“भिकूसासेठ” कौस्तुभ केळकर नगरवाला
“भिकूसासेठ”
साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल.
सकाळी साडेसहाची वेळ.
मित्राचं पेठेत दुकान आहे.
बाबा गावाला जायचे होते म्हणून त्यांना सोडायला, स्टॅन्डवर गेलो होतो.
येता येता त्याच्याकडे डोकावलो.
आमचा हा मित्र सकाळी सव्वासहाला दुकान ऊघडतो.
दुकान चालतंय कसलं पळायचं.
नीचे दुकान ऊपर मकान.
जनरल कम किराणा.
दूध,ब्रेड,बटर,अंडी,केक,बिस्कीटं,घडीच्या पोळ्या घेणारी, गिर्हाईकं सकाळपासून गर्दी करायची.
दुकानापाशी पोचलो.
दुकानासमोरचा डांबरी रस्ता.
तेवढा तुकडा छान झाडून घेतलेला.
पायरीपाशी कोपर्यात एक स्टीलची रिकामी बादली.
मित्रानं पाण्याचा छान सडा घातलेला.
पाण्याचा छान ओलेता वास येत होता.
पायरीसमोर वहिनी छान रांगोळी काढत होती.
मी दुकानात शिरलो.
वहिनी सुद्धा घरात शिरली.
पाच दहा मिनटं गप्पा झाल्या.
बेल वाजली.
दुकानातला पोरगा वर जाऊन चहाचा ट्रे घेऊन आला.
बेल वाजणं म्हणजे चहा तयार आहे.
घुटक घुटक चहा घेत होतो.
एवढ्यात एक माणूस दुकानात शिरतो.
पांढरा शुभ्र पायजमा.
पांढरा बंडीसारखा शर्ट.
डोक्यावर गांधी टोपी.
“नमस्कार मालक.
कसे आहात ?”
मित्र लगेच ऊठला.
काऊंटरची फळी ऊघडून त्यांना आत घेतलं.
बसायला खुर्ची दिली.
पटकन् वरची बेल वाजवली.
पाच मिनटात पुन्हा चहा आला.
एकंदर बडी आसामी असावी.
“मालक एक विनंती आहे.
वहिनी रोज पायरीपुढे रांगोळी काढते.
तू देवाला हारफुलं वाहतो.
ऊदबत्ती लावतो.
प्रसन्न वाटतं.
पन तू रोज बादलीभर पाणी मारतो ना रस्त्यावरी.
ते नको करत जाऊस बाबा.
पाणी वाया जाते अशान्.
पाण्यामदी जीव असतो.
पाणी देव हाये आमच्यासाठी.
देवाचा अनमान करू नका माऊली…”
पाच दहा मिनंट गप्पा मारून पाहुणे गेले.
” कोण ?”
मी विचारलं.
‘तू ओळखलं नाहीस ?’
‘नाही बुवा.
‘भिकूसाशेठ. चोपडा ज्वेलर्सचे मालक.’
‘सज्जनमाणूस.
सचोटीनं धंदा करतोय गेली अनेक वर्ष.
शून्यातून ऊभं केलंय सगळं.
एम जी रोडवरची मोठी पेढी.
ऊपनगरातही मोठं दुकान चालू केलंय नुकतंच.
घनो चोखो धंदो.
म्हातार्याला वेड लागलंय.
सकाळी सकाळी गावभर हिंडत असतो.
कुणी दुकानापुढं सडा घालताना दिसला,
की हात जोडून ऊभा राहतो.
पाणी वाया घालवू नका म्हणतो.
लोकं तेवढ्यापुरतं ऐकतात..
तो पुढं गेला की रस्ते पुन्हा ओले.
आपला गाव कसाय तुला माहित्येय.
नळांना तोट्याच नाहीत..
पाणी भरून झालं तरी नळ तसेच वाहतो.
शेकडो लीटर पाणी वाया जातं.
भिकूसाशेटच्या चुलतभावाचं हार्डवेअर शाॅप आहे.
त्याच्या हातात पिशवी असते.
पिशवीत पान्हा आणि तोट्या.
वाहतं पाणी दिसलं की हा तिथं जातो.
तोटी लावून देतो.
स्वखर्चानं…
मान्य.
पाणी वाया जातं.
दुकानापुढं पाणी मारलं की धूळ खाली बसते.
जरा गारवा वाटतो.
याला कोण सांगणार ?
बरं इथं पाणी वाचलं तरी ते तिकडे दुष्काळी भागात,
कसं पोचेल ?
म्हातार्याची सटकलीय झालं…’
मला हे माहितचं नव्हतं.
मला यात स्टोरीचा वास आला.
दुसर्या दिवशी सकाळी म्हातार्याला गाठला.
तो आणखीन एका दुकानात शिरला.
” सकाळी दुकानापुढे पाणी मारू नका ”
त्याची आर्जव, त्याची विनवणी.
त्याच्या हातातली पिशवी, तोट्या.
सगळं रेकाॅर्ड केलं.
न्यूजचॅनलला पाठवून दिलं.
पेपरमधे छापून आलं.
म्हातारा फेमस.
तरीही बदलला नाही.
त्याची रोजची प्रभातफेरी चालूच.
आताशा दुकानदारांना लाज वाटायला लागली.
डांबरी रस्त्यांवरचे ओले सडे जवळजवळ बंद.
ऊघड्या नळाचं वाहतं पाणी बंद झालं.
न्यूज चॅनलवाल्यांनी याचं पुन्हा एकदा फीचर केलं.
त्याचा छोटासा इंटरव्ह्यू.
ढसाढसा रडला म्हातारा.
“‘मारवाडातलं कोरडं ठाक गाव होतं माझं.
चार चार किलोमीटर पाण्यासाठी,
वणवण फिरायची आई माझी.
आईबरोबर मीही.
एक एक थेंब प्राण कंठाशी आणायचा.
पाण्यात देव दिसायचा.
इथली ऊधळमाधळ बघितली की जीव तुटायचा.
मला पता आहे, लोक माघारी टिंगल करतात.
धापैकी एक मानस तरी ऐकतो.
माझा काम झाला की मग..”
त्याचा ईंटरव्ह्यू ऐकला आणि मला,
म्हातार्यातच देव दिसू लागला.
मागच्या महिन्यात गावी गेलो होते.
बर्याच वर्षांनी.
पेठेतल्या मित्राच्या दुकानी पोचलो सकाळी सकाळी.
एकदम आठवण झाली.
“त्या भिकूसाशेटचं काय झालं ?”
‘पेठेतलं दुकान बंद झालं त्यांचं.
झालं म्हणजे त्यानंच बंद केलं.
रिटायरमेंट.
ऊपनगरातलं चाललंय जोरात.
ते दुकान पोरं सांभाळतात.
कोटी कोटींची ऊड्डाणं.
म्हातार्यानं एका पैशाला हात लावला नाही.
डोंगरगावला मोठी टाकी बांधून दिली आईच्या नावानं.
बायाबापड्यांचे ऊन्हाळ्यात फार हाल व्हायचे.
तिथं नळाला पाणी आलं,
आणि ईकडे म्हातार्याने डोळे मिटले..”
दोन मिनटं कुणीच बोललं नाही.
ग्रेट होता भिकूसाशेट.
मी मनातल्या मनात त्याला हात जोडले…
आणि निघालो.
कालचीच गोष्ट.
सोसायटीत एक जण रोज गाडी धूतो.
त्याला गाठला.
हात जोडून विनंती केली.
” रोज नको आठवड्यातून एकदा धूत जा ”
त्यानं ऐकलं.
मी खूष.
एकदम भिकूसा आठवला.
डोंगरगावचा नळ माझ्या डोळ्यातून ठिबकू लागला.
कौस्तुभ केळकर नगरवाला . *माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही.