देश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

टीम इंडियाचं टायटॅनिक —- द्वारकानाथ संझगिरी

टीम इंडियाचं टायटॅनिक
द्वारकानाथ संझगिरी

टायटॅनिक बोट जेव्हा बांधली गेली तेव्हा त्या बोटीच्या मालकाने मोठ्या अभिमानाने सांगितलं होतं, ” ही बोट कधीही बुडू शकणार नाही.” त्यामुळे त्या बोटीवरच्या जीवरक्षक बोटीसुद्धा कमी करण्यात आल्या होत्या. पण तिच्या पहिल्याच प्रवासात एका आइसबर्गने तिला अटलांटिक समुद्राच्या पोटात नेऊन कायमचं बसवलं.
टीम इंडियाचंही तस्संच झालं. पहिले दहा सामने लिलया जिंकल्यानंतर अकरावा सामना जिंकणं हे विधीलिखीत वाटत होतं. पण ते वाळूवरच लिखाण ठरलं. एक लाट आली आणि पुसून गेलं.

त्याची सुरुवात डावाच्या सुरूवातीपासूनच झाली. ज्या खेळपट्टीवर भारतीय संघाने पाकिस्तानला हरवलं होत. तीच खेळपट्टी निवडायची चूक भारताने केली. खरं तर त्यांना तसा मोह झाला, असं म्हटलं पाहिजे. या विश्वचषकात दर्जेदार फिरकी गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन संघ चाचपडला होता. मग ती भारताची असेल किंवा अफगाणिस्तानची किंवा दक्षिण आप्रिâकेची. अशीच खेळपट्टी निवडली जाईल, अशी अपेक्षासुद्धा ऑस्ट्रेलिया होती. त्यामुळे अशा खेळपट्टीसाठी काय आखणी करायला पाहिजे, हे ऑस्ट्रेलियाने आधीच ठरवलं होतं. अत्यंत सुंदर अशी आखणी ऑस्ट्रेलियन संघाने केली. आणि जवळपास जशीच्या तशी ती मैदानात उतरवलीसुद्धा गेली. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर अनेक दिग्गजानी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
अंतिम सामन्यात चक्क धावांचा पाठलाग करायचा?
१९९६ साली लाहोरच्चा गद्दाफीवरच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली होती, त्यावेळी इम्रान खानने अर्जुना रणतुंगालाही असेच वेड्यात काढलं होतं. तेव्हाही श्रीलंकेने तो सामना पाठलाग करून जिंकला होता. यावेळीसुद्धा ऑस्ट्रेलियाला आपण नेमकं काय करतोय, याची पूर्ण जाणीव होती. ड्राय आणि मंद खेळपट्टीवर भारतीय फलंदाजीला कशी वेसण घालायची,रात्री दवाचा फायदा कसा उठवता येईल, याचा व्यवस्थित विचार त्यामागे होता. तो कसा यशस्वी ठरला हे आपण डोळ्यांनी पाहिलं.
भारतीय संघाकडे ती खेळपट्टी निवडताना विचार होता का?
फिरकीला उपयुक्त खेळपट्टी निवडायची तर मग आश्विन संघात का नाही? ऑस्ट्रेियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आश्विन होता.मग सिराजला बाहेर ठेवावं लागलं असतं. पण नाहीतरी सिरजला गोलंदाजी कधी दिली?
आधीच्या सामन्यात सिराज नवा चेंडू बूमरा बरोबर शेयर करायचा ह्या सामन्यात तो फिरकी गोलंदाजांनतर आला.
म्हणजे कर्णधाराला फिरकी गोलंदाज कमी पडला.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने सुरूवात नेहमीप्रमाणेच नि:स्वार्थी आक्रमणाने केली. पण हे नि:स्वार्थी आक्रमण कधी-कधी लक्ष्मणरेषा ओलांडतं आणि बेदरकार बनतं. मॅक्सवेलच्या ऑफस्पिनचा फायदा उठवताना त्याची मनस्थिती कांचनमृगाच्या मोहात पडलेल्या सीतेसारखी झाली.
