एक थी बुलबुल……. ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
सगळ्यांचं तिच्यावरचं इतकं प्रेम बघून मुक्ताला गहिवरून आलं. आयुष्यात मित्र,मैत्रिणी किती महत्वाचे असतात हे तिला प्रकर्षाने जाणवलं. तिचा न्यूनगंड कुठल्या कुठे पळाला. एक नवीन आत्मविश्वास निर्माण व्हायला लागला होता. आता खरंच तिला काहीतरी करावं असं वाटायला लागलं आणि ती करणार होती.....
★एक थी बुलबुल★
चहा करताना मुक्ताच्या हातून साखरेचा डबा खाली पडला,सगळी साखर जमिनीवर सांडली.
“आज मला घाई आहे तर हे जास्तीचं काम पडणारच.” मुक्ता रागातच बोलली. तिचं बोलणं ऐकून रविवारची टी व्ही वरची रंगोली बघत असलेला शशी किचनमध्ये आला.
“मुक्ता, इतकी का वैतागली आहेस?”
“अरे बघ ना,आज मला घाई आहे तर नेमकं हे!” मुक्ता साखर गोळा करत म्हणाली.
“रिलॅक्स! बाजूला हो,मी भरतो ती बरणीत!”
“बरणीत नको हं! ती खाली सांडलेली साखर वापरायला नको.”
“तू म्हणशील तसं! मुक्ता किती वाजता पोहोचायचं आहे शाळेत तुला?”
“अकरा वाजता! आमची शाळा अकरा वाजता सुरू व्हायची ना! शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून नेहाने परवानगी घेतली आहे. आज रविवार आहे म्हणून शाळेच्या बेल वाजवणाऱ्या गंगारामला मुद्दाम बोलावलं आहे. राष्ट्रगीत म्हणणार आणि मग आमचं गेटटुगेदर आमचा वर्ग भरायचा तिथेच करणार आहोत. पंचवीस वर्षांनी भेटतोय रे आम्ही सगळे! उत्सुकता,हुरहूर सगळं दाटून आलंय.”
“आणि त्याबरोबर तुझा न्यूनगंड!”
मुक्ताने चमकून शशीकडे बघितलं.
“मुक्ता, तुमचं गेटटुगेदर ठरल्यापासून मी बघतोय,तू खूप अस्वस्थ दिसते आहेस. कामात चुका करते आहेस.”
“हो खरंय शशी! माझ्या सगळ्या मैत्रिणींनी खूप उच्च शिक्षण घेतलं आणि आज सगळ्याच खूप मोठ्या पोस्टवर आहेत. कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर, कुणी बँक मॅनेजर! मी मात्र काहीच केलं नाही.”
“पण हा सर्वस्वी तुझाच तर निर्णय होता. तुलाच होम मेकर व्हायचं होतं ना!”
“हो,पण आता माझं चुकलं असं वाटतंय.”
“सगळ्यात पहिले हे डोक्यातून काढून टाक. होम मेकर व्हायला पण गुण असावे लागतात आणि ते तुझ्यात आहेत. तू उत्तम संसार केलास.”
“शशी!…” मुक्ताने शशीचा हात हातात घेऊन प्रेमाने दाबला.
गेटटुगेदर ठरल्यापासून होतीच मुक्ता अस्वस्थ! पंधरा दिवसांपूर्वी नेहाचा तिला फोन आला होता.
“मुक्ते, आपल्या क्लासचं गेटटुगेदर ठरतंय आणि तू येते आहेस. नो कारणं!”
“नको ग! मला नाही जमणार.” मुक्ता टाळत म्हणाली.
“मी तुला आधीच सांगितलं आहे,नो कारण! तू येते आहेस आणि जाताना तुला माझ्या कारमधून घेऊन जाईन. साडे दहा वाजता तयार रहा.” नेहाने मुक्ताला पुढे बोलूच दिलं नाही. दोन वर्षांपूर्वी तुषारने सगळ्यांचे मोबाईल नंबर शोधून व्हाट्स अप गृप तयार केला होता.
