आपली आवडती लेखिका – सौ मधुर कुलकर्णी यांच्या लेखणीतून साकारलेली ★★डायरी★★

आपली आवडती लेखिका – सौ मधुर कुलकर्णी यांच्या लेखणीतून साकारलेली
★★डायरी★★
कोर्टातील एका वकिलाने सावीच्या हातात तिची डायरी दिली. सावीने डायरी हातात धरली,त्यावरून हळूच हात फिरवला. डोळ्यातील पाण्याचा थेंब त्यावर पडणार इतक्यात सावीने तो अश्रू पुसला. डायरी पर्समध्ये टाकली आणि गेटच्या बाहेर येऊन तिने कॅब केली. आजच्या कौंसलिंगसाठी ती एकटीच कोर्टात आली होती. तिला कुणीही बरोबर नको होतं. अगदी आईबाबा सुद्धा! एक जोडपं विभक्त होऊ नये,ह्यासाठी केलेले आटोकाट प्रयत्न! तडा गेलेला संसार जोडण्याचे प्रयत्न!
सावीने डायरीवरून हात फिरवला. पहिलीत पहिला नंबर आला तेव्हा बाबांनी तिला एक डायरी आणि एक पेन गिफ्ट दिलं होतं आणि म्हणाले होते,”सावी,माझ्याकडून तुला ही डायरी बक्षीस! ह्यात रोज काहीतरी लिहायचं.”
त्या कोऱ्या डायरीचा सुवास आणि नवीन पेन बघून बाल वयातली सावी हरखून गेली. त्यावेळी फारसं लिहिता येत नव्हतं पण बाबांनी सांगितलं म्हणून ‘श्री’ हे अक्षर लिहून सायलीने डायरी लिहायला सुरुवात केली होती. तिच्या मनातलं काहीतरी ती रोज लिहीत गेली. कधी कधी तर एखादं प्रश्नचिन्ह, फुलांची चित्रे काढून डायरीचं पान भरत असे. त्यावेळी बाबांनी सांगितलं म्हणून सावीने डायरीत रोजनिशी लिहायला सुरुवात केली पण पुढच्या आयुष्यात ही डायरी इतकी साथ देईल आणि एकाची साथ सोडायला कारणीभूत ठरेल, असं तिला कधीच वाटलं नव्हतं.
घरात पाऊल ठेवताच क्षमाने सावीला प्रश्न विचारायला सुरवात केली. सावीला त्या क्षणी कोणाशीही बोलायची इच्छा नव्हती.
“आई,माझं डोकं खूप दुखतंय. मी जरा पडते.”
“अग पण कोर्टात झालं काय ते तर सांगशील. आम्हा दोघांनाही तू तुझ्या बरोबर येऊ दिलं नाहीस.”
“क्षमा, तिला जरावेळ एकटं राहू दे. सांगेल ती!” सुमंतने सावीला थोपटलं.
भरल्या डोळ्यांनी सावी तिच्या खोलीत गेली. कॉटवर आडवी झाली आणि तिने अश्रूंना वाट मोकळी केली. आज एक नातं संपल्यातच जमा होतं. सप्तपदी चालताना सात जन्म साथ देण्याचं दिलेलं वचन काही महिन्यातच मोडलं होतं आणि ह्याला मीच जबाबदार आहे,हे सावीला ठाऊक होतं. ती डोळ्यांवर हात ठेवून पहुडली आणि तिचा डोळा लागला. जाग आली तेव्हा खोलीत अंधार होता. ती दचकून उठली. तिन्हीसांजेला झोपलेलं आईला आवडत नाही हे सावीला माहिती होतं, तरी देखील आईने उठवलं नाही. आई चांगलीच नाराज झाली आहे हे सावीला कळलं. तिने चेहरा स्वच्छ धुतला आणि ती खोलीच्या बाहेर आली. क्षमा देवाजवळ दिवा लावत होती.
“आई उठवलं नाहीस?”
“गाढ झोपली होतीस. उठवावं वाटलं नाही. दूध गरमच असेल,कॉफी करून घे.” क्षमा निरांजन घेऊन तुळशीजवळ गेली. सावीने कॉफी घेतली आणि परत तिच्या खोलीत आली. तिची नजर टेबलावरच्या डायरीवर गेली. सावीने कपाटातून सुमंतने दिलेली पहिली डायरी काढली. तिने पहिलं पान उलगडलं.
