Dr विभा देशपांडे यांचे अत्यंत लोकप्रिय सदर – डीव्हीडी कॉर्नर -आजची खुश खबर 15-02-2026

Dr विभा देशपांडे यांचे अत्यंत लोकप्रिय सदर – डीव्हीडी कॉर्नर -आजची खुश खबर 15-02-2026
भारतातील पहिला मेलडी रोड मुंबईत, कोस्टल रोडवरून गाडी जाताच ऐकायला येणार ‘जय हो’ ची धून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ फेब्रुवारी २०२६ रोजी या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

भारतातील पहिला मेलडी रोड मुंबईत, कोस्टल रोडवरून गाडी जाताच ऐकायला येणार ‘जय हो’ ची धून
Indias first Melody Road in Mumbai : मुंबईतील कोस्टल रोडला आता नवी ओळख मिळणार आहे. हा मार्ग आता देशातला सर्वांत पहिला मेलडी रोड (संगीतमय रस्ता) म्हणून ओळखला जाणार आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
मुंबईतील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोस्टल रोडला (सागरी किनारा मार्ग) आता नवी ओळख मिळणार आहे. मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारा हा मार्ग आता देशातला सर्वांत पहिला मेलडी रोड (संगीतमय रस्ता) म्हणून ओळखला जाणार आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना, अद्ययावत हंगेरियन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ‘जय हो’ या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील जगप्रसिद्ध गाण्याची धून ऐकण्याची पर्वणी मिळणार आहे.
राहुल शेवाळे यांची संकल्पना
माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून आणि पाठपुराव्याने, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बनविण्यात आलेल्या या देशातील पहिल्यावहिल्या मेलडी रोडचे लोकार्पण बुधवारी दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार आहे. मुंबईच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या कोस्टल रोडवर मरीन ड्राइव्ह बोगद्यातून बाहेर पडल्यावर अमरसन्स गार्डन ते ब्रिच कँडी दरम्यान पहिल्या मार्गिकेतील सुमारे 700 मीटर रस्त्यावर वाहनचालकांना या मेलडी रोडचा अनुभव घेता येणार आहे.
नेमका कुठे आहे हा मेलोडी रोड?
हा संगीतमय रस्ता दक्षिण मुंबईकडून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या उत्तर वाहिनीवर (Northbound carriageway) तयार करण्यात आला आहे. कोस्टल रोडवरील बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर वरळीच्या दिशेला साधारण ५०० मीटर अंतरावर पहिल्या मार्गिकेत (lane) या ‘म्युझिकल स्ट्रिप्स’ बसवण्यात आल्या आहेत. ही मार्गिका दुभाजकाच्या अगदी शेजारी आहे.
जय हो गाण्याची धून ऐकू येणार
हंगेरियन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या रस्त्यावर विशेष संगीतमय रिब्स (पट्ट्या) बसविण्यात आल्या आहेत. या पट्ट्यांमधील विशिष्ट अंतर आणि त्यावरून जाणाऱ्या वाहनाच्या चाकाचे होणारे घर्षण यामुळे स्वरांची निर्मिती होते. हे स्वर त्या वाहनातील प्रवाशांना ऐकू येतात. मेलडी रोडवरील स्वरांचा आनंद घेण्यासाठी ताशी 80 किमी प्रति तास वेगाने वाहन त्या विशिष्ट मार्गिकेवरून जाणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत तंत्रज्ञान, भारतीय संस्कृती आणि संगीताचा सुंदर मिलाफ म्हणून मेलडी रोडचा हा प्रकल्प देशभरात कुतूहलाचा विषय ठरणार आहे.
हे तंत्रज्ञान कसे काम करते?
मेलोडी रोड ही संकल्पना प्रामुख्याने जपानमध्ये विकसित झाली आहे. यामध्ये रस्त्याच्या पृष्ठभागावर विशिष्ट अंतराने आणि ठराविक खोलीचे ‘ग्रूव्ह्स’ (खाचा) किंवा रंबल स्ट्रिप्स तयार केल्या जातात. जेव्हा एखादे वाहन या पट्ट्यांवरून ठराविक वेगाने जाते, तेव्हा टायर आणि रस्ते यांच्यातील घर्षणामुळे विशिष्ट कंपनं निर्माण होतात. या कंपनांतून संगीताचे सूर उमटतात.
कसा घ्यावा संगीताचा आनंद?
वाहनचालकांना ‘जय हो’ची ही धून स्पष्टपणे ऐकण्यासाठी गाडीचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटर दरम्यान ठेवावा लागणार आहे. जर वेग यापेक्षा कमी किंवा जास्त असेल, तर धून व्यवस्थित ऐकू येणार नाही. विशेष म्हणजे, ही धून गाडीच्या आत बसलेल्या प्रवाशांना स्पष्टपणे ऐकू येते, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक आनंददायी होतो.
मुंबई महानगरपालिकेच्या विशेष निधीतून ‘रुट्स वर्ल्डवाइड इंडिया’ आणि हंगेरियन कंपनी ‘यूटीकोप्रो’ (UTKOPRO) यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या या मेलडी रोडचे लोकार्पण बुधवारी दुपारी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते तसेच माजी खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि हंगेरियन दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.
काय म्हणाले राहुल शेवाळे?
याबाबत बोलताना माजी खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, “हंगेरी, जपान, चायना, अमेरिका या देशांमध्ये काही वर्षांपासून मेलडी रोडची संकल्पना अस्तित्वात आहे. आपल्या देशात आणि खास करून देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत मेलडी रोड करावा, यासाठी गेल्या 2 वर्षांपासून मी पाठपुरावा करत होतो. हे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी मी स्वतः युरोपात जाऊन आलो. कोस्टल रोड हे मुंबईच्या वेगवान दळणवळणाचे एक प्रतीक मानले जाते. इथे उभारण्यात आलेला मेलडी रोड हा देशातील आणि जगभरातील पर्यटकांसाठी नवीन आकर्षण ठरेल, याची मला खात्री आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, पालिका आयुक्त आणि सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानतो.
मेलडी रोड विषयी माहिती
- भारतातला पहिलावहिला मेलडी रोड
- दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना मरीन ड्राइव्हवरील बोगदा संपल्यावर मेलडी रोड
- पहिल्या मार्गिकेवर 700 मीटर पर्यंत विशेष पट्ट्या
- रस्त्यावरील विशेष पट्ट्या आणि वाहनाच्या चाकांच्या घर्षणातून स्वरांची निर्मिती
- वाहनातील प्रवाशांना कोणत्याही वेगळ्या उपकरणाशिवाय वाहनात ऐकू येणार ‘जय हो’
- जगभरातील संगीतविश्वात भारतीय संगीताला नवी ओळख मिळवून दिलेल्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ गाण्याची पालिकेकडून निवड.
- मुंबईतील वातावरण, विविध ऋतू, समुद्रावरील वाऱ्याचा वेग यातही हा सांगितिक अनुभव कायम राहणार आहे.
- 11 फेब्रुवारीपासून वाहनचालकांना घेता येणार मेलडी रोडवरील संगीताचा आस्वाद.
खर्च किती आला?
मुंबई महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी 6.21 कोटी रुपये (जीएसटीसह) खर्च केले आहेत. हंगेरियन कंपनीने डिव्हायडरच्या बाजूला पहिल्या लेनमध्ये या पट्ट्या बसवल्या. ही कंपनी या प्रकारच्या तंत्रज्ञानात तज्ज्ञ आहे. गाणे निवडण्यात देशभक्तीचा विचार करण्यात आला. हे गाणे राष्ट्राला समर्पित आहे. या रोडमुळे मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाला एक अनोखा स्पर्श मिळालाय. ज्यामुळे तो जगातील इतर शहरांप्रमाणे आकर्षक झालाय.
जगभरात झालेयत प्रयोग
हे तंत्रज्ञान 2007 मध्ये जपानमध्ये अभियंता शिजुओ शिनोडा यांनी शोधले. त्यावेळी त्यांना बुलडोजरच्या कामातून तयार झालेला ध्वनी प्रभाव ऐकू आला. जगात हंगरी, जपान, दक्षिण कोरिया आणि संयुक्त अरब अमीरातसारख्या देशांत असे रोड आहेत. मुंबई ही भारतातील पहिली आणि जगातील पाचवी अशी जागा आहे जिथे ही सिस्टिम लागू झालीय. या रोडमुळे चालकांना जागृत राहण्यास मदत होते आणि प्रवास सुरक्षित होतो. ही कल्पना आता मुंबईत आणल्याने शहराच्या विकासाला नवीन दिशा मिळणार आहे.
——————————————–
“Best Teacher of the Year 2025-26” हा मानाचा पुरस्कार सा रे ग म च्या सदस्य सौ.जान्हवी अमित गोखले यांना प्रदान

D S Kulkarni Educational Trust संचलित DSK School चा वार्षिक स्नेहसंमेलन (२०२५-२६) सोहळा मंगळवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे पार पडला. या सोहळ्यात यावर्षीचा “Best Teacher of the Year 2025-26” हा मानाचा पुरस्कार हा ब्राह्मण यूनिटी सा रे ग म च्या सदस्य सौ.जान्हवी अमित गोखले यांना प्रदान करण्यात आला.
त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्या श्रीमती अलका आगटे मॅडम व हेमंती कुलकर्णी मॅडम यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
जान्हवी या शाळेमध्ये गेल्या ७ वर्षांपासून संगीत व मराठी विषय शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
जान्हवी तूझं खूप खूप कौतुक आणि पुढील वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा
Dr विभा देशपांडे
डीव्हीडी कॉर्नर
आजची खुश खबर
15-02-2026



