कोकण, चावदिवस आणि दिवाळी ……©अनिल विद्याधर आठलेकर, सिंधुदुर्ग
कोकण, चावदिवस आणि दिवाळी
__________
विद्यार्थीदशेत असताना दोनदा मोठ्ठी सुट्टी मिळायची __ ‘लाँग व्हेकेशन’! मे महिन्यामध्ये आणि दिवाळीमध्ये. स्वाभाविकच आम्ही या सुट्ट्यांची डोळ्यांत प्राण वगैरे आणून वाट पहायचो. या सुट्ट्या परिक्षेनंतर येत, एक सुट्टी सहामाही परिक्षेनंतर आणि दुसरी वार्षिक परिक्षेनंतर.मग केवळ या सुट्ट्यांसाठी आम्ही अभ्यास करायचो म्हटलं तरी हरकत नाही. अभ्यास काय चटकन व्हायचा पण सुट्टी काही केल्या चट्कन यायची नाही तिच्यासाठी खूप वाट पहावी लागायची अगदी चातकाप्रमाणे !
माझं घर तळकोकणात आणि आजोळ उत्तर कर्नाटकात. तसे पाहिले तर हे दोन्ही भाग प्रेमळ, हौशी आणि उत्सवप्रिय. उत्तम आदरातिथ्य ही येथील संस्कृती आणि प्रेम, जिव्हाळा हा स्वभावधर्म ! (शिवाय दोन्ही निसर्गरम्य परिसर) अशा अनेक सद्गुणांनी युक्त प्रदेशात, अशा गोतावळ्यात बालपण जाणे याहून सुख ते काय असू शकतं? साहजिकच दिवाळी अशा वातावरणात साजरी होणे म्हणजे आम्हा बाळगोपाळांसाठी नुसती चंगळ असायची!
आमच्या घरी व आजोळी साजरी केली जाणाऱ्या दिवाळीत अगदी थोडा फरक असायचा. सिंधुदुर्गात ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस ‘चावदिवस’ म्हणूनच ओळखला जातो. या दिवशी भल्या पहाटे उठून एक ‘गरंडेल बॉम्ब’ फोडायचा घराच्या भोवती, अंगणात सगळीकडे पणत्या, मेणबत्ती लावायचा, हौसेने गवत, लाकूडफाटा यांपासून बनवलेला नरकासुर जाळणे हा एक महत्वाचा कार्यक्रम असे. ‘नरकासुर’ बनवणे हा लहान मुलांचा आवडीचा उद्योग. यातही चढाओढ असायची. आपण ‘नरकासुर’ मित्रमंडळींनी बनवलेल्या नरकासुराहून भारी कसा होईल याकडे प्रत्येकाचं लक्ष. नरकासुर जाळण्याबरोबरच ‘कारीट’ फोडणे हाही एक यादिवशी महत्वाचा असणारा भाग. कारीट पायांनी फोडत जोरजोरात ‘गोयंदा गोयंदा’ असं ओरडायचं. जाम मजा यायची. अभ्यंगस्नान वगैरे उरकल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पोहे खाणे ही खास प्रथा. पोहे खाण्याच्या या प्रथेमुळेच कदाचित या दिवसाला ‘चावदिवस’ म्हणत असावेत. गूळपोहे, तिखट पोहे, दह्यातले पोहे, दडपे पोहे काय काय प्रकार पोह्यांचे नुसती मज्जा! या दिवशी दुसरी न्याहरी नाहीच, ‘फक्त पोहे’ मालवणीत यांना ‘फ़ॉव’ म्हणतात. हे फॉव खाणे ही इथली ओळख. शेजाऱ्या-पाजाऱ्यांना बोलावून पोहे खाऊ घालणे गप्पा मारणे यात दिवस आनंदात निघून जायचा. विशेष म्हणजे फटाके फार कमी प्रमाणात वाजवले जायचे. ‘फुलबाजा’ व भुईचक्र यांची फर्माईश अधिक.