नुकतंच मराठी लिहायला शिकलेल्या सावीने त्यावर ‘श्री’ लिहिलं होतं आणि खाली ‘थँक्स’ बाबा’ ! एकेक पान उलटताना ते प्रसंग डोळ्यापुढे येत होते. त्यानंतर अनेक डायऱ्या सावीच्या कपाटात येत गेल्या, पण ही पहिली डायरी तिच्या खास जवळची होती.
**
सावी…सुमंत आणि क्षमाची लाडकी लेक! सावी सोनपावलांनी घरात आली आणि तिच्या जन्मानंतर सुमंतला बढती मिळाली,स्वतःची वास्तू झाली. सावीचं फक्त रूपच देखणं नव्हतं तर ती अतिशय बुद्धिमान होती. पहिल्या वर्गापासून चौथीपर्यंत ती वर्गात पहिलीच होती. सुमंत आणि क्षमा दोघेही नोकरी सांभाळून लेकीवर उत्तम संस्कार करत होते. क्षमाने तिच्यासाठी पाळणाघर देखील घरगुतीच शोधलं होतं.
चौथी संपली आणि सावीला उन्हाळ्याची सुट्टी लागली. सावी आजीकडे म्हणजे क्षमाच्या आईकडे दिवसभर थांबायची. तिच्यासाठी सुमंत आणि क्षमा कधीतरी रजा घ्यायचे. मे महिना संपतच आला होता. एक दिवस सुमंतचा सावत्र भाऊ प्रदीप काही कामानिमित्त त्यांच्या घरी आला. मध्यम उंची, कमावलेलं शरीर! क्षमा प्रदीपला प्रथमच बघत होती. तिला प्रदीपची नजर विचित्र वाटली आणि ती सुमंतजवळ हे बोलली खरी पण त्याचे डोळे घारे आहेत म्हणून तसा दिसतो असं सुमंत म्हणाल्यावर क्षमाला जास्त बोलता आलं नाही.
एक दिवस सावीला आजीकडे पाठवू नका,मी तिला सांभाळतो, असं प्रदीप सुमंतला म्हणाला. क्षमाचं ऑफिस अर्धाच दिवस होतं, ती घरी लवकरच येणार होती,म्हणून तिने सावीला घरीच ठेवलं. संध्याकाळी क्षमा घरी परतली तर तिला सावी भेदरलेली दिसली. सारखी रडत होती पण काहीच बोलत नव्हती. तिने प्रदीपला विचारलं. मला माहिती नाही म्हणून त्याने टाळाटाळ केली. सावी प्रदीपकडे बघून जास्तच रडायची. क्षमाला सावीचे कपडे बदलताना तिच्या मांडीवर ओचकरल्यासारखं दिसलं पण सावी काहीच सांगत नव्हती. क्षमा काळजीने,भीतीने अस्वस्थ झाली.
दुसऱ्या दिवशी प्रदीप तातडीने सकाळच्या बसने निघून गेला. क्षमाच्या मनात नको त्या शंका यायला लागल्या. त्या दिवसापासून सावी पुरुषांना फार घाबरायला लागली. सुमंतला देखील ती स्पर्श करू देत नसे. क्षमाने तिच्या मनातली भीती सुमंतला बोलून दाखवली पण त्याने ते फार मनावर घेतलं नाही.
सावी पाचवीत गेल्यावर डायरीत रोज काहीतरी लिहू लागली. मराठी फारसं लिहिता येत नव्हतं पण तरीही एक दोन ओळी लिहायची. आठवीत गेल्यावर तिचे अनुभव, रोज काय घडलं ते लिहायला लागली. एक दिवस सावी शाळेतून घरी आली,ती घाबरलेल्या अवस्थेतच! आल्याबरोबर तिने शाळेचा युनिफॉर्म काढला आणि तिच्या खोलीत जाऊन डायरीत लिहिलं…..
