खानदान..!! कृष्णकेशव.
खानदान..!!
“माझं पॅकिंग झालय..टेंपोवाल्याला फोन करू का?” समोरच्या बॉक्सला शेवटची पॅकिंग पट्टी चिटकवत दिनकर अण्णांनी बेडरूममध्ये असलेल्या शालिनीताईंना विचारलं.
शालिनीताईंनी काहींच उत्तर दिलं नाही. काहीं उत्तर द्यायच्या मनस्थितीत त्या सकाळ पासूनच नव्हत्या.
जो दिवस कधीच येऊ नये अशी त्या मागचे आठ दिवस देवाजवळ प्रार्थना कर होत्या तो दिवस तो क्षण आज उगवला होता. आपल्या लाडक्या मुलाचं, मनोजचं
घर सोडून जाण्याची वेळ अण्णांमुळे त्यांच्यावर आज आली होती..!
तीनच महिन्यापुर्वी मनोजनं एक मोठा कौटुंबिक निर्णय घेतला होता आणि त्यांच्या कुटुंबातली आनंदाची प्रेमाची घडी विस्कटून गेली होती..
शालिनीताईंना तीन महिन्यापूर्वीचा तो दिवस आठवला आणि थांबून थांबून येणाऱ्या अश्रूंनी त्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा गर्दी केली..
तसं त्यांच वेगळ्या अर्थानं चौकोनी कुटुंब..! दिनकर अण्णा शालिनीताई त्यांचा मुलगा मनोज आणि त्यांची तितकीच लाडकी सून स्वाती.!
दहा वर्षांपुर्वी स्वाती सून म्हणून त्यांच्या घरात आली आणि लक्ष्मीच्या पावलांनी त्यांच घर भरून गेलं.! प्रेमाचे मोती पिकवणाऱ्या स्वातीनं आपल्या प्रेमळ स्वभावानं
आपुलकीच्या वागण्यानं
फक्त मनोजचं नव्हे तर अण्णा आणि शालिनीताईंना केंव्हाच आपलसं केलं होत.!
पण शरदाच्या चांदण्यानं न्हाऊन निघालेल्या मनोज स्वातीच्या या संसारात एक काळा ढग डोकावत होता.
लग्न होऊन दहा वर्षे झाली होती. पण घरभर दुडू दुडू धावणार, आपल्या बोबड्या बोलानं सगळ्यांना वेड लावणारं एखादं पाडस, एखादं गोंडस बाळ त्यांच्या अंगणात आलं नव्हतं.
आणि स्वातीला मुलीची फार आवड होती. एखादी मुलगी आपल्याला असावी अस तिचं एक वेड स्वप्न होतं पण आजपर्यंत ते स्वप्न स्वप्नच राहिलं होतं.!
शेजारच्या फ्लॅटमधली गोबऱ्या गालांची दोन वेण्या घातलेली लोभस रुहिका
‘बाय मम्मी..’ म्हणून फ्लाईंग किस देऊन शाळेत जायला निघाली की स्वातीच उर भरून यायचं.!
सुरुवातीची पाच वर्षे त्यांनी ‘प्लॅनिंग’ केलं होत
पण नंतरची पाच वर्षे इच्छा असूनही त्यांच्या घरात बाळ आलं नव्हतं.!
शहरातल्या नामांकित फर्टिलिटी डॉक्टरांकडून दोघांनीही चेक अप करून घेतल होतं पण प्रत्येकाचं ओपिनियन वेगळी आली होती..
सहा महिन्यापूर्वी मुंबईचे वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. देसाई यांनी ‘पीसीओडी’च्या प्रॉब्लेम मुळं संतति होणार नाही असं शेवटचं निदान केलं होतं.
आणि त्यादिवसापासून
स्वातीच्या चेहऱ्यावरचं ते
प्रसन्न हास्य मावळलं होतं. तिच्या रोजच्या वागण्या बोलण्यात जाणवणारं चैतन्य हरवलं होतं..
