मंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

दाबायला हवा चमचा …..©️डॉ शिरीष भावे

**दाबायला हवा चमचा
**
…..©️डॉ शिरीष भावे

दोन अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. बॅडमिंटनची इंडोनेशियन ओपन स्पर्धा चालू होती. उपान्त्य फेरीमध्ये भारताची चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज ही एक्का जोडी खेळत होती. प्रतिस्पर्धी म्हणून होती तितकीच कसलेली इंडोनेशियन जोडी. पहिली गेम इंडोनेशियन जोडीने आरामात जिंकली. दोन गेम्सच्यामध्ये भारतीय जोडीचा डॅनिश कोच मथायस बोए चिराग शेट्टीला एकच वाक्य म्हणाला,” यु आर नॉट डुइंग एनीथिंग डेंजरस” चिरागनी मान डोलावली .
कोच खेळाडूंना काय मंत्र देतो याकडे माझे बारीक लक्ष असते. “यु आर नॉट डुइंग एनिथिंग डेंजरस” अर्थात् तुझ्या प्रतिस्पर्ध्यांना तुझ्यापासून धोका वाटेल,ते बिथरतील असं तू काहीच केलं नाहीस. जपून जपून खेळत बसलास आणि त्यांनी तुझ्यावर सहजासहजी वर्चस्व मिळवलं. ह्या एका वाक्यातून चिराग काय तो धडा शिकला आणि पुढच्या दोन्ही गेम्समध्ये प्रसंगी धोका पत्करून, धडाकेबाज खेळ करत सामना खिशात घातला .

नुकताच झालेला एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना. पहिले तीन गडी गमावल्यानंतर विराट कोहली आणि राहुल कित्येक षटके जपून जपून खेळत बसले. कुणीच धोका पत्करून मारायला तयार नव्हता. त्या आधीच्या सामन्यात श्रेयस अय्यरनी 70 चेंडूत 100 च्या वर धावा केल्याने आपण जिंकलो. प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्यासाठी कोणीतरी अशी जोखीम पत्करावी लागते.

अमितला गाड्यांची फार हौस. एकदा एक नवीन गाडी घेऊन माझ्याकडे आला आणि म्हणाला,” चल, आपण जरा हायवेवर चक्कर मारून येऊ. तू चालव”

अडीशे अश्वशक्तींच इंजिन असलेल्या त्या गाडीचा ताबा मी भीत भीत घेतला. इतकी ताकदवान गाडी मी त्यापूर्वी कधीच हाताळली नव्हती. हायवेच्या मोकळ्या रस्त्यावर लागलो तरी माझा वेग जेमतेम 60 ते 80 किलोमीटर. अमित म्हणाला,” अरे 100 ची वेग मर्यादा आहे. दाब न जरा चमचा. किती जपून जपून चालवतोयस”

“चमचा!?” मी चमकून म्हणालो. चमच्याचे नेहमीचे उपयोग मला ठाऊक होते किंवा फार तर आकडी आली तर दोन दातांमध्ये चमचा दाबतात असेही ऐकले होते. आता हा गाडीतला दाबायचा चमचा कुठचा? अमितने माझी प्रश्नार्थक मुद्रा ओळखली आणि म्हणाला,” अरे, आम्ही गाड्यांचे शौकीन एक्सिलरेटरला ‘चमचा’ म्हणतो.” हाच ‘चमचा’ मी दाबला आणि गाडी क्षणार्धात 80 वरून 100 वर गेली.

तेव्हापासून मनात एक खूणगाठ बांधली. आयुष्यात मधून मधून चमचा दाबायला हवा. म्हणून वयाच्या 57व्या वर्षी बॅडमिंटनचे कोचिंग घेणं चालू केलं आणि आपण लिहू शकतो याची जाणीव झाल्यावर धडाक्यात लेखणी हातात घेतली. त्यादिवशी चिराग शेट्टीने खेळताना ‘चमचा दाबला’ म्हणून जिंकला आणि विराट आणि राहुलनी दाबला नाही म्हणून हरले.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण करत असलेल्या गोष्टींना वेग आणि प्रयत्नांची मर्यादा आपणच घालून घेतलेली असते. मग ती कुठलीही गोष्ट असू दे. शिक्षण असेल,नोकरी असेल, व्यवसाय असेल, खेळ, कला यासारखा एखादा छंद जोपासणं असेल एका विशिष्ट वेगात, विशिष्ट स्तरावर आपलं सगळं चालू असतं. बहुतेक जण मी अमितनी सांगेपर्यंत चालवत होतो त्याप्रमाणे 60 ते 80 च्या वेगात आयुष्य चालवत असतात. तो त्यांचा आराम कक्ष (कम्फर्ट झोन) असतो. त्यातून अधिक वेगात गेलो तर “धडपडू का काय” अशी भीती वाटते. कुठलेही अधिक कष्ट घेणं नाही, आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारायचा प्रयत्न करणं नाही, एका धीम्या सुरक्षित गतीने आयुष्य सुरू. स्वतःच्या बुद्धिमत्तेला,क्षमतेला, कलागुणांना पूर्ण न्याय देण्याचा कुठलाच प्रयत्न अनेक जण करत नाहीत.पण चमचा दाबल्याशिवाय उत्कृष्टता, नैपुण्य साधता येत नाही. ते करायला वयाचं बंधनही असता कामा नये. वयाच्या साठीनंतर आपल्यातील उपजत गुणांना न्याय दिल्याची कित्येक उदाहरणे जगात आहेत. चमचा कधी आणि किती दाबायचा हे मात्र चाणाक्षपणे ठरवावं लागतं.

फेडरर ,जोकोविच, नदाल या खेळाडूंना खेळताना नीट बघा. ते उगीच प्रत्येक चेंडूच्या मागे धावून धडपड करत नाही. पण जेव्हा अटीतटीचा, मोक्याचा क्षण येतो तेव्हा ते हमखास ‘चमचा दाबतात’. आयुष्य हा सत्तर ऐंशी वर्षांचा खेळ आहे असं मानलं तर आपला खेळ कधी आणि किती उंचावायचा याचं भान ज्याला असतं तोच आयुष्यात ‘सुमार’वरून ‘उत्कृष्ट’ या विशेषणापर्यंत पोचू शकतो.

लोकहो,
करावा रोजचा हा मंत्र तुमचा
मधून मधून दाबावा जोराने चमचा
जपून जपून कडेकडेने रेटावे थोडे
पण चमचा दाबूनी पोहोचावे जगापलीकडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}