कालौघात झालेले बदल..१ पूर्वीचे रस्ते आणि पथदिवे – मोहन वराडपांडे नागपूर
©️/®️ Mohan Varadpande.
9422865897
——————
कालौघात झालेले बदल..१
पूर्वीचे रस्ते आणि पथदिवे
आज आपण गुळगुळीत डांबरी रस्ते, आणि चकचकीत काॅन्क्रिट रस्ते पहातो, अनुभवतो.. त्यावरील उंच सिल्व्हर कलरच्या खांबांवरील दिव्यांचा झगमगाट पहातो.. तो इतका असतो की विमानातूनही ते रस्ते आणि त्यावरील दिव्यांचा प्रकाश आपल्याला दिपमाळेसमान भासतो..
पण पूर्वी कसे होते रस्ते? त्यावरील दिवे?.. माझी आई तिच्या लहानपणी च्या गोष्टी सांगताना सांगायची.. तिचं बालपण म्हणजे साधारणपणे १९३५ -४० चा कालखंड असावा..
ती सांगायची की तिच्या बालपणी कोणत्याही वस्तीतील रस्ते माती,खडी, व मुरुमाचे असायचे.. पण त्यावर खड्डे नसायचे .. धूळ मात्र उडायची.. वाहने म्हणजे फक्त सायकलीच.. रोज सायंकाळी कार्पोरेशनची एक बैलबंडी, त्यावर एक पाण्याने भरलेला ड्रम, त्याला खाली एक आडवा पाईप, त्याला अनेक छिद्रे… अशी बैलगाडी रस्त्यावर पाण्याचा एक सारखा सडा घालत पुढे पुढे जायची.. त्या ओल्या मातीचा एक वेगळाच दरवळ आसमंतात भरुन असायचा ..
त्यामुळे धूळ उडायची नाही. सकाळी सफाई कर्मचारी रस्ते झाडायचे.. एकदम स्वच्छ .. छान वाटायचं..
सर्व रस्तांवर साधारणतः आठ ते दहा फुट उंचीचे पोलादी खांब.. त्यावर राॅकेल वर चालणारे नक्षीदार दिवे.. त्याला चारही बाजूने काचा.. त्यातील एकाच काचेला बिजागिरी.. त्यामुळे तीच काच उघडणार .. बाकी काचा फिक्स्… त्यावर पावसाचे पाणी आत जाऊ नये म्हणून नक्षीदार पोलादी कळस..
सायंकाळ होण्यापूर्वीच कार्पोरेशनचा एक माणूस हातात शिडी, खांद्याच्या अडकलेल्या पिशवीत राॅकेलची डबकी, दुसर्या खांद्यावर एक फडके, अशा अवतारात यायचा.. तो एका खांबाला शिडी लावणार.. त्यावर चढून फडक्याने सर्व काचा बाहेरुन स्वच्छ करणार.. मग उघडणारी काच उघडून आतून सर्व काचा स्वच्छ करणार.. जवळच्या डबकीतील राॅकेल, दिव्याचे लहानसे झाकण उघडून, त्यात भरणार.. वातीवरील काजळी झटकून वात पुरेशी वर ओढणार .. इतकीच वर, की काजळी पकडणार नाही.. मग खिश्यातून माचिस काढून दिवा पेटविणार.. मग काच बंद करुन सरसर खाली उतरून, आपली शिडी काढून पुढल्या खांबाला लावणार.. पुन्हा तिच प्रक्रिया ..
असे करत करत अंधार पडे पर्यंत त्याला अलाॅटेड सर्व दिवे तो चेतवणार…
त्या दिव्यांचा मंद उजेड सर्व व्यवहारांसाठी पुरेसा असे. नुकतेच पाण्याचा सडा झाला असल्याने धुळही नसे. खूप छान वाटायचं.. ते दिवे पहाटे पर्यंत राहत असतं.. मग राॅकेल संपल्याने आपोआप विझून जात..
पण त्यावेळच्या पालिका कर्मचाऱ्यांनी या कामात एकही दिवस कुचराई केलेली स्मरत नाही, असे आई सांगायची..
उन्हाळ्यात सर्व जण बाजा टाकून अंगणात झोपत. चोरी, दरोडा या बाबी त्याकाळी ऐकावयास येत नसत.. भिती हा प्रकार नव्हता..
किती रम्य आहेत ना या गोष्टी..
आता कालौघात ज्ञान विज्ञानाचे प्रगतीने सर्वच बदललयं ..
होय ना?
मोहन वराडपांडे
नागपूर
9422865897
Shared by Shishir Lokhande 9028111422