दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

नॉस्टॅल्जिया……………©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

★नॉस्टॅल्जिया★

‘नॉस्टॅल्जिया’… भूतकाळात घडलेल्या गोष्टींची ओढ,त्यात रमणे. हा नॉस्टॅल्जिया कशाचाही येऊ शकतो. जागा, ऋतू, गाणं, एखादी इमारत,आजूबाजूचं वातावरण, एखादा पदार्थ…अगदी कशाचाही येऊ शकतो. आणि तो आला की काही क्षण हळवे होऊन जातात. कधी मन उदास होतं तर कधी आनंदी.

जून महिना सुरू झाला,पावसाची रिपरिप सुरू झाली की आजीच्या घराचा निरोप घ्यायची वेळ! (पूर्वी ७ जूनला पाऊस सुरू व्हायचा आणि शाळा जुलै मध्ये सुरू व्हायची) वरती आभाळ भरून यायचं आणि मनातलं आभाळ पाऊस होऊन डोळ्यातून झिरपायचं. तो पहिला पाऊस सुरू झाला की आजही अमरावती आठवते. तिथून निघतानाची हुरहूर, आजीकडेच राहावं ही तीव्र इच्छा,मावस आणि मामे भावंडांबरोबर केलेली मजा..सगळं आठवतं आणि परत मनातलं आभाळ भरून येतं.

नागपुरला गौरी (विदर्भात महालक्ष्मी म्हणतात) फारच मोठया प्रमाणात असतात. भरपूर पदार्थ, सोवळ्यात स्वयंपाक,जेवायला कमीत कमी २५ माणसं तर असतातच. पंधरा दिवस आईची आधीची तयारी आणि आजीची तिला असणारी मदत, हे सगळं ऑगस्ट,सप्टेंबर आला की आठवायला लागतं. लग्न झाल्यावर पहिल्यांदा सासरच्या गौरी बघितल्या. सुगड्यावरच्या सुबक गौरी! अर्ध्या तासात गौरी मांडून तयार! आईकडे एका गौरीला साडी नेसवायलाच अर्धा तास लागायचा. ते आईचे न कुरकुरता केलेले कष्ट, वडिलांची तिला मदत, सगळं आठवतं. आत्या आणि आजीने केलेला गोविंदविडा, तो मी कसा करतात हे मी विसरून जायचे आणि दरवर्षी परत आजीला विचारायचे.

ऑक्टोबर, नोव्हेंबरची गुलाबी थंडी सुरू झाली की दिवाळी नॉस्टॅलजिक करते.
नरकचतुर्दशीला कोणाची आंघोळ आधी होणार ही चढाओढ! सुगंधित स्नान झाल्यावर आईच्या हातची गरम चकली आणि दही!

डिसेंबर महिना आला की शाळेचं गॅदरिंग मला नेहमी आठवतं. ते गॅदरिंगचं माहोल असल्यामुळे वर्गात अभ्यास फार कमी व्हायचा. त्यावेळी शाळेत जायला आवडायचं. आणि म्युझिक कॉम्पिटीशनमध्ये कुठलं गाणं गायचं त्याची तयारी! आणि सगळ्यात गोड आठवण म्हणजे माझं पिल्लू ६ डिसेंबरला जन्माला आलं.

सिनेमांचा नॉस्टॅल्जिया पण मला खूप येतो. ‘जंजिर’ ‘दिवार’, ‘शोले’, ‘गुड्डी’ ‘परिचय’, ‘आंधी’, ‘खूबसुरत’, ‘कभी कभी’,’कोशिश’, ‘अनामिका’, ‘खेल खेल में’, ‘हम किसीसे कम नही’, ‘घर’.. अनेक. टीव्हीवर हे सिनेमे लागतात,तेव्हा त्या त्या वेळेचं सगळं आठवतं. मला आठवतंय मी ‘दिवार’ संध्याकाळचा शो बघून आले होते आणि रात्रभर त्यातले सीन्स आठवून रडत होते. किती sensitive असतो ना आपण त्या वयात! ‘मासुम’ सिनेमा बघून आल्यावर अशीच अंत:र्मुख झाले होते.

गाणी तर खूप आहेत, जी मला प्रचंड नॉस्टॅलजिक करतात. ‘आंधी’, ‘परिचय’, ‘खूबसुरत’, ‘कभी कभी’, ‘घर’, ‘मासुम’ मधली सगळी गाणी मला नॉस्टॅल्जिक करतात.

जागेचा पण नॉस्टॅल्जिया येतोच. नागपूरचं आमचं रामदास पेठ मधलं भाड्याचं घर, जिथे आम्ही भाड्याने बारा वर्षे होतो. माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवस! खूप मजा केली त्या घरात! अर्थात काही आठवणी दुःखद पण आहेतच. ती बिल्डिंग नुकतीच demolish केली हे कळलं आणि नॉस्टॅल्जिक झाले.

वास, सुगंध ह्याचा पण नॉस्टॅलजिया असतो बरं का! मी ‘Z’ ही powder पहिल्यांदा आणली तेव्हा त्याच्या सुगंधाने मी नॉस्टॅल्जिक झाले. लहानपणी वापरलेल्या कुठल्यातरी powder चा तसाच सुगंध होता. मातीचा वास तर सगळ्यांनाच पहिल्या पावसाची आठवण करून देतो. पापड,कुरडया तळल्या की आजी आठवते. स्वतः सगळे उन्हाळ्याचे पदार्थ करून इतक्या उन्हात वाळवण घालून, नातवंडांना कौतुकाने खाऊ घालणारी!

आयुष्यात जे चांगलं अनुभवलं असतं, त्याचा नॉस्टॅल्जिया येतोच. असं म्हणतात भूतकाळात फार रमू नये कारण आयुष्यातलं कुठलंच दशक पूर्ण सुखाने किंवा आनंदाने परिपूर्ण नसतं. आणि भूतकाळ हा नेहमीच चांगला वाटतो पण तो देखील कधीतरी वर्तमान आणि भविष्य असतोच की! काही माणसं भूतकाळात अजिबात रमत नाहीत,भविष्याचा विचार करत नाही आणि वर्तमानाचा आनंद घेतात. मला अशा लोकांचा हेवा वाटतो आणि कौतुक देखील! प्रत्येक पिढीला नॉस्टॅल्जिया असतोच,फक्त त्याचे संदर्भ वेगळे असतात. मी खूप जास्त नॉस्टॅल्जिक होते. मला शाळेतले मित्र,मैत्रिणी नेहमी म्हणतात, तुला किती आणि काय काय आठवतं.

असा हा ‘नॉस्टॅलजिया’…’कोई लौटा दे मेरे बिते हुये दिन’ मध्ये घेऊन जाणारा!

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}