नरकासुर
माझं आजोळ उत्तर कर्नाटकात म्हणजे दांडेलीजवळ. आजोळ म्हटलं की वीक पॉईंट असतो, जरा नाजूक विषय असतो मीही त्याला अपवाद नाहीच. ‘सुट्टी पडली की आजोळी पळणे’ हे त्यावेळी एक सूत्र बनल्यासारखं होतं. मे महिना व दिवाळीची सुट्टी आलटून पालटून घरी व आजोळी साजरी व्हायची. दिवाळीत आजोळी असलो की मग काही विचारूच नका! एकतर ‘मुलीची मुलं ‘ हा आजीचा वीक पॉईंट आणि आजी म्हणजे आमचा! मग काय? लाड एके लाड.. आधीच हे असे आम्ही लाडात न्हाऊन निघायचो त्यात दिवाळी म्हणजे या लाडाचा परमोच्च बिंदू, परिसीमाच ! इकडे एक अत्यंत मजेशीर प्रथा असते. नरक चतुर्दशीचा आधीचा दिवस ”बुधा कळ्ळू ” म्हणून ओळखला जातो. या दिवशी चोरी करायची असते आणि गंमत म्हणजे चोर सापडला की त्याला पोहे खाऊ घालायचे असतात. या चोरीमध्ये परसातील काकडी, शहाळी चोरण्यापासून ते अगदी वरवंटा लपवून ठेवणे, पाळण्यातलं छोटं बाळ लपवणे वगैरे गोष्टींचा अंतर्भाव होतो. हा एक प्रकारचा ‘फनी गेम’ असतो आणि विशेष म्हणजे त्याचा कुणीही गैरफायदा घेत नाही. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून शेजारी तसेच गावातील नातेवाईकांकडे जाऊन पोहे खाणे हा कार्यक्रम. इथेही वेगवेगळ्या प्रकारचे पोहे केले जातात हे दोन्हीकडच्या प्रथांमधील साम्य! आम्ही कोकणी आदरातिथ्य जाम भारी करतो पण इथे पाहुणचार करण्यात ही मंडळी एक पाऊल पुढे जाणवतात. पोह्यांवर ताव मारतानाच तुपासोबत ‘कडबू’ खाणे ही एक मेजवानी असते. चिवडा लाडू, चकली, शंकरपाळी हे नेहमीचे यशस्वी कलाकार दिमतीला असतातच. पोहे खाणे व गप्पा मारणे हा या दिवसाचा अघोषित एककलमी कार्यक्रम! सुट्टी असल्याने मामेभावंडं घरी असायची यांच्यासोबत त्यांची केळीची बाग हुंदडणं, केळीच्या पानाच्या जाड देठापासून ”फट फट फट फट’ असा आवाज करणारं खेळणं बनवणं, जायच्या यायच्या रस्त्यात असणाऱ्या इंगळीच्या बिळातून त्यांना बाहेर काढून मारणं अशा अनेक गंमतीजमती या दिवाळीच्या योगाने अनुभवता येत. पूर्ण दिवाळी अशा धामधुमीत, खादाडीत जात असे. सुट्टी संपल्यावर शाळा सुरू होणार असल्याने सुट्टीचा अधिकाधिक आनंद लुटत असू, दीपोत्सव हा आनंदोत्सव होत असे.
अजूनही या प्रथा चालू आहेत पण कितीही केलं तरी ते बालपण, ती मस्ती, तो माहौल आठवत राहतो. नॉस्टॅल्जियाला ‘स्मरणरंजन’ असा शब्द वापरलाय कुणीतरी,किती योग्य शब्द आहे. या भरभरून जगलेल्या क्षणांचे स्मरण करून त्यात आनंद मानणे हेच आपल्या हातात राहतं वेळ कधीच निसटून जाते.
आता ती वेळ निघून गेली आहे हे खरं असलं तरी मन कधी कुणाचं ऐकत नाही ऐकणार नाही. ते भूतकाळात जात राहील, तिथे रमत राहील. शायर मुबारक अंसारींचा आशावादी शेर अशा वेळी आठवत राहतो,
”न कोई ख़्वाब न मंज़र न कोई पस-मंज़र
कितना अच्छा हो जो बचपन की फ़ज़ा लौट आए ”
©अनिल विद्याधर आठलेकर, सिंधुदुर्ग
मोबाईल: ९७६२१६२९४२