Classified
शब्दमाधुर्य, नादमाधुर्य, गीतमाधुर्य – विश्वास देशपांडे, चाळीसगाव.* *प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
*शब्दमाधुर्य, नादमाधुर्य, गीतमाधुर्य.* .. संगीत, गाणी आणि शब्द. तसं पाहिलं तर अमूर्त…! नादब्रह्मच ते ! डोळ्यांनी दाखवा म्हटलं तर नाही दिसायचं. पण अनुभव मात्र घेता येतो. कान तृप्त होतात. मनही तृप्त होतं. निराश झालेल्या मनाला उभारी देण्याची शक्ती या नादब्रह्मात असते. एक प्रकारे परमेश्वराच्या अस्तित्वाचीच ती अनुभूती असते. म्हणून तर मंदिरात गेल्यावर, ध्यान केल्यावर मनाला जी शांती, प्रसन्नता लाभते, तीच शांती, प्रसन्नता हे नादब्रह्म आपल्याला प्रदान करतं. तुम्ही तल्लीन होऊन ऐकलंत तर सहजच तुमची सहज समाधी लागते. मग अशा वेळी आजूबाजूला काय सुरु याकडे सुद्धा आपलं लक्ष राहत नाही. परवा एक दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली. सी डी एस जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टरच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सारा देश हळहळला. देशानं एक सच्चा सुपुत्र गमावला. केवळ जनरल बिपीन रावतच नव्हे तर त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नीसह अन्य १२ व्यक्तींचाही या अपघातात मृत्यू झाला. खरं म्हणजे या लेखात हा उल्लेख कसा काय हा प्रश्न आपल्याला पडेल. पण त्याचे कारणही तसेच आहे. त्यांच्या निधनाने मला एका गीताची आठवण झाली. आठवण होण्यासाठी कारण म्हणजे हवाईदलाचं हेलिकॉप्टर. लता मंगेशकर यांचं एक अप्रतिम गाणं आहे. ‘ आकाश के उस पार भी आकाश है…’ लतादीदींच्या माझ्या आवडत्या गाण्यांपैकी हे एक आहे. एअर फोर्स दिनासाठी लतादीदींनी हे सुंदर गीत गायलं आहे. हे गीत गुलजार यांचं आहे. हे गीत गैरफिल्मी आहे. सगळी चांगली गाणी चित्रपटातीलच असतात असं नाही. या गीताचा व्हिडीओ जर आपण यु ट्यूबवर पाहिला तर आपल्याला हवेत झेप घेणारी लढाऊ विमाने दिसतात. आणि त्या विमानांच्या उड्डाणासोबत लतादीदींचा आवाज ऐकू येतो. विमानं आकाशातून उडत असतात. दीदींचे स्वर जणू त्या विमानांसोबत आकाशात विहार करतात. ते शब्द आपल्याला सांगतात, ‘ आकाश के उस पार भी आकाश है..’ जणू त्या सांगतात, ‘ इथेच थांबू नका. पर्वतांची, आकाशाची उंची तुम्ही गाठली म्हणजे सगळं मिळवलं असं समजू नका. या आकाशाच्या पलीकडे देखील एक विशाल आकाश आहे. ते तुम्हाला खुणावते आहे. चला पुढे…’ गुलजार या सिद्धहस्त कवीचे शब्द आणि त्या शब्दातील सामर्थ्याचा प्रत्यय आणून देतात दीदींचे स्वर. निराश, मरगळलेल्या मनाला उभारी देण्याचं सामर्थ्य, शक्ती या शब्दात आहे. या गीतातला सुरुवातीचा आणि नंतर येणारा ‘ आकाश ‘ हा शब्द लतादीदींनी इतका अफलातून आणि वेगवेगळ्या प्रकारे गाण्यात उच्चारला आहे की त्याला तोड नाही. जणू त्यांचे शब्द आपल्याला सुद्धा ‘ आकाश के उस पार…’ घेऊन जातात. छोटंसं तीन कडव्यांचं हे गीत. पण त्यात जीवनाचा आशावाद ठासून भरला आहे. या गीतातल्या काही ओळी पहा. झरते रहो बादल झरे जिस तरह दरिया मुडे पैरों तले जिस तरह सागर में भी गिरके कभी खाली न हो… आकाश के उस पार भी आकाश है. आकाशातले मेघ जलाचा वर्षाव करत राहतात. खाली असणाऱ्या समुद्रावर देखील वर्षाव करत राहतात. पण ते रिते होत नाहीत. पुन्हा पुन्हा जलवर्षाव करत राहतात. तसे तुम्ही थकू नका, थांबू नका. देत राहा. आपले कर्तव्य करत राहा. इथे मला रॉबर्ट फ्रॉस्ट या कवीची कविता आठवते… The woods are lovely dark and deep But I have promises to keep And miles to go before I sleep. या इंग्रजी ओळींमध्ये जो जंगलाचा उल्लेख आला आहे तो रूपकात्मक आहे. हे जंगल सुंदर आहे, घनदाट आहे. पण मला इथे थांबून चालणार नाही. कारण मला दिलेली आश्वासनं पूर्ण करायची आहेत. पाळायची आहेत. ही आश्वासनं म्हणजे जीवनातील ध्येय. ते जर गाठायचं असेल तर रस्त्यातील मोहांना बळी पडून चालणार नाही. कारण थांबला तो संपला. या गीताच्या पुढील कडव्यात गुलजार म्हणतात आना भी, है जाना भी है हर दफा चलते रहो मौसम चले जिस तरह कोई नही आए अगर एकला चलो आकाश के उस पार भी आकाश है… हार आणि जीत सुरूच राहणार. जीवन आणि मृत्यूचा खेळ सुरूच राहणार. म्हणूनच आपल्याला वाटचाल थांबवायची नाही. या पृथ्वीवर ऋतू कसे एकामागून एक येत जात राहतात. तशीच वाटचाल, तोच आदर्श पुढे ठेऊन आपल्याला करायची आहे. कोणी सोबत आलं तर उत्तमच पण नाही आलं तर कोणासाठी थांबू नका. आपली एकट्याने वाटचाल सुरु ठेवा. कारण ज्याला ध्येय गाठायचं आहे, त्याला कोणासाठी थांबून चालणार नाही. या सुंदर गीताला हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे. असं म्हटलं जातं की हे गीत सुरुवातीला आशाताई ( भोसले ) गाणार होत्या. पण नुकतंच आर डी बर्मन यांचं दुःखद निधन झालं होतं त्यामुळे हे गीत लतादीदींकडे आलं. पुण्याला १९९४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या वेळी दीदींनी स्वतः हे गीत सादर केलं होतं. तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव हे यावेळी उपस्थित होते. लतादीदी असो की आशाताई . दोघीही जित्याजागत्या लिजंड्स आहेत !
आशाताईंनी म्हटलेल्या एका सुंदर गीताबद्दल सांगून हा लेख संपवू या. हे अप्रतिम गीत आहे शांता शेळके यांनी लिहिलेलं. ‘ जिवलगा राहिले दूर घर माझे… ‘ हे ते अजरामर गीत. या गीताला श्रीनिवास खळे यांचं संगीत आहे. हे गीत शांततेत ऐकावं तरच त्याच्या सौंदर्याची अनुभूती येते. तसं एरव्ही केव्हाही ऐकू शकता. ऐकल्याचं फळ तुमच्या पदरात नक्की पडल्याशिवाय राहणार नाही. मन तृप्त होणे, कान तृप्त होणे हेच ते फळ. पण निवांतपणे शांततेत ऐकाल तर ते तुम्हाला नादब्रह्माची अनुभूती देईल. तुमची समाधी लागेल. या गीताला उपमा द्यायची झाली तर मी संथ वाहणाऱ्या एखाद्या नदीची उपमा देईन. नदीचे दोन्ही काठ म्हणजे श्रीनिवासजींचं मंद मंद वाजणारं संगीत. या संगीताच्या दोन्ही काठांमधून वाहणारा जलाचा पारदर्शी प्रवाह म्हणजे आशाताईंचं गाणं. जणू ‘ तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला…’ असं आहे ते. या गीतात अंतऱ्याच्या आधी खास संगीत नाही. आलापानं गाणं ध्रुवपदातून अंतऱ्यात प्रवेश करतं आणि त्यामुळे गायिकेला विश्रांती मिळत नाही. असं म्हणतात की आशाताईंनी हे गाणं वन टेकमध्येच रेकॉर्ड केलं. हे गीत जसं ऐकायला अप्रतिम तसंच गायला अतिकठीण. पण आशाताईंसारखी एखादी लिजंडरी सिंगरच ते लीलया पेलू शकते. इथे संगीत आणि चाल खळेकाकांची. हृदयनाथ मंगेशकर आणि श्रीनिवास खळे दोघांचंही संगीत अप्रतिम पण गायकांसाठी तेवढंच आव्हानात्मक. लतादीदी आणि आशाताई या दोघीही त्यासाठी समर्थ गायिका. या गीतातल्या शब्दांना आशाताईंनी जे वजन प्राप्त करून दिलं त्याला तोड नाही. जसा आधीच्या ‘ आकाश के उस पार भी ‘ या गाण्यातील ‘ आकाश ‘ शब्द लताबाईंनी वेगवेगळ्या सुंदर पद्धतीने गायिला आहे, अगदी तसाच या गीतातील ‘ जिवलगा ‘ हा शब्द आशाताईंनी गायिला आहे. गाण्यातली जी आर्तता आहे ती ‘ जिवलगा ‘ या शब्दातून जणू साकार झाली आहे. या गीतातला फक्त ‘ जिवलगा ‘ हा शब्द कसा वेगवेगळ्या प्रकारे उच्चारला आहे ते पाहावे म्हणजे आशाताईंच्या गायन सामर्थ्याचा प्रत्यय येतो. ‘ किर्रर्र बोलते घन वनराई… ‘ हे शब्दही असेच सुंदर म्हटलेले. ‘ सांज सभोती दाटून येई…’ हे शब्द भोवताली काळोख पसरल्याचा प्रत्यय आणून देतात. आणि मग तो ‘ आशा ‘वाद. अशा या वातावरणात ( हे परमेश्वरा ) तूच एक आशा आहेस. तल्लीन होऊन ऐकलं तर आपण त्यात हरवून जातो असं हे भावोत्कट गीत. या छोट्याशा लेखात या दोनच गीतांबद्दल मी तुम्हाला सांगू शकलो. अशी खूप गाणी आहेत. तुमच्या आणि माझ्याही मनात. त्या गीतांमधलं नादमाधुर्य, शब्दमाधुर्य वेड लावतं आपल्याला. त्यात परब्रह्माचं प्रतिबिंब पडलेलं असतं. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले कवी, गायक हे या परब्रह्माचे माध्यम बनून आलेले असतात. त्यांच्यात तीच दैवी शक्ती वास करत असते. परब्रह्म अशा वेळी नादब्रह्माचे रूप घेते आणि एक नवीन सृष्टी निर्माण करते. त्या सुरांमध्ये आपण चिंब न्हाऊन निघतो. पवित्र होतो.
*विश्वास देशपांडे, चाळीसगाव.* *प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२* ( *कृपया लेख नावासहित शेअर करावा* )