—-आज पीटीच्या सरांनी माझ्या पाठीवरून हात फिरवत कमरेपर्यंत नेला. मला भीती वाटली. मी छोटी असताना तो एक काका आला होता,त्याने असंच काहीतरी केलं होतं पण लहान होते,मला कळत नव्हतं. आज ह्या सरांची भीती वाटली. त्या स्पर्शाची किळस वाटली. सगळे पुरुष असेच असतात का? मला शाळेत जाणं नकोच वाटतंय—
शाळेत काय घडलं ते सावीने क्षमाला सगळं सांगितलं. ते ऐकून क्षमा पण अस्वस्थ झाली. क्षमा दुसऱ्याच दिवशी शाळेच्या मुख्याध्यापिकांना जाऊन भेटली आणि घडलेला प्रकार सांगितला. पिटीच्या सरांना समज देण्यात आली. त्या दिवसापासून पीटीच्या सरांनी सावीवर राग धरला. पीटीच्या प्रॅक्टिकलमध्ये तिला नापास केलं. सुदैवाने सावी नववीत गेली तेव्हा त्या सरांना नोकरीवरून काढलं असं कळलं आणि सावीची भीती कमी झाली.
रोजचे प्रसंग,रोजची डायरी लिहिता सावीच्या अनेक डायऱ्या झाल्या. रोज नाही पण कधीतरी पानावर तारीख टाकून सावी डायरीत लिहीत असे.
**
सावी एमबीए झाली आणि तिला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली. लहानपणी घडलेले प्रसंग ती विसरली होती. पण पुरुष जातीबद्दल तिच्या मनात असलेली भीती कमी होत नव्हती. वयात आलेली सावी अतिशय देखणी दिसत होती. कंपनीतले सगळेच कलीग तिचे छान मित्र,मैत्रिणी झाले होते. पण सावीचं आयुष्य जणू सरळ नव्हतंच. एक दिवस बॉसने तिला केबिनमध्ये बोलावून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. सावीला कुणालाही सांगता येत नव्हतं. इतक्या उच्चपदावर असणारा तिचा बॉस कंपनीत अतिशय लोकप्रिय होता. सावीच्या बोलण्यावर कोणी विश्वासच ठेवला नसता. घरी आल्यावर तिने डायरीत तिच्या मनातलं दुःख लिहून काढलं…
–माझ्याच आयुष्यात असे प्रसंग का घडावे? माझी काय चूक आहे? देवाने सौंदर्य मुक्तहस्ताने मला दिलंय ही माझी चूक आहे का? आज बॉसने माझा विनयभंग केला. सगळ्या पुरुष जातीची मला घृणा आली आहे. त्यांच्या दृष्टीने स्त्री म्हणजे फक्त एक भोगवस्तू आहे—
सावीने नोकरीचा राजीनामा दिला. सुमंत आणि क्षमाने तिला कारण विचारलं पण तिने कंपनी आवडली नाही हे कारण सांगितलं. सावीचं हे असं नुसतं घरात बसून राहणं क्षमाला काळजीत टाकणारं होतं. क्षमाने सावीला न सांगता तिचं नाव वधू-वर सूचक मंडळात नोंदवलं. सागर देशमुखचं स्थळ क्षमा आणि सुमंतला पसंत पडलं. सावीला जेव्हा हे कळलं तेव्हा तिने बराच विरोध केला पण क्षमाच्या अट्टाहासापुढे, नाईलाजाने सावी लग्नाला तयार झाली.
सिव्हिल इंजिनिअर सागर देशमुखने सावीचा फोटो,बायोडेटा बघून तिच्याशी चॅट करायला सुरुवात केली. सागर दिसायला देखणा,हुशार होता. त्याचं संवाद कौशल्य पण सावीला आवडू लागलं. दोनदा प्रत्यक्ष भेटल्यावर दोघांनीही एकमेकांना पसंत केलं आणि लग्न ठरलं. क्षमा आणि सुमंत दोघेही खुश होते. एकुलत्या एका मुलीचं लग्न त्यांनी अगदी सगळी हौसमौज करत धडाक्यात केलं. सावी पण आनंदात होती.
मीलनाची रात्र आली आणि सावीची
अस्वस्थता वाढली. सागरच्या प्रणयाला सावी प्रतिसादच देत नव्हती. पूर्वी घडलेलं सगळं एकेक आठवायला लागलं आणि तिने सागरला दूर लोटलं. तिच्या ह्या कृतीने सागर विचलित झाला. लग्न होईपर्यंत इतकी मनमोकळं वागणाऱ्या सावीला अचानक काय झालं त्याला उमजेना!
