★★समिधा★★ ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★समिधा★★
कथा लिहून संपवली आणि माझा साहित्यातला गुरू माझा मित्र राकेश, ह्याला व्हाट्स अपवर कथा फॉरवर्ड केली. त्याने मला फोन केला आणि नेहमीप्रमाणे माझं खच्चीकरण केलंच. “जरा ट्रॅक बदल ना तुझा! त्याच सासवा सुनांच्या कजाग कथा, भाऊ बहिणीच्या गोड गोड कथा लिहितेस. तुझे फॅन्स,फॉलोअर्स वाढतील कसे? फेसबुकवर माझे फॉलोअर्स बघ. सात हजार आकडा ओलांडला आहे. काहीतरी स्पायसी, मीस्टीरिअस लिही न. सत्य वाटायला हवं लोकांना.”
“प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी प्रोब्लेम्स असतातच. ते विसरण्यासाठी,विरंगुळा म्हणून देखील काहीजण वाचतात. त्यांना नकारात्मक नको असतं. सुखांत हवा असतो राकेश.”
“वास्तव लिही आरती. बातम्या बघ,अनेक विषय सापडतील. माझी ‘हुकमी एक्का’ ही कादंबरी किती गाजतेय हे माहिती आहे न तुला? पुरस्कारासाठी निवड झालीय. वाचलीस ना तू?”
“घरात आणि बाहेर गलिच्छ राजकारण करणाऱ्या, एका निर्दयी माणसावर लिहिलेली तुझी ती कादंबरी, मी वाचलीय. इतकं उघड सत्य लिहायला माझी लेखणी तयार होईल की नाही, मला शंका आहे.”
” एक लेखिका म्हणून तुला नावारूपाला यायचं असेल तर लिखाणावर लक्ष दे.”
राकेशचं म्हणणं काही अंशी खरंच तर होतं. सत्य ओरबाडून लिहिलं की ते वाचकांपर्यंत पोहोचतं.
सकाळी लायब्ररीत जाण्यासाठी घराबाहेर पडणार इतक्यात श्रुजाच्या बहिणीचा फोन आला.हुंदके देऊन रडत होती. “आरतीताई,तू ताबडतोब …हॉस्पिटलमध्ये ये. ताई ऍडमिट आहे.”
मी तातडीने दवाखान्यात गेले. श्रुजा निपचित पडून होती. ओठ फाटले होते.अंगावर ओरबाडल्याच्या खुणा होत्या. तिला बघून मी हादरले. श्रुजाची आई सतत रडत होती. लहान बहीण तिला थोपटत होती. वडील कदाचित डॉक्टरांना भेटायला गेले असावे. नक्की काय झालं? कोणाशी बोलावं मला कळेना.
मी श्रुजाजवळ गेले. तिच्या कपाळावरून हात फिरवला. मला बघून श्रुजाला उमाळा आला आणि ती हुंदके देऊन रडायला लागली.
“श्रुजा,काय झालं? अपघात झाला का?”
श्रुजाने नाही म्हणून मान डोलावली. तिला जास्त त्रास नको म्हणून मी प्रश्न विचारणं बंद केलं. तिला शांत केलं. पण मनात पाल चुकचुकली. काहीतरी अघटित नक्कीच घडलं होतं.
दुसऱ्या दिवशी मी तिला भेटायला गेले. रूममधे ती आणि मी असताना ती म्हणाली,
“आरती, माझी प्रचंड घुसमट होते आहे. मला बोलायचं आहे तुझ्याजवळ सगळं!”
“श्रुजा, अग बोल की. तुला त्रास नको म्हणून मी जास्त प्रश्न विचारले नाही.”
