एक अतिशय सुरेख वाचनात आलेली कथा :
मला संतोष पवार भेटला तेव्हा मी त्याला विचारले “आता तुझ्यासोबत हे कोण पाहुणे आहेत ?”
तो म्हणाला,” हे माझे आईवडील आहेत. ”
मला खुप आश्चर्य वाटले. मी त्याला लगेच म्हणालो,” मागच्या वेळी तर वेगळे होते. हे तर दुसरेच कोणीतरी आहेत. हे कसं काय ?”
तर तो मला म्हणाला,” आपण हाॅटेलमध्ये बसून बोलुयात. ”
आम्ही जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर गेलो. तेथे बाकावर बसलो. तो मला सांगू लागला.
” माझे आई वडील लहानपणीच वारले. माझ्या काकाकाकूंनीच मला वाढवले. नोकरी लगेच मिळाली आणि छोकरीही. कारण माझे वर्गातील एका मुलीवर प्रेम होते. मला नोकरी लागताच मी माझ्या काकांना या प्रेमाबद्दल सांगितले. त्यांनी होकार तर दिलाच शिवाय ते माझ्यासोबत मागणी घालायला तिच्या घरीसुध्दा आले. लग्न नोंदणी पध्दतीने झाले आणि माझी बदली नागपूराहून थेट मुंबई ला झाली. आमच्या कंपनी ने मला रहायला विरारला बैठे घर दिले. तेथे सर्व सुखसोयी होत्या पण मी नोकरीला जाताच घरी बायको कंटाळुन जायची.
मला ती नेहमी म्हणायची “सासूसासरे असते तर बरे झाले असते. त्यांची घरात थोडी मदतही झाली असती आणि मुलांना छान संस्कार मिळाले असते.”
एकदा आम्ही बागेत सगळे फिरायला गेलो होतो. तेथे एक आजी आजोबा उदास बसलेले दिसले. मी विचारले, ” काय काका, काही त्रास होतो आहे का ? मी काही मदत करु शकतो का ?”
तर ते म्हणाले,” बाळा, आम्हा दोघांना एकटेपणा खातो आहे रे. आयुष्य गेलं स्वप्ने रंगवण्यात. आता काम होत नाही. लगेच थकवा येतो. पण काम करण्याशिवाय पर्यायही नाही. ”
मी म्हणालो,” मुले सांभाळत नाहीत ?”
त्यावर ते म्हणाले, ” मुलगा सून अमेरिकेतच असतात. ”
आणि दोघांनी त्यांची तोंडे बाजूला वळवली आणि डोळ्यांना रुमाल लावला.
मी काय समजायचे ते समजलो. आणि म्हणालो,” आमच्याकडे येता का आठ दिवस रहायला ? तेवढाच हवाबदलही होईल आणि या दोन नातवंडात वेळही जाईल. ”
तर ते म्हणाले,” बाळा तुला कशाला आमचा त्रास ? अरे नेहमी इथेच भेटु आपण सगळे रविवारचे. ”
आणि मग दर रविवारी आमची त्यांची भेट होऊ लागली.
माझ्या मनात होतं की बायकोला विचारावे की या दोघांना आपल्याच घरी ठेवुया का ? पण एकदा तीच मला म्हणाली,” काही बोलायचे होते तुमच्याशी.”
मी म्हणालो,” बोल ना काय बोलायचे आहे ते.”
तर ती म्हणाली,” रविवारी आपण बागेत त्या आजीआजोबांना भेटतो ना, त्यांना आपल्या घरीच आणुया का ? म्हणजे मला असं वाटतंय की आपल्या मुलांनाही त्यांच्या भेटीची उत्सुकता असते आणि दोघेही आपल्या मुलांबरोबर किती आनंदात असतात ना !!”
मला तिचे म्हणणे पटत होते पण कंपनीने दिलेल्या घरात यांना कसे ठेवायचे ?
आणि आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला. या दोघांना दत्तक घ्यायचा. कागदोपत्री दत्तक घेतले व कंपनीला ते दत्तक पेपर्स दाखवले. कंपनी मालकाने माझा सत्कार केला आणि माझा पगार त्यांनी दिडपट केला.
आजीआजोबांना एक खोली दिली.
त्यांचे नाव श्री सुहास कळसकर व सौ सुहासिनी कळसकर अशी आहेत. त्यांचे टेलरिंगचे दुकान होते. त्यांना एक मुलगा झाल्यावर त्यांनी कुटुंबनियोजन केले व याच मुलाला खुप शिकवायचे ठरवले. मुलाला इंजिनियर केले व पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले. एमबीए करताना तेथील एका मुलीच्या प्रेमात पडला व परस्पर लग्न करुन मोकळा झाला. सूनेला एकदा दाखवायला आणलं होते. नंतर दर तीनचार महिन्यांनी पैसे पाठवायचा. नंतर नंतर सहा महिन्यांनी पैसे येऊ लागले. एकदा तो भारतात आला होता. म्हणाला तुम्ही दोघे तिकडेच रहायला चला. ही तयार नव्हती पण नंतर खुप दिवसांनी तयार झाली पण खुप उशीर झाला होता. नंतर पैसे यायचेही बंद झाले. पत्रव्यवहार केला तर कळले तो दुसरीकडे वेगळ्या शहरात राहतो. आणि त्याला फोन केला तर त्याने त्याची नोकरी गेल्याचे सांगितले. बायकोच त्याला सांभाळते. सातआठ वर्षात फक्त फोनवर बोलतो. त्याच्या मित्राने सांगितले,’त्याची नोकरी वगैरे काही गेली नव्हती उलट बढती मिळाली होती. एक बंगला व गाडी आहे.
आपलेच मुल आहे म्हणून माफ केले आणि नव्या जीवनाला सुरुवात केली.
कळसकर दांपत्याला दत्तक घेतल्यावर आम्हाला जोशी दांपत्य भेटले. त्यांची कथा वेगळीच. त्यांना मुलच नव्हते आणि ते अतिशय गोड बोलणे व संस्कारी जोडी होती. मग त्यांनाही आमच्या घरात सामील करुन घेतले. ते आनंदाने आमच्यात राहतात. ते जोशी काका म्हणजे आत्ता माझ्याबरोबर आहेत ते. त्यांना भाजी आणायची खुप आवड. जोशी काकू स्वयंपाक खुप छान करतात. चोघी मिळुन स्वयंपाक घर सांभाळतात आणि आता तर माझी मुलगीही त्यांच्या हाताखाली स्वयंपाक शिकते आहे.
मधल्या काळात आणखी एक जोडी आमच्यात आली. कांबळे काकाकाकू. त्यांचा तरुण मुलगा अपघातात ठार झाला. ते आमच्यात आले आणि त्यांनाही मी दत्तक घेतले. आता मला तीन आईवडील आहेत. कांबळे काकाकाकू नोकरी करत होते. त्यांना पेंशन आहे. त्यां दोघांनी त्यांच्याकडील पीएफचे तीस लाख आम्हाला दिले मग त्यात माझे सेव्ह केलेले टाकले. बायकोने तिचे दागिने विकून आम्ही एक मोकळी जागा घेऊन त्यावर एक बैठे मोठे घर बांधले.
बंगल्याप्रमाणे पुढे बाग केली आहे. कांबळे काका त्यात रमतात.
जोशी काका पुजेचे पाहतात व भाजीही आणून देतात.
माझा मुलगा आता काॅलेजमध्ये आहे. मुलीने फॅशन डिझाईनिंगचा कोर्स केला म्हणून तिने बुटीक टाकले त्यात कळसकर काका सुध्दा तिला मदत करतात.
तु तुझ्या फॅमिलीला घेऊन ये ना आमच्या घरी रहायला. पहा घर कसे आनंदाने भरुन वहात असते. आमच्या हातातील चहा केव्हाच संपला होता. मी चहाचे पैसे देत होतो तर चहावाल्याने घेतलेच नाहीत. म्हणाला,” साहेबांकडुन पैसे घेतले तर मला पाप लागेल .माझ्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च तेच करतात. किमान फुल ना फुलाची पाकळी उपकार थोडे परतफेड तरी करु द्यात हो. ” असं म्हणताना त्याचे डोळे ओले झाले होते.
संतोष पवार शाळेत खुप अबोल असायचा. आज कळले की आईवडिलांची किंमत फक्त त्यालाच कळाली होती. म्हणूनच तर त्याने तीन आईवडील दत्तक घेतले होते. लहानपणीच्या आईवडिलांची भरपाई करत समाजालाही त्याने एक मोठी शिकवण दिली. कशाला पाहिजेत वृध्दाश्रम ? ज्यांना शक्य आहे त्यांनी एक एक आजीआजोबा दत्तक घ्यायचे आणि समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडायचे हीच तर खरी आधुनिक जगाची उभारणी झाली म्हणता येईल.
मी असा विचार करत करतच घरी आलो आणि बायकोला सगळे सांगितले. ती म्हणाली पुढच्या आठवड्यात आपण सगळेच जण जाऊयात. भरपूर गिफ्ट घेऊन जाऊ.
_ अनुज कुलकर्णी,
कांदिवली