दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

*साँरी बाबा* -दीपक तांबोळी 9503011250 (ही कथा माझ्या ” गिफ्ट ” या पुस्तकातील आहे)

*साँरी बाबा*

-दीपक तांबोळी

टिव्हीवरच्या बातम्या पहातापहाता शेखरची नजर भिंतीवरच्या घड्याळाकडे गेली.साडेदहा वाजले होते.पुजाचा अजून पत्ता नव्हता.नऊ वाजताच त्याने तिला फोन करुन किती वाजता येते आहेस असं विचारलं होतं तेव्हा तिने साडेदहा अकराची वेळ दिली होती.त्याने अकरापर्यंत वाट पहायचं ठरवलं.जांभया देत तो टिव्ही पाहू लागला.पाच पाच मिनिटांनी त्याची नजर घड्याळाकडे जात होती.शेवटी अकरा वाजले.पुजा आली तर नाहीच तिचा फोनही आला नाही.शेखरने धीर धरुन तिला फोन लावला.बऱ्याच वेळ रिंग वाजली.तिने काँल उचलला नाही.दोन मिनीट थांबून त्याने परत काँल केला.आताही बराच वेळ रिंग वाजली पण शेवटी तिने काँल उचलला.
“हँलो बेटा कुठे आहेस?तू येणार होतीस ना अकरापर्यंत?”
“अहो कशी येऊ बाबा?पार्टी आतातर सुरु झालीये”
मागून कुठल्याशा वेस्टर्न साँगचा इतका मोठा आवाज येत होता की तीला तो काय म्हणतोय तेच व्यवस्थित कळत नसावं.
“बरं मग केव्हा संपणारआहे पार्टी?आणि केव्हा येणारेस तू घरी?”
” अहो बाबा मी आता कसं सांगू केव्हा संपेल पार्टी?”
तिचा चिडलेला स्वर त्याच्या लक्षात आला “तुम्ही काही काळजी करु नका.मी येऊन जाईन पार्टी संपली की!तुम्ही झोपा.माझ्याजवळ आहेच दुसरी चावी”
“अगं बेटा काळजी वाटते गं!”
“ओहो कमाँन बाबा मी आता काही लहान नाही राहिले.चांगली एकोणीस वर्षाची आहे मी!”
“अगं बेटा म्हणूनच जास्त काळजी वाटते गं”
“जाऊ द्या बाबा,तुमचं हे नेहमीचंच आहे.पार्टी रंगात आली की फोन करुन डिस्टर्ब करायचं!सांगितलं ना तुम्हांला,पार्टी संपली की मी येऊन जाईन.बस मग!आता त्रास देऊ नका.मी ठेवतेय फोन” पुढच्याच क्षणी फोन कट झाला.
तिच्या अशा वागण्याचा त्याला संताप आला.पण त्याने मनाला समजावलं.आजकाल बऱ्याचदा ती पार्टीला जायची पण बारासाडेबारापर्यंत घरी येऊन जायची.याही वेळेला येईल अशी स्वतःची समजूत घालत त्याने टिव्ही बंद केला.आणि झोपायला गेला.

पुजा शेखरची एकुलतीएक पोर.त्याची बायको सविता १३ वर्षांपुर्वीच वारलेली.त्यावेळी पुजा फक्त सहा वर्षांची होती.शेखर धुळ्याला एका सरकारी कार्यालयात कारकूनाचं काम करत असतांना घडलेली ही घटना.संसार सुखाचा चालू असतांना सविताला कावीळ झाला.डाँक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि चुकीच्या औषधोपचारामुळे धडधाकट सविताचा म्रुत्यु झाला.तिच्या या अकाली जाण्याने शेखर खचला.पण एक दिवस एका डाँक्टरनेच त्याला उपचारात हलगर्जीपणा झाल्याचं दाखवून दिल्यावर शेखर पेटून उठला.त्याने जिल्हा ग्राहक मंचात डाँक्टरविरुध्द तक्रार दाखल केली.यादरम्यान त्याला त्याच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी दुसरं लग्न करायचा सल्ला दिला.तो रास्तच होता कारण शेखरच वय तेव्हा फक्त ३२ होतं.पण सावत्र आईच्या छळाच्या इतक्या गोष्टी त्याने ऐकल्या होत्या की आपल्या लाडक्या लेकीला अशा कजाग आईच्या हातात द्यायला त्याचं मन काही तयार झालं नाही.शिवाय पुजाचं संगोपन करायला आजीआजोबा होतेच.म्हणून त्याने लग्नाचा विचारच मनातून काढून टाकला.कोर्टकेस सुरु होतीच.दुर्दैवाने जिल्हा ग्राहक मंचात हरल्यानंतर त्याने राज्य ग्राहक मंचात अपील केलं.त्यात तो जिंकला.त्याला नुकसानभरपाई तर मिळालीच पण डाँक्टरलाही सजा झाली.अर्थात जीवाभावाची बायको गमावल्यावर या जिंकण्याचा त्याला काहीच फायदा नव्हता.कोर्टकेस तर जिंकली पण त्याच वर्षात एकापाठोपाठ त्याच्या आईवडीलांचं निधन झालं.तो आणि त्याची लेक परत एकदा पोरके झाले.नाही म्हणायला वेगळे निघालेले त्याचे भाऊ होते पण त्यांचा फारसा काही उपयोग नव्हता.आजीआजोबा गेले तेव्हा पुजा नववीत होती.शेखरने तिला स्वयंपाक आणि इतर कामं करायला शिकवलं.तिच्यावर चांगले संस्कार केले.पुजा बारावी पास झाली आणि त्याचं वेळी शेखरची प्रमोशनवर पुण्याला बदली झाली. आपल्या मुलीने आय.ए.एस.आँफिसर व्हावं असं शेखरचं स्वप्न होतं.पुण्यात तिचं चांगलं शिक्षण होईल.युपीएससीचे क्लासेसही तिला जाँईन करता येतील या हिशोबाने त्याने पुजालाही पुण्याला आणलं.एका चांगल्या नामांकित काँलेजमध्ये तीची अँडमिशन करुन दिली.काही महिने सर्व आलबेल सुरु होतं.हळूहळू पुजाची मैत्री काँलेजमधल्या उच्चभ्रूंच्या मुलामुलींशी झाली.पुजाचं सौंदर्यही त्याला कारणीभूत होतं.शेखरलाही यात काही वावगं वाटलं नाही.अशा मुलांशी झालेल्या मैत्रीचा तिच्या करीयरला फायदा होईल असं त्याला वाटलं.दुसऱ्या वर्षापासून पुजाच्या मैत्रीने वेगळं वळण घेतलं.शेखरने लाडक्या लेकीचा हट्ट पुर्ण करुन तिला पन्नास हजारांचा स्मार्टफोन घेऊन दिला होता.त्या स्मार्टफोनचा उपयोग मित्रमैत्रिणींशी चँटींग करतांना होऊ लागला.पहिल्या वर्षी सदोदीत घरात रहाणारी पुजा दुसऱ्या वर्षी फक्त जेवायला आणि झोपायला घरी येऊ लागली.पार्ट्यांचं तर पीकच फुटलं होतं.कधी ही पार्टी तर कधी ती पार्टी.कधी शनिवार रविवार आऊटींग.पुजाला बापाकडे आणि अभ्यासाकडे बघायला वेळ मिळेनासा झाला.सकाळी ती दहा वाजता उठायची तेव्हा शेखर दोघांचा स्वयंपाक करुन आँफिसला
निघून गेलेला असायचा.तो संध्याकाळी सात वाजता घरी यायचा तेव्हाही ती काँलेजमधून आलेली नसायची.त्याने फोन केला की सांगायची “आज कुणीतरी अमूक पार्टी देतोय मी उशीरा घरी येईन”.तिला एकदा खडसून जाब विचारावा असं त्याला वाटायचं पण त्या एकुलत्या एक आईविना पोरीला दुखवायचं त्याच्या जीवावर यायचं.नाही म्हणायला दोनतीनदा त्याने तिला विचारलंही पण “बाबा घरी तुमच्याशिवाय कोण असतं?मला घरात करमत नाही”असं बोलून ती त्याला चुप करायची.शेखर लेकीवरच्या प्रेमापुढे हतबल झाला होता.थोडी मोठी झाली की तिला स्वतःलाच जबाबदाऱ्या कळतील अशी स्वतःची तो समजुत करुन घ्यायचा.पण पुजाचा उध्दटपणा दिवसेंदिवस वाढतच चालला होता.आपला बाप जुन्या आणि आऊटडेटेड विचारांचा आहे,जग कुठे चाललंय आणि हा मात्र अजुनही मध्यमवर्गीय चालीरीतींना पाळतो हे तिच्या मनातलं तिच्या बोलण्यातून बऱ्याचदा त्याला जाणवायचं. तिच्या अशा वागण्यामुळे बापलेकीत दुरावा निर्माण झाला होता हेही त्याला कळत होतं.

थोड्यावेळाने त्याला जाग आली.मोबाईलवर त्याने पाहिलं.रात्रीचा दीड वाजला होता.पुजा आली की नाही या काळजीने तो उठला.तिच्या रुमचं दार त्याने ढकलून पाहिलं.रुम रिकामी होती.आता मात्र चिंता आणि राग त्याच्या मनात उफाळून आला.फोन करुन तिच्यावर तोंडसुख घ्यावं या विचाराने त्याने हातातल्या मोबाईलवर तिचा नंबर डायल करायला सुरुवात केली नाही तोच त्याचाच मोबाईल वाजला.पुजाचाच फोन होता.
