दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

कुलकर्ण्यांचा ‘निशब्द’ प्रशांत — 🔸वृद्धाश्रम…🔸

🔸वृद्धाश्रम…🔸

प्रसंग एक…

दिवाळीचा सण असतो… संध्याकाळची वेळ असते… वृद्धाश्रमाच्या गच्चीत एक आज्जी कोपऱ्यात बसून मुळूमुळू रडत असतात… कोणीतरी त्यांना विचारतं,
” आज्जी काय झालं?… का रडता सणासुदीला?…”

” काही नाही रे, चकलीची आठवण झाली… यावर्षी घरून चकली आली नाही ना…” आज्जी रडवेल्या स्वरात म्हणते…

चकली हे निमित्त असतं खरं कारण वेगळं असतं… दर दिवाळीला आज्जीचा मुलगा फराळाचे घेऊन आईला भेटायला वृद्धाश्रमात येत असतो… पण आज दिवाळी असूनही तो काही फिरकत नाही… त्याच्या आठवणीने आज्जी कासावीस झालेली असते आणि गच्चीत रडत बसलेली असते… आसवांची आतिषबाजी आज्जीच्या चेहऱ्यावर फुलत असते… आठवणींच्या सुरसुरीने चकलीचे मनचक्र गरकन फिरत असते… दूर कोठेतरी आज्जीचा मुलगा आपली दिवाळी साजरा करत असतो…

प्रसंग दोन…

तो आपल्या आईला सोडवायला वृद्धाश्रमात येतो… आईची बॅग घेऊन तिला वृद्धाश्रमात सोडतो… त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड मानसिक तणाव दिसत असतो… त्याची हतबलता, विवशता चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत असते… त्याच्या मनाची पडझड त्याच्या देहबोलीतून दिसतं असते… त्याची बायको गाडीतच बसून रहाते… गाडीत त्यांचा लहान मुलगा त्याच्या मम्माला विचारतो… ” मम्मा आपण आज्जीला येथे का सोडतोय?”… त्याच्या या प्रश्नाने त्याची मम्मा वैतागून ओरडते…

” तुला काय करायच्यात फालतुच्या चौकशा?… गपचूप बसून रहा…”

तो आईला वृद्धाश्रमात सोडतो आणि जड पावलांनी गाडीत येऊन स्तब्ध बसतो… आणि काही वेळाने निघतो… आईला वृद्धाश्रमात सोडून ते कुटुंब निघून जातं… त्या लहान मुलाला वृद्धाश्रमाचा पत्ता लहानपणीचं माहीत झालेला असतो…

प्रसंग तीन…

एक त्रिकोणी स्टारचक्र लावलेल्या गाडीत तो आपल्या वडिलांना घेऊन वृद्धाश्रमात येतो… सुटबुटात असलेला हा उद्योगपती घासाघीस करत असतो… ‘माझ्या वडिलांना फारसं काही लागतं नाही… त्यांच्या काही फारशा मागण्या नसतात… ते केवळ एक वेळ जेवण करून राहू शकतात त्यामुळं तुम्ही मला पन्नास टक्के सूट द्या’ अशी त्यांची मागणी होती… ऑफिसचे लोकं त्या व्यावहारिक हुशार व्यावसायिकाला समजावून सांगतात की, हे असं काही चालत नाही. तुम्हाला पूर्ण महिन्याचे पैसे द्यावे लागतील… शेवटी नाईलाजाने तो पैसे भरतो आणि आपल्या वडिलांना तिकडे सोडून जराही मागे न बघता निघून जातो…

तुम्हाला सांगू का… किती पैसे लागतं होते ते ?… केवळ पाच हजार… आणि त्यात त्याला पन्नास टक्के सूट हवी होती, कारण का… तर वडील एक वेळ जेवतात… त्या स्टारवाल्या गाडीच्या लोगोची चकाकी जरा फिकी पडलेली असते…

प्रसंग चार…

वृद्धाश्रमाच्या दारात एक गाडी येऊन थांबते… एक माणूस आपल्या आईला घेऊन खाली उतरतो…तिच्या सामानाची बॅग घेतो आणि आईला घेऊन वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये पोहोचतो… आधी बोलणी झाली असल्याने आता फक्त कागदपत्रांचे सोपस्कार बाकी असतं… तो ते पूर्ण करतो… आईला तिथेच सोडून तो गाडी जायला वळतो… त्याचे मन सैरभैर झालेले असते… डोक्यात विचारांचे काहूर माजलेलं असतं… त्याचे पाय जड अन मंद झालेले असतात… कसाबसा तो आपल्या कारपर्यंत पोहोचतो… गाडीच्या सीटवर स्वतःला झोकून देतो… काही वेळ शांत बसतो… जरा वेळ जातो… आता गाडीला स्टार्टर मारून निघणार तेवढ्यात पुन्हा गाडीच्या खाली उतरतो आणि वेगाने पुन्हा वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये पोहोचतो… तिथे त्याची आई मलूल होऊन बसलेली असते… आई त्याच्याकडे पहाते… तिच्या आसवांच्या डोळ्यात चांदणं चकाकत… आणि तो एखाद्या लहान मुलासारखा आवेगाने आईला घट्ट मिठी मारतो… ” मला नाही ठेवायचे माझ्या आईला येथे… मी माझ्या आईशिवाय नाही राहू शकतं, मी तिला परत घेऊन जातोय…” तो ठामपणे निश्चयाने म्हणतो… आणि सगळी कागदपत्रे रहित करून तो आपल्या आईला घेऊन परत जातो… आईला मिठीत घेऊन वृद्धाश्रमाच्या बाहेर पडताना त्याच्या चेहऱ्यावरचा निग्रही भाव बरंच काही सांगत असतो…

प्रसंग पाच…

एक असाच खिशाने श्रीमंत माणूस आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात सोडून जातो… महिन्याचे पैसे भरण्याचे कबुल करतो… पहिल्या दोन महिन्यांचे पैसेही भरतो आणि मग गायब होतो… कधी फोन उचलत नाही, तर कधी फोन कट करू लागतो… दोन तीन महिने अशीच जातात… मग त्याला सरकारी नोटीस जाते आणि लगोलग दुसऱ्याच दिवशी वृद्धाश्रमात हजर होतो… निर्लज्जपणे नको नको ती कारणे देऊन पैसे भरतो आणि पुढचे भरायचेही वचन देतो… आणि निर्विकारपणे वडिलांना न भेटता निघून जातो… दरवाजातून किलकिल्या भरल्या डोळ्यांनी दुरून त्याला बघणारे त्याचे वडील काय बरं विचार करत असतील… ‘ हाच का तो ज्याला आपण अंगाखांद्यावर खेळवला?… त्याला आकाशात झेपावताना आपण त्याला सावरला…?’

प्रसंग सहा…

वृद्धाश्रमाच्या दारातच एक वयोवृद्ध अत्यंत हलाखीच्या अवस्थेत नुकताच पोहोचलेला असतो… चेहऱ्यावरील तेज उमेदीच्या काळात काहीतरी मोठं नक्कीच केलं असणार याची जाणीव करून देत… जरा चौकशी केल्यावर नाव समजतं आणि हातपाय गार पडतात… डोकं बधिर होतं… एक दिग्गज व्यक्तिमत्त्व ज्यांनी एक काळ गाजवला, कित्येक पुरस्कार मिळवले, कित्येक टीव्ही चॅनल वर झळकले, अनेक मुलाखती झाल्या, चित्रपटात नाव झालं… प्रत्यक्ष बाळासाहेब मंगेशकरांनी त्यांची फोन करून विचारपूस केली अशी व्यक्ती आज केवळ शरीर बनून अत्यव्यस्थ अवस्थेत पडून होती… पाणी पिण्यासाठी त्यांना उठताही येईना… जवळचा ग्लास तसाच थरथरत्या हाताने तोंडापाशी नेण्याचा प्रयत्न केला… पण सांडला, तेवढ्यात ते पाहून कोणीतरी धावून आले आणि त्यांना व्यवस्थित पाणी पाजले… किती मोठी माया असेल त्यांच्याकडे, अफाट ऐश्वर्य असेल पण आज एक ग्लासभर पाणी पिण्यासाठी परावलंबी आणि ते ही वृद्धाश्रमात…