मुक्ता, नेहा, स्वप्ना आणि सुवर्णा फक्त पुण्यात होत्या. बाकी सगळ्या लग्नानंतर इतर ठिकाणी सेटल झाल्या होत्या. नेहा एका मोठ्या फर्ममध्ये सिनिअर मॅनेजर होती. स्वप्ना शाळेत प्रिन्सिपल आणि सुवर्णा ऑर्थोपेडीक सर्जन होती. ह्या तिघींची कधीतरी भेट व्हायची. पण इतर सगळ्यांना मुक्ता पंचवीस वर्षांनी भेटणार होती. काहीजण तर खास परदेशाहून गेटटुगेदर साठी पुण्यात आले होते.
शाळेत मुक्ताची ओळख म्हणजे गाणारी मुक्ता देसाई अशीच होती. शाळेच्या दरवर्षीच्या स्नेह सम्मेलनात गाण्याच्या स्पर्धेत मुक्ताचं पहिलं बक्षीस ठरलेलं असायचं. पण नंतर तिची आवड तिने तिच्यापुरतीच मर्यादित ठेवली. लग्न करून छान गृहिणी व्हायचं हेच तिचं स्वप्न होतं. पण हल्ली कुठेतरी सतत मनाला टोचणी लागली होती की आपण काही कमावलं नाही. वर्गातली सगळी मुलं देखील आपापल्या क्षेत्रात प्रचंड यशस्वी होते. मुलांना तर मुक्ता पंचवीस वर्षांनी भेटणार होती.
“मुक्ता, साडे नऊ वाजून गेले आहेत. तयार हो! नेहा येणार आहे ना घ्यायला?”
“हो.” मुक्ता भानावर आली.
मुक्ताने कपड्यांचं कपाट उघडलं. ड्रेस घालावा की साडी नेसावी, तिचा निर्णयच होईना!तिच्याकडे खूप भारी,महाग असा ड्रेस पण नव्हता. शेवटी एक कॉटनची मोरपंखी साडी तिने कपाटातून काढली. त्या प्लेन साडीवर तिनेच सुंदर मोर काढून पेंट केलं होतं. एक सैल वेणी आणि ओठांवर हलकीशी गुलाबी लिपस्टिक लावून मुक्ता तयार झाली.
शशी तिच्याकडे बघत चेष्टेने म्हणाला, “मुक्ता, अजूनही तुझ्यावर वर्गातला कोणीतरी फिदा होऊ शकतो. ह्या पामराची आठवण ठेव.”
“गप रे! थट्टा पुरे. पण खरंच मी प्रेझेंटेबल दिसतेय ना रे?”
“मार्व्हलस दिसतेय.” शशी तिच्याकडे अनिमिष नजरेने बघत म्हणाला.
इतक्यात नेहाचा फोन आला,”मुक्ता, मी खाली थांबले आहे. लवकर ये.”
“आलेच.”
मुक्ताने मोबाईल पर्समध्ये टाकला आणि शशीला म्हणाली, “जाऊन येते. आज नेमका सोहम पण मित्रांबरोबर लोणावळ्याला गेलाय. तू घरी एकटाच! मी सगळं करून ठेवलंय. व्यवस्थित जेव.”
“सोहमचे मित्रांबरोबर फिरण्याचेच दिवस आहेत ग! एकदा लग्न झालं की मग बायकोचा पाश!”
“म्हणजे मी तुला पाश होय?” मुक्ता हसत म्हणाली.
“मुक्ता, लाडू घेतलेस का बरोबर? काल मित्र मैत्रिणींसाठी इतक्या प्रेमाने केलेस.”
“बरं झालं आठवण केली रे! विसरलेच होते बघ!”
मुक्ता कारमध्ये बसली आणि नेहा म्हणाली,”मुक्ते,काय गोड दिसते आहेस ग! आणि साडी कित्ती सुंदर आहे.”
“कौतुक पुरे ग,चल निघुया.”
