दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

व्हीआरएस…… ✒️©पराग दामले

#व्हीआरएस……

✒️©पराग दामले

मुलाचं लग्न झालं आणि त्रिकोणी कुटुंब चौकोनी झालं…..सुरुवातीचे दिवस अगदी छान चालले होते…नवीन लग्न झालेलं जोडपं अगदी आरामात आयुष्य जगत होतं…. मुलगा सॉफ्टवेअर मध्ये कामाला आणि सून एका ऑफिसमध्ये पार्ट टाइम जॉब करत होती… त्यामुळे सुनेची जायची गडबड नसायची… आजपर्यंत सगळ्या स्वयंपाकघराचा ताबा सासूकडेच होता, त्यामुळे नवऱ्याला काय हवं, मुलाला काय हवं, ब्रेकफास्ट ला काय हवं, जेवायला काय आवडतं, गोडाचं काय आवडतं, याप्रमाणे बाजारातून वस्तू आणण्याचं काम देखील सासू करायची, कोणत्या वारी कोणता पदार्थ हे देखील ठरलेलं होतं….सुनेचे आगमन झालं त्यामुळे सुनेला काय आवडतं हे देखील सासू बघायला लागली…. सहा, आठ महिने झाले, सुनबाई चांगली रूळली होती, सकाळी लवकर उठून स्वयंपाक घरात गेली सासूला विचारलं ” आई मी काय काम करू ? “…सासू म्हणली ” काही नाही, सगळं उरकलं..” सून म्हणली ” तरी काहीतरी द्या ना “….सासू म्हणली ” नाही ग, तू कर आराम, हवं तर ब्रेकफास्ट लाव आणि सगळे नाश्ता करू “….. तो दिवस गेला, संध्याकाळी सून पुन्हा सासूला म्हणाली ” आई मी ब्रेकफास्ट उद्या तयार करते “… सासू म्हणली ” नको ग “….आणि इथे संभाषण थांबलं…. तरी सुनेच्या डोक्यामध्ये सकाळी उठून काहीतरी करायचं असा हेतू होता, नेहमीप्रमाणे उठली आणि स्वयंपाक घरात गेली, बघते तर सगळं तयार…..परत एकदा ती सासूला म्हणली ” आई अहो मला पण काहीतरी करायला द्या, मला पण येत आईने शिकवलंय “… सासू फक्त गालात हसली….

संध्याकाळी सून घरात एकटीच बसली होती, मनात विचार आला, का होतंय असं, मी केलेलं का चालत नाहीये आणि सासू मला करू देत नाहीये हे कोणाला सांगावं, तिने ठरवलं की नवऱ्याला सांगायचं रात्री दोघं एकत्र आल्यावर तिने नवऱ्याला सांगितलं ” तुझी आई मला काहीच करून देत नाही, माझी करायची इच्छा आहे ” ….नवरा म्हणला ” ती नाही म्हणते मग नको करू, कशाला उगाच तुझा वेळ घालवतेस, ती स्वतःहून ज्या दिवशी म्हणेल त्या दिवशी कर ” हिला खरं तर ते पटलं नव्हतं, पण नवरा म्हणला आणि कशाला उगाच वाद म्हणून तिने विषय संपवला….

अगदी शेवटचं म्हणून तिने सासूला म्हणलं ” ठीक आहे तुम्ही नाश्त्याचं करता, जेवणाचं करता, मग मी बाजारातून वस्तू आणत जाऊ का ? तुम्ही मला सांगत जा कुठून आणायच्या “…त्याला देखील सासूने नकार दिला म्हणली ” नको ग, तू नको आणू, मला माहित्ये काय आणायचं, मला ती सवय आहे कुठला पदार्थ आणायचा, कसा करायचा, यासाठी मीच आणलेलं बरं, तू आणलेलं पसंत पडणार नाही असं नाहीये, पण एक सवय मला लागली आहे, त्यानुसार मी करते….अगं तुला येत असेल ही खात्री आहे, तू केलेलं आवडेल हा विश्वास आहे आणि समजा येत नसेल तर मी शिकवीन की, पण गंमत अशी आहे की मी सुरवातीपासून गृहिणी आहे, नवऱ्याला आणि मुलाला काय आवडतं ते मला माहित्ये त्यामुळे मी करत आले, मला ते करायला आवडतं, सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी हे सगळं करते, वेळा सांभाळते या सगळ्यात माझा वेळ जातो ग….उगाच त्या सिरीयल मधल्या सासुसारखे घरात काहीही न करता, घरात ताक नाही हे सांगण्याचा अधिकार देखील सासुचाच, हे मला अजिबात पसंत नाही, तू काहीतरी करायचं म त्यावरून गहजब करायचा, तुला बोलायचं, तुझ्या नवऱ्याला तक्रार करायची, तुझ्या आईवडिलांना बोल लावायचे, तुझे संस्कार काढायचे याचा मला प्रचंड राग येतो…..त्याच बरोबर मला उगाच बाहेर भटकायला आवडत नाही, मी कोणत्या भिशीत नाही….मी माझं स्वयंपाकघर, अहो आणि मुलगा आणि आता तुझी भर पडली…मी अजूनच आनंदी झाले, वेळ अजून चांगला जातो, आणि जेव्हा असं वाटेल की मला होत नाहीये त्यादिवशी मी तुलाच सांगीन ग …..तुझी करायची इच्छा बघून बरं वाटलं… एखादी असती तर पहिल्याच महिन्यात सांगून टाकलं असतं, की मी काही करणार नाही, आपण स्वयंपाकाला बाई लावू “….

उत्तर ऐकून तिला सासूचे कौतुक वाटलं….खूप कमी भाग्यवान असतात त्यात आपण आहोत याची खात्री पटली…

एका दृष्टीने म्हणलं तर असं कमी वेळा बघायला मिळतं की सासू स्वतः करत्ये आणि सुनेला करूच देत नाहीये… खरंतर बरेच वेळेला असं दिसतं की लग्नानंतरच्या काही दिवसातच सासू म्हणते… आता तू कर, काय हवं नको ते तूच बघत जा, पण इथे मात्र सगळा उलटा प्रकार होता, एका दृष्टीने सगळं छानच होतं…. अशी सासू मिळणं खरंच भाग्यच लक्षण होतं…

सुख म्हणजे अजून काय हवं….

तिने मनोमन ठरवलं की सासूने रिटायरमेंट घ्यायच्या ऐवजी आपणच व्हीआरएस घेतली असं समजू…..
©पराग दामले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}