प्रसंग सात…

एक आज्जी आजोबा… आजोबा नव्वदीच्या घरात तर आज्जी पाच वर्षे मागे… दोघेही धडधाकट, स्वतःच स्वतः सगळं करणारे… त्यांना चार मुलं… पण प्रश्न हा की, आई वडिलांना सांभाळायचं कोणी?… ज्याला त्याला स्वतःची काही ना काही समस्या आणि अडचण… आई वडिलांना ठेऊन घेण्यात असमर्थता आणि त्यासाठी अनेक कारणं… शेवटी आलटून पालटून एक महिना प्रत्येकाने सांभाळायचं असा मध्यम मार्ग निघतो… आई वडिलांची फाटाफूट केली जाते… आई एकाकडे तर वडील एकाकडे… पुन्हा पुढच्या महिन्यात अजून दुसऱ्याकडे… आठ महिने हे चक्र चालतं… या आठ महिन्यात भेटायचं तर सोडा आज्जी आजोबांचे एकमेकांशी साधं फोनवर बोलणं पण होत नाही… आज्जी आजोबा एकमेकांना भेटून आता आठ महिने झालेले असतात… या आठ महिन्यात चारही मुलं वैतागतात… आई वडिलांना सांभाळायला कोणीच तयार होत नाही… शेवटी त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करण्याचा निर्णय होतो… एक दिवस वेळ ठरते… आज्जी आजोबा दोघेही एकाच दिवशी वृद्धाश्रमात येतात… मुलं त्यांना सोडून निघून जातात… आज तब्बल आठ महिन्यांनी आज्जी आजोबा एकमेकांना बघत असतात… वृद्धाश्रमात येण्याच्या दुःखा पेक्षा एकमेकांना भेटून त्यांना झालेला आनंद चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो… एकमेकांना बघून दोघेही हरखून जातात… त्यांच्या चेहऱ्यावरचा सुखद आनंद लपत नाही… वृद्धाश्रमातला पहिला दिवस… त्याच दिवशीची संध्याकाळची वेळ असते… रात्रीची जेवण होतात… आज्जी आजोबा इतक्या दिवसांनी एकत्र आल्याने एकमेकांच्या सोबत असतात… गप्पा मारतात… आणि पुढच्या अवघ्या तीन तासात आज्जी आपला प्राण सोडतात… बहुदा आजोबांना शेवटच भेटायचं होतं म्हणून आज्जी प्राण मुठीत ठेऊन होत्या… आजोबांना डोळा भरून पाहिलं आणि आज्जीने प्राण सोडले होते… आजोबांना काही सुचत नाही, तोंडातून शब्द फुटत नाही…

” अरे गेssssली रे ती…” आजोबा आर्त आवाजात आकांत करतात… त्यांचा घसा कोरडा पडतो… आज्जीच्या निष्प्राण देहाचा हात हातात धरून आजोबा अक्षरशः गोठून जातात… कितीतरी वेळ ते आज्जीच्या चेहऱ्याकडे एकटक बघत नुसतेच बसून राहतात… त्यांच्याकडे बघवत नाही… त्यांच्या डोळ्यात अश्रूही नसतात… एका पुतळ्यासारखे ते स्तब्ध बसून राहतात… पुढचे सोपस्कार पार पडते आणि पुढच्या सहा महिन्यांत आजोबा आपला देह ठेवतात…

अशा असंख्य कहाण्या…किती लिहायच्या…??

तुमच्याकडे काहीही असू द्या, कितीही असू द्या, त्याची किंमत शेवटी शून्य असते… मी यांव आहे आणि त्यांव आहे हे सगळं पाण्याच्या बुडबुड्यासारखे असतं… आज आहे तो क्षण सांभाळा… प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या…

आई वडील वैभव आहेत, ती खरी श्रीमंती आहे ती सांभाळा… प्रत्येकाच्या आयुष्यात हे सुखं नसतं… माझ्यासारखे सगळं असूनही या बाबतीत केवळ कफल्लक असतात…

या लेखाने काही आई वडील सुखावले तर लिखाणाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल…

एक लक्षात ठेवा एक दिवस आपण पण वृध्द होणार आहोत… काळ कोणाला सोडत नाही…

कुलकर्ण्यांचा ‘निशब्द’ प्रशांत
🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}