मुक्ताने हळूच नेहाकडे बघितलं. अतिशय उंची किमतीचे हिऱ्याचे मंगळसूत्र आणि कुड्या तिच्या कानात होत्या. लव्हेंडर कलरची नाजूक डिझाइनची प्युअर सिल्क साडी ती नेसली होती. तिची ड्रायव्हिंगची सहजता,तिचा आत्मविश्वास मुक्ताला सुखावून गेला. शाळेत तिच्या कमी उंचीमुळे टार्गेट असणारी नेहा,आज किती मोठ्या पदावर होती.
शाळेच्या गेटजवळ नेहाने गाडी पार्क केली. मुक्ता आणि नेहा गेटजवळ आल्या आणि दोघींचे डोळे भरून आले.
“किती बदललं ग मुक्ते सगळं! तुला आठवतंय का ग? इथे गेटजवळ एक म्हातारी लिम्लेटच्या गोळ्या घेऊन उभी राहायची. एक दिवस तू गोळ्या विकत घ्यायची आणि एक दिवस मी!”
“ते दिवस विसरणं कसं शक्य आहे नेहा?”
मागून “हाय” ऐकू आला म्हणून मुक्ताने वळून बघितलं.
“हाय नेहा,मुक्ता! मुक्ता, अग अशी काय बघते आहेस? मला ओळखलं ना?”
“निलेश…कित्ती वेगळा दिसतो आहेस. व्हाट्स अपवरचा डीपी बघितला होता म्हणून ओळखू तरी आलास.” मुक्ता आश्चर्याने म्हणाली.
“हो ना,शाळेत इतके दाट केस म्हणून सगळे मुलं माझा हेवा करायचे आणि तुझ्यासमोर इतके विरळ केस असलेला निलेश उभा आहे. पण तुझ्यात काही फार फरक नाहीय मुक्ता! चला,आत जाऊया. सगळे वाट बघत असतील.”
शाळेच्या ग्राउंडवर सगळेच वाट बघत होते. इतक्या वर्षांनी एकमेकांना बघितल्यावर किती बोलू आणि काय बोलू असं सर्वांना झालं होतं. शाळेत स्वतःच्या सौंदर्याचा गर्व असलेली प्रीती अमेरिकेत सेटल झाली होती. बॉयकट, जीन्स-टी शर्ट मध्ये अगदी स्टायलिश दिसत होती. शाळेत मुक्ताशी फारशी न बोलणारी प्रीती मुक्ताजवळ आली. “हाय मुक्ता! यु आर लुकिंग गॉर्जस. अजूनही तशीच सिम्पल आहेस.”
सागर, तुषार, वरद, मंथन, राजेश सगळेच मुक्ताशी बोलायला आले. मुक्ताला अवघडल्यासारखं झालं. त्या सगळ्यांमध्ये मुक्ताच खूप साधी,मिडल क्लास वाटत होती.
“कमॉन गाईज! राष्ट्रगीत म्हणूया. जरा वेळाने देशपांडे सर आणि जोशी मॅडम येणार आहेत. मी त्यांना आमंत्रण दिलं आहे. मंथन त्यांना घेऊन येईल.” शाळेची घंटा वाजवणासाठी राजेश गंगारामला बोलवायला गेला.
राष्ट्रगीत म्हणायला सगळे उभे राहिले,इतक्यात तुषार म्हणाला,”अरे मुक्ताला समोर उभं करा. शाळेत तीच तर पुढे उभी राहायची आणि तिच्याबरोबर आपण राष्ट्रगीत म्हणायचो.”
वंदनाने मुक्ताला ओढतच पुढे आणलं. मुक्ताच्या गोड गळ्यातून राष्ट्रगीत सुरू झालं आणि सगळे तल्लीन झाले.
वर्गात गेल्यावर तर सगळे खूपच भावुक झाले.
“प्रत्येकजण आपल्याला जागेवर बसा रे.” वरद हसत म्हणाला.
