मनोरंजन

शंभू राजे  ………… प्रदीप केळुसकर

शंभू राजे
प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९
स्थळ – शिवाजी मंदिर दादर
एका मोठ्या संस्थेच्या या ऐतिहासिक नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग, संपूर्ण थिएटर हाऊसफुल्ल. मला कसेबसे बाल्कनीतील तिकिट मिळालेले. अनेक विशेष आमंत्रित, पत्रकार यांच्या उपस्थितीत पहिला प्रयोग सादर होतोय. या नाटकातून एक नवीन कलाकार संभाजीच्या भूमिकेत रंगभूमीवर येतोय. आणि हा नवीन संभाजी कोकणातील माझ्या भागातला म्हणून मी कॉलेजला दांडी मारुन शिवाजी मंदिरमध्ये आलोय.
तिसरी घंटा झाली आणि प्रेक्षकगृहात काळोख झाला, रंगमंचावर पात्रपरिचय सुरु झाला आणि शेवटी जाहिर झाले – शंभूराजेच्या भूमिकेत रवी साटम. टाळ्यांचा कडकडाट, पडदा हळूहळू बाजूला सरकू लागला. मला स्टेजवरील व्यवस्थित दिसत नव्हते. पण मान उंच करुन स्टेजवर पाहत होतो. पहिल्या प्रवेशात औरंगजेब बादशहाचा प्रवेश त्याचे सरदार, शिपाई यांचेसह आणि दुसर्या प्रवेशात राणी येसूबाईच्या महालाचा प्रवेश. एवढ्यात रंगमंचावर तडफदार संभाजी महाराजांची एन्ट्री. एन्ट्रीलाच जोरदार टाळ्या. या संभाजीने अख्ख स्टेज व्यापून टाकलं. त्याची भरदार शरीरयष्टी, तेजस्वी डोळे, दमदार घोगरा आवाज या संभाजीने लोकांची मन जिंकली. इतरही पात्रे येत होती पण माझे चित्त एकाग्र झाले होते शंभूराजेंवर. पहिला अंक संपला आणि मी चहा प्यायला शिवाजी मंदिरच्या कॅन्टीन जवळ आलो. इथे नाटकासंबंधी चर्चा सुरु होत्या. जो-तो नव्या संभाजीची स्तुती करत होता. लोकसत्तामध्ये परीक्षण लिहिणारे कमलाकर नाडकर्णी माधव मनोहरांसोबत चहा घेत होते. मी हळूच त्यांच्या बाजूला उभा राहून त्यांचे बोलणे ऐकत होतो. कमलाकर नाडकर्णी माधव मनोहरांना सांगत होते, ‘‘हा काशिनाथ घाणेकरांच्या तोडीचा संभाजी या साटमने उभा केला. या कलाकाराचे भवितव्य उज्वल आहे.’’ माझी कॉलर ताठ होत होती. यानंतर दुसरा अंक, तिसरा अंक. तिसर्या अंकात संभाजीला हालहाल करुन मारले जाते. हा इतिहास तोंडपाठ असूनही लोक सद्गतीत होत होते. काही स्त्रीया रडत होत्या. मी मात्र भारावून गेलो होतो. या नवीन संभाजीत दम होता. माझ्या मनात आले. आपण याला आतमध्ये जाऊन भेटूया. तुम्ही आमच्या गावात आहात हे त्याला सांगूया. नाटकाचा पडदा पडल्यानंतर मी आत गेलो. अनेक प्रेक्षक आतमध्ये येऊन निर्मात्याचे, दिग्दर्शकाचे, कलाकारांचे अभिनंदन करत होते. माझे लक्ष फक्त शंभूराजेंकडे होते. शंभूराजे आपला मेकअप उतरवत होते. लोकांचे अभिनंदन स्विकारत होते. मी एकाबाजूला उभा राहून त्यांना न्याहाळत होतो. हळूहळू संभाजीचे कपडे बदलून नेहमीचे कपडे घालून रवी साटम बाहेर आले. मी पुढे होत त्यांना नमस्कार केला. त्यांनीपण मला नमस्कार केला. मी सहीसाठी वही पुढे केली. ते सही करत असताना मी त्यांना म्हणालो, ‘‘शंभूराजे, मी नवीन महाजन. मी पण तुमच्याच गावचो.’’ माझे हे मालवणीतून बोलणे ऐकून साटम खुश झाले.
‘‘अरे व्वा !, मुंबईत काय करतसं ?’’
‘‘पारले कॉलेजमध्ये बी.एस्सी. करतयं, तुमी या नाटकात आसात म्हणून वर्गात दांडी मारुन इलय.’’
‘‘व्वा, व्वा. पण कॉलेजात दांडी मारु नको हां. नायतर माझ्यासारखी परिस्थिती, नाटकाच्या वेडापोटी शिक्षण अर्धवट रवलां, तुम्ही शिक्षण घ्या.’’
‘‘पण तुम्ही आता मोठे हिरो झालात.’’
‘‘अरे हिरोचो झिरो व्होवक वेळ लागणा नाय, शिक्षण कायम आपल्यासोबत रवतां.’’
मी हसलो, माझ्या डोक्यावर टपली मारुन साटम बाहेर गेले. तिथे त्यांचे मित्र वाट पाहत होते. मी रोज वर्तमानपत्रातील नाटकाच्या जाहिराती पाहत होतो. शंभूराजेंच्या नाटकाच्या जाहिराती आल्या की, मी मोठ्या कौतुकाने ‘‘आणि शंभूराजेच्या भूमिकेत – रवी साटम’’ हे वाक्य पुन्हा पुन्हा वाचत होतो.