“कुठं आहेस तू बेटा?केव्हाची वाट बघतोय तुझी” त्याने वैतागाने विचारलं
“हँलो मी पुजा नाही इन्स्पेक्टर जाधव बोलतोय” इन्सपेक्टर हा शब्द ऐकल्यावर एक भीतीची लहर त्याच्या काळजातून आरपार निघून गेली.
“इन्स्पेक्टर जाधव?हा फोन तुमच्याकडे कसा?”
“तुम्ही पुजा राणेचे वडील का?”
“हो.का काय झालंय?”भीती आणि काळजीने त्याचे हातपाय थरथरायला लागले.
” तुमच्या मुलीचा अँक्सीडंट झालाय.अँक्सीडंटच्या जागेवर हा मोबाईल मिळाला.त्यात “बाबा”नावाने तुमचा नंबर सापडला.त्यावरुन काँल करतोय.तुम्ही ताबडतोब सिटी हाँस्पिटलला पोहचा”
“अँक्सीडंट?कसा काय?”त्याचे हातपाय आता लटलट कापायला लागले.डोळ्यात पाणी दाटू लागलं.
“अहो प्रश्न विचारत बसू नका.ताबडतोब हाँस्पिटलला पोहचा.मुलगी जिवंत हवी आहे ना?”
“बापरे म्हणजे इतका मोठा झालाय अँक्सीडंट?”त्याच्या तोंडातून नकळत एक हुंदका निघून गेला.
“हो!लवकरच पोहचा.मी तिथेच आहे.तुमची वाट बघतोय”आणि फोन कट झाला.
शेखर मटकन पलंगावर बसला.भीती आणि काळजीने त्याचं शरीर शक्तीहीन होऊन कापत होतं.डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात होत्या.काय झालं असेल त्याच्या काळजाच्या तुकड्याला या विचाराने त्याला भ्रमित झाल्यासारखं होऊ लागलं.
“आपल्याला आता सावरायला हवं.असं नुसतं बसून कसं चालेल.जे घडलंय त्याला तोंड तर द्यावंच लागणार आहे” या विचारासरशी तो उठला.डोळे पुसून त्याने आँफिसमधल्या मित्राला फोन लावला.खरं तर शेजाऱ्यांना उठवायचाही त्याच्या मनात विचार चमकून गेला.पण मदत तर दुरच मात्र शहाणपणाच्या दोन गोष्टीच शिकवायला ते मागेपुढे पहाणार नाही हे त्याच्या लक्षात आलं.
मित्राशी बोलून त्याने त्याला सर्व थोडक्यात सांगितलं आणि गाडी घेऊन बोलावलं.सुदैवानं तो जवळच रहात असल्याने ताबडतोब आला.
दोघंही सिटी हाँस्पिटलला पोहचले तेव्हा इन्स्पेक्टर त्यांची वाटच पहात होता.
“मी शेखर राणे.अगोदर मला मुलीला भेटू द्या मग तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो”
“ओके.तुमची मुलगी आय.सी.यू.त आहे.डाँक्टरांना भेटून घ्या.”
शेखर धावतच आय.सी.यु.कडे गेला.डाँक्टर बाहेरच येत होता.
“डाँक्टर काय झालंय माझ्या मुलीला?”त्याने घाईघाईतच डाँक्टरला विचारलं
“तिच्या डोक्याला जबरदस्त मार बसलाय.एक हात आणि एक पाय मोडलाय.बाकीही बऱ्याच जखमा आहेत.आत्ताच काही सांगू शकत नाही”
“बापरे!पण होईल ना सगळं व्यवस्थित?”
“म्हंटलं ना काहीच सांगता येत नाही म्हणून!आम्ही काही टेस्टस् करतोय.त्यानंतरच काय ते क्लियर होईल.पण सध्या तरी नो होपस्.चोवीस तास ती जगली तर ठीकच नाही तर कठीण आहे”
डाँक्टर निघून गेला.शेखरच्या डोळ्यापुढे अंधारी आली.त्याच्या मित्राने त्याला खांद्याला धरुन खुर्चीत बसवलं.तेवढ्यात इन्स्पेक्टर तिथे आला.
“पाहिलं मुलीला?आता मला सांगा ही तुमची मुलगी इतक्या रात्री कुठे गेली होती?”
“ती पार्टीला गेली होती”
“कुठे?”
“एका हाँटेलमध्ये.मला हाँटेलचं नाव आठवत नाही”
“कमाल आहे.आठवत नाही की तुमच्या मुलीने सांगितलं नाही?बरं तिच्यासोबत बाईकवर जो मुलगा होता तो कोण? त्याचं नाव काय?”
