Classified

वाचकांचे आसमान उंचावणारा लेखक :- जिम कॉर्बेट . ~ मनोज बोरगावकर

वाचकांचे आसमान उंचावणारा लेखक :- जिम कॉर्बेट .
~ मनोज बोरगावकर
९८६०५६४१५४ .

वयाच्या दहाव्या वर्षी जिम कॉर्बेट ने पहिली शिकार केली तीही नेमबाजीच्या स्पर्धेत बक्षीस मिळालेल्या रायफलने. मग हा सिलसिला कितीतरी वर्षे चालू राहिला अगदी सराईत शिताफीनेआणि नरभक्षकाच्या भीतीच्या छायेत जीव मुठीत धरून जगणाऱ्याना मोकळा श्र्वास द्यायचा या नेकदिल ध्यासाने. गढवाली लोकांनसाठी तो वाघाचे धारीष्टय अन् साधूचे कनवाळूपण असलेला गोरा साधूच होता.लग्न बिग्न न करता तो वाघासारखा एकटाच जगला. म्हणूनच की काय तो वाघाच्या नस नसशी वाकिफ असावा.जिम कॉर्बेट रुढ अर्थाने गोरा साहेब तर नक्कीच नव्हता….अनवाणी पायाने जंगलात वीस वीस किलोमीटर न थकता भागता पायपीट करणारा खेडूत तर होताच…त्याही पलीकडे जनावरांचे -पाखरानचे हुबेहूब आवाज काढणारा आणि जंगलाचा रुतबा,, रीवाज, ऐपत ओळखून त्यात सहजी मिसळून जाणारा आदिवासी होता.असे म्हणणेच अधिक संयुक्तिक ठरेल.
नरभक्षक वाघांना मारण्याच्या या जीवघेण्या खेळात कधी कॉर्बेटला आडवी आली दबकत दबकत पाठलाग करणारी चौगडची नरभक्षक वाघीण तर कधी तालादेवीचा नरभक्षक. तर कधी भाग्यवान वाघ म्हणून पंचक्रोशीत नावं कमावलेला दबीधुऱ्याचा वाघ आणि त्या वाघाचे अनेक वेळा अविश्वसनीय तरीक्याने वाचणं. एक प्रसंग आवर्जून अधोरेखित करावासा वाटतो .वाघ जिमच्याअगदी बंदुकीच्या टप्प्यात असतो.चार दोन दिवसात पाऊस पडून जमिन पोखर झालेली नसताना किंवा कोणतेही वारवावधान सूटलेल नसतानाही ऐक भले मोठे झाड अचानक खचून काडकन कोसळते. आवाजासरशी तथाकथित भाग्यवान वाघ पुन्हा एकदा जिमला गुंगारा देतो. जिम या ठिकाणी आवर्जून नमूद करुन ठेवतो की”तो खरोखरच भाग्यवान आहे याची खातरजमाच वाघ आपल्या परीने करुन देत होता.आमच्या पैकी कोणालाही ईजा झाली नाही असा रोमहर्षक डाव आम्ही खेळलो त्यानतर अनेक वेळा मी दबीधुरऱ्याला गेलो पण त्या वाघाला कोणी मारल्याचे ऐकिवात नाही.म्हणजे तो वाघ वृद्ध सैनिका प्रमाणे काळाच्या उदरात गडप झाला असेल”.अशा अनेक अद्भुतरम्य साहसी कथांचा ऐवज जिम जेव्हा वाचकांपुढे साक्षात करतो तेव्हा वाचकांसाठी त्या केवळ शिकार कथा नसतात तर जंगल निसर्ग प्राणी माणूस यांच्या संबंधांची ती सुबक अशी एक आकलनगाथाच असते. जिम कार्बेटची सांगण्याची हातोटी आणि शैली इतकी सच्ची आहे की
त्या शैली समोर आजचे वेल इक्विप्प्ड डिस्कवरी चॅनेल सारखी चॅनेल सुद्धा थीटी थीटी वाटत राहतात.
