आगळावेगळा आनंद – श्रध्दा जहागिरदार….
आगळावेगळा आनंद
‘वृध्दाश्रम’ ही संकल्पना सध्या खुप प्रचलित आहे. जिकडे तिकडे आज आपल्याला ‘वृध्दाश्रम’ पहायला मिळतात. ‘वृध्दाश्रम’ हा बोर्ड वाचला की न जाणो आपल्या पोटात थोडी कालवाकालव होते. मनात विचार येतो, काय माहित उद्या आपल्याला पण येथे यावे लागले तर………
आधिच्या काळात ‘वृध्दाश्रम’ होते का ओ? त्या वेळी ही निराधार लोक (मी निराधारच म्हणेन) कारण येथील काही लोकांना सांभाळायला कोणी नाही, म्हणून ती वृद्धाश्रमात आलेली असतात. सर्वच निराधार नसतात. तर निराधार लोक नव्हते का?
तर मुद्दा हा की आधीच्या काळी माणसे म्हातारी होत नव्हती? त्यांची आपत्ये एवढी चांगली होती की ती आपल्या आईवडिलांना अशी वार्यावर सोडत नव्हती? एवढी श्रीमंती पैसा होता का की आई, वडील, भाऊ, बहिण त्यांना असे एकट्याला टाकले जात नव्हते.
मुद्द्यावर येते. काल आपल्या युनिटी मधील आम्ही 5 जण मिलिंद खुरसाळे, मधुर, मी, सुहासिनी, सुधाकर एका ‘वृध्दाश्रम’ मध्ये जाऊन त्या लोकांसमोर काही गाणी सादर केली. युनिटी मधील बरेच जण अनाथाश्रम, वृध्दाश्रम, सिप्ला कॅंसरग्रत लोकांचे सेंटर तेथे जाऊन गाणी सादर करतात. पण माझा आजचा पहिलाच अनुभव आहे. काल मी एकंदरीत तिथली परिस्थिती पाहिली , तो ‘वृध्दाश्रम’ चालवणार्या ताईंशी बोलले ते मनात हे सर्व विचार आले. मला जो काल अनुभव आला तो आज आपल्याला सांगवासा वाटला.
तेथे गेल्यावर माझ्या मनात आले, त्या लोकांची एकंदरीत शारीरिक, मानसिक, काही जणांच्या चेहर्यावर आपल्याला कोणी नाही यामुळे निर्माण झालेली दुर्बलता, भावनांची छाप, हे दृष्य पाहून असे वाटले “आपण गाणी म्हणणार, ह्या लोकांना काय कळणार आहेत ती. उगाच आलो आपण येथे. असे काहीसे मनात विचार आले. पण मंडळी आम्ही जसजशी गाणी सादर करत गेलो तसतसा त्या लोकांच्या चेहर्यावर आनंद पसरू लागला. प्रत्येक गाण्याच्या वेळी मी त्यांच्या चेहर् याकडे पहात होते. प्रत्येकाच्या चेहर्यावर हास्याची रेषा उमटू लागली.
आपल्या मधील खुप गायकांना हे अनुभव आहेत, पण मला हा अनुभव नवीनच होता. त्यांच्या हास्याची, शारीरिक हालचालीची (शारीरिक हालचाल म्हणजे ती लोक नंतर बेड वरून उतरून नाचू लागली) तसतसा आमच्या गाण्याचा उत्साहाचा आलेख चढत गेला. सहसा आपण लोक एखाद्याच्या गाण्यावर टाळ्या वाजवतो, पण ती लोक एवढ्या आनंदाने प्रतिसाद देत होती की मी तर अवाक च झाले. सर्वांना सर्व गाणी पाठ. 85 वर्षाच्या एक आज्जी आमच्या जवळ येऊन आम्ही गाणं म्हणताना नाचता येत नव्हते(वृध्दत्वामुळे) तरी पण नाचू लागल्या.
त्याच वेळी माझ्या मनात विचार आला ही खरी रसिकता, ही खरी दाद. तो हॉल एका तासा करता आनंदाने भरून गेला होता. पण मला मात्र तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद होता. मी गाणं म्हणत होते पण मनात विचार गुंतत चालले होते. जिवनात आनंद किती महत्वाचा आहे. ‘त्या म्हातार् याला, म्हातारीला काय कळते’ असे आपण सहज म्हणतो. पण ती लोक कळण्याच्या पलिकडे असतात. कोणाला आनंद, खुशी, हास्य नको असते का? दिवसभरात मिळालेला क्षणिक आनंद पण खुप महत्वाचा असतो.
कार्यक्रम संपल्यावर त्या लोकांना जो आनंद मिळाला होता तोच मोठ्या प्रमाणात मला मिळाला होता. घरी जाताना टॅक्सी मध्ये विचार करत होते ‘दुनिया बदल रही है, लेकीन इतकी की अपने अपने को पराये हो रहे है’ सध्या समाजात ठिकठिकाणी जशी दवाखाने दिसतात तशी उद्या गल्लोगल्ली ‘वृध्दाश्रम’ दिसणार आहेत. प्रत्येक माणसाला किंवा यक्तिगत कोणालाच दोष नाही येथे. काहींची अशी पण परिस्थिती असते की त्यांच्या मागेपुढे कोणीच राहिलेले नसते. अशा लोकांना सरकारने वृध्दाश्रम उपलब्ध करून दिले, खुप चांगली गोष्ट आहे. काही मुलांची आपल्या पालकांना सांभाळण्याची परिस्थिती, मानसिकता, प्रेम असते. पण त्यांच्या रोजच्या धावपळीमुळे त्यांना हे शक्य होत नाही. आणि अशी पण मुलं आहेत परिस्थिती चांगली आहे ते म्हटलं तर पालकांना सांभाळू शकतात पण त्यांचे म्हातारपण करणे नको, त्यांचे वृध्दत्व त्यांना जड झालेले असते अशी लोक पण तेथे होती. ‘वृध्दाश्रमामुळे’ त्या लोकांची रहाण्याची, खाण्या-पिण्याची, औषध पाण्याची चांगली सोय होते. अशा संस्थांना भरभरून मदत करणारी लोक पण समाजात आहेत.
तरी पण ‘वृध्दाश्रम’ म्हटले किंवा त्या नावाची पाटी वाचली की त्या पाटीकडे केविलवाण्या नजरेने पाहतो. खरे आहे ना मंडळी? त्या लोकांबद्दल नकळत मनात किव निर्माण होते.
टॅक्सीत बसल्या बसल्या ईतका विचारांचा गोंधळ निर्माण झाला की उतरताना एकच विचार आला ‘जाऊ दे बाई, आज आपण आपल्याच समाजातील लोकांना आनंद वाटला व माझा पण आनंद द्विगुणित केला’.
पण शेवटी देवाला एक मागणं मागते
” देवा पुढच्या वेळी मानव निर्मिती करशील त्या वेळी अशी सोय कर की घरातील सगळ्यांचा अंत हा एकाच वेळी होऊ दे. गेलेल्या माणसाचा शोक, दु:ख पचवायला कोणाला मागे ठेऊ नकोस” 🙏
– श्रध्दा जहागिरदार….