“मला काहीच माहित नाही.हे कसं घडलं हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्हीच प्लीज मलाही सांगा”
” सांगतो.तुमची मुलगी आणि तो मुलगा इतक्या रात्री कुठंतरी निघाले होते.ओव्हरटेकचा प्रयत्न करतांना एका ट्रकने त्यांना उडवलं.असं त्या ट्रकचा ड्रायव्हर सांगत होता़.मुलगा आँन द स्पाँट खलास झालाय”
“बापरे!”
“असे कसे तुम्ही बाप?काहीच माहिती नाही म्हणताय!आम्ही माहिती काढली.अहो ही मुलं हायवे ईन नावाच्या हाँटेलमध्ये पार्टीच्या नावावर धिंगाणा घालत होती.तुमच्या मुलीला घरी सोडायला हा मुलगा बाईकवर निघाला होता.दोघंही प्यायलेल्या अवस्थेत होते”
“काही काय सांगता?माझी मुलगी तसं करणं शक्यच नाही”शेखर चिडून म्हणाला
“रिपोर्ट्स दाखवेन मी तुम्हांला. मुलीची आई कुठेय?”
“मुलीची आई वारलीयेे”
“ओह.म्हणूनच मुलगी अशी वाया गेलीये.तुम्ही दिवसभर तुमच्या कामात असता.मुलगी काय गुण उधळतेय याकडे लक्ष द्यायला तुम्हांला वेळ नाही.मला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे मिस्टर राणे.पण बघितलंत ना काय भयंकर परीणाम झालेत ते!आय होप शी विल बी आँलराईट.ठीक आहे येतो मी.काही माहिती लागली तर कोआँपरेट करा”
शेखरने मान डोलावली.इन्स्पेक्टर गेला.त्याने सांगितलेल्या माहितीने शेखरचं मन विदीर्ण होऊन गेलं.खरंच पुजा दारू प्यायली होती?त्याला स्वतःला कोणतंच व्यसन नव्हतं.मग पुजाला ही सवय जडली कशी?ती आजच प्यायली होती की प्रत्येकच पार्टीत प्यायची?म्हणून त्याला कळू न देण्यासाठी ती उशीरा तर येत नसावी?तिच्या अशा वाया जाण्याला आपण किंवा घरातला एकटेपणा तर जबाबदार नाही ?असंख्य प्रश्नांचा भुंगा त्याच्या डोक्याभोवती फेऱ्या घालत होता.
“मिस्टर राणे?”समोर एक तरुण उभा होता
“हो.बोला मीच राणे आहे”
“तुम्हांला रिसेप्शनवर पंचवीस हजार भरायला सांगितले आहेत”
“ठिक आहे.येतो मी”
तो रिसेप्शनवर गेला.कार्ड स्वाईप करुन त्याने भरले.
“उद्या दिवसभरात एक लाख रुपये डिपाँझिट करा मिस्टर राणे”रिसेप्शनिस्ट बोलली
“बापरे एक लाख?एवढे कशासाठी?”
“अहो तुमची मुलगी सिरीयस आहे.तिच्या मेंदूचं आँपरेशन करावं लागलं तर यापेक्षाही जास्त लागतील.तुर्त एवढे जमा करा”
“पण माझ्याकडे इतकी कँश नाही.मला एफ.डी.मोडाव्या लागतील”
“ठिक आहे.उद्या दिवसभरात जमेल ते करा.पण पैसे जमा करा.नाहीतर दुसऱ्या हाँस्पिटलला हलवायला तुम्ही मोकळे आहात ” रिसेप्शनिस्ट कठोर शब्दात म्हणाली.
“करतो प्रयत्न” तिच्या माणुसकीहीन वागण्याने त्याचं डोकं भणभणायला लागलं.

तीन दिवस शेखर सतत तिथे बसून होता.पुजाच्या मोडलेल्या हाताला आणि पायाला प्लास्टर लागलं.पण अजुनही ती शुध्दीत नव्हती.तिच्या काळजीने शेखरचंं मन पोखरत होतं.संध्याकाळी तो डाँक्टरला भेटला
“सर ती शुध्दीवर का येत नाहिये.तिच्या ब्रेनचं आँपरेशन करणार होतात ना तुम्ही?”
“नाही.त्याची काही गरज नाही.वेल मिस्टर राणे आय अँम साँरी टु से ती बहुतेक कोमात गेलीये”
शेखरला जबरदस्त धक्का बसला.त्याचे डोळे आसवांनी भरुन गेले
“काय?कोमात गेलीये.आर यु शुअर डाँक्टर?”दुःखाने त्याचा आवाज कापत होता.
“वेल आय अँम नाँट कन्फर्म. पण आम्ही न्युराँलाँजिस्टला बोलावलंय.त्यांच्या ओपिनियन नंतरच आपण फायनल डायग्नोसिस करु शकतो”
“केव्हा येणारेत ते डाँक्टर?”
