Dr विभा देशपांडे डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 1-03-2026

Dr विभा देशपांडे डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 1-03-2026
ब्राम्हण युनिटी सा रे ग म तर्फे तीन जणांनी सहभाग नोंदवला.
नवीन अगरखेडकर, आरती सिन्नरकर आणि निशिगंधा निंबाळकर
यांनी आपल्या काव्यरचनांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली.
१४ फेब्रुवारी २०२६ या प्रेमदिनाच्या औचित्याने विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा यांच्या वतीने राज्यस्तरीय “त्रिवेणी काव्य संमेलन” उत्साहात पार पडले. साहित्यप्रेमी, कवी व रसिकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या काव्य संमेलनात ब्राम्हण युनिटी सा रे ग म तर्फे तीन जणांनी सहभाग नोंदवला. नवीन अगरखेडकर, आरती सिन्नरकर आणि निशिगंधा निंबाळकर यांनी आपल्या काव्यरचनांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली.
प्रेम, सामाजिक जाणीवा, नात्यांची नाजूक गुंफण आणि जीवनमूल्ये अशा विविध विषयांवर सादर झालेल्या कवितांना रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. काव्य सादरीकरणातील आशयघनता, शब्दसौंदर्य आणि भावस्पर्शी अभिव्यक्तीमुळे या तिघांनाही राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ब्राह्मण युनिटीच्या सारेगम ग्रुपमधील सदस्यांचा ऑनलाईन काव्यस्पर्धेत गौरव
ब्राह्मण युनिटी या सामाजिक समूहातील सारेगम ग्रुपमधील सदस्यांनी ऑनलाईन काव्यस्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रुपमध्ये कविता लेखनाचा अभ्यास ‘ BUF शब्द आणि सूर’ या उपक्रमांतर्गत घेतला जात असून, त्यांना आपलाच सदस्य अमित गोखले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
दि. १४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑनलाईन शब्द विसावा मनमोकळा मंच’ या तर्फे आयोजित “न पाठवलेला मेसेज” या विषयावर चारोळी व कविता स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत सारेगम ग्रुपमधील दोन सदस्यांनी सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली.
मंदार कुलकर्णी आणि निशिगंधा उपासनी निंबाळकर यांना त्यांच्या उत्कृष्ट काव्य लेखन सहभाग साठी उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले
त्रिराज्य कवी संमेलनात आरती सिन्नरकर चा काव्यसन्मान
दि. २२ फेब्रुवारी रोजी बेळगाव येथे महाराष्ट्र–गोवा–कर्नाटक अशा त्रिराज्य कवी संमेलनाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या प्रतिष्ठित काव्य संमेलनात ब्राह्मण युनिटीच्या सारेगम ग्रुपमधील सदस्य आरती सिन्नरकर हिला प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात आरती ने सरस्वती गीताने केली. त्यानंतर “नाळ” ही आई लेकीच्या नात्यावर आधारीत प्रभावी कविता सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. उत्कृष्ट काव्यसादरीकरणाबद्दल आरती हिला काव्यसन्मान गौरव प्रदान करण्यात आला.
आरती सिन्नरकर ही ब्राह्मण युनिटीच्या ‘कविता शब्द आणि सूर’ या उपक्रमातील सक्रिय सदस्य असून, त्यात काव्यलेखनाचा अभ्यास करते आहे. अभ्यासातून मिळालेले हे सलग दुसरे यश आरती साठी अत्यंत प्रेरणा देणारे आणि अभिमानास्पद आहे.
आपल्या मनोगतात आरती ने सांगितले की, “सातत्याने लेखन अभ्यास करत राहणे आणि अशा व्यासपीठांवर कविता सादर करण्याची संधी मिळणे हे अत्यंत प्रेरणादायी आहे.” त्यासाठी तिला काव्यलेखनाच्या अभ्यासासाठी मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार मानले .
बेळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात आरती हिची कन्या ओवी नितीन सिन्नरकर हिचा जयोस्तुते ह्या गीतावर सुरेख नृत्य प्रस्तुती साठी कथक कलाकार म्हणून सन्मान केला गेला.
ह्या कार्यक्रमासाठी माय लेक दोघींच्या कार्याची दखल बेळगाव येथील वृत्तपत्रांनी विशेष दखल घेतली.


=============================================
गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण…
देशातील १४ वर्षांवरील मुलींना गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार आता मोफत ‘एचपीव्ही’ लस देणार असून ही मोहीम ऐच्छिक असणार आहे.
वैज्ञानिक पुराव्यानुसार १४ वर्षे आणि त्यापुढील वयाच्या मुलींना याचा एकच डोस दीर्घकाळ संरक्षण देतो. हे लसीकरण ऐच्छिक आणि मोफत आहे. त्यामुळे भविष्यात गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. एचपीव्ही लसीमुळे गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून ९३ ते १०० टक्के संरक्षण मिळते, असे अभ्यासांती स्पष्ट झाले आहे. तसे त्याचे पुरावे देखील आहेत.
जगातील ९० पेक्षा जास्त देश एक डोस देत आहेत. ही मोहीम सुरू झाल्यानंतर एचपीव्ही देणार्या १६० देशांच्या यादीत भारताचा समावेश होईल
Dr विभा देशपांडे
डीव्हीडी कॉर्नर
आजची खुश खबर
1-03-2026



