‘मला मरेपर्यंत जगायचे आहे’… साधे वाक्य आहे, पण यात जीवनाचे सार दडले आहे – श्रध्दा जहागिरदार
ऐसा ना हो की जिंदगी हमारे मजे ले रही है। बल्कि उस मोड को पार करो की, हम जिंदगी के मजे लेंगे
‘मला मरेपर्यंत जगायचे आहे’…
साधे वाक्य आहे, पण यात जीवनाचे सार दडले आहे
साधे वाक्य आहे, पण यात जीवनाचे सार दडले आहे. काल शेजारचे गोखले काका आले होते. सत्तर वर्षाचे काका पण सत्तरीला लाजवेल असे त्यांचे व्यक्तिमत्व! नेहमी उत्साही, तरतरीत असे काका! कालच्या गप्पात काका थोडे नाराज दिसत होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यामुळे काकांचे वास्तव्य आता मुलाजवळ होते. गप्पांच्या ओघात मला लक्षात आले की काका आज नाराज आहेत व घरी पैशावरून काहीतरी कुरबुर झाली आहे. मी पण जास्त खोलात चौकशी केली नाही. काही वेळातच आश्चर्य घडले, नाराजीचा सूर लावणारे काका एकदम उत्साहात बोलू लागले. “मी काहीही मुलासाठी, नातवासाठी ठेवणार नाही. मी कमावलेला पैसा त्यावर माझा हक्क आहे ,त्याचा मी पुरेपुर उपभोग घेणार. दरवर्षी मोठी ट्रीप काढणार,राहिलेले जीवन कसे आनंदात घालवणार. त्यांच्या आयुष्याबद्दल भरभरून सांगत होते. या ठिकाणी मी फक्त ऐकण्याची भुमिका घेत होते. मला एवढे मात्र लक्षात आले की काकांना आता उर्वरित आयुष्यात सुखाचे क्षण हवे आहेत. काका गेले आणि नकळत माझ्या डोळ्यात पाणी आले. माझ्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले व मला मरेपर्यंत जगायचे आहे हे वाक्य सापडले. ‘हो! मला मरेपर्यंत जगायचे आहे’. येणारा प्रत्येक दिवस,पुरेपुर जगणे. ईश्वराने एवढे सुंदर आयुष्य दिले आहे. भले त्यामध्ये अडी-अडचणी आहेत, दु:ख आहे, आनंद आहे ते पार करून मला जगायचे आहे. म्हणायला सोपे आहे, पण आपण आपल्या अवती-भवती पाहतो कित्येक लोकं जीवनाला कंटाळलेली आहेत. तरी पण ते जगतातच की!आता यामध्ये अशी पण लोकं आहेत जी कोणत्यातरी कार्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून देऊन आनंदात जगत आहेत. काहीतरी सतत करत राहणे व त्यात आनंद शोधणे ही जीवनाची गुरुकिल्ली त्यांनी संभाळली आहे. लहानपण आपले खेळण्या बागडण्यात निघून जाते. जीवनाचे सार काय आहे हे लक्षात येईपर्यंत आपली तेवढी समज नसते. नंतर लग्न, संसार, मुलं यामध्ये बराच काळ जातो. आता असा टप्पा आहे की आयुष्याची परिपूर्ण ओळख झाली आहे. आयुष्याचा रस्ता सरळ असेल तर तो आपण डोळे झाकून पार करू शकतो पण तेच जर आयुष्यात खाच-खळगे, संकटं, सुख-दु:ख असतील तर ती पार करताना अवतीभवती नजर टाकून त्यात सुख शोधण्याचा प्रयत्न करू. ते शोधताना आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल, ज्ञान मिळेल कदाचित वाईट अनुभव पण येतील. म्हणून ईश्वराने माणसाचे आयुष्य सरळमार्गी ठेवले नसेल. कौटुंबिक जबाबदारी कमी झाल्यावर एखादा छंद, अध्यात्म, सत्कर्म यात पण आयुष्य घालवता येते. सकाळी आरशासमोर उभे राहून स्वत:ला सांगायचे “माझा आजचा दिवस छान जाणार आहे. भले त्यात मला काहीतरी वाईट ऐकायला मिळेल, आनंदाची बातमी कळेल, भांडण होईल, अपमान होईल ते सर्व आज माझे मन accept करणार आहे. तर आनंद सापडू शकतो. आज आपल्या समोर आपल्याला प्रेरित करण्यासाठी टिव्ही, मोबाईल, सोशल मिडिया अशी कितीतरी साधनं आहेत. त्यातुन पण जीवनाचे सार समजू शकते. इथे माझा एक अनुभव सांगते. माझी मैत्रीण मला सांगायची आपल्याला बारीक फिगर हवी असते पण त्यामागचे कष्ट जसे की व्यायाम, योगा, डाएट, या गोष्टी करण्याचा फार कंटाळा येतो. यासाठी फिल्मी मासिक, वर्तमानपत्र यामध्ये फिल्मी actress चे फिगर मेंटेन केलेले फोटोज असतात. ती मासिके, पेपर आपल्या नजरेस पडतील अशी समोर टेबल वर ठेवायची. नकळत आपण जागृत होऊन योगा, walk, डाएट याकडे वळतो. हा फॉर्म्युला माझ्या बाबतीत उपयोगी झाला. म्हणून इथे शेअर करण्याचा अट्टाहास! एकंदरीत चांगल्या गोष्टी, चांगल्या घडामोडी, चांगली कार्ये करत रहाणे, आपल्या नजरेसमोर ठेवणे, मग आयुष्य सुसह्य होईल. जन्म -मरणाचा फेरा कुणाला चुकलेला नाही. पण ते जगणं कसं असावं ते शोधले पाहिजे. आपल्या असण्याची, आपल्या जाण्याची कुणीतरी नोंद घेतली पाहिजे. मरेपर्यंत जगा म्हणजे नुसते जगणे नव्हे, लाभलेले जीवन आपल्या गोड बोलण्याने, गोड हास्याने, चांगल्या कर्तृत्वाने भरलेले ठेवणे. एखादी व्यक्ती सतत हसरी असते, बोलकी असते याचा अर्थ त्या व्यक्तीच्या जीवनात सुखच सुख असेल असे पण नाही. त्या हास्यामागे कदाचित कोणतीतरी वेदना पण असेल पण जे आहे त्यात ती आनंद शोधण्याचा प्रयत्न करते. आपल्याजवळ जे नाही त्याकडे सतत लक्ष देऊन जे आहे त्याला लांब करतो. ‘माझीया मना जरा थांब ना’ पण नाही, हे ‘मन’ थांबतच नाही. पळतच राहते व जे नाही त्याच्या मागे लागते. मोह, माया, राग, लोभ या सर्व गोष्टींनी जीवन भरलेले आहे. त्यावर काबू करून आनंद शोधण्याचा प्रयत्न करूया. हे सर्व सांगायला किती सोपे आहे. पण प्रवाहासोबत वहात जाऊन, मनावर ताबा ठेऊन, समोर आलेला प्रत्येक क्षण उपभोगुन जो जीवन जगतो, त्याला जीवनाची गुरुकिल्ली सापडली असे म्हणायला हरकत नाही. ते ‘मरेपर्यंत जगणे’ झाले.
“ऐसा ना हो की जिंदगी हमारे मजे ले रही है। बल्कि उस मोड को पार करो की, हम जिंदगी के मजे लेंगे”
थोडक्यात आपल्या आयुष्याची रुपरेषा आपणच आखुयात आणि मरेपर्यंत जगण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? हो ना?😊👍🏼
©®सौ श्रध्दा जहागिरदार
Nice website!
I regularly visit and go through all informative, interesting, diversified write-ups, videos.