माहेरवाशीण-…………………सौ ज्योती ज्ञानेश्वर पाटील- खामगाव
🔸माहेरवाशीण🔸
सुधा दिवाळीचा फराळ घेऊन प्राजक्ताकडे गेली. समोर हॉलमध्ये तिची सासू आणि पती बसले होते. सुधाला पाहून काकू म्हणाल्या, “ये, ये, सुधा! कशी झाली दिवाळी? अगं बाई!फराळाचं पण घेऊन आलीस?”
सुधानं काकूंना नमस्कार केला आणि फराळाचा डबा काकूंच्या पुढ्यात ठेवला. काकूंनीही डब्यात काय काय आहे ते पाहिलं आणि कौतुक करत म्हटलं, “छान आहे सगळं! घरी केलंस नं? हो की नाही?” सुधाने मान हलवली अन विचारले, “काकू, प्राजक्ता कुठे आहे?”
“ती काय आतल्या बाजूला बॅगा भरतेय…”
“हो का?” म्हणून सुधा आत गेली.
प्राजक्ताची लगबग पाहून सुधा एकदम पुतळ्यासारखी उभी राहिली. भानावर येऊन म्हणाली, “काय प्राजक्ता, एवढी कसली घाई?”
“अगं माहेरी जायचंय नं, भाऊबीजेला!”
“मग एवढ्या मोठ्या बॅगा?”
“हो, हो, लागतंच नं गं सगळं. मुलं खूप खराब करतात कपडे.”
“हं, मग तेही बरोबरच आहे.”
तेवढ्यात प्राजक्ताच्या नवऱ्यानं आवाज दिला, “ए,प्राजक्ता, मला पाणी दे नं…”
“हो,,, देते. बाई, या माणसाचं मला कळतच नाही. त्यांना समजत नाही का, मी घाईत आहे तर घ्यावं स्वतःच्या हातानं?”
सुधा पाहतच होती, प्राजक्ताच्या वागण्यात काहीतरी बदल दिसतोय. वेगळाच अॅटीट्यूड दिसत होता. जशी काही माहेरी कायमचीच जात आहे. प्राजक्ता पाणी देऊन परत सुधाजवळ आली. सुधा म्हणाली, ” का गं, आज काहीतरी वेगळंच वाटतंय. जशी काही कायमची माहेरी चालली.”
“नाही गं, असं नाही. पण माहेरी जायचं म्हटलं की, असा वेगळाच आवेश असतो बघ. आणि काय एकदोन दिवस राहणार आणि आहेच इथं. इथल्याशिवाय काही आहे का मग? नवऱ्याचं घर ते नवऱ्याचं. पण जायचं म्हटलं की वेगळंच गुमान येतं बघ. तुला नाही कळणार ते, जाऊ दे.”
सुधा हिरमुसली. घरी आली. दारात चिऊ रडतच होती, “आई,,,, कुठे गेली होती?” चिऊला कडेवर घेतले आणि घरात गेली. कपाट उघडलं. त्यातलं एक कात्रण काढलं. ठरवलेलं. जायचं. आपणही माहेरी जायचं. तिनंही बॅग भरायला सुरुवात केली.
सुधाची सासू अन पती दोघेही गंमत पहात होते. काय चालू आहे, त्यांनाही कळत नव्हतं. शेवटी न राहवून सचिननं विचारलंच,”काय करते? कुठे जातेय की काय?”
“हो, माहेरी जातेय.”
सचिन हसला, म्हणाला, “माहेरी? कोण आहे तिथं? आईबाबा तर केव्हाच गेले. ना भाऊ ना बहीण! मग?”
सुधानं पेपरचं कात्रण त्याच्या हातात दिलं. सचिननं ते आर्टिकल मन लावून वाचलं. पत्ताही वाचला. सुधाला कसं समजवावं, कळत नव्हतं. तो पत्ता एका संस्थेचा होता.