पाच वर्षानंतर –
ग्रॅज्युएशन नंतर मी नोकरीच्या मागे न लागता, आमच्या तालुक्याच्या गावी आलो. या सुमारास कोकणात आमच्या भागात एम.आय.डी.सी. नवीन व्यवसायासाठी भूखंड देऊन विविध व्यवसायासाठी योजना सुरु करत होती. त्यामुळे अनेक छोटे मोठे कारखाने सुरु होत होते. कर्ज देण्यासाठी नवीन बँका या भागात आल्या होत्या. माझ्या लक्षात आले. या भागात येणार्या कारखान्यांसाठी मशिनरी लागणार होत्या. त्या सर्व प्रकारच्या मशिनरी देणारा इथला स्थानिक माणूस हवा होता. या संधीचा फायदा घ्यायचं मी ठरवलं आणि मशिनरी एजन्सीचा व्यवसाय सुरु केला. व्यवसायाच्या पहिल्याच दिवसापासून चांगला प्रतिसादर मिळत होता. आता या भागात मशिनरी घ्यायची म्हणजे माझ्या एजन्सीचे नाव डोळ्यासमोर येत होते.
असाच नेहमीसारखा मी माझ्या एजन्सीच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. सकाळी ११ चा सुमार. माझ्या केबिनचे दार ढकलून एक गृहस्थ आत आले. मी त्यांच्या तोंडाकडे पाहताच एकदम आश्चर्य उद्गार बाहेर पडले. ‘‘कोण शंभूराजे ? तुम्ही इकडे कसे?’’
‘‘अरे व्वा, व्वा अरे कोणी शंभूराजे म्हणून हाक मारणारे आसत या जगात.’’
‘‘अहो म्हणजे काय? तुमची शंभूराजेची भूमिका डोक्यात फिट्ट बसलीया, ती तशी हालाची नाय.’’
‘‘बरा वाटला, तू माका ओळखतस ता. मी आपलो महाजन अॅण्ड कंपनी मशिनरी डिलर्स ह्या नाव ऐकून आत इलय. माका काय म्हायतं हयसर माझो फॅन आसा म्हणून..’’
‘‘पण तुम्ही हय कसे? एका मशिनरी डिलरच्या ऑफिसात?’’
‘‘अरे बाबा, हय आता एम.आय.डी.सी. वाल्यांनी प्लॉट देवकं सुरु केल्यानी, बँक कर्ज देता, मग विचार केलय की प्लास्टिक पिशवीचो कारखानो घालूचो म्हणून, म्हणून मशिनरी चौकशी करण्यासाठी इलय.’’
‘‘पण तुम्ही तर नाटकात बिझी, हय धंदो कोण बघतलो?’’
साटम
महाजन आणि कंपनीचा मालक नवीन महाजन म्हणाला, तुम्ही नाटकात बिझी. त्याला काय माहित आज या रवी साटमची काय परिस्थिती आहे. त्याने शंभूराजे म्हणून हाक मारली ते छान वाटले. पण या शंभूराजेला रंगमंचावरुन कधीच ढकलून दिले गेले आहे, त्या नाटक कंपनीचे ५५ प्रयोग मी शंभूराजे म्हणून हाऊसफुल्ल केले. अनेक दौरे पार पडले. सगळीकडे नुसतं कौतुक आणि कौतुक. पुण्यात मोठे सत्कार झाले. स्वतः पु.ल. देशपांडे, बाबासाहेब पुरंदरे यांनी स्टेजवर येऊन कौतुक केले. माझी छाती अभिमानाने फुलली.
त्यानंतर झी पुरस्कार जाहीर झाले. त्यात सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून मला पुरस्कार मिळाला. रविंद्र नाट्यमंदिर मध्ये पुरस्कार सोहळा होता. मी हजर होतो. सर्वोत्कृष्ठ नाटकाचा पुरस्कार आमच्या नाटकाला आणि सर्वोत्कृष्ठ अभिनयाचा पुरस्कार मला मिळाला. टाळ्यांचा कडकडाट, असंख्य फोटोग्राफर्स, व्हिडीओ कॅमेरेवाले शुटींग करत होते. सर्व रती-महारथी कलाकार, दिग्दर्शक, निर्माते माझे अभिनंदन करत होते. मी हवेत होतो. कार्यक्रम संपला आणि मी गेटच्या बाहेर पडलो. एवढ्यात माझ्या बाजूला एक अलिशान गाडी येऊन थांबली. ‘‘कुठे जायचं आहे?’’
‘‘ग्रँटरोडला.’’
‘‘बसा, आम्ही त्याच बाजूला जातोय.’’ गाडीचा मागचा दरवाजा उघडला, मी आत बसलो. त्या वातानुकूल गाडीत मागच्या सीटवर उंची कपडे घातलेले हनुवटीवर दाढी ठेवलेले गृहस्थ माझ्याकडे चष्म्यातून पाहत होते.
‘‘अभिनंदन, आजच्या पारितोषिकाबद्दल.’’
‘‘धन्यवाद !’’ मी म्हणालो.
या गृहस्थाला मी कोठेतरी पाहिले आहे असे वाटत होते.
‘‘मला ओळखलंत का?’’
‘‘नाही’’
‘‘नवीन आहात का?’’
