आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास …… राजेश सहस्त्रबुद्धे
मंडळी माझ्या मागच्या लेखात आपण नकारात्मक विचार दूर करून सकारात्मक रहायला सुरुवात करायची हे वाचल
सकारात्मक रहायला सुरुवात केली की पुढच पाऊल टाकायच,म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे हे होय.
व्यक्तिमत्वाचा विकास करणे हे अनेकांना अवघड काम वाटते. तस पाहिल तर आपण आपल्या दैनंदिन जीवनात जसे वागतो, विचार करतो तसेच आपले व्यक्तिमत्व घडते. समाजात घडणाऱ्या घटनांचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो. खर तर आपण जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करतो, आणि त्याचमुळे आपण कुठे तरी कमी पडतोय ही भावना मनात तयार होते आणि त्यातूनच पुढे जाऊन नैराश्य येते.
आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे
जेव्हा तुम्ही काही क्रिया करता, त्या क्रियेतून एक प्रकारची उर्जा निर्माण होत असते. ही उर्जा फक्त आणि फक्त तुमच्यातील आत्मविश्वासाची असते. मित्रहो हा आत्मविश्वास पैसे देऊन बाजारात मिळत नाही किंवा आपण online पण मागवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला अपार कष्ट करावे लागतात.
सोळा वर्षाचा कोवळा सचिन जेव्हा पाकिस्तान विरुद्ध जेव्हा प्रथमच मैदानावर उतरला होता तेव्हा त्याच्यासोबत नवज्योत सिद्धू मैदानावर खेळत होता. पाकिस्तानी खेळाडूच काय तर सिद्धूला सुद्धा सचिनला पाहून हसू आले होते.
सचिनला पाकिस्तानी गोलंदाजाने पहिलाच बॉल बाउंसर टाकला. सचिनचा अंदाज चुकला आणि बऱ्याच जणांचा काळजाचा ठोका कारण सचिन रक्तबंबाळ झाला होता. सिद्धुला वाटले, काय खेळाडू पाठवलाय? याला पाकिस्तानी आग ओकणार्या गोलंदाजां समोर खेळताच येणार नाही. त्याने सचिनकडे जाऊन त्याची विचारपूस केली त्याला ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन नंतर परत येणार, का, असाच खेळणार अस विचारल,सचिन निश्चिंत होता ,मैदानावरच त्यानी मलमपट्टी करून घेतली आणि नंतर तो फक्त म्हणाला हम खेलेगा आणि पुढच्या चेंडूपासून पाकिस्तानी खेळाडूंना या सोळा वर्षांच्या मुलाने मैदानावर नुसते पळवले, कारण त्याच्या हम खेलेगा ह्या वाक्यात होता प्रचंड आत्मविश्वास. हा प्रत्येकातच असतो असे नाही. सचिन शाळेतून तडक मैदानावर आला होता असेही नाही, तर त्याच्या नियमित सरावा मुळे त्याच्यात हा आत्मविश्वास आला होता. त्याच आत्मविश्वासाच्या बळावर आज निवृत्त होऊन इतकी वर्ष झाली तरी तो जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे.
तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगही शकता पण तो आत्मविश्वास टिकवण्यासाठी तुमच्याकडे संयम असणे गरजेचे आहे
विठ्ठल कामत हे नाव कदाचित तुम्ही ऐकले असेल. हो अगदी बरोबर, ज्या माणसाची शेकडो रेस्टॉरंट आहेत. त्यांची मी एकदा मुलाखत ऐकत होतो,त्यात त्यांनी सांगितल की मी एकदा आत्महत्या करण्याच्या तयारीत होते. पण एका पेंटरमुळे मी माझा निर्णय बदलला. त्याचा खुलासा करताना ते म्हणाले की मी डोक्यावरच्या कर्जाने हैराण झालो होते. मला काहीच मार्ग दिसत नव्हता. तेव्हा मी माझ्या मित्राला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात गेलो होतो. ते कार्यालय अत्यंत उंचावर होते. मित्र काही कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यामुळे मी एका खिडकीपाशी गेलो आणि मला एक क्षण त्या खिडकीतून ऊडी मारावीशी वाटली. परंतु, अचानक माझ लक्ष समोर गेल,तिथे एक पेंटर तितक्याच उंचीवर काहीतरी रंगवत असल्याचे मला दिसले ,त्या पेंटरच्या हातात काहीच नव्हते. वरून सोडलेल्या दोरीच्या टोकाला एक फळी होती फक्त ,बाकी कशाचाही आधार त्याने घेतला नव्हता. परंतु तरीही तो त्याच्या कामात मग्न होता. त्या पेंटर कडून मला धडा मिळाला, तो जर कुठल्याही आधाराशिवाय केवळ त्याच्यात असणाऱ्या आत्मविश्वासाच्या बळावर जगू शकतोय तर मी का नाही? मी माझा विचार बदलला आणि त्या नंतर डोक्यावरचे कर्ज पण उतरवले.
आज जर आपण पाहिल तर त्यांच्या क्षेत्रात त्यांचा कोणीही हात धरु शकत नाही.
कामत म्हणतात,आपण आपल्या परिस्थितीकडे पाहून रडत असतो. परंतु, आपण इतरांची परिस्थिती पाहिली तर आपण किती सुखात आहोत याचा आपल्याला अंदाज येईल आणि मला वाटत हे अगदी खर आहे.
आणखी एक अशीच गोष्ट आहे. एकदा एका अपघातात एका व्यक्तीचा एक हात मोडला. त्याला प्रचंड दु:ख झाले. त्याला नैराश्य आले. तो काही काम करण्यास तयार होईना. त्याने घराबाहेर पडणेच बंद केले. यामुळे त्याचे कुटुंब रस्त्यावर आले. त्यांचे हाल सुरू झाले. तरीही ती व्यक्ती काही केल्या आपली निराशा सोडत नव्हती,एके दिवशी त्याचे कुटुंबीय त्याला एका मंदिरात घेऊन गेले, तिथे एक मुलगा फुलं विकत होता आणि त्याची आई त्याला जेवू घालत होती. त्याला पाहून त्या व्यक्तीलाही हुरुप आला. जर बालपणापासून त्या मुलाचे दोन हात नसताना तो फुल विकून आपले घर चालवू शकतो तर मग मी का नाही हा विचार करुन त्यानेही पुन्हा नव्या उमेदीने व्यापार सुरू केला.
असेच जेव्हा तुम्हाला आपले दु:ख जास्त असल्याचे जाणवेल त्यावेळी तुम्ही तुमच्यापेक्षा अधिक दु:खी असलेल्या एखाद्या व्यक्तीकडे पहा मग तुम्हाला जाणवेल, की त्यापेक्षा तुम्ही अधिक सुखात आहात. म्हणून काहीही झाले तरी आपला आत्मविश्वास गमावू देऊ नका कारण त्याच्या बळावर तर यश खेचून आणू शकता. तुम्हाला जर मनापासून वाटत असेल की आपल्या व्यक्तीमत्वात आमूलाग्र बदल व्हावा तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास प्रबळ केला पाहिजे
बघा करा सुरुवात दिवाळीच्या मुहूर्तावर स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासाची.