‘तिखट-गोड ……………. © सुनील गोबुरे
‘तिखट-गोड’ 🌐🌐
श्रुती त्या उबेर टॅक्सीमधून सोसायटीच्या गेटवर उतरली तेंव्हा रात्रीचे साडे बारा वाजले होते. अर्थात त्यात नवीन काही नव्हते. एका मोठ्या विमानसेवा कंपनीत, आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स वर सिनीयर फ्लाइट अटेंडंट अर्थात एअर होस्टेस असल्याने ब-याचदा तिच्या घरी परतण्याच्या वेळा या अशा ऑड असायच्या.
एक एअर होस्टेस मुलगी…मुंबईतील एका मोठ्या सोसायटीत एका वन बिएचके मधे एकटीच रहात होती. खरं तर मुंबई मधील उच्चभ्रु सोसायटींमधे यात फारसं वावगं नसतं. तिथे कोण कधी आलं कोण कधी गेलं याबद्दल कोणी फारसं विचारही करत नाही.
पण पार्ल्यातील ही सोसायटी ब-यापैकी मध्यमवर्गीय लोकांची होती. तिथे मात्र तिचे असे अवेळी येणं जाणं अनेक लोकांना खटकायचं. इतर वेळी ती ड्युटीवर नसताना जेंव्हा सोसायटीत फिरताना, तिथल्या गणपती मंदिरात ते येताना दिसे तेंव्हा सोसायटीतील सर्वांच्या नजरेत थोडासा छद्मी भाव, थोडीशी नाराजी दिसे. बायका देखील तिच्याशी फारसं बोलायला जात नसत. तिचा शेजार देखील याला अपवाद नव्हता.
तिच्या समोरच्या सदनिके मधे एक आजी आजोबा दोघेच रहात होते.त्यांचा मुलगा व सून त्यांच्या धाकट्या नातीच्या शिक्षणासाठी पुण्यात होते. त्यांचा लाडका नातू अलिकडेच सिंगापूरला नोकरी निमीत्त गेला होता.
या आजींना देखील ही वेळी अवेळी घरी येणारी, दोन दोन दिवस घरी न येणारी मुलगी शेजार म्हणून अजिबात आवडत नसे. आजी दरवाजात दिसल्या की ती त्यांना पाहून हसे, पण आजी मात्र काहीच प्रतिक्रिया न देता दरवाजा बंद करुन घेत. आजोबा मात्र तिला बघून अधेमधे स्माइल करत..पण बोलत नसत, कारण अर्थात आजींना ते आवडत नसे.
आज ती टॅक्सीतून उतरली तेंव्हा आजी आजोबांच्या घरात अजून दिवा चालू होता. बिल्डींग समोरच्या कट्ट्यावर सोसायटीतलीच पण शेजारच्या बिल्डी़ग मधील तीन तरुण मुलं सिगारेट ओढत उभी होती. बहुधा ती तिघं पार्टी करुन आली होती. ती जवळून आपली सुटकेस ओढत निघून गेली तशी तिघांनी तिच्या अंगावरुन लोचट नजर फिरवली व ती पुढे गेली तसे त्यांनी तिच्याकडे पहात काही तरी शेरेबाजी केली व एकमेकांना पहात टाळी दिली.
श्रुतीने वरती आजी आजोबांच्या टेरेसकडे पाहिलं. आजी टेरेसमधे उभ्या होत्या. आजींनी त्या मुलांकडे पाहिलं. ते लक्षात येउन न ती मुले चटकन तिथून चालती झाली.
ती लिफ्टने वर आली अन आपल्या
घराचे लैच उघडून आत जाणारच होती तोच समोरचा दरवाजा उघडला व आजी बाहेर आल्या.
तिला पाहून आजी म्हणाल्या
‘अशा चुकीच्या वेळी सोसायटीत आलं की लोक असेच वागतात’ असं म्हणत त्यांनी तिला काही बोलायची संधी न देता दरवाजा, थोड्या जोरातच, लावून घेतला.
अचानक झालेल्या या घटनेने दरवाजातच उभी राहून श्रुती समोरच्या घरातून येणारे आवाज ऐकत होती. आतून आजी आजोबांचे संभाषण ऐकू येत होते.
आजोबा – ‘अगं कसं बोललीस तू तिला?’
आजी- ‘काय चुकीचे बोलले? चांगल्या सोसायटीत रहाणा-या, सभ्य घरातल्या मुली इतक्या उशीरा घरी येतात का?’
आजोबा – ‘अगं पण ती एअर होस्टेस आहे. त्या़ची विमाने अशी वेळी अवेळीच येतात जातात. आपला समीर नाही का रात्री एकच्या फ्लाइटने सिंगापूरला गेला?’
आजी- ‘हो..तुम्ही त्या परक्या मुलीची बाजू घ्या अन माझ्याशीच भांडा. इथे मी चकलीची भाजणी साठी संध्याकाळपासून निवडणं करत बसलेय. तुम्ही काय आहात निवांत.’
आजोबा- अग पण तुला कुणी स़ागीतलेत हे उद्योग. आजकाल सारा फराळ विकत मिळतो आहे ना? ..तोही घरपोच.? अगं अगदी ऑनलाइन ऑर्डर करता येते. लाडू, शंकरपाळ्या, चकल्या, अनारसे सारं मिळतं.’
आजी- ‘अहो मग करा ऑर्डर. माझी मेलीची ही मरमर तरी वाचेल’.
आजोबा- ‘ हं…मला कुठलं येतय ऑनलाइन ऑर्डर करायला? समीरला सांगतो..’
आजी- ‘काही नको..त्यालाच सिंगापूरला फराळ पाठवायचा आहै अन तुम्ही त्यालाच ऑर्डर करायला सांगताय? धन्य आहे तुमची..!’
श्रुतीला आजी आजोबांच्या या अशा लटक्या भांडणांची आता सवय होती. मघाचे आजींचे बोलणे विसरुन ती हसत दार लोटून तिच्या घरात आली.
येउन फ्रीज उघडत ज्युसची बाटली उघडून एक ग्लास मधे घेत ज्युस पिउ लागली. आपल्या बडोद्याला असलेल्या आजीची तिला तेंव्हा तिव्रतेने आठवण झाली व ती काहिशी हळवी झाली. वडिलांच्या पाठी आईचा विरोध असताना, तिच्या एअर होस्टेस बनण्याच्या निर्णयाच्या पाठीमागे आजी ठामपणे उभी राहिली म्हणूनच श्रुती एअर होस्टेस बनू शकली.
घरी जाउन तीन महिने झाले होती. तिला घरची आठवण येत होती.
दिवाळी जवळ आली होती. सोसायटीत घरोघरी तिची तयारी सुरु झाली होती. त्या दिवशी श्रुतीचा ऑफ असल्याने ती घरीच होती. ती काही कामासाठी बाहेर आली तेंव्हा तिला दिसलं की आजोबा घराबाहेर आकाश कंदील लावत होते.
त्यांना ते थोडं अवघड होत होतं म्हणून पुढे होत श्रुतीनेच स्टुल वर उभे रहात त्यांचा आकाश कंदील टांगून दिला.
बोलता बोलता आजोबांनी मग तिला ऑनलाइन फराळ ऑर्डर करायसाठी देखील मदत मागीतली. तिनेही त्यांच्या घरी येत आजोब़ाच्या फोन वरुन चटकन ऑनलाइन जाउन त्यांना हवी होती तशी फराळाची ऑर्डर केली.
आजोबा तिची मदत घेताहेत म्हणून आजी आधी थोड्या नाराजच होत्या. पण तरी त्यांनी तिला चहा बनवून दिला व सोबत बाकरवड्या खायला दिल्या.
फराळाची ऑर्डर करुन मग तिनं त्यांना माहिती दिली की त्यांच्या एअर लाइन तर्फे यंदा परदेशात फराळ पार्सल पाठवण्याची खास सोय आहे. त्यांच्या नातवाला देखील ते हा फराळ पाठवू शकतात.
आजोबांना हे ऐकून आनंद झाला. समीरला सिंगापूरला फराळ पाठवण्यासाठी त्यांनी तिला मदत करायला स़ागितलं. तिनेही आनंदाने होकार दिला. दोन दिवसांनी तिने पुन्हा येउन फराळ पार्सल करण्यासाठीचे पैकींग करायला तिने आजींना मदत केली. तिच्या एअरलाइनचा माणूस येउन ते पार्सल घेउन गेला.
आता मात्र आजींना खूपच आनंद झाला. त्यांची श्रृती विषयीची आढी थोडी कमी झाली. पण अजूनही त्या तिच्याशी मोकळेपणाने बोलत नव्हत्या. आजोबांशी मात्र श्रुतीची छान गट्ठी जमली.
चार दिवसांनी दिवाळीचा पहिला दिवस उजाडला. ज्या दिवशी पहाटेच्या आंघोळी असतात, घरोघरी फराळाचा आनंद, फटाक्यांची आतषबाजी असते त्याच दिवशी नेमकी तिची फ्लाइट ड्युटी होती.
श्रुती त्या दिवशी पहाटेच एअर होस्टेसच्या युनीफॉर्म मधे आपली सुटकेस घेउन कामावर निघायला आपल्या घराबाहेर पडली. सोसायटीत सर्वत्र रोषणाई, फटाके, मंगल सूर वाजत होते.
तिच्या दरवाजा बाहेर देखील बहुधा कोणीतरी दोन पणत्या ठेवलेल्या होत्या व एक छान छोटी रांगोळी काढली होती. तिला आधी याचं आश्चर्य वाटलं. मग तिने आजीच्या बंद दरवाज्याकडे एकदा पाहिलं. त्यांच्या घरासमोरही देखील छान रांगोळी, दरवाजावर तोरण फुलांची सजावट उठून दिसत होते.
अनेकविध पणत्या व वर ट़ागलेला आकाश कंदील त्यामुळे त्यांचं घर उजळून निघालं होतं.
तिने पाहिलं…तिच्या घरासमोरच्या पणत्या व आजींच्या घरासमोरच्या पणत्या सारख्याच होत्या. ती समजून गेली व हसत तिंने बेल वाजवली. आजोबांनी दार उघडले. तिने Happy Diwali म्हणत आजोबांना विश केलं. आजी आत दिसतात का याचा अंदाज घेत, एक नजर आत टाकून ती लिफ्टकडे निघाली.
अशा वेळी आपण घरच्यांबरोबर नाही, ड्युटीवर जातोय याची एक खंत परत तिच्या चेह-यावर येउन गेली.
ती लिफ्टमधे शिरण्याआधी मात्र अचानक आजी त्यांच्या घरा मधून लगबगीने बाहेर आल्या व त्यांनी श्रुतीला हाक देउन थांबवलं.
आजींनी तिच्या हातात एक फराळाचा बॉक्स दिला व तिला ‘शुभ दिपावली’ अशा शुभेच्छा दिल्या.
तिला त्यांनी प्रेमानं बजावलं
‘तुझं विमान टेक ऑफ झालं की तू व तुझ्या इतर एअर होस्टेस मैत्रीणी मिळून हा फराळ करा. विमानातलं ते नेहमीचा तुमचं बोरींग ब्रेकफास्ट करु नकोस..बरं का गं पोरी..’
श्रुतीला ते वाक्य ऐकून एकदम भरुन आलं व ती नकळत आजींना बिलगली. आजींनी तिला जवळ घेत थोपटलं व मग ‘Happy Diwali आजी’ म्हणत ती हसत लिफ्टमधे शिरली.
लिफ्टमधे शिरल्यावर व लिफ्ट बंद झाल्यावर मात्र तिने आपसूक आपले डोळे पुसले व त्या बॉक्सला प्रेमाने आपल्या छातीशी धरलं..
आजवर तिखट असणारं आजींशी तिचं नात आज अचानक गोड होउन गेलं होतं…अगदी दिवाळीच्या त्या फराळा सारखं…!!
© सुनील गोबुरे ✍️