मंथन (विचार)

स्पर्श …!लेखक-अनामिक

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
स्पर्श …!

लेकीची पाठवणी करुन घरी आली ती दोघं, कपिल आणि कावेरी दोघंही एकटी पडली होती आता. आजच लग्न लागून सासरी गेली होती, त्यांची एकुलती एक मुलगी परी. परीच्या घरात पडलेल्या पहिल्या पावलापासुनचा तिच्या आज घराबाहेर कायमच्या पडलेल्या पावलाचा प्रवास बघितला होता, त्या आता प्रचंड रिकाम्या वाटणार्‍या घराने.

कावेरी हाॅलमध्येच सोफ्यावर बसली. मान मागे करुन, डोळे मिटून, आणि तिला आवाज आला हुंदक्यांपासून तत्परतेने हमसून रडण्यापर्यंत पोहोचलेल्या, कपिलच्या आवाजाचा. कावेरी पळतच परीच्या बेडरुममध्ये गेली, आवाजाचा मागोवा घेत, कपिल परीच्या बेडवर बसून, घडी घातलेला एक हात डोळ्यांवर ठेऊन ओक्साबोक्शी रडत होता.

कावेरी भरल्या डोळ्यांनी कपिलच्या बाजूला जाऊन बसली. त्याच्या पाठीवरुन हात फिरवू लागली. “तरी मी तुला सांगत होते की काही अडलं नाहिये सांगायचं.” कावेरी बोलली.

क्षणार्धात भुतकाळात… जवळजवळ पंचवीस वर्ष मागे गेली ती,

एक वियोगात बुडलेली, हळव्या मनांची जोडी. दहा – पंधरा दिवसांच्या परिला कपिल हातात धरुन, छातीशी अलगद कवटाळून रात्र रात्र फेर्‍या मारत असे. सिझेरीयनमुळे प्रचंड थकलेल्या कावेरीला आराम मिळावा म्हणून. रडणारी परी क्षणार्धातच थांबत असे, जेव्हा कपिल गाणं सुरु करे “मेरे घर आई एक नन्ही परी”. बेदम आवडतं गाणं होतं हे त्या पंधरा दिवसांच्या लुसलूशीत लाल भेंडोळ्याचं. आणि त्यामुळेच परी हेच नाव ठेवावं असं वाटलं होतं कपिल – कावेरी दोघांनाही. ते कपिल मधला ‘प’ नी कावेरी मधला ‘री’, हे ऊगिचच आपलं कोणी विचारलंच तर सांगायला.

तर अशी ही परी खरंच शब्दशः परी होती तिच्या बाबाची. टोकाचे लाड करायचा तिचे कपिल, टोकाचे हट्ट पुरवायचा. परी नी कपिल ह्या दोघांनी मिळून घातलेल्या धुडगूसाला, कावेरी ‘परीकथा’ म्हणायची. अन् अधुनमधून बाप – लेकीला जमिनीवरही आणायची. पंधरा दिवसांची बाबाच्या छातीला चिकटलेली परी, पंधरा वर्षांची होईपर्यंतच बाबाला बुलेटवर मागे बसवून, गाव फिरु लागली होती.

कावेरी नको – नको म्हणत असतांनाही लेह – लड्डाख करुन आली होती बाप – लेक बुलेटवरुन. हाईट करुन आईची हवा टाईट करण्यात पटाईत झाली होती परी, तिच्या बाबाच्या कंपनीत.

ते एकाच दिवशी आवडलेल्या पिक्चरचे लागोपाठ तीन शोज बघणं असो, बेट लाऊन गिरगाव चौपाटीवरची आठ – दहा प्लेट पाणिपुरी ऊडवणं असो, पायी चालत शिर्डीला जाणं असो, भर पावसात कुठल्या कुठल्या कडांवर नी गडांवर ट्रेकला जाणं असो, असे एक ना अनेक आईची छाती दडपून टाकणारे ऊद्योग करण्यात, आघाडीवर असे परी तिच्या बाबाच्या जोडीने.

“मोठी झालियेस घोडे आता, निदान चार जणांत तरी ऊठसूठ चिकटू नकोस बाबाच्या अंगाला. काय म्हणतील लोकं?” कावेरी आपल्यापरीने परीला सांगायचा प्रयत्न करी. पण ऐकतीये ती परी कसली? “बुलशीट… वुई आर फ्रेन्ड्स… हू केअर्स अबाऊट अदर्स” असं म्हणत गप्प करत असे ती तिच्या आईला.