“विदीन वन अवर ही विल अराईव्ह.तुम्ही बाहेर थांबा.ते आले की मी तुम्हाला काँल करतो”
शेखर बाहेर बसून वाट बघू लागला.असंख्य विचारांनी त्याच्या डोक्यात गर्दी केली होती.तो एक दिड तास त्याला युगायुगासारखा वाटत होता.अखेरीस त्याला बोलावणं आलं.जड अंतःकरणाने तो आत गेला.
“बसा मिस्टर राणे.आलेल्या सर्व टेस्ट रिपोर्ट्स वरुन आणि माझ्या आँब्झर्वैशनवरुन मला सांगायला वाईट वाटतं की तुमची मुलगी कोमात गेलीये ” डाँक्टर सांगू लागले तसं शेखरने दुःखाने तोंड झाकून घेतलं.कितीही कंट्रोल केलं तरी त्याच्या तोंडातून एक हुंदका निघून गेला.डाँक्टर उठून त्याच्या जवळ आले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले.
“मिस्टर राणे,धीर धरा.तुम्हाला सांगतो.हेड इंज्युरीच्या केसेसमध्ये रिकव्हरीचा रेट खुप जास्त आहे.मला खात्री आहे ती लवकरच रिकव्हर होईल”
“किती दिवसांनी डाँक्टर?आठ,पंधरा,एकवीस किती दिवसांनी ती रिकव्हर होईल?”शेखरने रडत रडत विचारलं
“आय अँम साँरी मिस्टर राणे आय कँनाँट प्रेडिक्ट.देवावर भरंवसा ठेवा.ती लवकरच बरी होईल.”
“पण ती रिकव्हर होईलच का?की अशाच अवस्थेत तिचं काही बरंवाईट….”
” हो तीही पाँसिबिलीटी आहेच.बी प्रिपेअर्ड फाँर वर्स्ट”

पुजा कोमात गेलीये म्हंटल्यावर धुळ्याहून आलेले शेखरचे नातेवाईक हळूहळू निघून जाऊ लागले.असाही त्यांचा शेखरला काय उपयोग होता?त्यातल्या एकानेही त्याला मदतीबद्दल,आर्थिक मदतीबद्दल विचारलं नव्हतं.त्याचे भाऊबहिण फक्त शाब्दिक औपचारिकता पुर्ण करुन निघून गेले.जातांना प्रत्येकाने जाणं कसं गरजेचं आहे याचे खरेखोटे बहाणे रंगवून सांगितले. दोनतीन दिवसांच्या मुक्कामात पुजा कशी वाया गेलेली मुलगी आहे याची त्यांच्यात झालेली चर्चा शेखरच्या बऱ्याचदा ऐकण्यात आली होती.
ते सगळे निघून गेल्यावर भकास झालेलं घर पाहून त्याला त्याच्या बायकोची,सविताची तीव्र आठवण झाली आणि तिच्या फोटोकडे पहात तो हमसून हमसून रडू लागला.मग फोटोला हात जोडून त्याने लेकीच्या प्राणांची भीक मागितली.
आता दवाखान्यात रहाण्याचं त्याला काही कारण नव्हतं.म्हणून तो आँफीसला जायला लागला.तिथेही त्याचं मन लागत नव्हतं.लेकीचा भावनाहीन चेहरा त्याला आठवायचा आणि मग त्याला भडभडून यायचं.संध्याकाळी हाँस्पिटलला जातांना तो पुजाला कचोरी आवडते म्हणून दोन कचोऱ्या बँगेत टाकून जायचा.न जाणो लेकीला जाग आली तर तिला द्यायला बरं अशी वेडी आशा तो बाळगून होता.हाँस्पिटलला येता जाता तिथल्या गणपतीच्या मुर्तीला नमस्कार करुन लेकीला बरं करण्याचं साकडं घालायचा.बाहेर जी जी मंदिरं रस्त्यात लागायची त्यात जाऊन तो नवस कबुल करायचा.कुणी सांगितलं म्हणू शनिवारचे कडक उपवासही त्याने सुरु केले.

पुजाला आता हाँस्पिटलमध्ये एक महिना उलटून गेला होता.नेहमीप्रमाणे संध्याकाळी शेखर कचोऱ्या बँगेत टाकून हाँस्पिटलला गेला.पुजाच्या हातापायाचे प्लास्टर काढून टाकले होते.बहुतेक तिथली हाडं जुळून आली असावी.तिच्या भावनाहीन चेहऱ्याकडे पाहून त्याला कसंतरीच झालं.अनायसे त्याने त्याचा हात तिच्या हातावर ठेवला.आणि एकदम त्याला तिचा हात हलल्याचं जाणवलं.आपल्याला भास झाला आहे असं त्याला वाटलं म्हणून त्याने परत हात ठेवला.आता मात्र त्याला खात्रीच पटली.तिचा हात हातात घेऊन त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं .तो अजून भावनाहीनच होता.तिचा हात हातात धरुन त्याने तिला हाक मारली
“पुजा बेटा”
आणि काय आश्चर्य तिचा चेहरा आक्रसला आणि ओठातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले
“बा….बा”
आनंदातिशयाने शेखरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.खात्री करण्यासाठी त्याने परत विचारलं
“बेटा बरं वाटतंय?”
