समाजाचं देणं…………………….. ©® ज्योती रानडे
समाजाचं देणं..
©® ज्योती रानडे
मी जवळच्या फार्मसीच्या दुकानात औषध आणायला गेले होते. तिथे वरती एक बोर्ड लावला होता. Employee of the month & most helpful customer care representative लिहलेल्या बोर्डावर खाली “मेरी”असे नाव लिहले होते. मी त्या बोर्डाकडे बघत असताना एक बाई मला म्हणाली, “May I help you“?ती फार्मसी क्लार्क मेरीच होती. मध्यम वजन, कुरळे केस, कानात चांदीचे खडे, निळ्या रंगांचा चष्मा आणि अत्यंत विनयानं बोलणारी मेरी ४५-४६ वर्षाची असावी.
“आहे का माझं prescription तयार?” मी विचारलं. ती मुख्य फार्मसिस्ट ला काहीतरी विचारून आली.
“तुझं औषध तयार नाही. तुझ्या डॅाक्टरकडून तुझी prescription order आलेली नाही.” तिने कंप्यूटर मधे बघत सांगितलं. क्षणभर वाटून गेलं की हिचे काम तसं कठीण नसावं..त्यासाठी बक्षिस वगैरे म्हणजे जरा जास्तच झालं!
माझ्या वैतागलेल्या चेहऱ्याकडे बघत ती म्हणाली,“बसायला वेळ आहे का तुला? मी तुझ्या डॅाक्टरला फोन करून तुझं prescription लगेच पाठवायला सांगते म्हणजे तुला हेलपाटा नको.”मी बसले. मेरीने मला वाचायला एक मासिक आणून दिले. “हल्ली लोकं फोनवर वाचतात पण मासिक वाचण्यातली मजा काही औरच. किती सुंदर चित्रं आहेत बघ.” म्हणत मेरी पुढच्या गिऱ्हाईकाला मदत करण्यात गुंतली.
पुढचं गिऱ्हाईक एक ७५ वर्षाचे आजोबा होते. ते त्यांच्या तब्येतीमुळे आणि औषधाच्या वाढलेल्या किंमती ऐकून चिडले होते.”एवढं महाग कसं झाले हे औषध? ते चिडून मेरीला म्हणाले. हा देश दिवसेंदिवस खाली चालला आहे.औषधाच्या किमती वाट्टेल तशा वाढवताना काही वाटत नाही त्यांना”आजोबा रागाने थरथरत म्हणाले.
मेरी ला याची सवय असावी. ती आजोबांना म्हणाली,”बरोबर आहे तुमचे. माझी आई पण हे औषध घेते त्यामुळे मला माहित आहे. पण बघा दोन महिन्यात याचं Generic औषध येणार आहे. ते खूप स्वस्त असेल. या वेळी तेवढा खर्च करा. आत्ता हे कुपन वापरा.” म्हणत तिने आजोबांचे थोडे पैसे वाचवले. आजोबा थोडेसे शांत होऊन बाहेर पडले.
मेरी माझ्या डॅाक्टरकडून prescription अजून आलेलं नाही हे मला अधून मधून सांगत होती. तिने डॅाक्टरला फोन केलेला मी ऐकला होता.
पुढच्या गिऱ्हाईकाच्या औषधाचे कंम्पुटर वर बिल करत असताना तिला एक फोन आला. तिचा मुलगा असावा बहुतेक. ती म्हणाली, “ तुझी स्कूल बस चुकली असेल तर आता लायब्ररी मध्ये बसून होमवर्क संपव. मी काम संपले की येईन तुला घ्यायला.”
ती परत कामात गढली.समोर आलेल्या प्रत्येक गिऱ्हाईकाशी शांत आवाजात बोलणं, प्रेमानं त्यांची चौकशी करणं,डॉक्टरांच्या ऑफिसला फोन, हेल्थ इन्शुरन्स औषधाचे किती व तेवढेच पैसे का देईल हे त्यांना समजावून सांगणे सतत सुरू होतं.
माझं prescription पण तयार झालं होतं. मी ते घेऊन पैसे दिले व तिथून बाहेर पडू लागले.
“तुला अर्धा तास बसायला लागलं याबद्दल sorry! आम्ही prescription तयार झालं की text पाठवतो. तुला त्या लिस्ट मधे अॅड करते म्हणजे पुढच्या वेळी असा वेळ जाणार नाही.”ती म्हणाली. मी होकार दिला.
तिनं माफी मागण्याचा प्रश्नच नव्हता. “तुझ्या डॅाक्टरने prescription पाठवलं नाही तर मी काय करू?”म्हणून ओरडली असती तरी चाललं असतं. पण तसं काही झालं नाही.
“Mrs Ranade, Have a wonderful day. ”मी निघताना ती म्हणाली. मी तिच्याकडे बघून म्हटलं,” अग तुला मुलाला आणायला जायचं नाही का? त्याची स्कूल बस चुकली ना?”
ती म्हणाली,” तो नववी मधे आहे. लायब्ररीमध्ये बसून करेल अभ्यास माझी ड्युटी संपेपर्यंत. मला जाऊन त्याला आणता आलं असतं पण काम सोडून कसं जाणार?आज गर्दी खूप आहे… मी कॉफी ब्रेक ही घेतला नाही. नवऱ्याची कंपनी पण खूप लांब आहे त्यामुळे त्यालाही जमणार नाही.”
माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघत ती म्हणाली,” माझे काम तसे सामान्य वाटेल पण मी त्याच्याकडे लोकांची सेवा म्हणून बघते. समाजाचे देणं म्हणून बघते.
औषधं, हेल्थ इन्शुरन्स, prescriptions, तब्ब्येत बरी नसताना फार्मसी मधे जाणे, तिथं वेळ लागणे या किचकट गोष्टी असतात. त्यांचे पटकन काम करून देणं महत्वाचे असते. आणि जिथे काम पटकन व छान होतं ना त्या दुकानाची वेगळी जाहिरात करावी लागत नाही! लोकच सांगतात इतरांना!”
मी बाहेर पडले. वाटलं.. प्रत्येकानं समाजाचं देणं असतं ही जाणीव ठेऊन आपलं काम असं चोख केलं तर हे जग किती सुंदर होईल. मेरीच्या काम करण्यात एक आपलेपणा होता. समोरचा माणूस अगदी घरातला असल्या सारखं सर्वांशी दिवसभर प्रेमाने बोलणं सोपं का आहे?
आपल्या वाट्याला आलेलं काम न कंटाळता मनापासून कसं करायचं कुठल्या कॅालेजमधे शिकवत नाहीत. ती वृत्ती असावी लागते. हे समाजाचं देणं आहे ही जाणीव असावी लागते. आपण ज्या समाजाचा भाग आहोत तिथे वरपासून खालपर्यंत प्रत्येकाने उत्कृष्ट दर्जाचे काम केले तर देशात केवढी सुबत्ता नांदेल. मग ते देशाचे पंतप्रधान असोत किंवा कचरा उचलणारा कर्मचारी असो. रोजच्या कामात सौंदर्य शोधणं ही कला आहे आणि ती मेरी जवळ होती.
अभिनेता राजकुमार ला म्हणे कोणी तरी प्रश्न विचारला होता. “तू अभिनेता नसतास तर कोण बनला असतास?” त्यावर त्यानं दिलेलं उत्तर आठवलं. “जे केलं असतं ते इतकं उत्तम केलं असतं की त्याचं सुध्दा लोकांनी कौतुकच केलं असतं. अगदी बुटाला पॅालीश केलं असतं तरी ते इतकं चकचकीत केलं असतं की त्या चमकणाऱ्या बुटात माणसाला त्याचा चेहरा बघता आला असता.”
मी बाहेर जाऊन कॅाफी विकत घेतली. परत फार्मसी मधे गेले. मेरी पुढच्या गिऱ्हाईकाला स्पॅनिश भाषेत काही गोष्टी समजावून सांगत होती. तिला कॉफी दिली व सांगितलं,”Mary, you deserve that award. You truly are the best customer care representative!”मेरीचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. ती हसत म्हणाली,” Thank you. आता तू आलीस की मला कॅाफी ब्रेक मिळणार का नाही याची काळजी करायला नको!
परत दोन महिन्यांनी फार्मसी मधे गेले होते तेव्हा मेरी मॅनेजर झाल्याचं कळलं.A very well deserved promotion! महान फुटबॅाल खेळाडू पेले म्हणाले आहेत,”Success is no accident..It is hard work..and to love what you are doing!
मनापासून केलेल्या कामाचे चीज झाल्याशिवाय राहत नाही हेच खरे!
©® ज्योती रानडे , Thank you so much , Shared from What’s app Post