“कपिल, अरे तू तरी समजाव तिला. इतका बिंधास्तपणा शोभत नाही मुलीच्या जातीला” हताश कावेरी कपिलकडे मोर्चा वळवत म्हणे… “कोण मुलगी? कुठेय मुलगी? मला तर बुवा मुलगा आहे. हो की नाही पठ्ठे बापुराव?” कपिल परीकडे बघत हे बोले.., नी दोघांनी हसत एकमेकांना दिलेल्या टाळ्यांचा. आणि कावेरीने जोरात कपाळावर मारलेल्या हाताचा, एकत्रच आवाज घूमे मग खोल्यांतून.

असे हे सगळे अतरंगी ऊद्योग करत, परी चांगली शिकली. सी.एस. झाली. एका मल्टिनॅशनल बॅन्केत कामाला लागली. आणि एके दिवशी आली घरी सांगत, की तिने लग्न ठरवलंय.

कावेरीच्या पायाखालची जमिन सरकली. कपिललाही आयुष्यात पहिल्यांदा परीची मुलगी म्हणून चिंता वाटली. पण त्याचा त्याच्या लेकीच्या चाॅईसवर विश्वासही होता नक्कीच. आॅफिशीअली एकमेकांच्या घरच्यांना भेटण्याचा दिवस ठरला, आणि कपिलने कावेरीला सांगितलं की “नाऊ ईट्स टाईम टू से ट्रूथ टू आवर डाॅटर. तिला नी तिच्या होणार्‍या नवर्‍यालातरी निदान, वस्तुस्थीती माहिती असायलाच हवी”.

कावेरीची विशेष सहमती नसतांनाही, कपिलने परीला बोलावलं. परी आली ती नेहमीप्रमाणेच सरळ जाऊन कपिलच्या खांद्यावर हात ठेऊन, त्याला रेलुनच बसली. कपिल घसा खाकरुन बोलू लागला..,

“परी बेटा तू आता पंचवीस वर्षांची होशील. लग्न करुन लवकरच सासरी जाशील. पण त्याआधी एक गोष्ट तुला कळणं… रादर ती तुला आपणहून सांगणं मी माझं कर्तव्य समजतो.

तुझी आई सात महिन्यांची प्रेग्नंट होती, जेव्हा मी तिच्याशी लग्न केलं. कावेरी माझ्या मावसभावाची बायको. दोघांचा छान संसार चालू होता. कावेरीला दिवस गेले होते. आणि तशातच तिच्या नवर्‍याचा म्हणजेच तुझ्या बाबाचा रोड अॅक्सिडेंट झाला. आॅन दी स्पाॅट गेल्या होत्या दोन गोष्टी दोन शरिरांतून. तुझ्या बाबाचा जीव, अन् तुझ्या आईचा आत्मा. अचेतन झाली होती कावेरी, जणू काही एखादा पुतळाच.

डाॅक्टरांनी सांगितलं की, ह्या वेळीच मोकळ्या झाल्या नाहित तर त्यांच्यावर, नी पर्यायाने त्यांच्या पोटात वाढणार्‍या गर्भावरही, अतिशय वाईट परिणाम होतील. मी युके हून काही दिवसांकरताच आलो होतो ईथे. पण मग परतणं झालंच नाही माझं. तुझ्या आईशी लग्न केलं मी. एकट्याने पुर्णपणे सारासार विचार करत, कोणाच्याही दबावाला बळी न पडता.

आमच्या पहिल्या रात्री मग कावेरी रडली. अगदी धाय मोकलून रडली. अॅन्ड आय डिडन्ट स्टाॅप हर. नाॅर्मल केलं होतं कावेरीला त्या तिच्या रात्रभर रडण्याने. हळूहळू रुळत गेली ती तिच्या नव्या संसारात, आमच्या संसारात. कावेरी जेव्हा पुर्ण बरी झाली. म्हणजे आमच्या लग्नानंतर चारेक महिन्यांनी, तेव्हा पहिल्यांदा मिठीत घेतलं मी तुझ्या आईला.

बायकोआधी मुलीला मिठीत घेणारा पहिलाच पुरुष असेन मी ह्या जगातला. पण मग नंतर आम्ही एकमेकांच्या संमतीनेच ठरवलं, की आपलं दोघांचं मुल होऊ द्यायचं नाही. आता फक्त नी फक्त प्रेम करायचं आपल्या परीवर. प्रेमात कोणीही वाटेकरी आणायचाच नाही. अॅन्ड वुई स्टूड स्ट्राॅन्ग आॅन आवर डिसिजन”.

एवढं बोलून कपिल थांबला होता. नी अचानक त्याला जाणवलं की परी आता त्याच्यापासून बर्‍यापैकी लांब झालेली, दूर बसलेली. हमसून हमसून रडत. कपिलने तिच्या डोक्यावर हात ठेऊ पाहिला…. पण त्याआधीच परी रडत रडतच, तिच्या खोलीत पळाली होती. त्या दिवसानंतर मात्र अमुलाग्र बदल झाला होता परीत. अचानकच प्रगल्भ जाणवू लागली होती ती.

बाबाच्या पावलांतून घुटमळणारी ती, आता आईच्या पाठी – पाठी दीसू लागली होती. कपिलच्या अंगाशी जाणं तर दुरच, त्याच्या वार्‍यालाही ऊभं रहाणं टाळू लागली ती. जणू एका क्षणात तो माणूस, नी ते त्याचं घर परकं झालं होतं तिच्यासाठी. तो माणूस, ज्याने त्याचं आयुष्य वेचलं होतं तिच्यासाठी. ते घर ज्याने हरवलेलं हक्काचं छत्र दिलं होतं तिला. नंतरचे काही महिने मग ‘कधी एकदा जातेय ह्या घरातून’ अशा पद्धतीने तुटक तुटकच राहिली होती परी त्या छताखाली.

कपिल भुतकाळातून भानावर येत, रडतच कावेरीला बोलला… “आज निरोप घेतांनाही मला फक्त लांबून नमस्कार करुन पुढे सरकली ती. कारण वस्तुस्थीती कळल्यावर मी ही एक परका पुरुषच झालो होतो तिच्यासाठी. फक्त एक पुरुष. मी केलेलं सगळं कवडीमोल झालं क्षणार्धात”

कावेरी रडत, कपिलला सावरत, त्याच्या पाठीवरुन हात फिरवत, सगळं ऐकत होती. ‘आमची नाही तर माझी मुलगी ईतकी स्वार्थी निघावी’ असा विचार करत, कपिल पुढे बोलला… “आता फक्त एकच कर म्हणावं परीला… जेव्हा मी जाईन कायमचा, तेव्हातरी येऊन बिलग मला. एक बाप समजून. ते निष्प्राण शरीर कुठल्या बाहेरच्या पुरुषाचं नसून, बापाचं आहे आपल्या असं समजून. निदान एक आपुलकीचा ‘स्पर्श’ तरी कर म्हणावं तुझ्या बाबाला, ज्याने त्याची स्वतःची नसलेली लेक. पंधरा दिवसांची असल्यापासून पंचवीस वर्षांची होईपर्यंत, होणार्‍या तिच्या प्रत्येक स्पर्शातून. निखळ नी निव्वळ पितृत्वच शोधलं”.

इतकं बोलून कपिल जागेवरुन ऊठला. शेरवानीचं वरचं बटण सोडलं त्याने. खूपच ऊकडत होतं…

“मी कपडे बदलून आलोच. तू ही घे आवरुन. दमली असशील.” हे कावेरीला बोलून तो वळला, अन् समोर बघतो तर दारात परी ऊभी होती, हात जोडून. घळाघळा रडत.

“अर्ध्या रस्त्यावरुनच गाडी वळवायला लावली हिने. मी म्हंटलं ऊद्या जाऊया. पण छे… ऐकतीये ती परी कसली. तिच्या ह्याच मॅडचॅपपणावर तर मी भाळलो होतो. मग काय, म्हंटलं भोगा आता.” परीचा नवरा अनिष हसत हसत बोलत होता.

कपिल ने चक्राऊन कावेरीकडे पाहिलं, “मी जरा टेकलेच होते की ही दोघं आली मागोमाग. तुला बोलावणारच होते की तुझ्या रडण्याचा आवाज आला आतून. परीने तोंडावर बोट ठेऊन मला, ती आल्याचं तुला कळू देऊ नको असं खुणावलं होतं” कावेरीने एकदाचं सांगून हूश्श केलं.

परी धावतच गेली कपिलकडे, नी कडकडून मिठी मारली त्याला. कपिलच्या शेरवानीचा खांदा चिंब झाला, तर परीच्या केसांतून, कपिलच्या डोळ्यांतून सांडलेले मोती विखूरले. “मी तुझ्यासारखी असामान्य नाहीये रे बाबा… मी सत्य पचवून घ्यायला माझा वेळ घेतला… पण तू का नाही आलास पुढे, मला जाब विचारत?… तू का नाही फोडलंस मुस्काट माझं?”

परी हमसून हमसून बोलत होती. कपिल काहीच बोलला नाही… फक्त हसला… बऱ्याच दिवसांनी, अगदी मोकळेपणाने… परी पुरतीच सिमित असलेली मिठी सैल करत, त्याने त्याचे दोन्ही हात ऊघडले…

अनिषकडे बघत… धावतच आला मग अनिषही, परीच्या बाबाच्या… अन् त्याच्या बाबांच्या मिठीत… एका अस्सल पित्याचा ‘स्पर्श’ अनुभवण्यासाठी.

लेखक-अनामिक.
(कुणी लिहिलं ते माहीत नाही पण प्राप्त प्रतिक्रिया मुळ लेखकास सादर समर्पित.)
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}