तिने हलकीच मान हलवली.अश्रू आवरत शेखर उठला.वेगाने तो बाहेर आला.डाँक्टरची केबिन त्याने शोधली.दरवाजा उघडून तो आत गेला.आतमध्ये पेशंट बसले होते.त्यांची पर्वा न करता तो ओरडला
“डाँक्टर पुजा शुध्दीवर आलीये”
डाँक्टरने चमकून बघितलं.मग म्हणाला
“काही काय सांगता?तुम्हांला भास झाला असेल”
“नाही डाँक्टर ती बोलली देखील”
“चला बघुया”असं म्हणून तो त्याच्यासोबत निघाला. पुजाच्या रुममध्ये येऊन पाहतो तर पुजा परत भावनाहीन चेहऱ्याने पडली होती.डाँक्टरने त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने पाहिलं.
“थांबा डाँक्टर मी विचारतो.पुजा बेटा तुला बरं वाटतंय ना?”
पुजाचा चेहरा परत आक्रसला.अस्पष्ट आवाजात ती म्हणाली
“हो बा…..बा”
डाँक्टरने पुढे जाऊन तिच्या डोळ्याची पापणी वर केली.त्यात टाँर्च पेटवल्याबरोबर तिने मान फिरवली.
“येस मिस्टर राणे यु आर राईट”डाँक्टर त्याच्याकडे पाहून हसत म्हणाला.
“डाँक्टर मी तिला कचोरी खाऊ घालू?तीला फार आवडते कचोरी!”
“तुम्हांला वेड तर नाही लागलं ना?अजून ती पुर्णपणे शुध्दीवर नाहीये आणि बऱ्याच टेस्ट कराव्या लागणार आहेत.ते झाल्यानंतरच बघू काय खाऊ घालायचं ते!”
पुजा शुध्दीत आल्याचं त्याने कुणालाच कळवलं नाही.न जाणो कुणाच्या अशुभ चिंतण्याने परत काही झालं तर!

एक आठवड्याने पुजा चांगली बोलायला लागली.पण डाँक्टरांनी तिला कोणताच मानसिक ताण होईल असे प्रश्न विचारायला मनाई केली होती.एक दिवस पुजानेच त्याला विचारलं
“बाबा मी इथे कशी काय?मला आठवतंय ,मी आणि रोहित बाईकवरुन सुसाट निघालो होतो.समोरुन ट्रक आला तेवढं माझ्या लक्षात आहे.पुढे काय झालं?”
“हो बेटा तुम्हांला अँक्सीडंट झाला.एका भल्या माणसाने तुला आणि त्याला त्याच्या गाडीतून या हाँस्पिटलला आणलं”
“मग रोहीत कुठे आहे?”
शेखर अडखळला.सांगू की नाही हा पेच त्याला पडला.
“सांगा ना!काय झालं त्याला?”
” तो गेला बेटा.आँन द स्पाँट गेला होता तो”
तिने डोळे झाकून घेतले पण ती रडली नाही.
“बाबा फार वाईट मुलगा होता तो.तोच काय ती सगळीच मुलं मुली खुप वाईट होती.दुर्दैव हे की मला त्या दिवशी पार्टीत हे कळलं.सगळी बड्या बापाची मुलं.ऐश करणं एवढंच त्यांना माहीत”
“एवढं काय झालं होतं त्या दिवशी पार्टीत?”
“रोहीतचा त्या दिवशी वाढदिवस होता.पार्टीत गेल्यागेल्या मला अस्वस्थ वाटू लागलं.कारण रोहितने दारुच्या बाटल्या आणल्या होत्या.विशेष म्हणजे मुलांसोबत मुलीसुद्धा दारु पित होत्या.रोहीतची मी गर्लफ्रेंड म्हणून आजतरी मी दारु प्यायलाच पाहिजे असं सगळ्यांचं मत पडलं.पण मी नकार दिला.माझ्या मिडलक्लास अँटिट्युडबद्दल सगळ्यांनी माझी टिंगलटवाळी केली.रोहितने केक कापल्यानंतर एका मुलाने माझे हात धरले आणि एका मुलीने मला जबरदस्ती दारु प्यायला लावली.सगळ्यांनी डान्स सुरु केल्यावर डान्स करताकरता रोहित मला उगीचच मिठ्या मारु लागला.मी त्याला खडसावलं तर तो जास्तच चेकाळला.मी रागावून खुर्चीत जाऊन बसले.एका मुलीने मला सांगितलं की रोहितने प्रत्येक मुलामुलीसाठी रुम बुक केल्या आहेत.नेहमी तू पळून जातेस.आज तुला जाता येणार नाही.रोहितसोबत झोपावंच लागेल.ते ऐकून मी हादरलेच.म्हणजे असेही प्रकार चालतात पार्ट्यांमध्ये असं मी तिला म्हंटल्यावर ती हसून म्हणाली”हे तर काँमन आहे.हाय फाय पार्ट्यांमध्ये असंच चालतं”मला त्या मुलामुलींची घ्रुणा वाटू लागली.आधुनिकतेच्या नावावर चाललेला हा धिंगाणा मला पसंत पडला नाही.कुठंतरी
तुम्ही केलेले चांगले संस्कार मला त्या वातावरणात रमू देत नव्हते.मी रोहीतला गाठलं.त्याला मला अस्वस्थ वाटतंय असं सांगून घरी सोडायची विनंती केली.तो मोठ्याने हसला आणि म्हणाला “बेबी अभी तो पार्टी शुरु हुई है।नाचो गाओ ऐश करो।अभी तो तुम्हे “अच्छी अच्छी” फिल्मे देखना है।आज तो तुम्हे यहीपर सोना पडेगा।तुम्हारे वो बास्टर्ड मिडलक्लास बापको फोन करके बता देना” त्याने तुम्हांला शिवी दिलेली पाहून माझा संयम सुटला मी त्याच्या मुस्काटात मारली आणि त्याला ताकीद दिली की मला कोणीतरी घरी सोडा नाहीतर मी तमाशा करेन.माझा रुद्रावतार पाहिल्यावर त्याच्या मित्रांनी त्याला समजावलं आणि मला घरी सोडायला सांगितलं.रोहीत माझा हात धरुन मला ओढत बाहेर घेऊन आला आणि संतापाने बाईकवर बसायला सांगितलं. मी बसल्यावर त्याने बाईक सुसाट सोडली.मी त्याला हळू चालवायला सांगत होते पण तो ऐकत नव्हता.त्यात माझ्यावर घाणेरड्या शिव्यांचा भडीमार सुरु होता.समोरुन एक ट्रक येत असतांना एका बसला त्याने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.भितीने मी किंचाळले.पुढे मी बेशुध्द पडली असेन कारण नंतरचं मला काही आठवत नाही”
एवढं बोलून पुजाने आपलं तोंड झाकून घेतलं.आणि ती मुसमुसत राहिली.शेखर तिच्याजवळ गेला.तिच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाला
“विसर बेटा आता ते सगळं.एक नवं आयुष्य मिळालंय तुला.महिनाभर तू मरणाच्या दारात उभी होतीस.”
” बाबा आमच्या काँलेजची मुलं आली नव्हती मला बघायला?”
” आली होती.दोन दिवस तुझ्या प्रक्रुतीची चौकशी करुन जायची.नंतर पोलिसांनी तुमच्या पार्टीची चौकशी सुरु केली आणि मग ती यायची बंद झाली”
” काय घडलं पोलिसांच्या चौकशीत?”
“ते कळलं नाही.पण तुझ्या बाँयफ्रेंडच्या धनाढ्य वडिलांनी ते प्रकरण दाबून टाकलं असं कळलं.त्याचे आईवडीलही आले होते तुला बघायला.त्यांच्या मुलाच्या म्रुत्युला तू कारणीभूत आहे असं त्यांचं म्हणणं होतं”
” म्हणजे त्यांच्या मुलांनी वाटेल ती थेरं करावी असंच ना?”
“जाऊ दे बेटा.आपण मध्यमवर्गीय माणसं.आपण आपल्या मर्यादेतच रहायला हवं”
“तेच तर चुकलं बाबा माझं.तुम्ही अनेक वेळा समजावलं होतं मला.पण मलाही धुंदी चढली होती.एवढ्या श्रीमंतांची मुलं मला त्यांच्या ग्रुपमध्ये घेतात याचंच मला अप्रुप वाटायचं”
शेखरने तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाला.
“सोड ते विचार.उद्या बहुतेक आपल्याला डिसचार्ज देतील.”
“हो बाबा .मलाही घरची ओढ लागलीये.किती छान आहे ना बाबा आपलं घर”म्हणताम्हणता तिच्या डोळ्यात पाणी आलं.
शेखरने तिच्या खांद्यावर थापटलं.
“चल बेटा.मी निघतो.आता तू उद्या घरी येणार तर घर आवरुन ठेवावं लागेल.खुप पसारा झालाय.तू नव्हतीस तर माझं मनच लागायचं नाही घरात”
तो निघाला.तशी तिने परत हाक मारली.
“बाबा”
त्याने वळून पाहिलं.
“आय अँम साँरी बाबा.आय अँम एक्स्ट्रीमली साँरी”
तो हसला.म्हणाला.
“आता उद्या तू घरी आलीस की सविस्तर बोलूच”

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुजाला डिसचार्ज मिळाला.गावाकडच्या शेतीचा एक तुकडा विकून आणलेल्या पैशाने शेखरने हाँस्पिटलचं बिल भरलं.रिक्षाने ते घरी परतले.सोसायटीच्या गेटमध्ये सगळे रहिवासी जणू तिची वाटच बघत होते.कुणी फुलं तर कुणी फुलांचे बुके,चाँकलेटस् देऊन तिचं स्वागत केलं.आजपर्यंत कधीही न बोललेल्या बायका तिला जवळ घेऊन मिठ्या मारत होत्या.लहान मुलं तिला “वेलकम दिदी” म्हणत होती.त्यांनी केलेलं स्वागत पाहून दोघांनाही खुप आश्चर्य वाटलं.
फ्लँटमध्ये शिरल्यावर सजवलेलं घर पाहून पुजा आनंदीत झाली.सगळीकडे तिला आवडणाऱ्या मोगऱ्याच्या फुलांनी कोपरे सजले होते.त्यांचा सुवास घरभर दरवळत होता.भिंतीवर ” वेलकम टू होम “असा बोर्ड होता.असं स्वागत झालेलं पाहून पुजाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.तेवढ्यात दारावर टकटक झाली. शेखरने दार उघडलं तर समोर एक आजीबाई उभ्या होत्या.
” या आजी”
आजींनी पुढे येऊन पुजाला जवळ घेतलं आणि म्हणाली
“बेटा म्रुत्युच्या दारातून तुझ्या बापाने तुला खेचून आणलं.खुप केलं गं तुझ्यासाठी!.तुमचे नातेवाईक आले ते सांगत होते.तुझ्या बापाच्या तरुणपणातच तुझी आई गेली.फक्त तुझ्यासाठी त्याने दुसरं लग्न नाही केलं.आई काय करेल असे संस्कार तुझ्यावर केले.तुझ्या आनंदातच आपला आनंद मानला.तू हाँस्पिटलमध्ये होतीस त्या काळात त्याचे फार हाल झाले. बघितलं ना तुझ्या काळजीने अर्धा झालाय.आता बेटा त्याला कसलाच त्रास देऊ नकोस”
“अहो आजी माझंच काय सांगताय!बेटा पुजा या दिड महिन्यात आपल्या सोसायटीने माझी खुप काळजी घेतली.माझा सकाळचा डबा या आजीच करुन द्यायच्या आणि संध्याकाळी इतर घरातून मला डबे यायचे.मोठ्या शहरात माणुसकी नसते म्हणतात पण या सोसायटीतले सगळेजण येऊन मला धीर द्यायचे.तुझ्या अपघाताने सगळी सोसायटी एकत्र झाली बघ”
” बरं पोरांनो मी निघते.तुमचा दोघांचा डबा पाठवते.आजच्या दिवस दोघं आराम करा”
आजी गेल्यावर. पुजा शेखरला म्हणाली.
“बाबा आज आईची खुप आठवण येतेय.ती असती तर तिच्या कुशीत मला झोपता आलं असतं”
शेखरच्या डोळ्यात पाणी आलं
“खरंय बेटा बाप कितीही प्रेमळ असला तरी आईची सर त्याला येत नाही.ती असती तर कदाचित ही घटना देखील घडली नसती”
त्याचा गहिवरला स्वर ऐकून पुजा आवेगाने त्याला बिलगली.
“नाही बाबा.तुम्ही कधीही आईची उणीव मला भासू दिली नाही.माझ्यावर खुप प्रेम केलंत.पण मीच भरकटत गेले.आय अँम साँरी बाबा.मी प्राँमिस करते यापुढे या पार्ट्या वगैरे सगळं बंद.मी अभ्यासावरच लक्ष केंद्रित करेन.तुमचं स्वप्न आहे ना मला आय.ए.एस.आँफिसर करायचं!ते मी नक्की पुर्ण करेन.पण प्लीज तुम्ही रडू नका.मला माफ करा बाबा ,मला माफ करा”
दोघं बाप लेक त्यानंतर बराच वेळ रडत होते.येऊन गेलेल्या संकटाने त्यांच्यातला दुरावा नाहीसा झाला होता.

*© दीपक तांबोळी*
9503011250
(ही कथा माझ्या ” गिफ्ट ” या पुस्तकातील आहे.नावासहीत शेअर करायला हरकत नाही.माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी क्रुपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}