“सावी! तुला बरं वाटत नाहीय का? तुझ्यावर कुठलीही जबरदस्ती मला करायची नाही. तू शांतपणे झोप!”
सागरने दिवा मालवला पण सावी टक्क जागी होती.भीती,संकोच,
अपराधीपणाची भावना सगळं दाटून आलं होतं. तिने अश्रू थोपवायचा प्रयत्न केला.
सागर रोज रात्री सावीला खुलवायचा प्रयत्न करत होता पण सावी खुलतच नव्हती. एका क्षणी ती रडतच सागरला म्हणाली,
“तू नवरा आहेस माझा! तुझा अधिकार तू गाजव.”
“अधिकार गाजवणाऱ्या नवऱ्यांपैकी मी नाही सावी! मला तुझ्यावर बलात्कार करायचा नाही.”
सागर फार न बोलता तिथून निघून गेला. सागरचा संयम बघून सावी अजूनच अस्वस्थ झाली होती.
लग्नाला महिना झाला होता पण सावी सागरशी एकरूप होत नव्हती. एका रात्री सागरला ओव्हर टाइममुळे घरी यायला उशीर होणार होता. तिने त्या तीन डायऱ्या काढल्या ज्यात तिचे वाईट अनुभव तिने लिहिले होते. तिच्या मनावर आणि शरीरावर परिणाम करणारे! सावी वाचताना रडत होती आणि तशीच तिला झोप लागली. सागर जेव्हा घरी आला तेव्हा सावी झोपली होती आणि डायऱ्या तिच्या बाजूला पडल्या होत्या. सागरने डायरी उचलली आणि वाचायला सुरवात केली. सावीच्या आयुष्यात घडलेले प्रसंग त्याने वाचले आणि त्याला धक्का बसला. सावी माझ्यापासून दूर राहण्याचं हे तर कारण नसावं ना? त्याला शंकेने ग्रासलं. त्याने डायऱ्या उचलून ठेवल्या. सकाळी सावीला जाग आली तेव्हा डायऱ्या टेबलवर दिसल्या. म्हणजे सागरने डायरी वाचली? सावी घाबरली. सावी रूमच्या बाहेर जाणार इतक्यात सागर आत आला.
“तू डायऱ्या वाचल्या?” सावीने सागरला विचारलं.
“हो.” सागर तिच्याकडे बघत म्हणाला.
“सागर,मला घटस्फोट हवाय.”
सागरने चमकून सावीकडे बघितलं.
“लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ वाटला का तुला?”
“मी तुला सुख देऊ शकत नाही. मला तो गिल्ट आता असह्य झाला आहे.” सावी रडत म्हणाली.
“लग्नाआधी हा विचार केला होतास का?” सागर तिच्याकडे रोखून बघत म्हणाला.
“मला लग्न करायचं नाही हे मी आई-बाबांना सांगितलं होतं,पण..”
“पण काय? तुझ्यावर त्यांनी सक्ती केली असं मला अजिबात वाटत नाहीय कारण तू मला तीन चार वेळा भेटूनच होकार दिला आहेस.”
सावी निरुत्तर झाली.
“घटस्फोट तुला हवा आहे,मला नाही. आणि तुझी तीच इच्छा असेल तर माझी तयारी आहे. अट फक्त एकच आहे,इतक्यात माझ्या आई-बाबांना काही कळू नये ही माझी तुला विनंती आहे. वेळ आली की मी त्यांना सांगेन. तुला माझ्यापासून काही दिवस वेगळं रहावं लागेल तरच घटस्फोट मिळेल. तू सुज्ञ आहेस. तुला सगळं माहिती आहेच. मी महिनाभर दिल्लीला टूरवर जातोय! हे तुझ्या आणि माझ्या पथ्यावरच पडलंय. माहेरी जाऊन रहा. पुढचं बघू.”
सागर महिनाभर टूरवर गेलाय हे सांगून सावी माहेरी आली. सुमंतला मात्र काहीतरी घडलंय हे जाणवलं. क्षमा घरी नसताना त्याने सावीला सरळ प्रश्न केला,”सावी,इथे तू सहजच आली आहेस ना? नवरा घरी नसला तरी तुझे सासू-सासरे आहेत. त्यांच्यासाठी तू तिथे रहायला हवं.”