अगदी दिनकरअण्णांनासुद्धा ते
लक्षात आलं होत आणि न राहवून त्यांनी मनोजसमोरच स्वातीला विचारलं “स्वाती बेटा..
काय झालय. तू आजकाल कुठेतरी हरवल्यासारखी दिसत आहेस. काहीं प्रॉब्लेम आहे का..? तुझा असा हा दुर्मुखलेला चेहरा बघून आम्हाला काळजी वाटायला लागलीय .”
आणि मनोजनं अण्णांना खरं कारण सांगून टाकल होतं.
“स्वाती.. त्यात एवढं नाराज व्हायचं काय कारण..? जगात अशी कितीतरी जोडपी आहेत ज्यांना मूल नाहीय पण ते त्याचं दु:ख, निराशा विसरून आणि आपल्या वाट्याला आलेल सत्य स्विकारून आनंदानं राहतात.!
आणि तुला मुलाची हौसचं असेल तर माझी सोलापूरची भाची नंदिनी तुला माहित आहे.. तीन मुली आहेत तिला त्यातली एक तू
दत्तक घेऊन टाक.. मी सांगेन तिला.! ”
मनोज आणि स्वातीला हे ऐकून धक्काच बसला होता. खरंतर त्यांनी ह्या दृष्टीने कधी विचारच केला नव्हता आणि दुसरं म्हणजे दत्तक घेण्याचा आणि ते ही एखाद्या मुलीला दत्तक घेण्याचा सल्ला अण्णांनी दिला होता याचं त्यांना विशेष आश्चर्य वाटलं होतं.!
मनोजचे अण्णा म्हणजे दिनकर अण्णा पाटील.. तालेवार असामी.! गावाकडे घरदार, शेतीवाडी असलेले घरंदाज पाटील.! आणि आपण पाटील आहोत याचा त्यांना अत्यंत अभिमान होता.
“अरे आजकालच्या उपटसुंभ पाटलासारखे आम्ही नाही. आम्ही खानदानी पाटील आहोत शिवाजी महाराजांच्या
काळापासूनचे..” असं ते अभिमानानं सगळ्यांना सांगत असायचे.
त्यात आयुष्यभर ‘तहसीलदार’ म्हणून सत्तेची उब चाखल्यामुळे ताठरपणे वागण्याचा दुराग्रही स्वभाव.
आणि दहा वर्षे होत आली पण वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेऊनही स्वाती आई होत नाही हे लक्षात आल्यामुळे त्यांनी नंदिनीच्या मुलीला तिच्यासाठी दत्तक घ्यायचं हे मनातल्या मनात कधीच ठरवलं होत आणि तसं त्यांनी शालिनीताईंना सांगितलंही होतं.
याशिवाय एक अंतस्थ कारणही होतचं.! एकतर नंदिनीला तीन मुलीचं होत्या आणि त्यांची आर्थिक स्थितीही बेतास बात होती. पण त्यांच्या दृष्टीने त्यापेक्षाही जास्त महत्वाचं म्हणजे ती मोठ्या घराण्यातली होती..देशमुख होती.!
त्यामुळंच ते नंदिनीची मुलगी दत्तक घ्यायचा आधीपासून विचार करीत होते. एवढच नाही तर आपल्या बहिणीला सांगून त्यांनी नंदिनी आणि तिच्या नवऱ्याला त्यासाठी तयारही केलं होतं..
आणि मग तीन महिन्यापुर्वी त्या दिवशी मनोज आणि स्वातीनं तो असाधारण निर्णय घेतला होता आणि दिनकर अण्णांच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला होता.!
“अण्णा.. तुम्हाला माहीत आहेच डॉक्टरांनी स्वातीला मूल होण्याची शक्यता नाही म्हणून सांगितलय..त्यामुळं मागचा महिनाभर विचार करून आम्ही आता एक निर्णय घेतलाय. आम्ही एक मुलगी दत्तक घेणार आहोत.!”
“कॉंग्रॅटस.. हे तर मी तुम्हाला केंव्हाच सांगितलं होत..! मला खूप आनंद झालाय. केंव्हा घेताय दत्तक..? शुभस्य शिघ्रम्.!”
खरं तर त्यांच्या मनासारखं घडत असल्यामुळं ते हरकून गेले होते.
” आणि अण्णा पेठेतल्या ‘निराधार शिशु केंद्रा’ तली एक छोटी मुलगी आम्हाला आवडली आहे. खूप गोड आणि चुणचुणीत आहे. आम्ही तिला दत्तक घेणार आहोत.!”
त्याक्षणी दिनकर अण्णांसाठी तो मोठा धरणीकंप झाला होता.!
“अनाथ आश्रमातली मुलगी आणि आपल्या घरात.?
अण्णांचा आवाज चढलेला होता. मागील कित्येक महिन्यापासून नंदिनीच्या मुलीला दत्तक घेण्याचं त्यांनी पाहिलेलं स्वप्न एका क्षणात उध्वस्त झालं होतं.!
“तुला कळतयं का तू काय करतोय ते..? अनाथाश्रमातली मुलगी..
ना आईवडिलांचा पत्ता ना घरदार.. अरे आपण पाटील आहोत पाटील.!
प्रत्येक वाक्याला अण्णांचा पारा चढत होता.
” आमचा निर्णय झालाय अण्णा.! ” मनोज शांतपणे म्हणाला.
” तर मग माझाही निर्णय ऐक.. ती मुलगी ह्या घरात आली तर माझे पाय कायमचे ह्या घराबाहेर असतील”
अण्णांनी निक्षून सांगितलं आणि समोरची ब्रेकफास्टची डिश रागारागाने बाजूला ढकलून ते उठून
निघून गेले.
आणि आता आठ दिवसापुर्वी निराधार शिशु केंद्रातल्या छोटया आनंदीनं मनोजच्या घरात आपलं पहिलं पाऊल ठेवलं होतं.!
नावाप्रमाणेच गोड गोजिरी असलेली टपोरे डोळे, कुरळे केस आणि अपरं नाक असलेली आनंदी खुपच हुशार आणि चुणचुणीत होती.
आल्याबरोबरच तिनं मनोज स्वातीला आपलसं करून टाकलं होत.
” मला मॅनेजर अंकलनी सांगितलंय की आजपासून तुम्ही माझे
डॅडी आणि मम्मी आहात म्हणून.! पण खरं सांगू का मला मम्मी डॅडी म्हणायला नाही आवडत.. मी तुम्हाला आई बाबा म्हटलं तर चालेल.? माझी फ्रेंड मनिषापण आई बाबाचं म्हणते.!”
कमरेवर हात ठेऊन आनंदीनं विचारलं होतं.!
स्वातीनं तिला जवळ ओढलं आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवत ती म्हणाली..” हो बेटा तूला जे म्हणायचं ते म्हणं..”
तिच्या त्या पहिल्याच वाक्यानं स्वातीला आपल्या डोळ्यातले अश्रू लपवता आले नव्हते.
आणि मॅनेजर अंकल म्हणाले मला आजी आजोबापण मिळणार आहेत . कुठयत ते?
स्वातीनं शेजारच्या बेडरूमकडे बोट दाखवलं
आनंदी धावत तिकडे गेली. शालिनीताई गालावर हात ठेवून खुर्चीवर स्तब्धपणे बसल्या होत्या तर दिनकर अण्णा अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते..
“तुम्ही माझे आजोबा आजी ना.? मला ना तुमच्याकडून
मला छान छान गोष्टी ऐकायच्या आहेत.”
शालिनीताईंनी तिला
जवळ घेतलं. त्या काहीं बोलणार इतक्यात अण्णांनी आनंदीला बजावलं ” मी गोष्ट बीष्ट काहीं सांगणार नाही आणि तू माझ्याकडे येऊही नकोस.”
आठच दिवसात आनंदीनं आपल्या बडबडीनं आणि हसण्या बागडण्यानं घरातलं वातावरण हळूहळू बदलून टाकलं होतं.
मधूनच ती शालिनीताईकडे यायची आणि तिचा हात धरून समोर बसलेल्या अण्णाकडे
बघत म्हणायची..” आजी तू तरी सांग ना आजोबांना माझ्याशी बोलायला..! त्यांना सांग ते माझ्याशी बोलले तर मी त्यांना बाबांना सांगून कॅडबरीचं अख्खं पॅकेट गिफ्ट देईन म्हणून.!”
आणि निर्विकारपणे तिच्याकडे पहात असलेल्या अण्णांनी तीच ते बोलणं ऐकून बाहेर पडणारं हसू कसबसं आवरलं होतं.
आज त्यांचा त्या घरातला शेवटचा दिवस होता आणि त्यांनी मनोजला तसं सांगितल होतं. सकाळ पासून तो बाल्कनीत सुन्नपणे बसून होता.
अण्णांनी परत एकदा दोन्ही भरलेल्या बॅगा चेक केल्या आणि त्यांनी टेंपोवाल्याला फोन लावला.
इतक्यात आनंदी धावत धावत त्यांच्याकडे आली.. तिच्या हातात कॅडबरीचं पॅकेट होतं.!
“तुम्ही आज चाललात ना..!आजोबा नका ना जाऊ बाबांना सोडून.. रोज रात्री ते रडत असतात मी बघितलय.. मी त्यांना विचारलं सुद्धा, ते म्हणाले तुम्ही त्यांना सोडून जाणार आहात म्हणून !”
अण्णा तिच्याकडे बघायला लागले.. आपल्यामुळे आपल्या मुलाला त्रास होतोय हे आज त्यांना पहिल्यांदाच जाणवलं होतं.
” आजोबा मला माहितय तुम्ही का चाललात ते.. मला आजीनं सगळं सांगितलय..
मी इथं आले म्हणून तुम्ही चाललात ते ?
अस नका ना करू आजोबा .. मी बाबांना सांगते
मला केंद्रात परत सोडा म्हणून.. पण तुम्ही बाबांना सोडून जाऊ नका..!!”
आनंदी भाबडेपणाने त्यांना विनवत होती..
अण्णांच्या पोटात प्रचंड कालवाकालव झाली .. काल आलेली एक निरागस निष्पाप पोर त्यांना आपल्या मुलाला सोडून जाऊ नका असं जीव तोडून सांगत होती आणि ते
मात्र समाजातील मोठेपणाच्या भ्रामक कल्पनेपोटी, उच्च घराण्याच्या दुराग्रहापायी लहानाचा मोठा केलेल्या,
लाडानं वाढवलेल्या आपल्या मुलाला
मागचापुढचा विचार न करता सोडून चालले होते.!
र्हदयात उमललेल्या
उत्कट प्रेमभावानं आता अश्रूंच
रूप धारण केलं होत.
हातातला फोन अण्णांनी खाली ठेवला आणि धावत जाऊन त्यांनी आनंदीला छातीशी कवटाळलं..
“नाही जाणार पोरी.. आणि तूही नाही जायचं.!”
अण्णांच्या हुंदक्यातून कसेबसे शब्द बाहेर पडले.! एका नव्या दिनकर अण्णांचा जन्म झाला होता..!!
आणि आनंदीनं त्यांचे डोळे पुसत हातातलं कॅडबरीचं पॅकेट त्यांच्यासमोर धरत विचारलं होतं…
“आजोबा.. मी राहीन पण उद्यापासून मला रोज एक नवीन गोष्ट सांगणार ना.?
कृष्णकेशव.