दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

दिवाळी; आत्मिक जाणिवेचा प्रकाश (रजनीश जोशी)

दिवाळी; आत्मिक जाणिवेचा प्रकाश
(रजनीश जोशी)

देखण्या व्यक्तिमत्वाला अलंकारांनी नटवले तर कोण कुणाला शोभून दिसते, असा संभ्रम पडतो. अंगाचेनि सुंदरपणे, लेणिया अंगचि होय लेणे, तेथ अलंकारिले कवण कवणे, निर्वचना असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. कौशिकी चक्रवर्तीचं गायन अनुभवताना श्रुती मनोहर होणे म्हणजे काय त्याचा प्रत्यय येतो. सुंदरतेचा कण न् कण सुरेल झालेला पाहताना चैतन्योत्सवात न्हाऊन निघाल्यासारखे वाटते. अशावेळी ते गाणं एकट्या गायिकेचं राहत नाही! आपल्या ‘आत’देखील ते सुरू झालेलं असतं.

सैय्या निकस पडे, मैं ना लडी थी कबीरदासांची कन्या ‘कमाली’ची ही रचना कौशिकींच्या आवाजात ऐकताना अर्थालाही स्वरांचे पंख लाभल्याचा भास होतो. रंग महल के दस दरवाजे, ना जाने कौनसी खिडकी खुली थी… आपण आपल्या देहाचे अनंत चोचले पुरवतो; पण त्यातील प्राण निघून गेला की तो अचेतन देह निरूपयोगीच. पाण्याबाहेर उसळी घेऊन पुन्हा पाण्याच्या अंतरंगात मिसळून जाणारे सोनेरी मासे जो उल्हास आपल्या मनात निर्माण करतात तसा उत्साह कौशिकींचे स्वरहिंदोळे ऐकताना वाटतो. आणि ‘कमाली’ची अर्थपूर्ण रचना आपल्या जाणिवा प्रकाशपुंजांनी भरून टाकतात. आपल्यातला हा लख्ख उजेड हीच तर दिवाळी!

पहाटे शिरशिरी आणणाऱ्या गारव्याची आता सुरूवात झाली आहे. अशा प्रसन्न वातावरणात सूर्याच्याही आधी फिरायला बाहेर पडणं हा अनुभव विलक्षण आहे. चुकार थंडी झोंबायला सुरूवात करत असताना आकाशात हळूहळू वर येणारे सूर्यबिंब पूर्णांशानं भेटते, तेव्हा वॉर्म विशेश या शब्दाचा अर्थ कळतो. कळण्याची, समजण्याची प्रक्रिया अशी आतून सुरू होते, तेव्हा जाणिवा लख्ख होतात. जाणिवा जागृत झाल्याशिवाय आतून उमजत नाही. प्रचिती आणि प्रतीती यात भेद आहे. प्रचिती चमत्कारसदृश असू शकते. साक्षात्कार ही आणखी खोलवरची समज.

गुरुदेव रा. द. रानडेंनी गूढवादावर भाष्य केले आहे, तसा साक्षात्कारही उलगडून सांगितला आहे. जीवनजाणिवांच्या अनुषंगाने आणि आत्मोन्नतीसाठी त्याची उपयुक्तता मोठी आहे. आपल्याला आयुष्यात वीज चमकून जावी, असा अनुभव येतो, तेव्हा आपण असावध असता कामा नये.
तनु धनातुनी। जन-मनातुनी। घनघनातुनी जे गमते। ते भ्रमते कधी कधी जमते। महाकवी द. रा. बेंद्रे यांच्या या ओळींतून समजणे आणि ‘स्त्रवणे’चे विश्लेषण सहजच होते.. या ओळीत लय आहे, नाद आहे, साद आहे आणि संवादही स्त्रवण्याचा, सृजनाचा अनुभव हा विजेच्या चमकण्यासारखा असतो आणि साक्षात्कार त्या दीप्तीने उजळवून टाकणारा असतो. हे उजळणे म्हणजेच दिवाळी!