“जाईन मी परत काही दिवसांनी!”
सावीने विषय संपवला.
सावीला सागरची उणीव भासत होती. मी चुकतेय हे देखील तिला जाणवत होतं पण सागरच्या स्पर्शाला ती घाबरत होती. सागरने तिला एकदाही जबरदस्ती केली नव्हती आणि हेच तिच्या मनात सलत होतं. सागरवर माझ्याकडून अन्याय होतोय हे तिला आता असह्य झालं होतं.
पंधरा दिवस माहेरी राहून सावी परत सासरी गेली. सासू-सासऱ्यांना काही कळू नये ह्याची काळजी घेत होती. दिल्लीवरून आल्यावर परस्पर संमतीने घटस्फोट व्हावा ह्यासाठी सागरने अर्ज केला. क्षमा आणि सुमंत डिव्होर्स पेपर बघून हादरले. लग्नाला फक्त दोन महिने झाले होते आणि घटस्फोट? सागरच्या आईवडीलांनी सागरला कारण विचारले पण तो शांत होता. “आमचं जुळत नाहीय म्हणून हा निर्णय दोघे मिळून घेतोय.” एवढंच त्याने उत्तर दिलं.
सावी माहेरी आली आणि क्षमाने तिच्याशी अबोला धरला. सागरसारख्या समजूतदार मुलाबरोबर ही घटस्फोट घेतेय हे क्षमाच्या पचनी पडत नव्हतं.
शेवटचं कौंसलिंग झालं होतं. सावीने डायरीत जे लिहिलंय त्यावरून ती वैवाहिक सुखाला घाबरत होती,असमर्थ होती हेच तिने सांगितलं. आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी मनाच्या मीलनाबरोबर देहाचं मीलनही सुखाचा शोध देणारं असतं. सहा महिने विभक्त राहिल्यावर घटस्फोट मिळणार होता.
**
क्षमा तुळशीजवळ दिवा लावून आली. “आमचं कुठे चुकलं तेच कळलं नाही. तुझ्या नशिबी सुख आलं होतं पण तू ते दूर लोटलं.” क्षमाने डोळे पुसले. घरात राहून विचारांनी सावीची तब्येत खालावली होती. तिने नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली.
एका छोट्या कंपनीत सावीला जॉब मिळाला. अजून एक महिना उलटला की घटस्फोट मिळणार होता. ह्या पाच महिन्यात सावीला सागरची अनेकदा आठवण आली. त्याचं तिच्यावर असलेलं प्रेम, घटस्फोट मागितल्यावर कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता त्याने दिलेली संमती, हे सगळं आठवलं की सावी व्यथित व्हायची. पण सागरला आपण वैवाहिक सुख देऊ शकत नाही हे आठवलं की ती सावरायची आणि आपला निर्णय योग्यच आहे हे तिला जाणवायचं.
कंपनीत सावीची आर्याशी छान ओळख झाली. अल्पकाळात दोघीही जिवाभावाच्या मैत्रिणी झाल्या. आर्या गरोदर होती. दोन दिवसात ती रजेवर जाणार होती,”आर्या, तुला मी खूप मिस करेन ग! तुझ्याशिवाय ऑफिसमध्ये मला करमणार नाही.”
“सावी, चार महिन्यांनी मी परत जॉईन होतेच आहे. माझं बाळ देखील तोपर्यंत जरा मोठं होईल. सावी,एक बोलू?”
“बोल ना ग!” सावी आर्याचे हात धरत म्हणाली.
“सावी,परत विचार कर. घटस्फोटाचा तुझा निर्णय बदल. सगळेच पुरुष तसे नसतात ग! तुला स्त्री जन्म मिळाला आहे आणि स्त्रीला मातृत्वाचं वरदान लाभलंय, ते तू लाथाडते आहेस. परत शांतपणे विचार कर. अजूनही वेळ गेली नाहीय. तुला घटस्फोट अजून मिळाला नाहीय.”
सावी काही न बोलता फक्त हसली.
आर्याला मुलगा झाल्याचं कळलं आणि सावी अर्धी रजा टाकून दवाखान्यात गेली. ते इवलेसे छोटे बाळ बघून ती हरखून गेली. त्याचं ते गोरं गुलाबी अंग,किलकिले डोळे,भरघोस जवळ, बंद मुठी सगळं ती टक लावून बघत होती.
“आर्या, दोन दिवस ऑफिसला शनिवार, रविवारची सुट्टी आहे तर मी दवाखान्यात थांबते. काकूंना तसं कळवून दे. या लबाडाला सावीमावशी सांभाळणार म्हणून कळवून दे.”
आर्याने सावीकडे बघितलं. आर्याला जाणवलं की सावीतलं मातृत्व जागं झालं होतं पण वेडीला ते कळत नव्हतं. सावी सतत बाळाला मांडीवर घेऊन बसत होती. रात्री अचानक आर्याला ताप भरला आणि बाळाला इन्फेक्शन नको म्हणून दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं. सावी दोन दिवस सतत बाळाच्या सहवासात होती. त्याला वरचं दूध पाजणं, त्याचे सतत कपडे बदलणं, रात्री रडला तर मांडीवर घेऊन बसणं! ह्या दोन दिवसात सावीत अमूलाग्र बदल झाला. मातृत्वाची ओढ लागली. सागरची सतत आठवण यायला लागली. त्याची पहिली मिठी,कपाळाचं घेतलेलं चुंबन, त्याचा संयम आणि घटस्फोट हा शब्द ऐकून त्याने शांतपणे जे सगळं घेतलं होतं,ते आठवून सावीला हुंदका आला.
**
सागर कंपनीत जायला निघणार इतक्यात त्याला मोबाईलवर ‘सावी कॉलिंग’ दिसलं. त्याने फोन घेतला. “सावी पुढच्या आठवड्यात बहुतेक डिव्होर्सची प्रोसेस पूर्ण होईल. कशी आहेस तू?”
“सागर,आज संध्याकाळी भेटशील?”सावीने हुंदका दाबत विचारलं.
“श्यूअर! कुठे भेटायचं?”
“तुझ्या घरी ” सावीने उत्तर दिलं.
“आर यु श्यूअर?”
“हो,मला घरीच भेटायचं आहे.”
“ओके! मी सात पर्यंत घरी येतो.वाट बघतोय.”
सावीने मोबाईल बंद केला आणि डोळे पुसले.
संध्याकाळी सात वाजता सागरच्या घरची सावीने बेल वाजवली आणि तिला धडधडायला लागलं. दार सागरनेच उघडलं.
“ये. चहाच करत होतो,तुला आवडतो तसा,आलं घालून.”
सागरचं ते बोलणं ऐकून सावीला दाटून आलं.
“आई-बाबा?” सावीने विचारलं.
“मुंबईला गेले आहेत. उद्या येतील.”
सावी सोफ्यावर बसली. तिचे हात घामेजले होते.
“सागर,डिव्होर्स पेपर कुठे आहेत?”
“तुझ्याकडे कॉपी आहेच ना!” सागर आश्चर्याने म्हणाला.
“तुझ्याकडले हवे आहेत.”
सागरने बॅगमधून डिव्होर्स पेपर काढले आणि सावीला दिले.
सावीने त्या पेपरचे तुकडे तुकडे केले आणि मान खाली घालून हमसून रडायला लागली.
सागर ते सगळं बघून भांबावला.
त्याने सावीच्या खांद्यावर हात ठेवला आणि सावीने उठून सागरला घट्ट मिठी मारली आणि तिला जास्तच हुंदके यायला लागले. सागरने तिला तसंच थोडावेळ रडून मोकळं होऊ दिलं. तिला जरा दूर करत तो म्हणाला,
“सावी! काय समजू मी?”
“हेच की मला घटस्फोट नको आहे आणि तू आता काहीच बोलू नकोस. मला तुझा स्पर्श अनुभवायचा आहे.” सावी रडत रडत म्हणाली.
सागरने हसतच सावीला जवळ घेतलं. ज्या स्पर्शासाठी तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला होता,त्याच स्पर्शाची तिला ओढ लागली होती. सागरने सावीच्या कपाळावर ओठ टेकले आणि सावी त्याला परत बिलगली.
दोन मनांचं खऱ्या अर्थाने मीलन झालं होतं….!
★समाप्त★
सौ मधुर कुलकर्णी, पुणे



