कोकणातला गणेशोत्सव ©अनिल विद्याधर आठलेकर
कोकणातला गणेशोत्सव
एखाद्या कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला, असं आपण सहज म्हणतो. प्रथमपूज्य श्रीगणेशाचं स्थान आणि त्याचा महिमाच असा आहे की सर्वांना त्याचा लळा लागतोच. कोकणी माणसाचं आणि विशेषत: मालवणी लोकांचं गणपती हे लाडकं दैवत. ‘गणपती बाप्पा मोरया’ हे तीन शब्द जरी उच्चारले तरी कोकणी माणसाच्या मनात त्याचा लाडका गणपती बाप्पा आकार धरू लागतो.
‘चाकरमानी’ हा शब्द विशेषतः बाहेरगावी( त्यातही पुणे-मुंबई इथे राहणाऱ्या) कोकणी मंडळींसाठी वापरला जातो. ‘गणपतीला गावी जायचं’ या एका ओढीवर कोकणी माणूस वर्षभर त्याची वाट पाहत राहतो. गणेशचतुर्थीसाठी कोकणात येऊन बाप्पाची सालाबादप्रमाणे सेवा करून पुन्हा कर्मभूमीकडे परत जाणे. कितीही अडचण असली, काहीही झालं तरी कोकणी मंडळी वर्षभर पै पै जमवून बाप्पासाठी बाजूला काढून ठेवतात आणि बाप्पाच्या सेवेला कोकणात पोहचतातच.
गणरायांची चैतन्यमूर्ती ही मोठ्यांना मोहित करते असं नाही तर ती बालगोपाळांनाही तितकीच जवळची वाटते. गणपती शाळेतून आणण्यापासून ते त्याचं विसर्जन होईपर्यंत मुलं बाप्पाच्या आजूबाजूलाच रेंगाळत असतात. घरात वेगळंच वातावरण असतं. पूर्ण वाडीत फिरून आरत्या , भजनं करणं, भजन झाल्यावर वाटाण्याची उसळ आणि खडखडे लाडू यावर ताव मारणं, रात्री सगळेजण एकत्र जमून छान गप्पागोष्टी करणं. ही सगळी धमाल करण्यात मोठ्यांबरोबरच लहान मुलं सर्वात पुढे असतात. म्हणूनच बाप्पानं खूप खूप रहावं असं वाटत असतं. ‘गणपती बघायला या हं’ असं जेव्हा सर्वजण एकमेकांना सांगतात, तेव्हा ते निमंत्रण फक्त गणपती बघण्याचं नसतं. ते निमंत्रण असतं आनंदसोहळ्यात सहभागी होण्याचं. ते निमंत्रण असतं जिव्हाळा वृद्धिंगत करण्याचं. ते निमंत्रण असतं दु:ख, पीडा, क्लेश, विवाद, भांडणं, राग वगैरे सगळं विसरून जाण्यासाठी विघ्नहर्त्याच्या, सुखकर्त्याच्या उत्सवात सहभागी होण्याचं. हा आनंद जर डोळ्यांत साठवून घ्यायचा असेल तर तुम्ही एकदातरी नक्की कोकणातल्या गणेशोत्सवात सहभागी व्हायला हवं.
‘पाट देणे’ हा एक खास कोकणी वाक्प्रचार आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. वास्तविक पाहता, पाट देणे ही वरवर सामान्य वाटणारी क्रिया पण कोकणी माणसाचं मन त्यात गुंतलं की तो उत्सवाचा भाग बनतो. साधारणपणे नागपंचमी झाली की पाट देण्याची ही लगबग सुरू होते. पाट कुणाकडे द्यायचा हे फिक्स असतं. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेचा तो एक भाग असतो. हा पाट म्हणजे ‘गणपतीचो पाट!’ गावात ठराविक मूर्तिकार असतात, त्यांच्याकडे जाऊन गणपतीचा हा पाट देणे म्हणजे गणेशोत्सवाची चाहूल असते. याच पाटावर गणपतीची मूर्ती विराजमान होते. हा पाट खास गणपतीसाठीच राखीव असतो आणि दरवर्षी हा पाट देण्याचा सोहळा असाच घडत असतो. पाट देतानाच मूर्तिकाराला आपल्याला गणपतीबाप्पाची मूर्ती कशी हवी आणि केवढी मोठी हवी याचीही माहिती दिली जाते. काहीजणांकडे असणारी मूर्ती ही दरवर्षी एकाच स्वरुपात असते मात्र काहीजणांकडे वेगवेगळ्या रूपात पहायला मिळते. अनेकजण गणपतीसमोर विविध पौराणिक/सामाजिक देखावेही साकारतात. त्यासाठी तशी मागणी पेंटरकडे केली जाते. (काही ठिकाणी मुर्तीकाराला पेंटर असंही म्हणतात ) गणपतीशाळेत जाऊन हे गणपती मूर्तिकार रंगवत असताना पाहत बसणे ही लहानधाकट्यांसाठी पर्वणी असते.