निसर्ग आणि साहस यांच्या बेमालूम अदाकारीतून जिम कार्बेटने , मॅन ईटर्स ऑफ कुमाऊ (1944), दि मॅन इटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग (1947), जंगल लोअर (1953), आणि टेम्पल टायगर अँड मोर मॅन ईटरस ऑफ कुमाऊ(1954) यासारखी अफलातून पुस्तके लिहून निसर्गाकडे पाहण्याची एक जाणती नजर वाचकांना उपलब्ध करून दिली आहे. बंदुक ही कॉर्बेटची गरज होती, जंगल हे त्याचे पॅशन तर कॅमेरा हा त्याचा जीव की प्राण…म्हणूनच त्यानें लिहिलेल्या जंगल कथा व चलचित्रपटागत आपल्या डोळ्यासमोरुन सरकत जातात.
प्राण्यांच्या क्रोर्या याविषयीचे तोकडे असलेले आपले आकलन जिम कार्बेट वाचल्यानंतर वेगळ्या अर्थाने समृद्ध होत जाते. प्राण्यांच्या या क्रौर्यामागे सहेतुक अणुकुचीदार मानवी भावना नसून, जगण्याच्या लढाईत त्यांच्यासमोर शिल्लक असलेला तो एकमेव असा पर्याय असतो. त्यामुळे त्यांच्या हिंसे मागे केवळ हिंसेचे टोकदार पाठबळ नसते तर त्यापुढे जाणारे सशक्त असे
कारण असते… चच्चा बच्चा सुरक्षित रहावा म्हणून कराव्या लागणाऱ्या सीझेरींनच्या कापाकापीगत.निसर्गाचे असे असण्या पलीकडचे दिसणे जिम कॉर्बेट मोठ्या देखण्या पद्धतीने उजागर करीत राहतो.
जंगलातल्या प्राण्यांच्या हिंसेकडे पाहण्याचा एक अधिक साफ सुथरा असा मनाला भिडणाऱ्या दृष्टिकोनाची ऊरभेट जिम वाचकाला पदोपदी करून देऊन कळत नकळत आपल्या निसर्गविषयक जाणिवा अधिकाधिक प्रगल्भ करीत जातो मोठ्या नजाकतीने.
कॉर्बेट जेंव्हा म्हणतो,”जंगलातला
कोणताही जीव स्वतःहून आक्रमक वा हल्लेखोर नसतो, परिस्थिती त्याला तसे करण्यास बाध्य करते… किंवा जगण्यातल्या लढाईत ही ऐकमेव बाराखडी त्यांच्या कडून घोटऊन घेतलेली असते”.आॅदरवाईज वाघ अगदी भुकेला असला तरी शेजारून जाणाऱ्या मनूष्य प्राण्याकडे ढुंकूनही पाहत नाही किंबहुना मानवी स्मेलच त्याला आवडत नाही.माणूस हा तसा कोणत्याही अर्थाने त्याच्यासाठी दखलपात्र ऐवजही नसतो ना भीती म्हणून ना भूक म्हणूनही .वाघाकडे असलेल्या अमाप ताकदीचा रुबाब त्याने कधी केल्याचे ऐकिवात नाही. वेळप्रसंगी केवळ अनिवार्य म्हणून ती वापरायची असते अन्यथा ती म्यान करून ठेवण्याल्यानेच ती अधिक रुबाबदार दिसत राहते. निसर्गाने कोणतीही ट्युशन फी न आकारता वाघाला दिलेले हे शहाणपण असते. वाघांचे उपजत असलेले हे शहाणपण ‘पॉवर मॉन्गर’ असलेल्या माणसाला कधीही ऊमजणार नाही. म्हणूनच त्याच्या सत्तेचा रुबाब देखणा वाटण्याऐवजी ओंगळवाणाच वाटत राहतो. हे उमजण्यासाठी जिम कॉर्बेट सारखे जंगल नाही वाचले तरी किमान कार्बेट तरी वाचलाच पाहिजे .साध्या साध्या छोट्या छोट्या प्रसंगातून जिम जगण्यातली सोपी सोपी रहस्य मोठ्या नफिस पद्धतीने उलगडत जातो. मासल्यादाखल,”जंगलातले सर्व जीव त्यांच्या नैसर्गिक परिस्थितीत अगदी आनंदाने जगत असतात. निसर्गात दुःख नाही कशाची टोचणीपण नाही.एखादा तळ्यातला पक्षी किंवा कळपातला प्राणी ससाण्याने किंवा एखाद्या मासभक्षी जनावराने उचलला तर कळपातले इतर जण आपली वेळ आली नव्हती यातच मश्गूल राहणे पसंत करतात.” किती ग्रेट आहे नाही हे दुःखाच्या आसपासही रेंगाळायचे नाही अन् तथाकथित सुखलाही कवटाळत बसायचे नाही .आला क्षण फक्त तहेदिल जगत राहायचा.