एक षटकार, एक चौकार मिळाल्यावर त्याला आणखी एक षटकार मारायचा मोह झाला आणि ट्रॅव्हिस हेडने कव्हर क्षेत्रात आयुष्यातला सर्वोत्कृष्ट झेल घेतला. त्यावेळी त्याला लक्षात आलं नसेल. हा नुसता झेल नाही तर हा वर्ल्ड कप आहे. १९८३ वर्ल्ड कपमध्ये कपिलने घेतलेला विव रीचर्ड्सचा झेल आणि त्याची किंमत सोन्यात एकाच कॅरेटची. दहाव् षटक होतं ते, म्हणून तो मोह पडला. नंतर वर्तुळाबाहेरचे क्षेत्ररक्षक दोनचे चार होणार होते. पुढची चूक विराट आणि राहुलच्या जोडीने केली. वन डेच्या नव्या नियमाप्रमाणे ११ ते ४० षटके फलंदाजांसाठी कमीत कमी जोखीम घेऊन धावा लुटण्याची असतात. कारण वर्तुळाबाहेर चार क्षेत्ररक्षक असतात. या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने आपल्या शतकांचा पाया आणि काही मजले याच ओव्हर्समध्ये उभारलेत. वर रोहित शर्माने वेगात धावा केल्यामुळे त्याला त्या शतकांच्यावेळी जोखीम घेऊन फलंदाजी करावी लागली नाही. त्याचं विक्रमी पन्नासावं शतक तर झालं होतं. पण कदाचित अंतिम सामन्यात जिंकताना एखाद्या मौलिक हिर्‍याप्रमाणे आपल्या मुकूटात शतक असावं, याचा मोह कोहलीला झाला असावा. त्याने चेंडू ढकलण्यापलीकडे किंवा एकेरी-दुहेरी धावा काढण्यापलीकडे किंचीतसुद्धा जोखीम घेतली नाही. ना समोर राहुलने घेतली. जगातल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजाला हे शोभणारे नाही.त्यामुळे सुरुवातीची आतषबाजी सोडली तर पुढे चार-पाचच चौकार मारले गेले. म्हणजे कर्णधाराने जोखीम घेऊन १० षटकांत ८० धावा फटकावल्या. त्याचा सर्व परिणाम पुसला गेला. मुख्य म्हणजे या ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी टाकली. क्षेत्ररचना आणि फलंदाजांच्या कमकुवत आणि ताकदवान दुव्यांप्रमाणे गोलंदाजी कशी टाकावी याचं ते प्रात्यक्षिक होतं. महत्वाचं उदाहरण.
विराटला कव्हर ड्राईव्ह मारायला जागा सोडली. तिथे क्षेत्ररक्षक नव्हता. ” असेल हिम्मत तर मार.” पण गोलंदाजी अशी केली की विराटने हिम्मत नाही केली. खानत्यामुळे हिंदुस्थानी संघाला किमान ४० -५० धावा कमी पडल्या. दबाव आल्यावर खालची फलंदाजांची फळी खचली. गोलंदाज म्हणून निवड झालेल्या खेळाडूला फलंदाज म्हणून निवड झालेल्या खेळाडूची कवच कुंडल बनाव लागलं. सूर्यकुमार ला, टी,20, आय पी एल, वन डे, आणि वर्ल्ड कप फायनल ह्यातला मूलभूत फरक कळला असेल. आणि ज्यांनी ” Suryakumar is more talented than sachin tendulkar ” म्हटलेल्यानाही.एरवी टी २० सामन्यात तो सपेरा असतो आणि गोलंदाजांना साप बनऊन नाचवत असतो. इथे गोलंदाज सपेरे होते आणि तो नाचत होता.
विराट राहुल जोडीच्या कुर्मगती फलंदाजी मूळे भारत ना वर्ल्ड कप जिंकू शकला,ना विराट आपलं शतक पूर्ण करू शकला. या सगळ्या धावा रोखताना ऑस्ट्रेलियन संघाने जे क्षेत्ररक्षण केलं ते पाहणं हा आनंद आणि शिक्षण होतं. पाण्यात सूर मारावा तसा ते गवतावर सूर मारत होते. जणू क्रिकेटऐवजी वॉटरपोलोचा खेळ असावा.
हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजांनी सुरूवात तर सुसाट केली. चेंडू भन्नाट स्विंग होत होते. पण त्या भन्नाट स्विंगला नियंत्रणात कसं ठेवावं हे फक्त बुमराला माहित होतं. मागचे डावपेच बदलून नवा चेंडू हा सिराजऐवजी शमीला देण्यात आला. शमीने सवयीप्रमाणे पहिल्याच षटकात विकेट काढली. पण भन्नाट स्विंग होणारा चेंडू त्याला ताब्यात ठेवता आला नाही.
३ बाद ४७ अशी ऑस्ट्रेलियाची अवस्था असताना हिंदुस्थानी संघ टॉपवर होता. पण मग हेड आणि लाबुशन यांच्या भागीदारींनी एक वेगळीच गीता आपल्या समोर वाचली. लाबुशनने थेट कसोटी फलंदाजाप्रमाणे फलंदाजी केली. हेडने सुद्धा आपलं डोकं शांत ठेवलं. मान खाली घातली आणि अप्रतिम फलंदाजी केली. पण विराट कोहलीप्रमाणे मोठ्या फटक्यांंची जोखीम आपल्या पाठ्यपुस्तकातून पूर्णपणे काढली नाही. संधी मिळताच त्याने मोठे फटकेसुद्धा मारले. त्याचे slog sweep अप्रतिम होते. नववधू थोडी जुनी झाल्यावर तिने आपला स्वभाव बदलावा तसा स्वभाव दव आल्यावर खेळपट्टी ने बदलला. तिने फलंदाजाना प्रियकर बनवलं,. चेंडू बॅट वर मस्तपैकी यायला लागला. ३ बाद १७० च्या आसपास भारतीय संघाने सामना सोडून दिल्यासारखं वाटलं. त्यांच्या शारिरीक भाषेतून फक्त तेवढाच अर्थ निघतोय, असं वाटत होतं.
खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक धिक उत्तम वाटू लागली. ऑस्ट्रेलियन संघाने टॉस जिंकून स्वीकारलेले क्षेत्ररश्रण पूर्णपणे यशस्वी ठरलं.२४० धावा कॅब्रे डान्सरच्या कपड्यापेक्षा कमी वाटायला लागल्या. अंदाज आल्यावर हेडने वेगात धावांचे अंतर कमी केलं. आपले गुढगे टेकत आले आहेत हे जाणवलं. ते गुढगे वर यायचं कुठलंही चिन्ह नव्हतं.
हा ऑस्ट्रेलियन संघ स्टीव्ह वॉ, रिकी पॉण्टिंच्या संघासारखा ताकदवान नव्हता. अक्रोडाप्रमाणे कठोर कवच त्याच्याभोवती आहे, असं जाणवतही नव्हतं. पण शेवटी तो ऑस्ट्रेलियन संघ आहे. योग्य टप्प्यावर त्यांनी परफॉर्मन्स उंचावला. कधी मॅक्सवेलच द्विशतक , कधी स्टार्क चा स्पेल, कधी आणि काही. वाघ तरूण असो किंवा म्हातारा, तो लांडगा होऊ शकत नाही. आपण आकाशातून कोसळलो. .जे कामचलाऊ गोलंदाज आहेत त्यांच्या कडूनही धावा लुटता आला नाही. महाभारताच् युद्ध जिंकणाऱ्या अर्जुनाला नंतर यादव स्त्रियांचं संरक्षण जमलं नव्हतं. तसं आपलं झालं. सर्वोच्च स्टेज आल्यावर ऑस्ट्रेलियाने आपला खेळ खूप उंचावला आणि आकाशाला भिडलेल्या हिंदुस्थानी संघाची उंची खुजी करून टाकली.
टायटनिकची अवस्था
” डूबे जब दिलीकी नय्या
सामने थे किनारे ”
अशी झाली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}