आपल्या भोवताली अंधार नसतोच असे नाही. पण त्या काळोखावरही एक आभाळ पसरलेले असते. त्यात सर्वांना सामावून घेण्याची शक्ती असते. स्नेहशीलता, सख्यत्व, गुणाढ्यता, करुणा आणि प्रेमाने त्याला सुंदर करता येते. आपल्याला आपल्या आत उतरून आपल्यालाच तपासता आले पाहिजे. आपण आपल्या जवळ आहोत का, हेही त्यामुळे समजते. आपल्या आतलं सौंदर्य सत्वस्थ व्हायला हवं.

अंतर्मग्न तितुके तरले, अंतर्भष्ट तितुके बुडले असे रामदासांनी म्हटले आहे. उद्वेगाचा उद्रेक टाळून सत्वाचा प्रकाश पसरला पाहिजे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख यांनी आपल्या आतल्या चांदण्याला नेहमीच यथार्थ मानले. चांदण्याची ही ओढ प्रत्येकाच्या अंतरात असते. ते म्हणतात, स्वप्नं मातीत रुजतात आणि आकाशात उगवतात. ते रूजून उगवणे म्हणजेच आत्मिक जाणिवेचा प्रकाश! ती जाणीवजागृती म्हणजेच दिवाळी!
⭐✨🌟💫💥
•••••••••
सौंदर्य दीपावलीच्या महालक्ष्मीचं!
(श्रीराम भट)

मन ही वस्तू नाहीये. शरीर हे वस्तू असल्यासारखे आहे. त्यामुळेच ते वस्तूंची गणना करते किंवा हल्लीच्या भाषेत माणसांचा मतदार संघ जपते. मन आणि शरीर यांचा एकमेकांशी संबंध येत असला, तरी मनापासून शरीर आणि शरीरापासून मन हे वेगवेगळ्या सत्तासामर्थ्याने राहत असते. त्यामुळेच मनाचा ऐश्वर्यभोग किंवा मनाचे सौंदर्य शरीरापेक्षा वेगळ्या स्वरूपात अनुभवाला येऊ शकते. शरीर अलंकार किंवा अर्थातच वस्तू धारण करत असते. अर्थातच शरीर स्वतःला उत्तम सजवत असते. हे सजवलेलं सौंदर्य वेगळे आणि मनाच्या आणि शरीराच्या उत्तम संधानातून अवतरलेलं सौंदर्य हे वेगळेच असते! आणि हे उत्तम सात्त्विक गुणांतून अवतरलेलं सौंदर्य महालक्ष्मीचेच असते आणि तेच मुखपृष्ठ होत दिवाळी अंक साजरा करत असते!

त्यामुळेच आम्ही म्हणतो, की माणसाचे मन आणि शरीर यांच्या एकत्रित सौंदर्याचा किंवा ऐश्वर्याचा एक महाआविष्कार म्हणजेच दीपावलीचा दीपोत्सव होय!

का स्नेहसुत्र वैष्णानरा। जालिया ही संसारा।
हातवटी नेणता वीरा। प्रकाशु नोहे।।
(ज्ञानदेव)

निरांजन हे एक प्रकारचा अग्निच आहे. परंतु ते निरांजन मनाच्या आध्यात्मिक उच्च भावातून ज्या वेळी अवतरते, त्या वेळी हा निरांजनाचा अग्नी एक ज्ञानज्योत होतो! आणि खरी ज्ञानप्रकाशाची दिवाळी साजरी करतो आणि माणूस एका विचित्र नरकातून बाहेर पडतो. एकूणच ज्ञानदेवांच्या भाषेत मनाच्या ईश्वरीय सौंदर्याचा स्पर्श किंवा ते सूत्र हातात धरल्यावरच माणूस धनत्रयोदशी किंवा दिवाळी अमावस्येचे लक्ष्मीपूजन साजरे करू शकतो! नाही तर ती सध्याच्या कलियुगातील राक्षसांची दिवाळी होऊ शकते!

मित्र-मैत्रिणींनो, ता. ९ च्या गुरुवारी चंद्र-शुक्रांचा पिधानयोग होत आहे. अर्थातच मनाचे स्नेहसूत्र जपणाऱ्या सद्भक्तांच्या बाबतीत! त्यामुळेच आपण आपल्या सत्, चित् आणि आनंदस्वरूप असे मनाचे स्नेहसूत्र हाती धरत दैवी संपत्तीची दिवाळी साजरी करण्यासाठी दीपप्रज्वलन करू या!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}