जिमची पुस्तकं म्हणजे नरभक्षक वाघांच्या शिकारीसाठी त्यांनी दिवसरात्र जंगलातून केलेल्या बेजोड भटकंती आणि त्यातून गवसलेल्या निसर्गाच्या अनागिनत आणि अविश्वसनीय अशा रहस्याची वाचकांना नादाऊन टाकणारी मालिकाच आहे.
जिम एके ठिकाणी सांगतो ,”मी जेव्हा नवखा होतो तेव्हा वाघ किंवा तत्सम प्राण्यांच्या तावडीत सापडलेल्या एखाद्या असाह्य जीवाला वाचवायचा जीतोड कोशिश करायचो. पण माझे हे नवखेपण फार काळ टिकले नाही. माझ्या लगेच लक्षात आले की प्राण्याला वाचवण्याचा हा व्यवहार आतबट्ट्याचा आहे. यातून होणारे नुकसानही दुहेरी आहे. कारण गिधाडांच्या आणि वाघांच्या नखात किंवा दातात कुजलेल्या मासांचे कण असतात त्याचे विष बनलेले असते. ते विष वाचवलेल्या प्राण्यांच्या शरीरात भिनायला फारसा वेळ लागत नाही.जंगलात त्यांना कोणतीही ट्रिटमेंट मिळण्याची सुतराम शक्यता नसते. त्यामुळे ते प्राणी तर मरतातच पण त्याच बरोबर हातातोंडातशी आलेली शिकार हिरावल्या गेलेला तो उपाशी जीव अधिक त्वेषाने आणखीन एक शिकार करतो. यातूनच नाहक दोन बळी जातात. हे उमजल्यापासून मी हा नाद सोडून दिला. माझ्या लवकर लक्षात आले की निसर्गाच्या या स्वभविक व्यवहारातील आपली सक्रियता बहुतांश वेळा नुकसानदायी तर असतेच पण त्याचबरोबर जंगलातील स्वाभाविक रिवाजांच्या आड येणारही असते.,”
निसर्ग नियमांचे प्राण्यांच्या जगण्याचे हे तत्वज्ञान केवढ्या ताकदीने आणि खुबीने मांडून ठेवलेय जिम कार्बेटने . मुळाबरहुकूम आपल्यालाही असे म्हणता येईल की, जगण्याच्या या साऱ्याच प्रक्रियेचा इनऍक्टिव्ह भाग बनून आपण राहिलो तर जगण्याची समिकरण खूप सरळ साधी सोपी होत राहतात. म्हंटले तर हे खूप साधे म्हंटले तर खूप अवघड.
यामुळेच त्याच्या लेखनातून एकाच वेळी जिम कार्बेट हा नेकदिल शिकारी आणि निसर्गाचे सहजी न समजणारे देखणेपण उमजलेला लेखक वाटत राहतो.
नरभक्षक वाघाची शिकार करताना जिमने अनेक प्रसंग केवळ मांडून ठेवले आहेत त्यावर कोणतेही भाष्य न करता. त्याने दिलेला हा स्पेस वाचकाच्या जीवनातल्या अनेक जागा भरुन काढतो. मासल्यादाखल एक उदाहरण आवर्जून नमूद करावे वाटते. हा प्रसंग ‘ दि टेम्पल टायगर अॅन्ड मोर मॅन ईटर्स ऑफ कुमाऊ’ या पुस्तकात आलेला आहे. तो असा….
मुक्तेश्वरच्या नरभक्षकाने मांडलेला उच्छाद आणि भयाच्या छायेत वावरणाऱ्या लोकांना भयातून मुक्त करण्यासाठी जिम निघालेला , मुक्तेश्वरच्या वाघिणीचे दहशत एवढी असते की चार तासाच्या वाटचालीत त्या रस्त्यावर त्याला माणूसच काय पण चिटपाखरू सुद्धा आढळत नाही. या एकांड्या रस्त्यावरून आठ वर्षाची एक मुलगी आपला बैल घेऊन काकाला नांगरण्यासाठी द्यायला चाललेली असते. एकंदर दहशतीच्या वातावरणातले ते दृष्य जिमला बेजोड वाटते .त्या आठ वर्षाच्या मुलीची रस्त्यात बैलांशी ओढाताण चालू असते. जिमला तिला त्या रस्त्याने एकटे जाऊ देणे प्रशस्त वाटत नाही म्हणून तो तिला काकाच्या घरापर्यंत सोबत करतो. घर आल्यावर ती आठ वर्षाची मुलगी काकाला हाळी देते आणि बैल आणल्याचे सांगते.काका झोपडीतून बाहेर न येताच तीला उत्तर देतो.,” पुतळा मी जेवायला बसलोय बैल खुट्याला बांध आणि सरळ घरी जा”. पुतळा बैल बांधते आणि घराकडे निघते. अर्थातच जिम तीला घरापर्यंत सोबत करतो.जिम स्वतः येथे काहीच कॉमेंट करत नाही पण वाचकाचा तळखोल अगदी ढवळून ढवळून काढतो. जिमने मांडून ठेवलेला हा प्रसंग वाचक इन द लाईन तर वाचतोच… इन बीटवीन द लाईन ही वाचतो एवढेच नव्हे तर त्यापलीकडे जाऊन बीयाॅन्ड द लाईनही वाचतो. हा प्रसंग वाचल्यावर आपले मन अनेक शक्यता पडताळून पाहात राहते. सैनिक सुद्धा ज्या रस्त्याने एकटे दुकटे प्रवास करत नाहीत अशा नरभक्षक वाघाच्या प्रदेशात त्या ईन मिन आठ वर्षांच्या लेकराला बाप एकटीला कसे काय पाठवतो?.त्या मुलीचा काका साधे झोपडीच्या बाहेरही न येता तिला वाटेला कसा काय लावू शकतो? वगैरे वगैरे. जिमच्या जगण्याची आणि लिखाणाची ऐपत एवढी मोठी की या प्रसंगावर कोणतीही कॉमेंट न करता त्या मुलीला घरापर्यंत सोबत करून जिमने फार मोठी कॉमेंट केलेली असते. निसर्गाच्या सततच्या वावरातून ही मूक सोबतीची दीक्षा जिमला मिळालेली असते की काय?
ज्या कार्बेट कडून अनेक नरभक्षक वाघ मारले जातात , तो ठामपणे असे सांगतो की एरवी वाघ तसा खूप चांगला प्राणी आहे तो विनाकारण माणसाकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाही हे ऐवज आपल्या लायकीचेच नाही ही अंगभूत जाणीव त्याला मुळातच असावी.
म्हणूनच की काय अनेक वाघांचा वावर असलेल्या या जंगलात हजारो माणसे निर्धोकपणे भटकत असतात. माणसांपेक्षा वाघावर असलेला हा अतिरिक्त विश्वास तर त्या बापाला मुलीला एकटच सोडण्यात दडलेला नसेल ना? का आपल्या मालकाला सोडवण्यासाठी बेलाशकपणे वाघावर चाल करून गेलेल्या गाईंची उदाहरणे सोबतीला असल्यामुळेही सोबतच्या बैलावर म्हणजे पुन्हा प्राण्यावरच बापाचा अपार विश्वास असेल का?असाही विचार मनात तरळून जातो. वाघ नरभक्षक झाला असेल तरच विपरीत वागतो आणि त्याचे तसे वागणे हा अपघात आणि वाघाचा केवळ नाईलाजच असतो.आपल्याला येईल असे सभोवाराला किंवा प्राण्यांना समजून घेणे..?
द बॅचलर ऑफ पोवाळगडच्या व नरभक्षकाच्या शिकारीची कथा तर केवळ अद्भत या सदरात मोडणारी अशीच.हा वाघ ‘ओव्हर द कर्व्हज ‘(नाकाच्या शेंड्यापासून शेवटच्या टोकापर्यंत लांबी) साडे दहा फूट एवढी अवाढव्य होती.
कॉर्बेटच्या अवघ्या काही यार्डावरुन मारलेल्या गोळीने कवटीचा एक तुकडा तुटूनही हा जिगरबाज वाघ त्याला दोन दिवस झुंजवत होताअन् एकटा बेडर जिमही त्याच्याशी जीव पणाला लावून झुंजत होता.वाघ गतप्राण झाल्यावर त्याने एवढे थकवल्यावर जीवावर ऊठल्यावरही जिम त्याच्या रूबाबदारपणाचेच वर्णन करीत राहतो न थकता. तेंव्हा आपल्यासाठी ती माणूस व प्राणी यांच्यातील जीवघेणी लढाई न राहता एका नेक कॉज साठी केली गेलेली शिकार या देखण्या रुपातच ती चिरकाल स्मरणात राहते.
रॉबिन या त्याच्या ईमानी कुत्र्याशी असलेल्या नाते संबंधाचा उल्लेख केला नाही तर ती नाईनसाफीच ठरेल.प्रत्तेक जीवघेण्या प्रसंगांत या मूक्या जीवाने कॉर्बेटला प्राणपणाने साथ दिलेली असते.ऊभ्या आयूष्यात फक्त एकदा अणि एकदाच जिकीरीच्या प्रसंगी रॉबिन त्याची साथ सोडतो.त्या प्रसंगी त्या मूक्या जीवाची झालेली तगमग आणि नेकदिल जिमने बाराखडीतल्या एकाही अक्षरांची मदत न घेता घातलेली समजूत अफलातून अन् त्याच्याच शब्दात ऐकावी अशीच. तो अख्खा प्रसंग त्याच्याच शब्दात,”रॉबिन आणि मी इतकी वर्षे एकत्र शिकारी केल्यात, या काळात फक्त एकदाच रॉबिनने मी अडचणीत असताना पळ काढला होता.एकमेकापासून अलग होण्याच्या त्या विशिष्ट क्षणानंतर त्याचा उतरलेला चेहरा आणि खाली पडलेले कान बरेच काही सांगून गेलेले.त्याच क्षणी आम्ही दोघांनी मूकपणे ठरवून टाकलं की, झालं गेलं विसरून जायचं आणि कधीही त्याचा उल्लेख करायचा नाहीं, पण आता आम्ही दोघेही म्हातारे झालो आहोत आणि तितकेसे हळवे राहीलेलो नाही.तेरा वर्षांचा रॉबिन , मी हे लिहीत असताना माझ्या पायाशी अखेरच्या शय्येवर पडून राहीलाय.त्याने त्याच्या लबाड व तपकिरी डोळ्यांनी आणि छोटीशी शेपटी हलवून मला ती गोष्ट सांगायला
‘ ना हरकत’ दिली आहे. ‘
केवढे अविश्वसनीय हे सगळं. मॅन ईटर्स ऑफ कुमाऊ’ या पुस्तकाच्या पानापानातून रॉबिनने कॉर्बेटचा चाटलेला चेहरा आणि घशातल्या घशात काढलेला आवाज घुमत राहतो.
ठाक मधील जिम कार्बेटच्या शेवटच्या नरभक्षकाच्या शिकारीचा प्रसंग ही थरारक असाच आहे. निसर्गाचे माहीत असलेले तपशील त्याचा योग्य वेळी केलेला नेमका वापर यातूनच ही अविश्वसनीय अशी शिकार घडते. जिमला आपला नेक सलामही आपसूकच घडतो. ठाकची नरभक्षक वाघीण जिमला अनेक वेळा गुंगारा देते. प्रत्येक वेळा लढाईत त्याला वरचढही ठरते .जंगलातल्या आपल्या रुतब्याची पदोपदी जाणीव करून देते.तो शहारे आणणारा प्रसंग असा, वाघीण जिम पासून फक्त मैलभर अंतरावर असते तिचे कॉल्स जिमला सारखे ऐकायला येतात. मैलभर अंतरावर असलेल्या त्या वाघिणीच्या हलचाली जिमला तंतोतंत ऊमगत असतात जणू पाढे पाठ असावेत त्यागत जिमला जंगल पाठ झालेले असते. वाघीण कोणत्या मार्गाने त्या दिशेला येणार याचे जिमचे ठोकताळे निश्चित झालेले . इथपर्यंतच्या साऱ्या गोष्टींवर आपण आपल्या इमॅजिनेशनला स्ट्रेच करत विश्वास ठेवत राहतो.पण त्याच्या पुढची जी मूव्ह तो करतो ती केवळ जिम कार्बेटच करू शकतो.वाघाचा मिलन काळ आहे याचे भान आणि नरभक्षक वाघीण कामातूर झालेली आहे हे जिमच्या बरोबर ध्यानात येते .आता हे नेमके कोणते इंद्रिय आहे ज्यातून ही जाणीव त्याला झालेली असेल , या फंदात वाचकाने पडू नये कारण ते जाणून घ्यायचे असेल तर केवळ पुस्तकं वाचून भागणार नाहि त्यासाठी कॉर्बेट सारखे जंगलातील पानं न् पानं वाचावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत वाघिणीला आता आपल्या तावडीतून सुटू द्यायचे नाही. या जाणिवेतून तो एक शक्कल लढवतो.ती अफलातून या सदरात मोडणारी तर असतेच पण प्रसंगी जीवघेणी सुद्धा ठरू शकते. आपल्या फुफ्फुसात हवा भरून जिम त्या वाघिणीला हुबेहूब वाघाच्या आवाजात कॉल देत राहतो. वाघीण पण त्या आवाजाला चकून कॉल देत देत त्याचा मागोवा घेत राहते. ज्या सादेला वाघीण ही भुलावी केवढी मोठी तपश्चर्या उभी असेल त्या सादे मागे. मेटिंगसाठी अनावर झालेल्या त्या वाघिणीचे कॉल्स जवळजवळ येत राहतात. हा प्रसंग वाचताना वाचकाच्या अंगावर काटे उभे राहतात एवढे मोठे धाडस करतो आहे जिम, कामातूर झालेली ती वाघीण नर वाघाच्या एवजी जिमला पाहून केवढी चवताळली असेल याची कल्पनादेखील आपण करू शकणार नाही . वाचकाला जाणवत राहते ते एढेच की तो त्या वाघिणीला नाही तर साक्षात आपल्या मृत्यूलाच जणू कॉल देतो आहे. वाघीण आवाजाचा माग काढत काढत त्याच्या समोर येऊन उभी राहते. नर वाघा ऐवजी कॉर्बेटला पाहून वेडीपिशी होते. चवताळून ती त्याच्यावर झेप घेणार एवढ्यात आपला आयुष्यभराचा तजुर्बा पणाला लावून तो तिला गोळी घालतो ती चवताळलेली वाघीण व धाराशायी होते.या जीवघेण्या लढाईत सूतभर जरी अंदाज चूकला असता तर ही गोष्ट सांगायला जिम शिल्लक राहिला नसता.एवढी भयावह असते ती लढाई काळजाचं पाणी पाणी करणारी.
शेवटचा नरभक्षक वाघ मारल्यानंतर जिम कार्बेट जे काही काळजातले बोलतो ते थेट आपल्या काळजातच उतरते. तो म्हणतो,,”मला ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या त्या सांगून झाल्या आहेत. या वाघिणीच्या मृत्यु बरोबर नरभक्षक वाघांना मारण्याची माझी कारकीर्द आता संपलेली आहे. बरीच वर्ष मी हा धोकादायक खेळ खेळलो. एवढ्या वर्षात कधी कधी तर माझ्या आयुष्याचे दोर कापण्याचे बाका प्रसंगही आले .पण प्रत्येक वेळेला मी स्वतःच्या पायावर चालत परत आलो. माझ्या एका गोळी मुळे एका जरी माणसाचा जीव वाचला असेल तर ते माझ्यासाठी फार मोठे बक्षीस आहे .त्याचे मोल मी कधीही करू शकणार नाही.”
आख्खा जिम कॉर्बेट जेव्हा आपण वाचून संपवतो तेव्हा निसर्गाविषयी एक नम्र भाव त्याच्या शंभरदा शब्दा मधून झिरपत झिरपत आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. जाईजुईच्या वेलीवरून पडणारे फुल जसे अलगदपणे स्वतशीच गिरक्या घेत खाली पडते जणू गुरुत्वाकर्षणाचे कोणतेही नियम त्याला लागू नसावेत बरेचसे त्यागतच .जिम कॉर्बेटची पुस्तकं वाचल्यावर निसर्गातील काही रहस्य आपल्या समोर अलगदपणे उलगडत जातात. वेलीवरून फुलाचे ते पडणे आपणास सांगून जाते की जितके हलके व्हाल तेवढे अलगद पडाल इगोच्या वजनाने जड झाला की धप्पकन खाली पडाल.. तंतोतंत असेच काहीसे चिंतन हा शिकारी लेखक आपल्या लिखाणातून आपल्यासमोर सहजी मांडत राहतो. शेवटच्या नरभक्षक वाघिणीला मारताना स्वतःलाच तीचे आमिष म्हणून पेश करणारा हा लेखक वाचकांच्या काळजाचा ठाव घेत राहतो.
25 जून 1875 ला जन्मलेल्या आणि 19 एप्रिल 1955 काळाच्या पडद्याआड गेला. कोणताही अभिनिवेश न घेता (त्याच्या साहसामुळे कदाचित तो अभिनिवेश त्याला शोभूनही दिसला असता) त्याने लिहून ठेवलेल्या या नोंदी पुढील कित्येक पिढ्यांना समृद्ध करीत राहतील. त्याची ही पुस्तके म्हणजे जंगल कसे वाचावे याची बाराखडीच वाटत राहते. जंगलातील दृश्य आवाज हलचाली जित्या जागत्या करून वाचकासमोर मांडण्याची त्यांची हातोटी विलक्षण अशीच आहे.जिम कॉर्बेट सारखा निसर्ग वाचण्याची करामत आपल्याला कधीही साधणार नाही पण किमान जिम कॉर्बेट जरीआपल्याला वाचता आला तरी आपल्या निसर्गविषयक अकलनात फार मोलाची भर पडलेली असेल. निसर्गासाठी नाही तर बरीचशी आपल्या अस्तित्वासाठीच….एकदा अपरात्री जंगलातून तो गोठ्यात येऊन झोपतो त्या जनावरांना आपलेसे करुन इतके आपलेसे की काही वेळाने गोठ्यातली गाय वात्सल्याने थकल्या -भागल्या कॉर्बेटच डोकं चाटायला लागते त्या क्षणी वाचकाला जंगल,प्राणि आणि कॉर्बेट हेअगदी परस्परांचे पर्यायी शब्दच वाटत राहतात.
वाचकांच्या डोक्याच्या कक्षा सर्वार्थाने रुंदावणारे लेखक बरेच असतात पण जिम कार्बेट मात्र वाचकांचे आसमान उंचावणारा लेखक म्हणून पिढ्यानपिढ्या हस्तांतरीत होतं राहिल अगदी विनासायास….
संदर्भ :- १)मॅन ईटर्स ऑफ कुमाऊ._1944,

२)दी मॅन ईटीग लेपर्डत रुद्रप्रयाग-1947,

३)जंगल लोअर-1953,

४)दी टेंपल टायगर अॅन्ड मोर मॅन ईटर्सऑफ कुमाऊँ-1954 .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}