श्री. शैलेश सोमनाथ महाजन पोलीस मित्र, बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे. स्थानिक पोलीस स्टेशनचे, पोलीस व आधिकरी आणि त्यांचे नियोजन
🙏 माझा सार्वजनिक गणेशोत्सव 🙏
विविध सामजिक क्षेत्रात काम करीत असतांना, विविध अनुभव येत असतात, त्यातून आपला दृष्टीकोन बदलत असतो. आज असाच एक अनुभव मी आपल्याबरोबर शेअर करीत आहे.
आपला श्री गणपती बाप्पा येणार ! म्हणून समाजात विविध स्तरावर जोरदार तयारी चालू असते. यात घरगुती गणेश उत्सव आणि सार्वजनिक गणेश उत्सव असे, साधारण दोन प्रकार येतात. पण तयारी मात्र आपापल्यापरीने दोघांची जोरदार चालू असते.
आपल्या सर्वांच्या आधी, आपली उत्सवाची तयारी, नीट व्हावी आणि आपला श्री गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, म्हणून जोरदार तयारीला लागते, ते सैदिव आपल्या रक्षणासाठी तत्पर असलेले, पोलीस प्रशासन.
साधारण एक महिना आधी पोलीस, एक स्थानिक स्तरावर बैठक घेतात. त्यात स्थानिक पोलीस स्टेशनचे, पोलीस व आधिकरी आणि समाजातील विविध जातीधर्मातील नागरिक, पोलीस मित्र, पोलीस पाटील, शांतता कमिटी सदस्य यांचा समावेश असतो. खेळीमेळीच्या वातावरणात हि बैठक, पार पाडली जाते. यात समाजाचे श्रींच्या उत्सवाच्या निमित्ताने येणारे प्रश्न व त्याचे निराकरण, कसे करायचे ? याची चर्चा केले जाते. खरेदी साठी होणारी गर्दी, त्यातून निर्माण होणारे पश्र्न. ट्रॅफिक, चोरी, महिलांची छेडछाड, मांडव, आरास व देखावे, ध्वनीप्रदूषण, फटाके आणि आता नवीन सुरू झालेले सायबर क्राईम, इतकेच नव्हे तर रस्त्यातील खड्डे, वीज, विजेचे खांब, पाणी असे विविध प्रश्न यात चर्चेला घेतले जातात. यातील ज्या समस्या पोलीस प्रशासनाच्या नसतात, दुसऱ्या प्रशासनाच्या असतात, त्या समस्या, त्या प्रशासनाला कळविल्या जातात. कारण काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी घेतली जाते.
अशाच प्रकारच्या नियोजन बैठका शासन दरबारी, ज्या प्रशासनाचा संबंध, श्री उत्सवा निमित्त नागरिकांशी येतो, त्या प्रशासनाच्या नियोजन बैठका घेतल्या जातात.
स्थानिक पोलीस शांतता कमिटीची बैठक झाल्यावर, अशीच एक मोठी विभागीय एकत्रीकरण बैठक, पोलीस आयुक्तालयात घेतली जाते. या बैठकीत मुख्य पोलीस आधीकारी, तसेच विविध प्रशासकीय आधिकारी, एकत्र येऊन, वरील प्रकारे समाजतील उत्सवाबाबत समस्या ऐकून घेऊन, त्याचे निराकरण काश्या प्रकारे व कोणत्या पद्धतीत करता येईल हे पहिले जाते.
श्री गणेशाचे आगमन झाल्या नंतर दीड दिवसाचे, पाच, सात आणि दहा दिवसाचे विसर्जन, त्यासाठी होणारी गर्दी, मिरवणुका, मोठ्या गाड्या, ट्रॅक्टर ट्रॉली, छोट्या गाड्या तसेच अबालवृद्ध यांची काळजी. फटाके, गुलाल, दारू पिऊन नाचणारी मंडळी, त्यांचे वाद, ऐन विसर्जनात पाण्यात उतरून मृत्यूमुखी पडणारे काही उत्साही नागरिक, तसेच वेळेत विसर्जन करून घेणे. मूर्तीची काळजी, विसर्जनाच्या ठिकाणी करण्यात येणारी प्रशासकीय व्यवस्था. सर्व गणपतींचे विसर्जन झाल्यावर, निरक्षण करण्यासाठी शेवटी, मारण्यात येणारा फेरफटका. या साठी दरवेळी, जवळ जवळ रात्रीचे दोन ते अडीच वाजता. परत हि सर्व यंत्रणा तिथे आली किती वाजता असते ? तर दुपारी दोन ते अडीच वाजता. तब्बल १२ तास. ते पण विविध प्रकारच्या नागरिकांच्या सानिध्यात. (आपला घराचा गणपती उत्सव सोडून.) नागरिकांच्या सेवेसाठी ! का ? तर नागरिकांचे काही नुकसान होऊ नये, काही अघटीत घडू नये म्हणून.
