी आई, बहिण, मुलाबाळांच्या आठवणीने तळमळत आहेत. अखंड असे सगळे भयानक प्रकार तिथे चालू असत. शिवाय रुग्णाच्या श्वासातून प्लेगचा फैलाव देखील होतच असे.
तात्याराव जेष्ठ बंधूंना दिवसातून दोन वेळेस जाऊन भेटत. तेव्हा जेवणाचा डबा देत, आणि लागणारे कपडे वगैरे सामानही देत. रुग्णालयात बाहेरच्या व्यक्तीस अजिबात प्रवेश नसे. आतील माणूस बाहेर आला तरी, त्याने बाहेरच्या माणसास आजीबात स्पर्श करू नये, फार जवळ जाऊ नये असा दंडक असे. लांबूनच बोलावे लागे.
वस्तू देखील अंतर ठेवून द्याव्या लागल. फार काळ तिथे थांबता पण येत नसे. नाशिकमध्ये देखील प्लेगने प्रचंड धुमाकूळ घातला होताच. त्यामुळे अनेक घरे ओसाड पडलेली होती. रस्त्यावर लोक अजिबात दिसत नसत. दिवसा त्या वातावरणात जाण्यास तात्यारावांना काही वाटत नसे पण संध्याकाळी जातांना मात्र अंधारात त्या वातावरणातून जाताना घाबरे होई.
याबद्दल तात्याराव म्हणतात की, “जर सोबत कधी भेटलीच तर ती बहुदा प्लेगने बळी पडलेल्या कोण मनुष्याची प्रेतयात्रा आणि तिचा ती विकृत आणि भीषण ‘राम बोलो भाई राम!’ यांचीच काय ती. मनात यावे आज यांचा राम बोलो भाई राम मी ऐकत आहे. उद्या कदाचित माझ्या प्रिय बंधूंची किंवा माझीही तिरडी अशीच जात असताना तिचा हा बाबारावांनी म्हटलेले ‘राम बोलो भाई राम, दुसरे कोणी ऐकत नसतील कशावरून!”
तात्याराव रुग्णालयाजवळ जाऊन बंधूंची वाट बघत थांबायचे, तेव्हा ते बाहेर येईपर्यंत तात्यारावांना फार काळजी वाटत राही. त्यांना बाहेर यायला अधिक उशीर लागला तर मात्र काळजी अधिकच दाटून येई. मनात अशुभ विचारांची झुंबड उडे. मनात येई आज आपल्या थोरल्या बंधूंना देखील प्लेग झाल्याची वार्ता तर आपल्याला ऐकावी लागणार नाही ना. या विचारे मनाचा एक भाग घाबरा होई, पण त्याच वेळी तात्यारावांच्या मनाचा दुसरा भाग मात्र असे झाल्यास पुढे कशी व्यवस्था लावावी याच्या विचारात गुंतून जाई. तरी प्रत्येक दिवशी रुग्णालयाच्या बाहेर बंधूंची वाट बघणे म्हणजे तात्यारावांसाठी मोठे दिव्यच असे.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