‘‘हो.’’
‘‘मी वसंत कोल्हे.’’
आत्ता माझी ट्युब पेटली. नाट्यसृष्टीतील एक नंबरचे निर्माते हे. यांची पाच नाटके एकाचवेळी रंगभूमीवर होती. वर्षाला कमीत कमी नवीन चार नाटके त्यांच्या संस्थेमार्फत रंगभूमीवर येत होती. त्यांचा राजकारण्यांसोबत घरोबा होता. अनेक सांस्कृतिक संस्थांवर ते होते. थोडक्यात मराठी रंगभूमीवरील दादा माणूस. मी कोल्हेंना नमस्कार केला.
‘‘सॉरी हं साहेब, एकदम लक्षात नाही आलं.’’
‘‘असू दे असू दे. तुझा संभाजी सध्या गाजतोय.’’
‘‘माझी फक्त संभाजीची भूमिका. नाटक कंपनीचे मालक यशवंतराव, त्यांचे नाटक गाजतंय म्हणायचं.’’
‘‘काय तो यशवंतराव ²²²²²²’’
कोल्हे चक्क यशवंतरावांना शिव्या देत होते.
‘‘तुझ्या या नाटकाचा तो निर्माता आहे म्हणून तुला राग येईल, पण ह्या यशवंताची चार नाटके पडली, कर्जबाजारी झाला होता. कुठली बँक ह्याला कर्ज देईना. शेवटी माझ्या शब्दाला मान देऊन त्या पुण्याच्या बँकेतून मी याला कर्ज मिळवून दिले. दौरा करायला बस नाही म्हणून माझी बस याला वापरायला दिली. तर हा हरामखोर माझे कलाकार फोडतो? आता बघतोच त्याला. याची नाटकं नाय बंद केली तर नावाचा वसंता नाही.’’
‘‘बर ते असूदे, तुमचा संभाजी महाराष्ट्रभर गाजतोय हे खरंय, पण कस असतं साटम, एका नाटकाच्या जीवावर या महागाईत मुंबईसारख्या ठिकाणी राहणे कठिण. खर्च किती वाढलेत हो? आणि समजा हे नाटक बंद पडलं तर खायचं काय? इथे ना पगार ना पेन्शन. आणि एकदा बाहेर गावचे दौरे झाले म्हणजे नाटकाचे प्रयोग हळूहळू कमी होतात. मग तुमचा कसा भागायचा? या करिता आणखी एखादे नाटक हवे आपल्यापाशी. एका दगडावर उभे राहू नये. तो दगड पायाखालून सटकला तर काय करायचे? म्हणून म्हणतो, मी एक नवीन नाटक काढतोय, सोळंकी आहे दिग्दर्शक. या नाटकात तुझ्यासाठी मोठी भूमिका ठेवली आहे मी. तुला या संभाजीच्या भूमिकेचे किती मिळतात?’’
‘‘पंधराशे रुपये’’
‘‘मी तुला प्रत्येक प्रयोगाचे दोन हजार देतो. आणि तुला माहिती आहे माझे दर महिन्याला मुंबईत आणि मुंबई बाहेर मिळून कमीत कमी वीस प्रयोग असतात. म्हणजे माझ्या नाटकाचे दर महिन्याला कमीत कमी चाळीस हजार रुपये कुठे गेले नाहीत.’’
‘‘पण साहेब, मी दुसर्या नाटकात भूमिका घेतली तर यशवंतरावांना राग येईल.’’
‘‘त्याला कशाला राग येतोय? आमच्या नाटकांच्या तारखा, आमचा मॅनेजर तुला एक महिना आधी देईल. दौरे दोन महिने आधी ठरवतो आम्ही. बाकीच्या तारखा त्याला दे. आणि तो काही चिडायचा नाही. कारण तुझ्या संभाजीच्या भूमिकेमुळे त्याचं नाटक चालतंय हे लक्षात ठेव. दुसरा कुणी घेऊन ते नाटक प्रेक्षक स्विकारणार नाहीत आणि पंधराशे रुपयात मोठे नट काम करणार नाहीत. त्यामुळे तू बिनधास्त रहा आणि जास्त विचार करु नकोस. उद्या सकाळी साहित्य संघ मंदिरात अकरा वाजता ये. मी तिथे आहे. तुझी सोळंकीची गाठ घालून देतो.’’
माझ्या चुलत भावाची खोली जवळ आल्यावर मी उतरलो. गॅलरीत माझी पथारी घालून झोपल्यावर रात्रभर विचार सुरु होता. काय करावे? एका बाजूला वाटत होते यशवंतराव चिडले तर पंचाईत, दुसरीकडे कोल्हेंनी दिलेली ऑफरपण महत्त्वाची. कोल्हेंचे नाटक स्विकारले तर महिन्याला चाळीस हजार मिळण्याची खात्री. शेवटी ठरविले उद्या साहित्य संघामध्ये जायचे.
दुसर्या दिवशी साहित्य संघात पोहोचलो. कोल्हेंनी आणि दिग्दर्शकाने जोरदार स्वागत केले. गेल्या गेल्या चहा, मग इतर कलाकारांची ओळख. कोल्हेंच्या मॅनेजरने माझ्या हातात कराराची प्रत दिली. त्यात प्रत्येक प्रयोगाचे दोन हजार रुपये देण्याचे कबूल केले होते. यशवंतरावांच्या कंपनीत असे काहीच नव्हते. सर्व तोंडी कारभार. मला नाटकाची प्रत देण्यात आली. सोळंकींनी नाट्यवाचन केले. माझ्या सोबत नायिका म्हणून मराठी सिनेमासृष्टीतील मोठी कलाकर होती. बाहेर गावी दौर्याच्यावेळी ए.सी. बस आणि राहण्याची व्यवस्था टू स्टार हॉटेलात. एकंदरीत कोल्हेंच्या कंपनीत सर्व झकपक होते. त्याच दिवशीपासून नाटकाची तालिम सुरु झाली.
दोन दिवसांनी यशवंतरावांच्या नाटकाचा मुंबईत प्रयोग होता. मी नाटकाला गेलो पण लक्षात आले की, वातावरण तंग आहे. कलाकारांच्यात आणि स्टेजच्या मागील लोकांची कुजबूज सुरु आहे. मी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि नेहमीप्रमाणे प्रयोग केला. इकडे कोल्हेंच्या नाटकाच्या तालिमीपण सुरु होत्या. पुढील रविवारी यशवंतरावांच्या नाटकाचा ठाण्यात प्रयोग. सकाळी ११ चा प्रयोग केला आणि दुपारच्या प्रयोगासाठी रंगभूषा करत होतो. एवढ्यात यशवंतरावांचे मॅनेजर जवळ येऊन म्हणाले, नाटक संपल्यावर साहेबांनी घरी बोलावले. मी गाडी घेऊन येतो. आपण सोबतच जाऊ. मी समजलो. काहीतरी घडणार आहे. काय होईल त्यासाठी मनाची तयारी करायला हवी. प्रयोग संपल्यावर मॅनेजर सोबत यशवंतरावांच्या घरी वरळीला पोहोचलो. यशवंतराव व्हिस्कीचा पेग भरून बसले होते. मला पहाताच चिडून बोलू लागले- ‘‘त्या कोल्ह्याच्या नादाला लागलास ? तुला माहिती आहे ना त्याचे आणि माझे हाडवैर आहे म्हणून. तो मुद्दाम माझी माणसं फोडतोय. माझं बर चाल्लेल नाटक त्याला बघवत नाही. पण न्हाई त्या कोल्ह्याला एकदिवस मातीत घातला तर बाचं नाव सांगणार नाही, आणि तू हरामखोर तुला गटारातून उचलून मी संभाजी केला तर तुझी एवढी मजाल? मला न सांगता त्याची तालिम करतोस? अरे चल फूट आता दुसर्या प्रयोगात दुसरा संभाजी उभा करतो की नाही बघ. आता मला परत तोंड दाखवू नकोस. आणि एक लक्षात ठेव. या यशवंताशी दगलबाजी करणे तुला महागात पडेल. मी नाट्यनिर्माता संघाचा अध्यक्ष आहे. तुला कोण कसं कुठल्या नाटकात घेतो ते मी पाहतो. न्हाई तुला भायेरा केला तर नावाचा यशवंत न्हाय. चल चालता हो. परत मला तोंड दाखव नकोस.’’
मी मान खाली घालून बाहेर पडलो. संभाजीची भूमिका करुन एक प्रकारची धुंदी मी अनुभवत होतो. आता मोठ्या जड अंतःकरणाने संभाजीची वस्त्रे खाली ठेवायला हवीत. कोल्हेंच्या नाटकाच्या तालमी सुरु होत्या. पण या नाटकात माझे म्हणावे तसे मन लागत नव्हते. कारण माझा जन्मच शंभूराजेंच्या भूमिकेसाठी होता. इतर भूमिका म्हणजे नाईलाज होता.
अत्यंत विमनस्क मनाने मी कोल्हेंच्या नाटकाचे प्रयोग सुरु केले. पहिल्याच प्रयोगात लक्षात आले नाटक प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत नाही आहे, मुळात लेखनात दम नव्हता. कलाकारांची निवड चुकली होती. मी शंभूराजेंच्या भूमिकेत जसा जीव ओतला होता तसे या नाटकात जीव ओतण्याची इच्छा होत नव्हती. आठ प्रयोगानंतर नाटक बंद पडले.
नाटकाचा मेकअपमन रामूदादा याच्याशी मी गप्पा मारत होतो.
‘‘रामूदादा, माझी दोन्ही नाटके गेली, आता माझ्याकडे नाटक नाही.’’
‘‘साटम, तुला सांगतो हा नाटकाचा धंदा आहे बाबा, इथं कोण कुणाचं नसतं, जर तुझा सुर्य तळपत असेल तर तुझा जयजयकार करतील. आणि सूर्य मावळला तर पायाखाली घेतील. इथे खूप हेवेदावे आहेत. मत्सर आहेत. इथे राजकारण एवढे आहे की दिल्लीतील राजकारण झक मारते यापुढे. साटमा तुझा नशीब गांडू कारण सुरवातीक हे दोन लांडगे तुका गावले. त्यांच्या नाटकातून तू बाहेर पडलस आता तुका खयसरचं तुका ते स्थिरावूक देवचे नाय. तू संभाजी गाजवलस ह्या खरां, पण हेंका तेची किंमत नाय रे. माका विचारशीत अजून तरुण आसस, कायतरी कामधंदो बघ. नायतर गावाकडे जा. तिकडे आता एम.आय.डी.सी. इली हां. सरकारचे नवीन स्किम आसतत. तेचो फायदो घे. आणि लवकर या मुंबईतून बाहेर पड.
