आपली आवडती लेखिका – सौ मधुर कुलकर्णी यांच्या लेखणीतून साकारलेली ★ही वाट वळणाची (4)★

युनिटी एक्स्प्रेशन ची अत्यंत प्रसिद्ध आणि आपली आवडती लेखिका – सौ मधुर कुलकर्णी यांच्या लेखणीतून साकारलेली
★ही वाट वळणाची (४)
★स्वप्ना★
श्रुतीशी हल्ली बोलायची सुद्धा इच्छा होत नव्हती. का ही इतकी रितेशच्या मागे लागली आहे? पहिल्या भेटीत आम्ही दोघेही एकमेकांना आवडले असलो तरी,आम्ही दोघेही सुजाण आहोत. प्रेम आंधळं असलं तरी आमचे डोळे उघडेच होते. रितेशच्या कुशीत जेव्हा मी मोकळी होते,तेव्हा त्याचे पण ते गहिरे डोळे पाणावतात. इतकी हळवी व्यक्ती खोटी,फसवणारी कशी असू शकेल? रितेश आता भेटला की त्याला मी लग्नाचं विचारणार. आयुष्यात स्थैर्य हे कधीच येत नसतं. आणि जी काही आव्हानं येतील ती दोघे मिळून पेलू! मी रितेशला फोन लावला,”रितेश,आज भेटूया! मला तुझ्याशी बोलायचं आहे.”
रितेश काहीवेळ गप्प होता.”मी शिरूरला आलोय. चार दिवसांनी भेटू.”
“रितेश,मी पण शिरूरला येते,मला पत्ता पाठव. तुझ्या आई-वडिलांना देखील भेटता येईल. असं किती दिवस आपण दोघे फक्त भेटत राहणार? आपल्या नात्याविषयी मी अतिशय सीरिअस आहे. मला हे पुढे न्यायचं आहे. कळतंय ना तुला? लग्न करायचं आहे मला तुझ्याशी!”
“स्वप्ना,आत्ता मी जरा गडबडीत आहे,नंतर बोलतो.” रितेशने मोबाईल बंद केला.
असा काय हा? लगेच फोन का बंद केला? मध्ये त्याला मी म्हणले की तुझी रूम दाखव तेव्हा पहिल्यांदा मला बोलला की एक फ्लॅट तिघेजण शेअर करताहेत. आर्थिक स्थैर्य नाही म्हणून रितेश हे लग्नाचं टाळतोय का? पण सुरवातीला कोणाचंच नसतं. संसार सुरू झाल्यावरच दोघांनी मिळून ते स्थैर्य आणायचं असतं. श्रुती रितेशला भेटल्यापासून मी आणि रितेश फक्त एकदाच भेटलो होतो. मला त्याच्या सहवासात परत सगळं जग विसरायचं होतं म्हणू एकदा मी त्याला म्हणाले होते,”तुझ्या मित्राच्या रूमवर जाऊ.” तेव्हा त्याने मला टाळलं. मित्र गावाला गेला आहे,त्याने किल्ली ठेवली नाही,हे कारण मला सांगितलं.
हे रोजचं ऑफिस, आईचा उदास चेहरा,स्वराचा नंतर काहीही फोन नाही,हे सगळं मला सतत नकारात्मक ऊर्जा देत होतं. रितेशच्या सहवासात मला हे काही काळ विसरायचं होतं. श्रुती म्हणाली त्याप्रमाणे खरंच मी वाहवत चालले होते पण आता रितेशच्या स्पर्शाची मला सतत ओढ लागली होती. त्याचं हे असं कधीतरी भेटणं मला नको वाटायला लागलं. तो सतत माझ्याजवळ,माझ्या हक्काचा असावा असं सारखं वाटत होतं.
श्रुतीशी मी ऑफिसमध्ये अगदी मोजकंच बोलत होते,कामापुरतं! पण वाटत होतं की तिला एकदा विचारावं,काय कळलं तुला रितेशबद्दल? मी देखील मनातून अस्वस्थ झाले होते. श्रुतीला भेटल्यापासून रितेशचं मला आजकाल टाळणं हे खुपत होतं. मनाची घालमेल प्रचंड वाढली होती. खरं काय ते कळल्याशिवाय माझं मनही शांत होणार नव्हतं.
घायकुतीला येऊन शेवटी दोन दिवसांनी मी रितेशच्या फ्लॅटवर जाऊनच आले. कुलूप होतं. शेजारी चौकशी केली तर त्यांनाही काही माहिती नव्हतं. बहुतेक रितेश अजून शिरूरलाच होता. श्रुती स्वतःहून मला रितेशबद्दल काही सांगत नव्हती. मला छातीत सारखं दाटून येत होतं. कसलीतरी अनामिक भीती,दडपण यायला लागलं. रात्री झोप लागेना. न राहवून रात्री श्रुतीला फोन केला,
“श्रुती,असह्य होतंय ग सगळं! प्लिज मला सांग,रितेशशी तुझं काय बोलणं झालं? मला खूप भीती वाटतेय ग! जेवण जात नाहीय,झोप लागत नाही! प्लिज श्रुती,सांग मला!”
“स्वप्ना! काळजी करू नकोस. आपण रितेश आला की तिघेही एकत्र भेटून बोलू. आणि तू रिलॅक्स हो,काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आहे,हे कायम लक्षात ठेव. अर्ध्या रात्री सुद्धा तुझ्यासाठी धावून येईन.”
“मग ये आत्ता श्रुती,ये ना ग,आता मला नाही सहन होत!” मी जोरजोरात हुंदके देऊन रडायला लागले.
अर्ध्या तासात श्रुती माझ्या दारात होती. येताना रेस्टीलच्या दोन गोळ्या घेऊन आली. आईला ऑफिसचं काम आहे म्हणून आलेय,हे तिने सांगितलं. आई बैठकीच्या खोलीत झोपली. श्रुती मला घेऊन बेडरूममध्ये आली. रेस्टीलची एक गोळी दिली आणि अक्षरशः मला जवळ घेऊन थोपटत झोपवलं. तिच्या कुशीत मला ग्लानी यायला लागली. आज खूप दिवसांनी शांत झोप लागली……!
***
सकाळी मला जाग आली तर घड्याळात आठ वाजले होते. डोकं बधीर झालं होतं, डोळ्यात अजूनही झोप होती. आई रूममध्ये डोकावली.
“स्वप्ना,उठलीस का ग? चहा करते. श्रुती अर्ध्या तासापूर्वीच घरी गेली. ऑफिस आहे ना,तिला घरचं सगळं आवरून निघावं लागेल.”
खरंच की! काल श्रुती आली होती,माझ्यासाठी!डोळ्यात परत पाणी आलं,इतका जीव लावणारी मैत्रीण मला मिळाली होती. माझ्या एका हाकेला धावून आली होती.
“आज तू ऑफिसमध्ये उशीरा गेलीस तरी चालेल म्हणाली श्रुती! तसं ती बॉसना सांगतेय.”
मी आईला फक्त हुंकार देऊन परत डोळे मिटले. घरात बसून तरी काय करणार होते? कामात निदान दिवसभर तरी मन,शरीर व्यग्र राहतं. रेस्टीलची गोळी पहिल्यांदाच घेतली होती. त्याचा जबरदस्त असर होता. अजून अर्धा तास झोपून मी उठले. कसंतरी आवरलं. रोज पोळी भाजी मी करून जात होते,आई नंतर कुकर लावायची. आईने टिफिनसाठी पराठे करून दिले. आज बसने जाणं मला नको वाटलं. रिक्षा केला आणि ऑफिसमध्ये पोहोचले. श्रुती दिसली,मला परत रडू यायला लागलं,श्रुतीने दुरूनच डोळ्यांनी मला दिलासा दिला. फाईल्स उघडल्यावर,काम सुरू केल्यावर विचार जरा बाजूला झाले.लंच टाईममध्ये श्रुती मला म्हणाली,
“स्वप्ना,प्रयाग उद्या टूरवर जातोय. उद्या शनिवार म्हणून आपल्याला पण हाफ डे आहे. दुपारी माझ्याबरोबर माझ्या घरी चल. जरा सिनेमा बघू,गप्पा मारू,रात्री तू घरी जा.”
मी काहीच न बोलता हो म्हणून मान डोलवली. रितेश मला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत माझं कशातही मन लागणार नव्हतं.
शनिवारी हाफ डे संपल्यावर श्रुतीनेच आईला फोन केला,”काकू,मी स्वप्नाला माझ्याबरोबर घरी घेऊन जातेय. साड्यांचा सेल लागलाय तो बघून येतो.” मी श्रुतीकडे बघून हलकं स्मित केलं.
श्रुतीचं घर नेहमीच टापटीप असतं. मला तिचं फार कौतुक वाटतं, नोकरी करून सुद्धा घर छान सांभाळत होती. फक्त पोळ्यांना बाई लावली होती,बाकी सगळं श्रुती करायची. प्रयागची तिला उत्तम साथ होती. तिने इडलीचं पीठ तयार ठेवलं होतं.
“स्वप्ना,मी कुकरमध्ये इडली ठेवते,तोपर्यंत तू फ्रुट सॅलडसाठी फळ काप,ही घे सूरी!”
“आपण दोघीच असताना कशाला ग इतकं करते?”
“रितेश येतोय स्वप्ना!” ती माझ्याकडे रोखून बघत म्हणाली.
“काय?” मला धडधडायला लागलं. आनंदाने का भीतीने…..काही कळत नव्हतं. मी एकेक फळ कापत होते,धीर सुटत चालला होता. इतक्यात बेल वाजली. श्रुती दार उघडायला गेली. मी तसेच नॅपकीनला हात पुसले आणि बाहेर आले. मनावर ताबा राहिला नाही. धावत जाऊन रितेशचा हात धरला. “किती छळशील रे? तुझी वाट बघून थकले.” माझा आवाज कापत होता,डोळ्यात पाणी साचलं होतं. “रितेश,आज तुला निर्णय घ्यायचा आहे आणि तो देखील श्रुतीसमोर!”
“स्वप्ना,त्याला बसू तर दे!” श्रुती रितेशला पाण्याचा ग्लास देत म्हणाली.
“मी खायला आणते,तुम्ही दोघे बोलत बसा!”
“श्रुतीताई, खायला नको. मी स्वप्नाला घेऊन बाहेर जाऊ?”
“आज नाही. आज जे काही तुम्ही बोलणार ते इथेच माझ्यासमोर बोलायचं. माफ करा,मी थोडी स्पष्टच बोलतेय पण तेच योग्य आहे.”
श्रुती आत प्लेट्स आणायला गेली. रितेश काहीच बोलत नव्हता,काय झालंय ह्याला? हा अचानक का असा बदलला? मला आता बेचैन व्हायला झालं.
“रितेश,आपण जे काही बोलणार आहोत,ते अगदी मोकळेपणाने, कुठलाही आडपडदा न ठेवता बोलू. तुमच्या दोघांच्याही आयुष्याचा प्रश्न आहे,त्यामुळे आज प्रामाणिक आणि खरे रहा! जे काही सांगणार आहात ते पूर्ण विचार करूनच बोला.” श्रुती रितेशला म्हणाली.
“काय सांगणार आहेस तू रितेश? अरे बोल ना!” मी घाबरत रितेशजवळ येऊन बसले.
“स्वप्ना,कसं सांगू तुला? हिम्मतच होत नाहीय ग! तू प्लिज माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे,मी तुला फसवत नाहीय.”
“अरे,पुढं बोल!” मी ओरडले.
“स्वप्ना,माझं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं आहे. माझी बायको वर्ष झालं,अर्धांगवायुने अंथरुणाला खिळून आहे. तिची जबाबदारी मी झटकू शकत नाही. पण तुझ्यावरही नितांत प्रेम करतो. तू भेटलीस,ओढल्या गेलो तुझ्याकडे! तू पण खूप मानसिक दडपणाखाली आहेस हे जाणवलं आणि तुला आधार द्यावासा वाटला. मी प्रेम करतोय ग तुझ्यावर,माफ कर मला!”
रितेशचे ते शब्द ऐकून आगीचा लोळ अंगावर आल्यासारखं झालं. क्षणभर भोवळ येऊन माझा तोल गेला. श्रुतीने मला सावरून सोफ्यावर बसवले. मला पाणी दिलं. सगळ्या संवेदना बधीर झाल्या होत्या. मनात रितेशबद्दल तीव्र संताप उफाळून आला पण तोंडातून शब्दच फुटत नव्हता. जिवाच्या आकांताने ओरडावसं वाटत होतं पण आवाज फुटत नव्हता.
“स्वप्ना!” श्रुतीने मला हलवलं आणि मी भानावर आले. एक मोठा हुंदका देऊन मी मांडीत तोंड खुपसून गदगदून रडायला लागले. का? माझ्याच नशीबात हे का घडतंय सगळं? का मला सुख मिळत नाही? खांद्यावर स्पर्श झाला म्हणून मी वर बघितलं. रितेश मला थोपटत होता. मी क्षणात त्याचा हात झिडकरला आणि त्याला दूर ढकललं.
“का खेळलास माझ्या भावनांशी,माझ्या शरीराशी? हे प्रेम तुझं? एका असहाय,आधार शोधणाऱ्या मुलीची फसवणूक हे तुझं प्रेम? तुझं प्रेम नव्हतंच कधी! तुला फक्त माझं शरीर हवं होतं,जे तुला उपभोगायचं होतं कारण त्या सुखापासून तू वंचित होतास. मला जाळ्यात ओढून तुझी वासना तू पूर्ण करत होतास. दूर हो माझ्या नजरेसमोरून!”
“स्वप्ना,मी फसवलं नाही तुला! माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर!मार्ग काढू काहीतरी!” रितेश माझ्याजवळ येत म्हणाला.
“काय मार्ग काढणार तू?दोघींनाही एकावेळी फसवतोय ह्याची जाणीव आहे का तुला? एक पाऊल जरी पुढे आलास तरी याद राख! चालता हो,मी माझं काही बरंवाईट करून घ्यायच्या आत!”
“रितेश,तुम्ही आत्ता ताबडतोब इथून निघा.आपण नंतर बोलू.प्लिज,मी हात जोडते.” श्रुती रितेशला हात जोडत म्हणाली.
मी बेभान होऊन किचनमध्ये आले. टेबलवर पडलेली फळ कापायची सूरी घेतली आणि मनगटावर चीर ओढली. काही क्षणात सगळं अस्पष्ट दिसायला लागलं. मला ह्या सगळ्यातून सुटका हवी होती. सगळं धूसर होतंय….खोल खोल दरीत मी कोसळतेय…….!
**
★श्रुती★
रितेश गेल्यावर मी दार बंद करून किचनमध्ये आले आणि समोरचं दृश्य बघून माझे हातपाय कापायला लागले. ह्या अविचारी,अविवेकी मुलीने नको ते पाऊल उचललंच होतं. मी तिच्या मनगटावर रुमाल बांधला. तिला कशीबशी ओढत दारापर्यंत घेऊन आले. कारमध्ये तिला मागे टाकलं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं.
स्ट्रेचर आणून कर्मचाऱ्यांनी तिला आत तर नेलं पण मला अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागलं. स्वप्ना माझी कोण आणि हे कसं झालं?
“मॅडम, तुम्ही चांगलंच जाणता, ही आत्महत्येची केस आहे. हे प्रायव्हेट हॉस्पिटल असलं तरी तुम्हाला सगळं क्लीअर करावं लागेल. नाहीतर पोलिस केस होईल.” तिथल्या एका डॉक्टरने मला सरळ सांगितलं.
“डॉक्टर,ती मानसिक रुग्ण आहे. तिचं डिप्रेशन खूप वाढलं होतं. त्या भरात तिने ही चूक केली. प्लिज समजून घ्या. इथेच हे प्रकरण थांबवू.”
“तुम्ही त्यांना ताबडतोब आणलं म्हणून त्यांचा जीव वाचू शकतो. पण सॉरी,काही डिटेल्स तुम्हाला फाईलमध्ये द्यावे लागतील. मानसिक रुग्ण आहेत तर ट्रीटमेंट कोणाची घेताहेत,किती दिवस झाले ते सगळं प्लिज डिटेल लिहा.”
कोणाची ट्रीटमेंट? काय सांगू आता? माझा घसा कोरडा पडला. अचानक केतन आठवला. कॉलेजमध्ये मला सिनिअर होता पण आम्ही कॉलेजमध्येच एका एकांकिकेत काम केलं होतं! अतिशय हुशार,ध्येयवादी! तो एम डी मेडिसीन तर होताच पण त्यानंतर त्याने मानसशास्त्राचा अभ्यास करून त्यात एम ए केलं होतं. मी ताबडतोब गुगल सर्च केलं,त्याच्या हॉस्पिटलचा नंबर मिळाला. केतनला फोन लावला. त्याच्या असिस्टंटने घेतला. सर मिटिंगमध्ये आहे,अर्ध्या तासाने फोन करा असं सांगितलं. मी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सरळ केतनचं नाव सांगितलं. मला ती वेळ निभवायची होती.
“डॉ केतन देशपांडे? फेमस पर्सनॅलिटी! त्यांच्याशी मला कनेक्ट करून द्या! मी बोलते.”
“डॉक्टर,मी फोन केला पण ते सध्या बिझी आहेत. करते मी परत फोन!” माझा रडवेला चेहरा बघून त्या डॉक्टरने फार ताणून धरलं नाही.
अर्ध्या तासाने मी परत फोन केला. “केतन, श्रुती बोलतेय!”
“कोण श्रुती? सॉरी,मी ओळखलं नाही.”
“श्रुती साने! कॉलेजमध्ये आपण एका नाटकात काम केलं होतं.”
“ओह श्रुती! व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज! बोल कशी काय आठवण काढलीस?”
“केतन,तुझी मदत हवीय, विनंती समज हवं तर!”
“अग हो,पण झालं तरी काय?”
मी केतनला सगळं सविस्तर सांगितलं. अगदी रितेशबद्दल सुद्धा!
“ओह! ब्रेकअप,प्रेमभंग! हल्ली येणारे अनेक पेशंट्स! आयुष्यात दुसऱ्या जवळच्या व्यक्ती ह्यांना महत्वाच्या नसतातच. एका व्यक्तीसाठी आयुष्य संपवायचं.
तू डॉक्टरांना फोन दे,मी बोलतो त्यांच्याशी!”
केतन डॉक्टरांशी बोलला आणि त्यानंतर मला म्हणाला,”तिला घेऊन ये माझ्याकडे! तिला कौन्सिलिंगची गरज आहे. मला परत फोन कर,वेळ ठरवू आणि तिची आणि तुझी पण काळजी घे. सी यू सुन!”
सगळं विनासायास घडत होतं, ही पण देवाचीच कृपा!
स्वप्नाला ट्रीटमेंट सुरू झाली होती. अजून ती शुद्धीत नव्हतीच! ह्या सगळ्या तणावात मी स्वप्नाच्या आईला कळवायचं विसरूनच गेले. त्यांचे चार मिस्ड कॉल दिसले. मी त्यांना फोन लावला.
“हॅलो काकू, मी स्वप्नाला घेऊन दवाखान्यात आलेय. तिचं जरा पोट दुखत होतं. पण तुम्ही काळजी करू नका. डॉक्टरांनी तपासलं आहे,ती आता ठीक आहे. मी करते तुम्हाला फोन!”
मोबाईल बंद केला आणि प्रयागला फोन लावला. त्याला मला खरं काय ते सांगायलाच हवं होतं.
“प्रयाग,मी स्वप्नाला घेऊन दवाखान्यात आलेय.”
“काय झालं अचानक? इज शी ओके नाऊ?”
प्रयागला सगळं थोडक्यात सांगितलं. तो आधी चिडलाच,
“श्रुती, हे सगळं रिस्की आहे. तू का ह्यात इन्व्हॉल्व्ह झालीस?”
“प्रयाग,जवळची मैत्रीण आहे ती माझी! अशावेळी मी मदत नाही केली तर ती कसली मैत्री रे?”
“आय कॅन अंडरस्टॅण्ड! पण काही वाटलं तर मला लगेच फोन कर, मी टूर सोडून येऊ शकत नाही पण इथून काहीतरी मॅनेज करू शकतो. आणि स्वतःची काळजी घे.आय एम प्राउड ऑफ यू माय डिअर वाईफ!”
“प्रयाग…..!” माझा गळा भरून आला.
आता मला स्वप्नाची काळजी घ्यायची होती. तिच्यावर ट्रिटमेंट सुरू होती पण तिला ह्या मोठ्या धक्क्यातून सावरून त्यातून बाहेर काढून पूर्वव्रत करणे ही माझ्यावर फार मोठी जबाबदारी होती. कदाचित तिला माझी आर्थिक मदत सुद्धा लागणार होती. पण मैत्री निभवायची होती. ती चुकली म्हणून तिला तोडून टाकायचं नव्हतं. आणि मला प्रयागची भक्कम साथ होती.
तिथल्या बाकावर थकून बसले. मोबाईलची रिंग वाजली म्हणून बघितलं,रितेश कॉल्लिंग दिसलं.
“श्रुतीताई,मी तसा माणूस नाहीय हो! माझं खरंच स्वप्नावर खूप प्रेम आहे. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. मला भेटायचं आहे तिला!”
“मिस्टर रितेश,तुम्ही इथेच थांबला तर बरं होईल. तुमचं तिच्यावर खूप प्रेम असलं तरी सत्य परिस्थिती तुम्हाला एकत्र आणू शकत नाही. जे आहे ते स्वीकारा आणि स्वप्नाला विसरा! ती सुखी व्हावी असं वाटत असेल तर ह्यापुढे तिला किंवा मला कॉन्टॅक्ट करू नका. माझी विनंती आहे तुम्हाला!” मी फोन बंद केला.
दोन जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेमींची शोकांतिका मी बघत होते. पण काहीच इलाज नव्हता. त्या दोघांचा सहवास इतकाच होता,काहीतरी मागच्या जन्माचं अपूर्ण राहिलेलं……..!
क्रमशः!
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