देशपांडे सर,जोशी मॅडम आल्यावर त्यांचा सत्कार केला. काही जुन्या आठवणी जाग्या करत, आनंद घेऊन ते दोघेही परतले. गप्पा रंगल्या! शाळा सोडल्यानंतर प्रत्येकाने पंचवीस वर्षात इतकी प्रगती केली होती. मुक्ताला परत वरमल्यासारखं झालं. तिच्याकडे सांगण्यासारखं काहीच नव्हतं. विशेष असं तिने काही केलंच नव्हतं ना! एक एक जण आपल्या फील्ड मधले अनुभव सांगत होता. मुक्ता फक्त ऐकत होती. एका क्षणी तिला वाटलं,काहीतरी कारण काढून घरी परत जावं.
“मुक्ता, कुठे लक्ष आहे? तू बोल ना काहीतरी तुझ्याबद्दल!” सागर म्हणाला.
“माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही रे! मी एक साधी गृहिणी! मी तुमच्यासारखं असं अभिमानास्पद काहीही केलं नाही.”
दुपारचा चहा झाला. मुक्ताने सगळ्यांना रव्याचे लाडू दिले.
“मुक्ता, अग काय सुंदर लाडू केलाय. चविष्ट! पुढचं गेटटुगेदर तुझ्याच घरी! इतकी सुगरण मैत्रीण असताना हॉटेलचं कशाला खायचं? काय ग चालेल ना तुला?”
“हे काय विचारणं तुषार! कधीही ठरवा. सर्वांचे मनापासून स्वागत आहे.”
गप्पा,आठवणी ह्यात दिवस कसा सरला ते कळलंच नाही. निघण्यापूर्वी सागर म्हणाला,
“लिसन गाईज! आता ‘मुक्ता- द नाईटिंगेल ऑफ अवर क्लास.’ एक गाणं गाणार आहे. ही बुलबुल इतक्या वर्षांनी भेटली आहे. तिच्या गाण्याशिवाय आपलं गेटटुगेदर अपूर्ण आहे.”
“सागर,अरे हे काय? मला आता गायची अजिबात सवय नाही. आता मी फक्त बाथरूम सिंगर आहे.” मुक्ताला हे अनपेक्षित होतं.
“तुझं काहीही ऐकणार नाही. तुला गाणं गावच लागेल.” सुवर्णा मुक्ताचा हात धरत म्हणाली.
“अग पण कुठलं गाणं म्हणू?”
“तेच गा की,तुझं आवडतं, नेहमी गायचीस. ‘अभिमान’ सिनेमातलं..’पिया बिना,पिया बिना,बासिया बाजेना…” मंथन म्हणाला.
मुक्ताला दडपण आलं,पण सगळ्यांच्या आग्रहापुढे तिला नमतं घ्यावं लागलं. तिने गायला सुरवात केली. ‘पिया बिना’…
गाणं संपलं आणि तल्लीन झालेले सगळे उठून उभं राहून टाळ्या वाजवायला लागले. प्रीती मुक्ताजवळ आली,तिच्या कपाळावर ओठ टेकत म्हणाली,”सो स्वीट मुक्ता! किती सुंदर आवाज आहे अजूनही तुझा! शाळेतली दोन वेण्यांची बक्षीस घेणारी मुक्ता आठवली.”
“बक्षीस तर तिला आजही मिळणार आहेच. माझी जाहिरातीची एजन्सी आहे. मुक्ता, तुला एका जिंगलसाठी मी साइन करतोय. मॅडम,आपली फी सांगाल का?” सागर मुक्ताची चेष्टा करत म्हणाला.
“मी म्युझिक शो नेहमीच अरेंज करतो. मुक्ता, यु आर इन अवर गृप.” निलेश म्हणाला.
“मेरा बस चलता तो उसको मै यु एस ले जाता और वहा शो करता.” मंथन म्हणाला.
सगळ्यांचं तिच्यावरचं इतकं प्रेम बघून मुक्ताला गहिवरून आलं. आयुष्यात मित्र,मैत्रिणी किती महत्वाचे असतात हे तिला प्रकर्षाने जाणवलं. तिचा न्यूनगंड कुठल्या कुठे पळाला. एक नवीन आत्मविश्वास निर्माण व्हायला लागला होता. आता खरंच तिला काहीतरी करावं असं वाटायला लागलं आणि ती करणार होती…..
★समाप्त★
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
Excellent story