मी रामूदादाचा सल्ला मानला. आपल्या गावाकडे काहीतरी करुया. एम.आय.डी.सी. मध्ये प्लॉट मिळाला तर लहानशी फॅक्टरी खोलू असा विचार करुन गाव गाठले. आणि आता हा महाजन आणि कंपनीचा मालक महाजन मला विचारतोय –
‘‘तुम्ही इथे कसे? आणि कारखाना कोण बघणार?’’
महाजन
रवी साटमनी त्याचा मुंबईतील नाटक प्रवास आणि नाट्य व्यवसाय आणि शंभूराजेच्या भूमिकेतून बाहेर पडावे लागणे हे सविस्तर सांगितले. या हाडाच्या कलावंताला अशी वागणूक नाट्य व्यवसायातून मिळाली याचे वाईट वाटले. मी त्यांना प्लास्टिक पिशवी उत्पादनासंबंधी लागणार्या मशिनरींबद्दल माहिती दिली. तसेच एम.आय.डी.सी. मध्ये जागेकरिता अर्ज करण्याची सुचना केली. साटम त्यांच्या मूळगावी काकांकडे राहत होते. ते अविवाहित होते. साटमनी प्लॉटसाठी अर्ज सादर करुन ६ महिने झाले तरी त्यांना एम.आय.डी.सी.कडून कसलेही उत्तर येईना. ते वारंवार ऑफिसला जात होते पण टोलवाटोलवी सुरु होती. एकदा ते त्या ऑफिसला गेले असताना एक माणूस भेटला. त्याने त्यांना सांगितले असा नुसता अर्ज करुन प्लॉट मिळेपर्यंत तुम्ही म्हातारे व्हाल. प्लॉट देणारे काही एजंट आहेत त्यांना भेटा. त्याप्रमाणे साटम अशा एजंटना भेटले. त्या एजंटने दहा हजार रुपये गुंठा असलेली जमीन दिड लाख रुपये गुंठा दराने सांगितली आणि एका महिन्यात तुम्हाला जमिन मिळवून देतो असा शब्द दिला. साटम चिडले. आणि माझ्या ऑफिसात आले. मी त्यांना सांगितले असा प्लॉट मिळविणे, मग कर्ज घेऊन मशिनरी, मग उत्पादन हे सर्व तुमच्याकरिता कठीण आहे. मेकअपमन रामूदादाने धंदा व्यवसाय करा असे म्हटले तरी ते सोपे नाही. प्रत्येक ठिकाणी अडथळ्याची शर्यत पार करायला हवी. तुम्ही कलावंत आहात. शंभूराजे तुम्ही गाजवलात. आता नाटकातून तुम्हाला हद्दपार केले गेले हरकत नाही. आता विविध चॅनेलस् वर मालिका सुरु झाल्यात. त्यात तुम्ही प्रयत्न करा.
‘‘पण माझी ओळख नाय रे, ओळख नाय तर काम कोण देतलो ?’’
‘‘ठिक आहे, माझी थोडीफार ओळख आहे. मी तुमच्यासाठी प्रयत्न करु का? तुम्ही परत जाल का मुंबईत?’’
‘‘होय जाईन, नायतरी रिकामो रवानं काय करतलयं? माझ्या चुलत भावाकडे रवण्याची सोय होईल. पण काम मिळाक व्हयां.’’
‘‘ठिक आहे. ऋषीकेश जोशी माझा मित्र आहे कोल्हापूरात असतानाचा, त्याला मी फोन करतो तुमच्यासाठी.’’
‘‘हरकत नाही.’’
त्या रात्री मी ऋषीकेशला फोन लावला.
‘‘हाय ऋषीकेश!’’
‘‘बोल रे महाजन. किती दिवसांनी फोन.. ? काय विशेष…’’
‘‘होय बाबा, माझं जरा काम होतं. माझे जवळचे स्नेही आहेत रवी साटम नावाचे. ज्यांनी शंभूराजेंची भूमिका गाजवली होती.’’ आणि मी ऋषीकेशला साटम यांनी केलेली शंभूराजेची भूमिका आणि दोन निर्मात्यांच्या भांडणात त्यांचे संपलेले करियर त्यांनी व्यवसाय सुरु करण्याचा घेतलेला निर्णय हे सर्व सांगितले.
‘‘त्यांना चॅनेलस् वरील मालिकांचा पर्याय सांगितला. तरी तू त्यांना मदत कर, मी त्यांना तुझ्याकडे पाठवितो.’’
‘‘पाठव त्यांना. पण मालिकेच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडे मी त्यांची ओळख करुन देऊ शकतो. पण काम देणे न देणे हा त्यांचा निर्णय आहे. ओके ?’’
साटम
महाजनने मला जोशींकडे जायला सांगितले. मी व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न केला खरा. पण मला ते जमणार नाही हे लवकरच लक्षात आले. माझा जन्म अभिनयासाठी झालाय आणि शंभूराजेच्या भूमिकेत माझा जीव अडकलाय.
दिनानाथ नाट्यगृहात जोशींचे नाटक होते. तेथे मी त्यांना भेटलो. नाटक संपल्यावर जोशींनी माझी विचारपूस केली. माझी शंभूराजेची भूमिका त्यांनी पाहिली नव्हती परंतु त्याबद्दल अजूनही नाट्यवर्तुळात चर्चा होते हे त्यांनी सांगितले. त्यांनी चार मालिका दिग्दर्शकांना फोन करुन माझ्या विषयी सांगितले. त्यातील एकाने दुसर्या दिवशी मढ येथे भेटायला बोलावले. मी जोशींचे आभार मानून निघालो.
उद्या पहिल्या मालिका दिग्दर्शकाला भेटणार म्हणून आनंद झाला खरा पण हल्ली पोटात अधूनमधुन दुखत असते. त्यामुळे डॉक्टरकडे जाऊन तपासणी करणे पण भाग होते. पण पहिल्यांदाच काम मिळते का पाहू म्हणून दुसर्या दिवशी मढ मध्ये जाऊन मालिका दिग्दर्शकाला भेटलो. त्यांना एका भूमिकेसाठी एका कलाकाराची गरज होती. त्यामुळे त्याच दिवसापासून माझे मालिकेतील काम सुरु झाले. फोन करुन मी महाजनला ही आनंदाची बातमी सांगितली.
मालिकेमध्ये मी काम करु लागलो खरा पण मला हे माध्यम नवीन. इथे सर्वकाही घाईत. पाठांतर करायला आणि भूमिकेचा विचार करायला वेळच नाही. त्यामुळे मी सतत चुकत होतो. नाटकाच्या आणि मालिकेच्या अभिनयात खूप फरक. त्यामुळे दिग्दर्शक एकसारखा ओरडत होता. त्यात माझे पोट दुखणे सुरु होते. पण रोज दोन एपिसोड शुटिंग करण्यामुळे पोटदुखण्याकडे दुर्लक्ष झाले. एवढ्या मेहनतीनंतर लक्षात आले की, पैसे फारच कमी मिळतात. फक्त मोठ्या कलाकारांचे लाड इतरांचे अपमान. रंगभूमीवर आपण आपले राजा असतो आणि झटपट प्रसिध्दीसाठी या मालिका.
तो रविवार होता. आजच्या दिवसात दोन महाएपिसोड शुट व्हायचे होते. सकाळी ६ पासून कामाची घाई सुरु झाली होती. मी सहावाजता सेटवर पोहोचलो पण काल रात्रौपासून पोटदुखीने हैराण झालो. पोटदुखीवरील गोळ्या घेऊन माझे काम चालू होते. सकाळी अकराची वेळ. माझा शॉट होणार होता म्हणून मी मेकअप करुन मोठ्या कॅमेर्याच्या बाजूला उभा होतो. पोटात दुखत होते म्हणून डावा हात पोटावर घेऊन उजव्या हाताने खिशातील रुमाल बाहेर काढणार एवढ्यात काही कळायच्या आत डोळ्यासमोर भोवळ आली आणि सोबतचा कॅमेरा अंगावर घेऊन मी कोसळलो.
महाजन
सायंकाळी ४ ची वेळ. मी मित्रांबरोबर चहा घेत गप्पा मारत होतो. एवढ्यात फोनची रिंग झाली. मला चॅनेलवरुन एका माणसाचा फोन होता. घाईघाईत म्हणाला, ‘‘आपण महाजन काय? तुमचे स्नेही साटम यांना केईएम मध्ये अॅडमिट केलयं. आज सकाळी शुटींग सुरु असताना ते भोवळ येऊन पडले आणि अंगावर कॅमेरा पडला. त्यांच्या मोबाईलमध्ये ज्यांचे ज्यांचे फोन होते त्या प्रत्येकाला फोन केला. पण कोणी दाद घेतली नाही. म्हणून तुमचा नंबर मिळाला, तुम्हाला फोन करतोय. त्यांची तब्बेत नाजूक आहे.’’
मी सटपटलो. माझे शंभूराजे गंभीर आहेत? मला ताबडतोब निघालेच पाहिजे. त्यांना जवळचे कोणी नाही. शंभूराजेंना वाचवायलाच हवे. मी तातडीने निर्णय घेतला. घरी जाऊन बायकोला कल्पना दिली. सहा वाजता मी माझ्या गाडीने मुंबईला जायला निघालो.
सकाळी सहा वाजता परळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. कांऊंटरवर चौकशी करुन पाचव्या मजल्यावर अॅक्सिडंट वॉर्डमध्ये जाऊन साटमना शोधून काढले. डोक्यावर भलंमोठं प्लास्टर, हाताला प्लास्टर अशा परिस्थितीत समोर बेशुध्द साटम जनरल वॉर्डमध्ये एका कॉटवर होते. सलाईन सुरु होतं. माझ्या लक्षात आले. साटमना वाचवायचं असेल तर इथून बाहेर काढायला हवे. स्पेशल ट्रिटमेंट मिळायला हवी. काय करावे असा विचार करत असताना लक्षात आले, या हॉस्पिटलचे डिन डॉ. संजय ओक आहेत आणि ते आमच्या भागातील डॉ. नंदन सामंत यांचे साडू आहेत. लायन्स क्लबमुळे डॉ. नंदन सामंत परिचयाचे होते. डॉ. सामंत यांना फोन करुन साटम यांची परिस्थिती सांगितली आणि डॉ. संजय ओक यांना मला भेटायचे आहे असे सांगितले. डॉ. सामंत यांनी डॉ. ओक यांना फोन केला व मला परत फोन केला. मी नऊ वाजता डॉ. संजय ओक यांच्या केबिन बाहेर जाऊन आत चिठ्ठी पाठविली. डॉ. सामंत यांची शिफारस असल्यामुळे डॉ. ओक यांनी मला त्वरीत आत घेतले आणि साटमना पाचव्या मजल्यावर स्पेशल रुममध्ये हलविण्याची व्यवस्था केली. अर्ध्या तासात निष्णात डॉक्टरांकडून सर्व तपासण्या झाल्या. एका तासानंतर मला सांगण्यात आले त्यांचे अॅपँडिक्स फुटले आहे. त्यावर त्वरीत ऑपरेशन करणे जरुरी आहे. सायंकाळी पाच वाजता मुंबईतील एका मोठ्या सर्जनने साटमांवर सर्जरी केली. हे सर्व डॉ. ओक यांच्यामुळेच झाले याची मला जाणीव होती. ऑपरेशन थिएटर मधून पेशंटला बाहेर आणला. आता मी निर्धास्त झालो. लवकरच साटम बरे होणार होते. सकाळपासून मी उपाशी होतो. बाहेर जाऊन थोडे खाऊन आलो. रात्रौ त्याच वॉर्डमध्ये झोपलो.
सकाळी दहा वाजता डॉ. राऊंडला आले. त्यांनी पुन्हा तपासलं. साटमांचं ब्लड प्रेशर, पल्स रेट अनियमित होते. डॉक्टर काळजीत पडले. पुन्हा सर्व तपासण्या झाल्या. त्यांनी शुध्दीवर यावे म्हणून सर्व प्रयत्न सुरु होते. पुन्हा रक्त चढविले गेले. नवीन इंजेक्शन दिली गेली. पण साटम शुध्दीवर येत नव्हते. शेवटी केईएमचे माजी डीन डॉ. रवी बापट यांना बोलविले गेले. डॉ. बापट हे अनेक नाट्य कलाकारांचे मित्र. डॉ. घाणेकर, पणशीकर, मोहन वाघ यांचेवर त्यांनीच ऑपरेशन्स केली होती. एक नाट्य कलाकार कोमामधून बाहेर पडत नाही हे ऐकून डॉ. बापट स्वतः आले. सर्व रिपोर्ट पाहिले. पेशंटसोबत मी होतो हे पाहून मला म्हणाले,
‘‘वैद्यकिय शास्त्र पेशंटला बरे करते हे खरे, पण पेशंटची मनातून बरे होण्याची इच्छा नसेल तर कोणी काही करु शकत नाही. या पेशंटला जवळचे कोणी नाही असे म्हणता त्यामुळे आपण त्यांना बोलावू शकत नाही. पण तुम्ही असे काही तरी करा ज्यामुळे त्यांना जगण्याची इच्छा निर्माण होईल. पेशंटची विल पॉवर महत्त्वाची आणि एक लक्षात ठेवा, वेळ फार थोडा आहे. ब्लड पे्रशर सतत वर खाली होणे, आणि हृदयाचे ठोके अनियमित होणे हे हृदयासाठी आणि मेंदूसाठी धोकादायक आहे.
डॉ. रवी बापट गेले. मुंबईतील निष्णात डॉक्टर शंभूराजेंवर उपचार करत होते. पण माझे शंभूराजे डोळे उघडत नव्हते.
केईएम हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरुन मी खिडकीतून बाहेर पाहत होतो. जून महिन्याचा पहिला आठवडा होता. आकाशात ढग जमले होते. पाऊस कोणत्याही क्षणी बरसेल अशी चिन्हे होती. पण मी शंभूराजेंची विल पॉवर जागवू शकत नव्हतो. मी असहाय्य झालो होतो. डोळ्यात वारंवार अश्रू जमा होत होते. काय करावे? कसाला तरी चमत्कार व्हावा आणि शंभूराजेंनी डोळे उघडावेत असे वाटत होते. अचानक मी चमकलो. सकाळी घेतलेल्या लोकसत्तातली बातमी आठवली. मी माझ्या बॅगेतून लोकसत्ता बाहेर काढला. त्यातील पाचव्या पानावर आलेली बातमी पुन्हा वाचली. ‘‘दिग्दर्शक विनय आपटे संभाजी राजेंवर हिंदी आणि मराठीत महासिनेमा बनविणार. कलाकरांची निवड सुरु आहे.’’ होय हीच ती महत्त्वाची बातमी. मला उत्साह आला. डोळे पुसले आणि ऋषीकेश जोशीला फोन लावला. त्याचेकडून विनय आपटेंचा फोन घेतला. विनय आपटेंना फोन लावला. विनय आपटेंना रवी साटम उर्फ शंभूराजेंचा जीवन प्रवास सांगितला.
‘‘सर, रवी साटम यांना कोमातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे शंभूराजे. शंभूराजेंच्या भूमिकेतून ते अजून बाहेर पडले नाहीत. त्यांना जबरदस्तीने बाहेर काढलं आहे. शंभूराजेंची भूमिका हा त्यांचा श्वास आहे. आपण जर केईएम हॉस्पिटलमध्ये आलात आणि शंभूराजेंच्या भूमिकेबद्दल बोलत राहिलात तर कदाचित त्यांची जगण्याची विलपॉवर जागृत होईल. एक प्रयत्न करायला हरकत नाही.’’