अशा प्रकारे श्री गणेशोत्सवाची तयारी सुरू होते, आपली सामान्य नागरिकांची तयारी वेगळी, आपल्यापूर्ती मर्यादित आणि ही प्रशासकीय तयारी वेगळी समजाभिमुख. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, श्री उत्सव सुरक्षित होण्यासाठी.
मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात, सर्वप्रथम बंदोबस्त वाढविणे. सी.सी. टी. व्ही. कॅमेरे मेंटेन करणे. ट्रॅफिकला शिस्त लावण्याचा प्रयत्न करणे. गणपती बाप्पा आणताना काळजी घ्यायला सांगणे. सार्वजनिक मंडळ, मांडव कसा व कुठे घालणार ? तिथे काय काय खबरदारी घ्यावी ! साधारण देखावे कशा पद्धतीत करावेत? समाजामध्ये तेढ निर्माण होईल, प्रक्षोभक वातावरण निर्माण होईल असे देखावे नकोत. रात्री मूर्तीची काळजी घेणे. लाऊड स्पीकर किती वेळ कसा लावायचा हे समजून सांगणे. निर्माल्य आणि इतर कचरा बाबत खबरदारी घ्यावी लागते. शक्यतो सांस्कृतिक आणि समाजाला उपयोग होतील असे उपक्रम राबवणे. यात पोत्साहन देण्यासाठी स्पर्धा आयोजित करणे. स्पर्धा परीक्षक म्हणून सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांची पाहाणी आम्ही केली. त्यासाठी परीक्षक मंडळी नेमणे. सार्वजनिक मंडळांनी आवश्यक त्या विविध शासकीय परवानगी घेतल्या का ? याबाबत सर्व मंडळांवर लक्ष ठेवणे. बरीच मंडळ दरवर्षी श्री गणेश उत्सव करीत असल्याने त्यांना याबाबतची जाण असते. तरी सावधानता, खबरदारी हि घ्यावीच लागते.
श्रींचे विसर्जन झाल्यावर दुसऱ्या दिवशी लगेच, तिथे नगरपालिकेमार्फत स्वच्छता मोहीम राबवावीच लागते. त्यात काही मूर्ती पाण्याच्या बाहेर वाहत आलेल्या असतात. त्या पुन्हा विसर्जित करण्याचे जिकरीचे काम पण असते.
हे सर्व करत असताना नेहमीची कामे चालू ठेवावीच लागतात. मग ते नगरपालिकेचे कर्मचारी असोत नाहीतर पोलीस किंवा विद्युत नाहीतर अग्निशमन दल कर्मचारी असोत. सुट्टी नाही. घरी गणपती असेल तरी.
मग अश्या वेळी यांना अपेक्षा असते ती फक्त आपल्या सहकार्याची. ते पण आपल्यासारख्या सामान्या नागरिकांचा श्री. गणेश उत्सव निर्विघ्न पार पडावा. आपल्यावर कोणते संकट येऊ नये म्हणून.
या सर्वासाठी पोलीस दल आपल्या बरोबर सहकार्यासाठी घेते, ते पोलीस मित्र. ( ठाणे पोलीस आयुक्तालय, परिमंडळ उल्हासनगर ४ अंतर्गत, बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे यांनी आमचा पोलीस मित्र म्हणून उचित सन्मान राखून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. अरुण क्षिरसागर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार केला ) आणि दर वर्षी पोलीस मित्र म्हणून कार्य पार करीत असताना मनात विचार येतो, की ज्यांच्या सुरक्षितते साठी विविध यंत्रणा शासनाकडून उभारली जाते, त्या यंत्रणेला जर आपण सर्वांनी योग्य ते सहकार्य, स्वतः हुन केले, अगदी स्वयंशिस्तीने. तर आपलेच सण किती आनंदाने आणि सुखाने निर्विघ्नपणे पार पडतील.
आपण सर्वजण अशावेळी सहकार्य करीत असतोच. पण अजून समाज जागृत व्हावा, नागरिकांना सामजिक भान निर्माण व्हावे, म्हणून हा लेख प्रपंच.
जवळपास सर्वच ठिकाणी अशीच मेहनत पोलीस प्रशासन आणि इतर प्रशासने आपल्यासाठी घेत असते.
धन्यवाद !
ll जय हिंद ll
श्री. शैलेश सोमनाथ महाजन
पोलीस मित्र, बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे.