नवदुर्गा – माझ्या आयुष्यातल्या दुसरे दुर्गा रूप – माझे आई बाबा “प्रवास परिपूर्ण संस्कारांचा”
नवदुर्गा – माझ्या आयुष्यातल्या
दुसरे दुर्गा रूप – माझे आई बाबा
“प्रवास परिपूर्ण संस्कारांचा”
माझा जन्म नक्कीच माझ्या हाती नव्हता…माझे पालक कोण असावेत हे ही माझ्या हाती नव्हत…पण प्रेमळ आई च्या पोटी जन्म आणि भक्कम आधार असणाऱ्या वडिलांचा साथ ह्या दोन्ही मुळे उत्तम संस्कारच लेण माझ्याकडे असणं हे मी माझं नशीब.. माझ भाग्य मानते.
माझी आई अतिशय शांत स्वभावाची, तर वडील कडक स्वभावाचे..त्यामुळें मी कायमच आईच्या मागे मागे तर वडिलांपासून चार हात लांब…आईची हाक आली की एक मिनिट ग आई आले..हे वाक्य हक्काच तर बाबांची हाक पूर्ण होण्याआधी त्यांच्या समोर हे ठरलेलं गणित.
दोघांमध्ये एक गोष्ट मात्र अगदी सारखी ती म्हणजे नेटकेपणा..शिस्त..आणि ती मला देताना दोघांनी खूप योग्य पद्धतीनें दिली,माझ्या मध्ये रुजवली.
संस्कार म्हणजे काही वेगळं नसत…ते कुणी उचलून देऊ शकत नाही तर समोरच्याच्या कृती मधून ते आपल्यात कसे रुजत जातात ते मी आई बाबांकडून शिकले.
लहानपणापासून मुलींचं काम हे… मुलाचं अमुक एक असा भेद नसतो तर दोघांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता लक्षात घेऊन काम करायचं असत हे आई बाबांनी त्यांच्या सहज कृतीने समजावलं.
अगदी लहान पणापासून आईने संध्याकाळी देवासमोर बसून हात जोडून देवाचं म्हणावं हे जसं शिकवलं तस घरातली छोटी छोटी काम करत मदत कशी करता येते हे ही सहज शिकवलं.
घरातली भांडी नेटकी लावण, कपड्याच्या घड्या नीट करण हे काम नाही तर ही एक कला आहे हे रुजवलं.
तर बाहेर जाताना गाडी चालवायला जशी आवडते तशी ती बंद पडली तर किमान डागडुजी यायला हवी..गाडी नीट सांभाळता यायला हवी हे बाबांनी शिकवलं.
आई असो वा बाबा समोर बसून शिकवणारे कधीच नव्हते…त्यांची प्रत्येक कृती शिकवणारी होती..त्यातून मी पणं घडत गेले.
आई कडून संगीत, कामामधला नेटकेपणा ,आदरातिथ्य..हे खूप शिकण्यासारखं होत. ते थोडफार शिकण्याचा मी प्रयत्न केला.
दागदागिने घालण आणि मिरवण …हे जितकं सहज सोप्प असत तसच भरपूर शिक्षण घेऊन समाजात मानान वावरता येत..तेव्हा शिक्षण हा सगळ्यात मोठा दागिना आहे तो आधी घाला हे बाबांनी रुजवलं… आणि त्या साठी आई आणि बाबा दोघांनी खूप कष्ट घेतले. म्हणूनच आज अजूनही…माझ्या मुलांच्या बरोबर मी माझ्या आवडीच्या विषयांचा अभ्यास मनापासून करते आहे.
बाबांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लाऊन काम करणारी माझी आई. बाबा उत्तम अभियंता तर आई अतिशय उत्तम अकाउंट्स हा विषय शिकवणारी. तिचे विद्यार्थी आजही तिची आठवण काढतात..सहज गप्पा मारता मारता एखादा विषय शिकवण्याचा हातखंडा असणाऱ्या माझ्या आईने दवाखान्यात असताना माझा बारावी चा अभ्यास करून घेतला होता.
घरात आलेला प्रत्येक व्यक्ती देव रुपात आपल्याकडे येतो तेव्हा तो उपाशी पोटी जाता कमा नये…म्हणून प्रत्येकाला प्रेमाने जेवायला घालणारी ही माऊली.
आई आणि बाबा दोघांनी कधी पैसा जमवला नसेल पण अनेक माणस जोडली, कुणाला शिक्षणाला मदत करून, कुणाला नोकरी व्यवसायासाठी मदत करून..ह्या सगळ्या जाणीवा भले सगळ्यांनी कधी जपल्या पण नाहीत..पण आई नंतर ह्यातल्या कित्येक जण त्याच प्रेमाने आजही आमच्याशीही जोडलेले आहेत.
आई आणि बाबा आपल्याबरोबर आयुष्यभरासाठी असावेत अस वाटत पण दुर्दैवानं माझ्या आई ला परमेश्वराच्या गृही खूप लवकर तो घेऊन गेला. कदाचित त्याच्याकडे अश्या सुस्वभावी,सत्कर्मी लोकांची कमी त्या परमेशाला ही जाणवली असावी.
आई आज माझ्याबरोबर नसली तरी तिचं संस्कारांचा वाण माझ्या मुलांना पुढे देण्याचा मी प्रयत्न करते आहे.
तर माझे बाबा निवृत्तीनंतर मुलींच्या संसारात लुडबुड न करता अगदी आत्तापर्यंत स्वतः ला कामात गुंतवून होते..आणि आता लेक जावयांच्या हट्ट म्हणून नोकरीतून बाहेर पडून वेळप्रसंगी मुलींना मदत करायला आवर्जून पाठीशी उभे राहतात. तर कधी आजोबा आणि नातवंड मस्त मित्रासारखे दंगा मस्ती…गप्पा मध्ये ही रमतात.
आज मी माझ्या संसारात आणि माझ्या बहिणी त्यांच्या संसारात गुंतलो आहे पण बाबा नी आईच्या नंतर आमच्यासाठी स्वीकारलेल्या एकटेपणात आमचा स्वार्थ जपला..पण तरीही बाबा कायम आनंदी राहिले आमच्यासाठी..आणि कायम आनंदी राहतील.
मला ह्या सुंदर जगात आणणारे माझे आई बाबा , आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सुंदर गोष्टींची जाण जशी तुम्ही मला दिलीत तेवढीच इथे असणाऱ्या खाचखळगे ह्यांची पण जाणीव दिलीत. म्हणूनच जगात मिळणारा सन्मान आणि होणारा अपमान दोन्हीला मी खंबीरपणे समोर जाऊ शकते.
देविमाते माझी आई तुझ्या गृही नक्कीच सुखी , समाधनी ,आनंदी असणार ह्यात शंकाच नाही. माझ्या बाबा ना उदंड आयुष्य ,उत्तम आरोग्य लाभू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना🙏🏻
सौ आरती अलबूर – सिन्नरकर