“आरती,मी उध्वस्त झालेय ग. कंपनीतून रात्री दोन वाजता शिफ्ट करून माझी मैत्रीण आणि मी येत होतो. तिला घरी सोडल्यावर,मी एकटीच टॅक्सीत असताना माझ्यावर अतिप्रसंग झाला. माझं तोंड बांधून, हात बांधून, अंधारात, मला रस्त्यावर टाकून तो नराधम पळून गेला. काही वेळाने दोन तरुण मुलं मोटारसायकलवरून त्या रस्ताने जाताना दिसले. त्यांनी मला हात आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत बघितलं. गाडी थांबवून दोघेही माझ्याजवळ आले,माझे हात मोकळे केले. तोंडावरचा रुमाल मी काढला आणि हुंदके देऊन रडायला लागले. सगळ्या अंगावर ओचकारल्याच्या खुणा होत्या. कपडे अस्ताव्यस्त होते. माझं सुदैव,माझी पर्स त्या माणसाने चोरली नाही. माझ्या मोबाईलवर आईबाबांचे वीस मिस्ड कॉल होते. मी बाबांना फोन लावला. त्या मुलांना पूर्ण कल्पना आली होती पण त्या सभ्य मुलांनी एका शब्दानेही मला काहीही विचारले नाही. त्यांनी आईबाबा येईपर्यंत माझी पूर्ण काळजी घेतली. त्यांचे आभार मी मानले नाही. मला त्यांच्या ऋणातच राहायचं आहे. पुरुषाचे एक पाशवी रूप आणि दुसरं प्रेमळ रूप,दोन्ही एकाच वेळी मी अनुभवले. मला बघितल्यावर आई भीतीने थरथर कापायला लागली. आईबाबांना मी गाडीत सत्य सांगितले. दवाखान्यात मला आज सकाळी आणलं.आईबाबांना जबरदस्त शॉक बसला आहे,. लहान बहीण अजाण आहे. ती गोंधळून गेलीय. मला केस करायची आहे,पण आईबाबांना मान्य नाही. त्यांना बदनामीचं भय वाटतं आहे. मी गाडीवरून पडले आणि मला खरचटलं,जखमा झाल्या, हेच त्यांनी डॉक्टरांना सांगितलं आहे.”
श्रुजाने जे काही सांगितलं,ते ऐकून माझे हातपाय कापायला लागले. मी तिचा हात घट्ट धरला.
“श्रुजा,केस करणं सोपं नाहीय ग. तुझी प्रचंड बदनामी होईल. मनस्ताप होईल. पुरावे काहीच नसतील तर तू केस हरशील. सामान्य माणसांची हीच व्यथा आहे ग. तुझ्यावर ओढवलेल्या प्रसंगाची कल्पनाही करवत नाही. पण वस्तुस्थिती ही आहे की रेपच्या केसमधे सबळ पुरावे लागतात.”
“आरती…” श्रुजा गदगदून रडायला लागली. मैत्रीण ह्या नात्याने श्रुजाला मानसिक आधार देणं, माझं कर्तव्य होतं.
तीन दिवसांनी श्रुजा दवाखान्यातून घरी आली. तिच्या शारीरिक जखमा भरत आल्या होत्या, पण तिच्या मानसिक जखमेचं काय? ती आयुष्यभर तशीच भळभळ वाहणार होती. महिनाभर मी तिच्या घरी रोज जात होते. श्रुजा थोडीशी सावरली होती. तिने नोकरीचा राजीनामा दिला. श्रुजाच्या वडिलांनी ट्रान्सफर मागितली. मुंबई सोडायच्या आधी श्रुजाने मला फोन करून बोलावलं.
“आरती,तू कथा लिहितेस ना. माझ्या आयुष्यावर लिही. पण त्या कथेत केस कोर्टात गेली आणि मी जिंकले असं लिही. माझ्या मनाला तेवढंच समाधान मिळेल.माझ्या ह्या पुढच्या आयुष्यात काय घडणार आहे,हे मला देखील माहिती नाही, पण मी लग्न करणार नाही हे तर निश्चित! एक मनात दडवून ठेवलेलं ओझं घेऊन,मी कुणाला फसवू इच्छित नाही.”
“श्रुजा..” तिचा हात घट्ट धरत मी माझे डोळे पुसले.
कथा पूर्ण लिहून झाली. कथेला ‘समिधा’ नाव दिलं. श्रुजाने तिच्या मानसिक कुचंबणेच्या समिधा जनरीतीच्या होमात अर्पण केल्या होत्या.
राकेशला कथा पाठवली.
“अमेझिंग आरती. जबरदस्त लिहिली आहेस कथा. आता तुझे फॅन्स,फॉलोअर्स कितीतरी पटीने वाढतील बघ. कीप ईट अप. ह्यावर एक छान कादंबरी लिही आणि जरा अतिरंजीत प्रसंग लिही.”
राकेशला ओरडून सांगावं असं वाटलं की ही कथा, माझे फॅन्स आणि फॉलोअर्स वाढावे म्हणून लिहिलेली नाही, हे एक विदारक सत्य आहे. जे मी देखील उघडपणे सांगू शकत नाही. मला कथेचा आधार घ्यावा लागला.
आठवडाभराने फेसबुकवर बघितलं. माझे फॉलोअर्स कितीतरी पटीने वाढले होते…..
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे