नवदुर्गा – माझ्या आयुष्यातल्या नऊ वे दुर्गा/ दुर्गेश रूप – माझे पती “मैत्री पूर्ण सहजीवन”
नवदुर्गा – माझ्या आयुष्यातल्या
नऊ वे दुर्गा/ दुर्गेश रूप – माझे पती
“मैत्री पूर्ण सहजीवन”
दोन परस्पर विरोधी व्यक्तींनी एकत्र येणं आणि सहजीवनाची स्वप्न पाहणं म्हणजे विनोद वाटतो ना! पण हा विनोद घडलाय माझ्या जीवनात.
मी प्रचंड बडबडी , अखंड मित्र मैत्रीण ह्यांच्या गोतावळ्यात… वेगवेगळ्या अभ्यास गटात रमणारी …तर माझे पती नितीन अतिशय शांत ,आपण भल आपला काम भल असा स्वभाव , माझं घर…आई वडील,मुल हे मोठं विश्व …आणि त्या विश्वात रमणारे नितीन.
पण सध्याच्या परिस्थतीत
“अरे संसार संसार
दोन्ही चाकानी धावाव
येतील त्या साऱ्या कासोट्यांना
दोघांनी सांमोर जावं”
हे चित्र आज सगळीकडे दिसतच..आम्ही दोघे त्यांचेच प्रतिनिधी.
आमचा २४ वर्षाचं संसार म्हणजे दोन विरूध्द स्वभावाच्या माणसांची जमलेली उत्तम केमेस्ट्री.
लग्न झाल्यापासून अगदी आत्तापर्यंत मी आणि माझे पती नोकरीमध्ये व्यस्त. एकत्र कुटुंब असल्याने घरात सासू सासरे, आम्ही दोघे आणि आमची मुलं.
पहिल्यापासूनच घरातलं सगळ दोघांनी मिळून एकत्र आवरायचं आणि एकत्र कामासाठी बाहेर पडायचं हे पक्क ठरलेल.
माझं स्वयंपाक , आवराअवरी,मुलांचे डबे भरण हे सगळ होईपर्यंत मुलांचं सगळ अवरण्याच काम कायम बाबा ने केलं.
आता दोन्ही मुलं मोठी झाली आहेत, मी पण नोकरीतून बाहेर पडले पण अस असल तरीही नितीन मला कधीही गृहीत धरत नाहीत.
एका अतिशय कठीण प्रसंगी हातात असलेली उत्तम नोकरी सोडण्याचा निर्णय घ्यायची वेळ आली..पण त्यावेळी देखील नोकरी पेक्षा ही किती महत्वाचं काम करते आहेस हे कळूनही न वळणारी मी , त्यावेळी माझ्या निर्णयाला भक्कम पाठिंबा देणारे आणि त्याच महत्व त्यांच्यासाठी पण किती आहे हे सांगणारे नितीनच!
नोकरी व्यवसाय नक्कीच हवा. पण संसाराची गरज नेमकी काय हे ओळखून त्यावर योग्य दिशा ठरवता यायलाच हवी ह्यावर नितीन कायम ठाम असतात.
भटकंतीच प्रचंड वेड असणारे नितीन, त्यांच्यामुळे मी आणि माझ्या मुलांनी नव्हे माझ्या सासू सासऱ्यांनी देखील मनसोक्त भटकंतीचा आनंद घेतला आहे.
नोकरी सोडताना मला प्रचंड नैराश्य आलं होत. अनेक वर्ष आपण स्व कमाईवर असताना एकदम सगळ सोडताना खूप त्रास होत होता. पण मिळणारा वेळ तुझ्या आवडीला दे हे प्रोत्साहन देणारे नितीन च!
त्यांच्या प्रोत्साहनामुळे च मी माझ्या कलेच्या ( गाण्याच्या) सादरीकरणासाठी भारतात नव्हे तर परदेशातही जाऊन येऊ शकले.
आज लेकाला उच्च शिक्षण घेण्यासाठी भारताबाहेर पाठवताना हळवा झालेला बाबा तो हाच जो मुलांच्या भविष्यासाठी मुलांच्या पाठीशी उभा राहतो. मुलीचे वा मुलाचे लाड बाबा ने करायचे आणि आई ने …मुलांच्या चुकांवर रागवायचे हे जणू ठरलेल गणित. त्यामुळे आई कायम हिटलर आणि बाबा कायम हिरो. ह्यावरून माझा कायम वाद ठरलेला…की मी का सतत रागवायचे …त्यावर ‘अग तू पण रागवत नको जाऊ…समजत मुलांना’ हा विश्वास असणारा हा बाबा.
आई वडील, सासरे, बहिणी , मेहुण्या सगळ्यांची मनापासून काळजी असणारा पण ती काळजी कधीही दाखवता न येणारा. जिथे कमी तिथे आम्ही अस मदतीला जाणारा…माझा नवरा..
प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री भक्कम उभी असते अस म्हणतात. पण मी म्हणेन प्रत्येक स्त्री च्या पाठीशी जर असा भक्कम साथ देणारा नवरा असेल असा मैत्र कायम लाभणार असेल तर कोणतीच स्त्री आयुष्यात करिअरच्या टप्प्यावर मागे वळून न पाहता यशाचे उंच मनोरे चढत जाईल. पाहिलेल्या स्वप्नाची उंची नक्की गाठेल.
माझ्या ह्या सहजीवनात फक्त नवरा म्हणून नाही तर माझा खूप प्रेमळ मित्र होऊन मला नितीन साथ देत आले आहेत.
एखाद्याला प्रेम व्यक्त करण, कौतुक करण सहज जमत नाही. भाव व्यक्त करूनच समजतो ह्यावर विश्वास नसणारे म्हणजे नितीन.
आणि मनात काहीही येवो
धाडकन बोलून मोकळं होणारी मी. तर असे आम्ही दोन ध्रुव एकत्र आलो काय आणि सुरेख संसाराची रंगवलेली सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावलो काय.. सगळा प्रवास कठीण तरीही मोठा गमतीशीर…ह्या प्रवासात मला साथ देणारे नितीन ,त्यांच्या सारखे साथी लाभले आणि ही विरोधी स्वभावाची केमेस्ट्री मस्त जमली.
ह्या प्रवासात अनेक गोष्टी मिळत गेल्या पण नकळतपणे एक गोष्ट मागे पडली…आमचं तारुण्य. हे आमच्यातून गेलं असल तरी आज ते आमच्या मुलांमध्ये आम्ही दोघे ते पाहतो अनुभवतो आहे.
आज मागे वळताना
धूसर वाटा दिसल्या
कधी वेडीवाकडी वळणे
तर कधी पानगळ होती
२४ वर्षाचा हिशेब जेव्हा
घेऊन जाईल पानगळ
येईल पुन्हा नवी पालवी
घेऊन नवा बहर…
मी ही पाहते आहे वाट
बदलत्या नव्या ऋतूची
पुन्हा एकदा जाऊ दोघे
घेऊन हात हाती
अनुभवू ऋतुरंगांची उधळण
पुन्हा एकदा दोघे मिळूनी
पुन्हा एकदा दोघे मिळूनी
देवी माते वडाची पूजा करून जन्मो जन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करणारी मी
आणि अग जरा varity असू दे
प्रत्येक आयुष्यात अस म्हणून माझी चेष्टा करणारे नितीन…हा साथ अखंड रहावा.हाच बेस्ट हाफ जन्मो जन्मी लाभो हीच प्रार्थना🙏🏻
सौ आरती अलबूर – सिन्नरकर