जिथे ज्यांना माहेर नाही, त्यांनी यावं व मनात वाटेल तितके दिवस राहावं. माहेरवाशीणीला जे जे माहेरी मिळतं ते ते सर्व तिथं मिळतं. ती संस्था एक साठ वर्षाच्या काकू – सौ इंदू हिंगणे चालवतात.
आता सुधा काही ऐकणार नाही अशा आवेगात दिसत होती म्हणून सचिन काही न बोलता तिची बॅग भरू लागला. बॅग भरली आणि सुधा सासूबाईंच्या पाया पडून निघाली. सचिननं आईला सर्व व्यवस्थित सांगितले अन तोही सुधाला पोहचवून देण्यासाठी तिच्यासोबत निघाला.
संस्थेच्या फाटकाजवळ गाडी उभी राहिली, तशा दोन बाया जणूकाही धावतच आल्या. एकीने सुधाजवळची बॅग घेतली आणि एकीने चिऊला. सुधाला एकदम आनंद झाला. सचिनही पाहतच राहिला. त्याला किंवा तिला कल्पनाही नव्हती की, त्यांचे असे स्वागत केले जाईल. सगळे जण आत आले. इंदूताई समोर आल्या. “दमले असाल. बसा. पाणी घ्या. चहा दे गं सुमन…”
जेवढे कोडकौतुक आजी नातवंडांचं करते तसेच लाड इंदूताई चिऊ आणि गौरवचे करत होत्या. सचिनला जावयासारखा मान आणि सुधाला पण लेकीला माहेरी आल्यावर जी आपुलकी, माया, प्रेम मिळते ते मिळत होते.
इतकं… की, सुधाला इंदूताईत तिची आईच दिसत होती.
शेवटी न राहवून सुधाने विचारलेच,” काकू, तुम्ही खूप छान काम करताय. इतकी सुंदर कल्पना तुम्हाला सुचलीच कशी? मला तर इतका आनंद होतोय.., इथं येऊन की खरंच एखाद्या वेळेस मी माझ्या माहेरी गेल्यावर पण एवढं आदरातिथ्य झालं असतं की नाही, काय सांगावं? सांगा नं काकू, तुमच्या मनात ही कल्पना कुठून आली?”
“अगं मला पण असंच माहेरचं कुणी नव्हतं. माझी पण तुमच्यासारखीच तळमळ व्हायची. कधी कुणाला बोलून नाही दाखवलं. नवऱ्याला कळत होतं, पण शेवटी पुरुषच. बाईसारखं हळवं मन थोडंच असतं त्यांना. मग म्हटलं आपल्यासारख्या अशा अनेक स्त्रिया असतील… ज्यांना माहेरवासाचं सुख मिळत नसेल. मग ते सुख जर आपण त्यांना दिलं तर… दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानून घ्यावं, अशा तुझ्यासारख्या मुली आल्या, त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघितला की मला खूप खूप आनंद होतो. हा एवढा गोतावळा जमला की कसं गोकुळासारखं वाटतं.”
सचिनही काकूंचं बोलणं मन लावून ऐकत होता. तोही खूप खूप प्रसन्न झाला.
नकळतच तो काकूंच्या पाया पडला आणि म्हणाला, “येतो काकू मी! इथं येण्याआधी मी थोडा संभ्रमातच होतो. सुधाला इथं ठेवायचं की नाही? पण आता तुम्हाला पाहिल्यावर, इथं आलेल्या या सर्व माहेरवाशीणीना पाहून मी निश्चिन्त झालो”
तेव्हाच आणखी एक ऑटोरिक्षा गेटजवळ थांबली. सुधा उठून पळतच गेली. सचिन काकूंशी बोलत होता, काकूंना काही पैसे देऊ करत होता… पण काकू म्हणाल्या, “पैसे नका देऊ पण काही खेळणी, कपडे आणून दिले तर चालतील.”
सचिन वळला, पाहतो तर सुधा रिक्षातून उतरलेल्या बाईच्या हातातली बॅग घेत होती…
सौ ज्योती ज्ञानेश्वर पाटील- खामगाव.
🌀🌀🌀🌀🌀🏵🌀🌀🌀🌀🌀