सणासुदीसाठी आवश्यक असणारी नेहमीची साफसफाई केली जात असतानाच ‘भिंत रंगवणे’ हा एक अतिशय महत्वाचा भागही त्यात समाविष्ट असतो. प्रत्येकाच्या घरात गणपती ठेवायची जागा ठरलेली असते. लाकडी टेबल किंवा खास बांधून घेतलेला ओटा असतो तिथेच गणपतीची मूर्ती बसणार असते. ( ‘गणपती बसणे’ हाही कोकणातला एक खास वाक्प्रचार ) जिथे ही जागा असते त्या मागे म्हणजे गणपतीच्या मागे असणारी भिंत रंगवणे हादेखील एक महत्वाचा भाग असतो. ‘रंगवणे’ म्हणजे चित्र काढणे. पूर्वी, अनेकदा या ठिकाणी निसर्गचित्रच पहायला मिळत. अधिकतर, एखादा वाडेकरी (म्हणजे वाडीतच वास्तव्यास असणारा ) हे काम करत असे. हळूहळू यात बादल होऊन वेगवेगळी चित्रे येऊ लागली आता तर काहीजण चित्रं असलेला पडदाही लावतात पण ती भिंत रंगवण्याची आणि ती रंगवलेली पाहण्यात असणारी मजा वेगळीच असायची.
यानंतर असतो सर्वात आनंददायी भाग तो म्हणजे माटवी किंवा माटी बांधायचा. माटी म्हणजे लाकडी चौकट. गणपतीच्या आसनावरती ही लाकडी चौकट छतासारखी बांधलेली असते. माटी ही कोकणच्या गणेशोत्सवाचं एक महत्वाचं अंग आहे, ठळक वैशिष्ट्य आहे असं म्हणावं लागेल. माटी सजवणे म्हणजे सर्वप्रथम माटी खाली काढून साफ करणे इथपासून सुरू होते. या माटीला खास पावसाळ्यात उगवणारी विविध रानफळे, पत्री बांधली जातात. हरणं, तेरडा, शेरवडा, कांगला, काकडी, कवंडळा, नारळ, कच्च्या सुपारीची पेंडी (घोस) तसेच आंब्याचे टाळ (डहाळा), सावंतवाडीची लाकडी फळं इत्यादी माटवीळा बांधून माटवी सुशोभित केली जाते. ही फळं किंवा फुलं बाजारात विकत मिळत असली तरी आवाठात (म्हणजे वाडीत ) किंवा रानात फिरून ती गोळा करण्यात एक वेगळाच आनंद असतो.
यानंतर इतर सजावट केली जाते. तोरणं बांधणे, मखर बांधणे, लायटिंग करणे हे आवडीचे काम घरातील तसेच आजूबाजूची बाळगोपाळ मंडळी मोठ्या आनंदाने करतात. मातीची जमीन असेल तर शेणाने मस्त सारवून घेतली जाते. नंतर जमिनीवर मस्त रांगोळ्या काढल्या जातात. सर्व सजावटीमध्ये आणि एकूण भक्तिमय वातावरण करण्यामध्ये कोकणी माणूस कुठेही कसर सोडत नाही.
शक्यतो चतुर्थीच्या आदल्या दिवशीच मूर्ती घरी आणली जाते (क्वचितप्रसंगी गणेश चतुर्थीच्याच दिवशीही आणली जाते ) मग पहाटे लवकर उठून अंघोळी वगैरे वगैरे उरकून बाप्पाच्या पूजेची तयारी केली जाते आणि गुरुजी आले की त्यांच्या सुचनेनुसार सिद्धीविनायकाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते.
| अस्या मृण्मयमुर्तौ प्राणप्रातिष्ठापने विनियोग: |
|| एकदन्तं शूर्पकर्ण गजवक्त्र चतुभूर्जम् ||
|| पाशांकुशधरं देवं ध्यायेत सिद्धीविनायकम् ||
बाप्पाचं पूजन झाल्यावर घरातील सर्वजण बाप्पाचं दर्शन घेतात, फुले वाहतात आणि त्यानंतर आरती केली जाते. आरती करतानाचा उत्साह बघण्यासारखा असतो टाळ तसेच टाळ्या तर कधी तबलाही वाजवून आरती केली जाते. मग प्रसाद वाटला जातो. कोकणात भजनी मंडळांची एक परंपरा आहे. गणपतीमध्ये ही भजनी मंडळे घरोघरी भजने करतात आणि इथून पुढील काही दिवस घरोघरी गाणी, भजने, आरती या ना त्या मार्गे फक्त बाप्पा आणि बाप्पाचाच नामघोष सुरू असतो.
मनं जोडणारा, दु:ख दूर करणारा, सुख आणणारा, घरात आनंदीआनंद पेरणारा, सर्वांना गुण्यागोविंदानं नांदण्याची गोड शिकवण देणारा, बालगोपाळांचा लाडका बाप्पा म्हणूनच फक्त दीड दिवसांनी घरी जायला निघतो तेव्हा रडू कोसळतं. तसं तर पाच, सात, नऊ, अकरा, एकवीस दिवसांनी बाप्पा निघाले तरी डोळे भरून येतातच, पण थोड्या अधिक दिवसांचा सहवास लाभल्याचं सुख तोवर मनात भरून घेतलेलं असतं …
तरीही मन मात्र पुन्हा पुन्हा म्हणत राहतं –
” बाप्पा तुम्ही या हो खूप खूप रहायला”
©अनिल विद्याधर आठलेकर
मोबाईल – 9762162942