‘‘अरे येतो रे महाजन… रवी साटम माझापण आवडता संभाजी आहे. त्याच्यासारखा संभाजी कोणाला जमलेला नाही. एका तासात हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. आणि खरेच एका तासात विनय आपटे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉ. संजय ओक, डॉ. रवी बापट हे त्यांचे मित्रच असल्याने त्यांच्याशी आधी ते सविस्तर बोलले. मग आम्ही सर्व पाचव्या मजल्यावर पेशंटपाशी आलो. ‘‘शंभूराजे, शंभूराजे, कोण आलेत ते पाहिलेत काय? अहो तुमचे आवडते दिग्दर्शक विनय आपटे आलेत. विनय आपटे सर राजा संभाजींवर मोठा सिनेमा बनवत आहेत आणि त्यातील शंभूराजे तुम्ही आहात. तेव्हा शंभूराजे जागे व्हा.’’
विनय आपटे पेशंट जवळ जाऊन म्हणाले, ‘‘शंभूराजे… तुमच्यासारखा संभाजी मराठी रंगभूमीवर याआधी कोणी केला नाही आणि यानंतर कोणी करणार नाही. मी आता छत्रपती संभाजी राजांवर महासिनेमा बनवतोय. आणि त्यातील शंभूराजे तुम्ही आहात. तुमच्या एवढा ताकदीने शंभूराजे उभा करणारा कोण आहे साटम? तेव्हा लवकरात लवकर बरे व्हा शंभूराजे. आपल्याला लवकरात लवकर शुटींग सुरु करायचे आहे.’’
अशा अनेक गोष्टी संभाजी महाराजांबद्दल विनय आपटे बोलत राहिले. सुमारे अर्ध्या तासानंतर डॉक्टरांच्या लक्षात आले, नाडीचे ठोके साधारण होत आहेत. ब्लड प्रेशर योग्य पातळीवर येत आहे. डॉक्टरनी माझ्या खांद्यावर थोपटले. माझे डोळे आनंदाश्रुंनी डबडबले. रात्रौपर्यंत शंभूराजेंच्या तब्ब्येतीत बर्यापैकी सुधारणा झाली. ते हात हलवू लागले. पापण्या हलवू लागले. दोन दिवसानंतर शंभूराजे कॉटवर टेकून पातळ पदार्थ घेऊ लागले.
पंधरा दिवसानंतर मी शंभूराजेंना घेऊन कोकणात माझ्या घरी आलो. आमच्या घरचे उत्तम जेवण, चांगली हवा, औषधे यांनी त्यांची तब्येत सुधरली. हळूहळू ते हिंडू फिरु लागले. हलका व्यायाम करु लागले. चार महिन्यानंतर विनय आपटेंनी ‘‘छत्रपती संभाजी महाराज’’ या सिनेमाचे शुटींग सुरु केले. आपटेंनी साटमांची मुंबईत राहण्याची व्यवस्था केली. हिंदी आणि मराठीत हा सिनेमा सहा महिन्यात तयार झाला. हा सिनेमा तुफान चालला. संपूर्ण भारतभर आणि जगात हा सिनेमा बघितला गेला आणि रवी साटमांचे शंभूराजे घरोघरी पोहोचले.
पुन्हा शिवाजी मंदिर, दादर …
आज पुन्हा शिवाजी मंदिर, दादर मध्ये विंगेत उभा आहे. पंधरा वर्षापूर्वी जे नाटक मी बाल्कनीतून पाहिले होते तेच नाटक सिनेमानंतर रवी साटम यांचे नाव प्रत्येकाच्या तोंडावर होते. विनय आपटेंनीच यशवंतरावांनी बंद केलेले नाटक रंगभूमीवर आणले. आणि शंभूराजेच्या भूमिकेत अर्थातच रवी साटम. सर्व ठिकाणी जाहिरातीतून साटमांचे नाव गाजत होते.
मेकअपसाठी पुन्हा रामूदादा. साटम मेकअपसाठी आले तेव्हा रामूदादाने त्यांना मिठी मारली. ‘‘साटमा, तू खरो कोकणी माणूस, अन्याय झालो तरी कोकणी माणूस रडत बसना नाय. आपल्या कृतीतून तेका उत्तर देता. पण तुका कसा काय जमला ह्या?’’
साटमांनी माझ्याकडे बोट दाखवून म्हणाले, ‘‘हो महाजन… माजो नाय नात्याचो, ना रक्ताचो… फक्त माझ्या शंभूराजेचो भक्त… तेनाच माझ्या अंगावर ही शंभूराजेची वस्त्रा चढवल्यानं.’’ साटम डोळे पुसीत म्हणाले.
नाटकाची तिसरी घंटा झाली आणि पात्र परिचय सुरु झाला आणि शंभूराजेच्या भूमिकेत रवी साटम. टाळ्यांचा कडकडाट.
पहिल्या रांगते मी बसलोय. माझ्या बाजूला ऋषीकेश जोशी, डॉ. संजय ओक त्यांच्या बाजूला डॉ. रवी बापट बसलेत.
नाटकाचा दुसरा प्रवेश, विंगेतून मोठ्याने बोलत शंभूराजे प्रवेश करत आहेत आणि त्याच क्षणी त्या नाट्यगृहातील आठशेहून अधिक प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करीत जागेवर उभे राहिलेत. दोन मिनिटे टाळ्या वाजत शंभूराजेंचे मराठी रंगभूमीवर स्वागत होते आहे. माझ्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली आहे. तशाच डोळ्यांनी मी बाजूला पाहतोय. ऋषीकेश जोशी, डॉ. संजय ओक, डॉ. रवी बापट हेपण हळूच डोळे पुसत आहेत.
रंगभूमीवर तिचा लाडका शंभूराजे पुन्हा एकदा राज्य करु लागला आहे….!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}